चूक की बरोबर?

मला ‘क्लास’ सोडवला पण जात नाही आहे आणि आवडत पण नाही आहे अशा द्वंद्वात मी अडकलेली आहे.

..कसा सोडायचा ‘क्लास’? मी दहावीत आहे. शिकवणीची फी आधीच भरली आहे, ती परत मिळणार नाही, आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना सर्व विषयांच्या शिकवण्या आहेत. ते सर्व सकाळी साडेपाचला घरातून निघतात तर रात्री आठलाच घरात ! जर मी शिकवणी सोडली तर मी माझ्या सर्व मित्र मैत्रिणींपेक्षा अभ्यासात मागे राहीन. मग मला दहावीत कमी टक्के मिळाले तर? मला खूप टेन्शन येतं.

..मी जो इंग्रजीचा क्लास लावला आहे तो नाशिकचा नंबर वन ‘क्लास’ आहे.आठवीत असताना दहावीसाठी ‘booking’ करावे लागते तिथे.नववीत मी आले तेव्हा आईला घाबरायला झालं! ‘‘दिशा, तुझ्या admissionचं काय? मी पण किती बेजबाबदार आई निघाले, एवढा उशीर केला,’’ आई एकदा हळूच म्हणाली होती. सर्वांनी समजावले, अजून पण हातपाय हलव, कुठेतरी प्रवेश नक्की मिळेल ! आईने धावपळ सुरू केली. तिला मला सर्वात नामवंत क्लासमधे प्रवेश मिळवून द्यायचा होता.

‘दिशा, क्लासेस मधे प्रवेश घ्यावाच लागणार आहे कारण शाळेतले शिक्षक हे गृहीतच धरतात की मुलांना बाहेर शिकवण्या असतील, म्हणून ‘पोर्शन’ पण पूर्ण करत नाहीत, हा अनुभव आपल्या हाताशी आहेच’ आईची तळमळ दिसत होती !
मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आईने बेस्ट क्लासेस शोधून काढले. इंग्रजीच्या क्लासला मी रोज जाते. ह्या क्लासचे सर म्हणतात माझ्याकडे शिकवणी लावल्यावर बोर्डाच्या परीक्षेत पंधरा ते वीस मार्क वाढतात ! म्हणून त्यांच्याकडे प्रवेशासाठी खूप मोठी waiting list असते. आईने मला पाठवायचे ठरवले. त्यांच्या घरी फोन करायला मनाई होती. त्यांना भेटायची वेळ संध्याकाळी पाच ते सहा. आईने वीस चकरा मारल्या पण भेट काही होईना. एका संध्याकाळी सर घरीच सापडले.

‘‘ऍडमिशनसाठी आला असाल तर उद्या एक वाजता पाचशे रुपये घेऊन या.’’ सर आतूनच म्हणाले.

दुसर्‍या दिवशी परत मी आणि आई पैसे घेऊन एक वाजता सरांकडे गेलो. सर अंघोळ करत होते. आम्ही घराबाहेर सरांची वाट बघत होतो. सरांची अंघोळ मग पूजा, आम्हाला बाहेर उन्हात दहा मिनिटे झाली, वीस मिनिटे झाली… पण सर काही बाहेर येईनात. उन्हात आईचे डोके दुखू लागले पण परत घरी जाणं अशक्यच होतं, प्रवेश हवाच होता. शेवटी पाऊण तासाने सरांनी आम्हाला घरात बोलावले.

‘‘पाचशे रुपये भरा आणि booking करा आणि जर ऍडमिशन झाली तर बाकीचे पैसे पाच आणि सहा तारखेच्या संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत भरायचे. पैसे भरायला एक मिनिट पण उशीर झाला तर प्रवेश रद्द.’’ ‘‘पण प्रवेश मिळेल काय?’’ आईने भीत भीत विचारले.

‘‘सांगता येत नाही, मुलं आठवीत असतानाच पालकांनी booking करून ठेवले आहे.’’

‘‘समजा, प्रवेश मिळाला नाही तर पैसे परत मिळतील का?’’ आईने परत प्रश्नस विचारला.

‘‘पैशांचा हिशोब करायचा असेल तर घरी जा. माझ्या शिकवणीला येण्यासाठी पालक तीन तीन वर्ष वाट पाहतात. माझ्या शिकवणीला आल्यावर मुलांचे बोर्डात पंधरा ते वीस मार्क वाढतात.’’ सर म्हणाले. ‘‘मला अजून एक विचारायचं आहे…’’ आई भीत भीत म्हणाली.

‘‘हे बघा तुम्ही फारच प्रश्नव विचारताय. माझ्याकडे शिकवणीला यायचं असेल तर बोलायचं नाही ऐकायचं. माझा वर्गात पण नियम आहे, फक्त ऐकायचं. मी कोणाचं ऐकून घेत नाही. तुम्ही ठरवा तुम्हाला मार्क हवे आहेत की चर्चा !’’
आई गप्प बसली !

पंधरा मेला शिकवणी सुरू झाली. पहिल्या दिवशी भली मोठी लिस्ट –
– जीन्स घालायची नाही
– बिना बाह्यांचे कपडे घालायचे नाही
– मुलीने सलवार सूटवर ओढणी घेणे अनिवार्य आहे.
– मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या वेळेस शिकवलं जाईल. मुलींची शिकवणी झाली आणि त्या कॉलनी सोडून गेल्यावरच मुलांनी कॉलनीत प्रवेश करायचा. तोपर्यंत कॉलनीबाहेर उभे राहायचे.
– मला प्रश्नि विचारायचे नाहीत कारण मी कोणाचं ऐकून घेत नाही, मी फक्त बोलतो’’
मला तर कळतच नव्हतं की काय चाललं आहे, पण विचार केला शिकवत छान असतील बहुतेक.

दुसर्‍या दिवशी वर्गात गेल्यागेल्याच त्यांनी मला विचारले ‘‘दिशा काल तूच होती न टी.व्ही.वर?’’
‘‘होय’’
‘‘काही स्विमिंगच्या संदर्भात?’’
‘‘होय !’’
‘‘छान, फारच छान ! एवढंसं पोहायचं आणि टी.व्ही.वर झळकायचं ! माझे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयात पंच्याऐशी आणि नव्वद मार्क आणतात. ते दिसतात का कधी टी.व्ही.वर?
…मी चकितच झाले ! पोहणं म्हणजे एवढसं आणि बोर्डात मार्क म्हणजे सर्व काही? मला खूपच वाईट वाटले पण गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्या बाबांनी मला एकदा सांगितले होते की चांगला शिक्षक तो असतो ज्याच्यात intellectual intimacy बरोबर Emotional intimacy पण असते. पण इथे? फक्त गप्प बसायचं !

दुसर्‍या दिवशी विषयाला धरून भली मोठी लिस्ट –
– मी शिकवीन. बोर्डात तुमचे पंधरा ते वीस मार्क वाढतील. पण मला प्रश्ना विचारायचे नाही, मी नुसतं बोलणार, तुम्ही नुसते ऐकणार.
– एका मुलाने एक प्रश्नग विचारला आणि त्याला एक मिनिट वेळ दिला तर माझ्या वर्गात ऐंशी विद्यार्थी आहेत, म्हणजे झाली ऐंशी मिनिटे. मग मी कधी शिकवायचं?
– आपल्या मनानी काही लिहायचं नाही. मी जे सांगेन तेच लिहायचे, मनाने प्रयोग करायला गेलात तर चुका होतील. गोष्टीचे title पण मीच लिहून देईन, चांगले शंभर दोनशे लिहून देईन तेच पाठ करायचे आणि लिहायचे.
…मी तर ऐकलं होतं शिक्षणाची सुरुवातच प्रयोग आणि प्रश्नां नी होते. इथे तर सगळं उलटच चाललं होतं.
तिसर्या् दिवशी कोण कोठे बसणार हे ठरवण्यात आलं.
‘‘माझ्या वर्गात मी म्हणेन तसं बसायचं !’’ सर म्हणाले.
‘‘एक हुशार मुलगी आणि तिच्याजवळ एक ‘ढ’ मुलगी असे आपण बसणार आहोत.’’ सर म्हणाले.
मी विचारच करत होते, सर ठरवणार कसे कोण हुशार आणि कोण ‘ढ’ तेेवढ्यात सर म्हणाले की ज्यांना शंभर पैकी साठ किंवा जास्त मार्क आहेत. ते सर्व हुशार मुलींमधे बसणार आणि साठ पेक्षा कमी मार्क असलेल्या मुली ‘ढ’!
‘‘मी कुठे बसायचं सर?’’ मी विचारले
‘‘का ! तुला किती मार्क होते?’’
‘‘मी परीक्षाच दिली नव्हती’’
‘‘का?’’
‘‘खाडी पोहायला गेले होते’’
‘‘वा छान ! असे तर उद्यापासून कोणीपण खाडी पोहायला जाणार आणि परीक्षेपासून सुटका. छानच मार्ग शोधून काढला आहे.’’ मला खूपच वाईट वाटले.

माझी मैत्रीण शुचीला शंभर पैकी एकोणसाठ मार्क नववीत इंग्रजी विषयात मिळाले होते. सरांनी तिला ‘ढ’ मुलींमधे बसवले होते. तिला तर रडूच कोसळले. मग सर म्हणाले, आता ह्या सर्व ‘ढ’ मुलींसाठी आपण टाळ्या वाजवू त्या जेव्हा बोर्डाच्या परीक्षाचा निकाल पाहतील तेव्हा त्यांना कळेल की त्यांचे विषयात पंधरा ते वीस मार्क वाढले आहेत. मग आपण त्यांच्या हुशारीसाठी टाळ्या वाजवू.’’

टाळ्या वाजत होत्या आणि शुचीच्या डोळ्यातले पाणीपण बाहेर येत होते. मला वाटत होते ओरडून सांगावे सरांना शुची खूप हुशार आहे, ती उत्कृष्ट डान्सर आहे. देशभरात तिचे शो होतात!
पण इथे कोणाला सांगणार आणि कोणाचं ऐकणार?

मला रात्रभर झोप आली नाही. मी परीक्षेला बसले असते आणि मला एकोणसाठ मार्क मिळाले असते तर? म्हणजे मी पण ‘ढ’! आणि शुची, काय वाटलं असेल तिला जेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

…सकाळी सहा वाजले. क्लासची वेळ झाली. मी तयार झाले, काय करू? ..पण शेवटी मी ठरवले क्लासला जायचं. पंधरा ते वीस मार्काची लालूच मला सोडता येत नाहीये. मी ठरवले, होय मी क्लासला जाणार. मला नाही मागे राहायचं, मार्कांमधे ! आणि मी आले. माहीत नाही चूक की बरोबर.

‘आजच्या तरुण पिढीला काही विचारच करायला नको.’

‘ते स्वतःच्या विश्वाहत मश्गुल असतात. त्यांना इतरांबद्दल काही घेणं-देणं नसतं.’

‘त्यांना प्रयत्न करायला नकोत, कष्ट घ्यायला नकोत.’

अशी अनेक विधानं मोठ्या माणसांकडून नेहमी केली जातात. कदाचित ‘आपण जेव्हा तरुण होतो.’ तिथंच आपण गुंतून पडलेले असतो का?

पण अशी सारी विधानं मागे घ्यावीत, किमान त्यांचा पुनर्विचार करावा आणि आपलं वागणंही तपासून पहावं असा विचार तरुण करतात आणि तो मांडतातही. आपल्या अपेक्षा आणि आज ते ज्या व्यवस्थेत वाढताहेत ते वातावरण या सगळ्याचा पुनर्विचार करावा यासाठी अनेकदा हे तरुण आपल्याला भाग पाडतात. असे विचार मांडू इच्छिणार्या. तरुणांनी ते आमच्याकडे जरूर पाठवावेत. मुलांनी लिहितं व्हावं यासाठी पालक-शिक्षकांनी आवर्जून प्रयत्न करावेत. त्यासाठी पालकनीतीमधे विशेष जागा दिली जाईल.
– संपादक