संवादकीय- मार्च २००७
दर आठ मार्चला मित्र-मैत्रिणींचे संदेश येतात.
हल्ली ते फार सोपं झालंय.
‘Happy woman’s day !’
मला काही समजत नाही, संदेश पाठवण्याबद्दल आभार मानावेत की काय करावं? एक दिवस स्त्री-दिन म्हणून ‘साजरा’ करण्यानं नेमकं काय होतं हे मला कळत नाही. उलट इतर वेळ विसरण्याची अलिखित परवानगीच असते असं दिसू लागतं.
• गेल्या वर्षात भारतात एक कोटी स्त्रीभ्रूण हत्या घडल्या.
• साहजिकच स्त्रियांचं प्रमाण खालावत चाललेलं आहे.
• बलात्कार करण्याची सोय असलेली बाब असं बाईचं रूप मानलं जाताना दिसतं.
• स्त्रिया शिकल्या, नोकर्या करू लागल्या, वगैरे खरं असलं तरीही त्यामुळे बाई ‘माणूस’ म्हणून स्वीकारली जात नाही.
• बाई लग्न करून सासरी जाते.
• इत्यादि.
हे बदलता आलेलं नाही, ह्याबद्दलची खंत स्त्री-दिनाच्या दिवशी तरी मन विषण्ण करू लागेल, तर त्या दिवशी आनंद करायला सांगणारे संदेश येतात, ते मला पेलत नाहीत.
परिचयातल्या अत्यंत उच्चशिक्षित नवविवाहितेला दिवस गेल्याचं कळलं. म्हणून प्रेमानं भेटायला गेले होते. तीही लाडानं येऊन बिलगली. तिची आई म्हणाली, तुझा आशीर्वाद हवाय तिला. मी अजूनही लहानपणापासून पाहिलेली, सतत पहिली येणारी, गोड स्वभावाची मुलगी…कशी छान मोठी झालीय… आता पालकपण स्वीकारतेय अशा भोळ्या विचारात होते. ‘तू डॉक्टर आहेस, म्हणून विचारते, मुलगाच हवाय आम्हाला व्हायला. काय करता येईल? तुझ्या ओळखीत कुणी तपासणी करून सांगणारे असतील ना? विश्वासाचे डॉक्टर हवेत. आजकाल ठेववत नाही कुणावर विश्वास, म्हणून विचारतेय.’
लेकीच्या वतीने आई बोलत होती. लेक आशेनं माझ्याकडे पाहत होती.
एका कार्यशाळेत संवादकांनी ओळीनं चार छायाचित्रं समोर ठेवली.
पहिलं इस्पिळातल्या ओळीवार खाटांपैकी एकीवर झोपलेली थकलेली स्त्री. तिच्या खाटेखाली किडनी-ट्रेत ठेवलेला मृत-गर्भ-मुलीचा.
दुसरं आनंदी, सजलेल्या मुद्रेने कन्यादान करणारे मातापिता – शेजारी ‘दान’ आणि याचकासह.
तिसरं एका सौंदर्यस्पर्धेत आपलं सौंदर्य(?) मांडणारी स्त्री.
चौथं चित्रं होतं, अंधार – फक्त निःशब्द अंधाराचं.
संवादकांनी ह्या चित्रसंचाला, नाव द्यायला सांगितलं. काहींनी ‘वास्तव’, ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ वगैरे नावं दिली. एका बाईनी शेवटचं चित्र सुरवातीला घेतलं, आणि नाव दिलं, ‘अंधारातून प्रकाशाकडे’ त्यावर सर्वांनी त्यांच्या हुषारीचं कौतुक केलं. त्याही खूष झाल्या.
अन्याय ज्यांच्यावर होतोय तेच जेव्हा करणार्या गटात पोचतात आणि स्वतःवरच अन्याय करण्यात सहभागी होतात तेव्हा त्या परिस्थितीला उत्तर निघण्याची शक्यता संपते.