आईपेक्षा बाबाच मला जास्त आवडतो!

आईपेक्षा मला बाबाच जास्त आवडतो असं माझा मुलगा जेव्हा म्हणाला तेव्हा चालताना ठेच लागल्यावर जसा जीव कळवळतो अगदी तसं मला वाटलं. अक्षरश: डोळे भरून आले. वाटलं, काय करीत नाही मी मुलांसाठी? प्रत्येक गोष्ट ठरवताना- करताना पहिला मुलांचा विचार. त्यांच्या जाण्यायेण्याच्या वेळा, त्यांचं जेवण, त्यांचा अभ्यास, तब्येती, क्लासेस. आधी सगळं त्यांचं; मग मी, माझ्या आवडीनिवडी, माझी कामं ! आणि येवढं सगळं करूनही शेवटी मुलांनी म्हणावं की आईपेक्षा बाबाच जास्त आवडतो. का? असं का? ह्यांचा बाबा ह्यांना असा किती वेळ देतो, आणि असं काय वेगळं करतो की ज्यामुळे मी देत असलेले १५/१६ तास आणि तो देत असलेला दिवसभरातून जेमतेम अर्धा किंवा एक तास यातून त्याची जादू मुलांवर राहते आणि आईची मात्र कटकट वाटते.

ही अशी मनातल्या मनात धुसफुस दोनतीन दिवस चालली. त्या तेवढ्याशा वाक्याचा ओरखडा पुसला जात नव्हता. प्रत्यक्ष मुलांच्या बाबाशीच ह्या विषयावर बोलायचं ठरवलं. बोलायच्या आधी मनात कितीदातरी उजळणी केली होती. काय काय मुद्दे बोलायचे आहेत आणि कशाकशाचा त्याला जाब विचारायचा आहे वगैरे वगैरे. प्रत्यक्ष बोलताना मात्र ठरवल्याप्रमाणे काहीच बोलता आलं नाही. तो नुसताच जोरजोरात हसत होता आणि माझे डोळे डबडबलेले. खूप राग येत होता. कुणाचा? मुलांचा.. मुलांच्या बाबाचा..? की मला माझाच…? कुठे चुकत होते मी? कशात कमी पडत होते मी? कोणापेक्षा वरचढ वा श्रेष्ठ ठरायचं होतं मला? सारखी का मी आमच्या दोघांना तराजूच्या दोन पारड्यांमध्ये बसवून वर-खाली, कमी-जास्त ह्याच प्रमाणात मोजत होते? वर्षभर अभ्यास करूनही शेवटी एखाद्या विषयानं दगा द्यावा आणि परीक्षेत अपयश यावं, अगदी तशी, तेवढी हतबलता मी अनुभवत होते. राहून राहून वाटत होतं की इतकं सगळं वाचतेय, इतकं
सगळं उघड्या डोळ्यांनी प्रयत्नपूर्वक करतेय तरी शेवटी आईच्या रोलमध्ये आपण पूर्णपणे नापास झालोय.

ही सगळी अशी मनाची घालमेल सुरू असताना एकदा मुलांशी खेळता खेळता सहजच त्यांना विचारलं, ‘‘सांगा बरं, तुम्हाला खूप खूप राग केव्हा येतो?’’ तन्वी लगेच म्हणाली, ‘‘दादा जेव्हा चिडवतो आणि गुदगुदी करतो तेव्हा!’’ केतन मात्र क्षणभर थांबला. माझ्याकडे बघत, माझ्या मूडचा अंदाज घेत आणि तो ठीकठाक असल्याची खात्री पटताच म्हणाला, ‘‘तू सारखी सारखी रागवते, प्रत्येक वेळी नाही म्हणते आणि कधी कधी मारते तेव्हा मला खूप राग येतो.’’ मुलं अगदी मनापासून बोलत होती. लपवालपवी, आत वेगळं – बाहेर वेगळं अशी मोठ्यांसारखी व्यावहारिक कौशल्यं अजून निश्चिगतच शिकलेली नव्हती.

त्याच्या उत्तरावर तेव्हा काही बोलले नाही. पण नंतर विचार करताना जाणवलं की पूर्णवेळ मी मुलांसोबत राहणार, तर त्यांना काही विशिष्ट सवयी लावणं, काही गोष्टींचा आग्रह धरणं, काही वेळा स्पष्ट नकार देणं, काही गोष्टींसाठी वेळेची मर्यादा घालणं – हे आईलाच करावं लागणार. आणि लहान मुलंच का, अगदी मोठ्यांनासुद्धा नको म्हटलं, मनाप्रमाणे-स्वेच्छेने वागता आलं नाही, हवं तेव्हा हवं तसं करता आलं नाही, संपूर्ण स्वातंत्र्यावर मर्यादा आली, तिथे नाराजी येणं-राग येणं, कडवटपणा, अप्रियता, दुरावा वाटणं हे स्वाभाविकच आहे. त्यामुळेच मुलांनी नाराजी व्यक्त केली तर त्यांच्या एका वाक्यासाठी मी येवढं वाईट वाटून घेण्याची गरज नाही. पण मग मी काय करावं? मुलांना आई खूप नाही पण थोडीशी तरी आवडावी ही सुप्त इच्छा होतीच.

मुलांच्या मते, आई म्हणजे वाईट्ट! सारखं हे करू नको ते करू नको म्हणणारी, रागवणारी, ओरडा करणारी, टोकणारी आणि प्रसंगी चोपसुद्धा देणारी. त्यांच्या मनातली ही प्रतिमा कशी बदलता येईल हा विचार करत होते. मात्र सगळ्यात पहिले त्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेली भावना स्वीकारायची ठरवली. मग इतर मैत्रिणींशी ह्या विषयावर बोलले तर त्यांनीही हाच अनुभव सांगितला. अगदी मुलांच्या शब्दात, ‘‘आई म्हणजे कटकट, आई म्हणजे नकारघंटा, आई म्हणजे हिटलर, आईला केवळ ‘नाही’ हाच शब्द बोलता येतो. आईपेक्षा बाबा परवडला.’’ एकंदर तमाम आईवर्गाला मुलांकडून हे असं केव्हा ना केव्हा तरी ऐकावं लागलं होतं तर! चला म्हणजे मी काही एकटी नव्हते. कसं अगदी हुश्श वाटलं! मनाला केवढीतरी उभारी आली.

मी मुलांशी ही अशी का वागते हे मला समजत होतं, पण हे सगळं मुलांना कसं समजवून सांगणार? ‘‘बाळांनो तुमच्याच भल्यासाठी, तुम्हाला शिस्त लागावी म्हणून मी हे सगळं करतेय रे ! तुम्ही चांगलं वागावं, सगळ्यांनी तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून करतेय हा आटापिटा.’’ हे असलं सांगून उपयोग झाला नसता. उलट ‘आई प्लीज बोअर करू नको’ हे त्यांच्या चेहर्याावरून क्षणात मला कळलं असतं आणि कदाचित माझीच चिडचिड झाली असती. म्हणून मग असलं काही उपदेशामृत न पाजताही त्यांच्या माझ्यामध्ये पडलेलं अंतर मला कमी करायचं होतं. मुलांना Quality Time द्या सांगणारे बरेच होते. पण तो द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं हे कोणीच सांगत नव्हतं. म्हणून मग माझ्या दृष्टीने ह्या (Quality time) संज्ञेचा अर्थ मी लावला आणि माझ्यात बरेच बदल केले.

बाबा मुलांसोबत फार कमी वेळ असतो पण मुलांसोबत असताना तो पूर्णपणे त्यांचाच असतो. त्यावेळी मोबाईलची रिंग नाही की पेपर-फाईल्सची चिंता नाही. कोणाकडून किती पैसे घ्यायचे आणि कोणाला किती पैसे द्यायचे ह्याचा हिशोब नाही की कोण काय म्हणालं ह्याचीही चर्चा नाही. आईच्या डोक्यात मात्र चोवीसही तास एकानंतर एक (कधीकधी एकाच वेळी अनेक) विवंचना! किराण्यातलं काय संपलंय आणि काय लौकर संपवायला हवं आहे? येणारे जाणारे पाहुणे, सण-वार, देणं-घेणं, मुलांच्या शाळा, home work, त्यांचे मित्रमैत्रिणी, त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा-परीक्षा, फोन-विजेची बिलं, बँकेचे व्यवहार, शाळेची फी भरण्याची तारीख, कामवाल्या बायांचं नेमकं महत्त्वाच्या दिवशी न येणं, नळाचं गळणं, अठ्ठेचाळीस तासही अपुरे पडतील अशी घरातली आवराआवरी, कोणाचं तरी दुखणं, डॉक्टर-औषध इ.इ.इ. ह्या सगळ्यातून बाहेर पडणं आणि मुलांना मुद्दाम वेगळा वेळ देणं अवघडच. घरचं करून ऑफिस गाठणार्याम आईचं विश्व तर विचारूच नका. ह्या सगळ्यामुळे कदाचित हसणारी, हसवणारी, गप्पा मारणारी, मस्ती-मजा करणारी, प्रसंगी गाणारी-नाचणारी आई मुलांना दिसतच नाही. कायम स्वत: टेन्शन घेणारी आणि इतरांनाही टेन्शन वाटणार्याि आईचीच प्रतिमा मुलांना दिसत असणार.

हे सगळं जाणवल्यावर मग अगदी मुद्दाम प्रयत्नपूर्वक, रोज जमलं नाही तरी जेव्हा जमेल तेव्हा अर्धा तास तरी मुलांचा असं ठरवलं. त्यावेळी मात्र मी कोणाची सून नाही, कोणाची बायको नाही, कोणाची मॅडम नाही, शेजारीण नाही, मैत्रीण नाही, अगदी मुलांची आईसुद्धा नाही. त्यावेळी मी मुलांची फक्त एक खेळगडी. खेळाचे नियमही त्यावेळी त्यांच्यामाझ्यासाठी सारखेच. अगदी टिक्कर-बिल्ला खेळताना भांडून भांडून घर बांधणं, सापशिडी, अष्टाचंगा खेळताना रुसणं-फुगणं. पत्ते खेळताना लपवलेला हुकूम हळूच बघणं आणि चिडणं, शब्दांची अंताक्षरी, धावण्याची शर्यत, सायकल चालवणं, पकडापकडी, क्रिकेट इ. बरोबरीने खेळायला लागले. तर कधीमधी स्वयंपाकघरात धुडगूस घालून आलूचाट, पिझ्झा, पाणीपुरी, भेळ कधी सरबत तर कधी कच्चाचिवडा इ. वर ताव मारणं हेही ओघानी आलंच.

मात्र येवढं सगळं ठरवून करतानाही आईपणाला जागून अपरिहार्यपणे काहीवेळा शाब्दिक उचक्या आवरता यायच्या नाहीत. एकदा असंच आम्ही खेळत असताना केतनचा धक्का तन्वीला लागला. मग लगेच तिनंही त्याला धपाटा घातला. मग ह्याने उलट तिला ढकललं. झालं ! तन्वीचं मग मोठ्ठ्याने रडणं सुरू होताच माझ्यातली आई तत्क्षणी जागी झाली. ‘‘अरे अरे असे काय भांडता आहात? अरे तू तर मोठा आहेस ना? आणि तू ग? येवढासा धक्का लागला तर त्याला मारायचं? असं मोठ्यांना मारायचं कां? आणि तू रे? आपण लहानांना समजून घ्यायचं. मी तुझ्याशी बोलतेय आणि तुझं लक्ष कुठे आहे? इथं मी माझी सगळी कामं सोडून खेळतेय आणि तुम्ही?’’
झालं! खेळगडीचा role विसरून मी पूर्णपणे आईच्या role मध्ये शिरले आणि Quality time चा फज्जा झाला! मग वाटलं, त्यावेळी इतकं सगळं भाषण न देता मी येवढंच म्हणाले असते की, ‘‘तुमच्या दोघांचाही आता बहुतेक खेळण्याचा मूड दिसत नाही तेव्हा आपण खेळ थांबवूया’’ तरी त्यावेळी पुरेसं होतं. पुढल्यावेळी असा double role न करण्याचा निश्चय केला.

मुलांची माझ्याबाबत असलेली आणखी एक मुख्य तक्रार म्हणजे आई प्रत्येक गोष्टीला आधी नाहीच म्हणते. विचार आला, खरंच मला प्रत्येक वेळेला मुलांना नाही म्हणायचं असतं का? मग आमच्यातल्या संवादाकडे तटस्थपणे बघितल्यावर जाणवलं की संपूर्ण दिवसभरात कमीतकमी २० ते २५ वेळा निरनिराळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या पद्धतींनी मी मुलांना नाही म्हणते. जसं…
मुलं : आई खेळायला जाऊ?
मी : आत्ता नको. ही काय खेळायची वेळ आहे का?
मुलं : आई, खूप भूक लागली आहे. लवकर काहीतरी खायला दे.
मी : आत्ता काहीही खायला मिळणार नाही. स्वयंपाक करतेच आहे. झाल्यावर सरळ जेवायला बस.
मुलं : आई, माझं पुस्तक शोधून दे ना.
मी : दिसत नाही का, मी महत्त्वाचं काम करतेय.
मुलं : आई, गोष्ट वाचून दाखव ना.
मी : ही काय वेळ आहे गोष्ट वाचायची? केवढी कामं अजून पडली आहेत. रात्री वाचून दाखवेन.
मुलं : फ्रीज मधलं आईस्क्रिम खाऊ?
मी : नाही म्हणजे नाही.
मुलं : Mathsची वही संपलीय. नवीन वही दे ना.
मी : देईन म्हटलंय ना, जरा धीर धर.
मुलं : मी पण तुझ्या सोबत काकडी सोलते.
मी : काही गरज नाही. जा बाहेर खेळायला. लुडबुड करू नको.

म्हणजे मुलं जे म्हणत होती की आई पहिल्यांदा नाहीच म्हणते ते काही खोटं नव्हतं. खरंतर खूप कमी वेळा मला अगदी खरोखर नाही म्हणायचं असतं वा ठाम नकार द्यायचा असतो. आणि इतरवेळी नाही न म्हणताही काही वेगळ्या पद्धतीने माझं मत मी देऊ शकते. कधी कधी तर ह्या ‘नाही’ सोबत मी इतरही इतक्या गोष्टी बोलून जाते की ज्याची त्यावेळी मुळीच गरज नसते. जसं परवा, मुलांनी विचारलं, आई टीव्ही पाहू? मी जवळ जवळ ओरडलेच, ‘‘काही टीव्ही पाहायची गरज नाही. जेव्हा तेव्हा टीव्ही, दुसरं काही करायला नको. आणि तो अभ्यास कोण करेल? तू की मी? शाळेतून आल्यावर खाणं झालं, मग खेळणं झालं आणि आता टीव्ही पाह्यचा. अभ्यासाचं नाव काढत नाही. परीक्षा इतकी जवळ आली आहे पण तुला त्याची काही चिंता नाही. शनिवारी कोणत्या चॅनलवर कोणती सिरियल आहे आणि रविवारी कुठे कोणता पिक्चर आहे हे बरोबर लक्षात राहतं… मग अभ्यास कसा लक्षात राहत नाही?’’
येवढ्या बॉम्बहल्ल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन ती केवळ माझ्या समाधानासाठी डोळ्यासमोर पुस्तकं घेऊन बसली. पण मनात मात्र निश्चित आपली आई किती वाईट आणि आपल्या मनासाखं कधीच कसं वागू देत नाही हेच घोळत असणार. खरं तर मला मुलांना टीव्ही पाहण्याआधी अभ्यास उरकून घ्या येवढंच सांगायचं होतं. पण ते न सांगता मी वेगळ्याच गोष्टींवर भरकटत गेले आणि मुलांचा सूर आणि नूर बिघडवून बसले. त्यावेळी येवढी लेक्चरबाजी न करता, ‘आधी तासभर अभ्यास करून घ्या आणि नंतर तुम्ही टीव्ही पाहिला तर हरकत नाही’ असं म्हणता आलं असतं. किंवा मग ‘तासभर तुम्ही अभ्यास करून घ्या, तेवढ्या वेळात मी माझीही कामं आटोपते आणि मग मी पण तुमच्यासोबत कार्टून नेटवर्क बघणार आहे. वा…मज्जा येईल नाही?’ असं म्हणूनही मुलांकडून अभ्यास करून घेता आला असता.

चला… म्हणजे मी नेमकी कुठे कमी पडतेय हे लक्षात यायला लागलंय तर! म्हणजे माझी बदलण्याची प्रक्रिया सुरू झालीय. आत्ता सगळं घडून गेल्यावर मला पर्याय सुचत आहेत. हळूहळू कदाचित प्रतिक्रिया देण्याआधी असे पर्याय सुचायला लागतील.

तर असे चालले आहेत हे माझे ‘आई’ची पारंपरिक भूमिका नाकारून नवीन ‘child friendly’ भूमिका कशी अंगी मुरवता येईल ह्यासाठीचे प्रयोग. आव्हान कठीणच आहे. एका रात्रीत सगळं बदलणार नाही ह्याची कल्पना आहे. पण सततच्या प्रयोगातून आणि सरावातून यश मिळेल असं कुठेतरी निश्चित वाटतंय. आणि माझ्या मुलांना आई म्हणजे कटकट, आई म्हणजे नकारघंटा वाटणार नाही; कदाचित… कदाचित… बाबासारखीच आई पण आम्हाला आवडते असंही म्हणतील कधीतरी !