प्रतिसाद

‘‘दिवाळी अंक दिवाळीतच मिळाला. एक सुनियोजित मांडणीचा अंक वाचल्याचं समाधान मिळालं. बदलत्या काळाचं भान पालकवर्गात निर्माण करण्यासाठी एक संघटित चळवळ/उपक्रम आपण चालविता आहात, हाच मुळात एक अभिनंदनीय भाग. त्यातकरून प्रस्थापित मासिकं,नियतकालिकंही नाकाशी सूत धरून चालवावी लागताहेत, असा हा बिकट काळ. अशा प्रतिकूल काळात आपण नेटानं मासिक चालवीत आहात, याचंच अप्रूप वाटतं.

दिवाळी अंकासाठी सर्जनलेखन हा काहीसा अवघड विषयच आपण निवडलात. त्याच्या सर्व ताण्याबाण्यांचा विचार करून अंकाची मांडणी कल्पकतेनं केलीत. सर्जन म्हणजे काय, हे अधिकारी अभ्यासकांकडून समजून घेऊन नंतर विविध अंगांनी त्याचा परामर्श घेणारे लेखही लिहून घेतलेत-ही सर्व मांडणी वैचारिक व कलात्मकही झाली आहे. संगीताच्या मैफलीत कुशल गायकानं रागाचं मूळ स्वरूप नमुनेदार बंदिशीतून प्रथम ठसठशीतपणे मांडावं, आणि नंतर आलाप, बोलआलाप, ताना, बोलताना, हरकती इत्यादितून त्याचा विस्तार कलात्मक पद्धतीनं करावा-तसा हा अंक सजविला गेला आहे, असं मला वाटलं. स्वत:ची नवी वाट शोधून केलेला कोणत्याही प्रकारचा सुंदर आविष्कार म्हणजे सर्जन. प्रस्तुत दिवाळी अंक हेच एक सामूहिक सर्जन झालं आहे.

मुलांच्या सर्जनात्मक आविष्काराची ओळख पटण्यासाठी पालकांनी वेगळी ‘दृष्टी/नजर’ कमावली पाहिजे. मुलांच्या ‘आकलनाचे’ व ‘आविष्काराचे’ रूपच प्रौढांहून वेगळे असते. प्रत्येक मुलाचे दुसर्यााहून भिन्न असते. ते अंत:स्फूर्त, टवटवीत आणि विकसनशील असते. त्याचे जतन व जोपासना हळुवारपणे करावी लागते. त्यासाठी मुलालाही ‘स्वत:चा शोध’ घ्यावा लागतो… तेवढे स्वातंत्र्य, निवान्तपण आणि संधी त्याला मिळवून देणे एवढेच पालकाचे कार्य. प्रौढांच्या फूटपट्ट्या वापरून त्यांना साचेबंद मुशीत पालकांनी बंदिस्त करता कामा नये – हाच आशय सर्व लेखांतून मांडला गेला आहे, असे मला वाटते.

यातील बरेच लेख स्त्रियांनी मुलांबद्दलच्या स्वानुभवांतून लिहिलेले आहेत. त्यांत स्वाभाविकपणे भाषेचे व भावनांचे मार्दव विलोभनीय रीत्या प्रकट झाले आहे. बालकांच्या समस्यांबद्दल जाणीव परदेशी संदर्भकथांतून अधिक व्यापक झाली आहे. यातून एका जागतिक सहविचारापर्यंत वाचकाचा प्रवास होतो.

या अंकाच्या परीघातून कुमार वय (१३+) वगळले गेले आहे, ते जाणीवपूर्वक की अजाणता? मुले त्या वयात पोचल्यावर पालकांसाठी वेगळ्या समस्या उद्भवतात. त्यांच्या सर्जनशीलतेला सुस्पष्ट वळण द्यावे लागते. त्या समस्येला अंकामध्ये जागा मिळालेली दिसत नाही.’’