सावल्या

तुला काय वाटतंय की मी आपला
रिकामा बसून असतोय?’’
‘‘नाही ना. आपल्या कामातून तुम्हाला तर डोके वर काढायलाही सवड नसते. मोकळी आहे म्हणायला ती मीच!’’ मी बोलून गेले.
यावर, तो पहिल्यापेक्षाही मोठ्याने ओरडला आणि पेन टेबलावर आपटत म्हणाला, ‘‘मला तू धडपणे जगू देशील की नाही? एक घटकाभर म्हणून स्वस्थ राहू देत नाहीस’’.
मी मग हात जोडले नि म्हणाले, ‘‘हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मीच मोठी वाईट आहे…. आता, काही बोलू नका. पुरे.’’
त्यावेळी, पप्पू आमच्यापाशी नसता तर मी कपाळ बडवून डोक्यावरचे केस उपटले असते आणि त्यानेही हातातील पेन टेबलावर न आपटता भिंतीवर भिरकावलं असतं. मी पप्पूला बाहेर घेऊन जायचं म्हणून त्याचे कपडे करीत होते.
दरवेळी, आमच्यापैकी कुणाचाही आवाज चढला की पप्पू काहीच बोलत नाही. ओठ दाबून गप्प राहातो. कधी माझ्याकडे तर कधी आपल्या वडिलांकडे टक लावून बघत असतो.
त्याच्या पायांत मोजे घालताना मला रडू फुटले नि दु:खावेगाने मी म्हणाले, ‘‘अहो, आजही मला तुम्ही असे घालून पाडून बोलणार…’’

एक क्षणभर तोही चक्रावला आणि जाड चष्म्याच्या भिंगाआडून माझ्याकडे पाहात राहिला. तो पुन्हा काहीतरी बोलणारच होता, पण मीच त्याला हात जोडले आणि पप्पूचा हात हातात घेऊन उठले. ‘‘आता, बस्स झाले. मी काय नि तुम्ही काय, आहे ते आहे. काही कुणात बदल होणार नाही’’. असं म्हणत पप्पूला घेऊन मी बाहेर पडले.

तो टेबलावरून उठला नाही. मला चांगलं माहीत होतं; माझी पाठ फिरली की सगळं काही विसरून तो आपल्या कामात पुन्हा गर्क होणार. व्हरांड्यात आल्यावर मोडल्यागत होऊन मी भिंतीला टेकून उभी राहिले. मनाचं पार पोतेरं झालं होतं. डोळे मोठे करून पप्पू माझ्याकडे पाहात होता. नंतर मी आपले डोळे पुसले आणि पुढे होऊन त्याचा हात आपल्या हातात घेतला. तेव्हा तो क्षीण आवाजात मला म्हणाला, ‘‘आई, आज तुझा वाढदिवस ना?’’
मी काहीच बोलले नाही. त्याला हाताला धरून मी पायर्यांवरून खाली आले. अंगणात आल्यावर पप्पू माझ्याकडे बघत म्हणाला, ‘‘बघ तरी, मी रडलो का आज?’’
‘‘आता, खूप शहाणा झाला आहेस तू बाबा.’’ त्याचा हात दाबून मी म्हणाले.
‘‘पप्पा, तुला काही बोलत असतील, तर तू त्यांना काही बोलत जाऊ नकोस… तू बोललीस ना की त्यांना राग येतो.’’
मी गप्प राहिले. पण पप्पूचे बोलणं ऐकून माझे मन खट्टू झालं. मुलेही आपल्या बापाचीच बाजू घ्यायला लागलीयेत. पुरुष लबाड असतातच. मुलांनाही आपल्यासारखं करून घेतात. इथे रात्रंदिवस मर मर मरते ती आई, पण मुलं बापाचीच तळी उचलणार.

मी एका बाजूला एकटीच एका बाकड्यावर जाऊन बसले. हवा कोरडी नि शुष्क होती. ऋतूचं संक्रमण सुरू होतं. पानगळ होऊन धूळ उडत होती. गवत पार वाळून गेलं होतं. भुईला खाली टेकले तर ते काट्यासारखं टोचत होतं. मैदानाच्या कडेला लावलेली झाडं गारठ्याने लालचुटूक झालेली. काहींनी तर आताच अगदी मुंडन केल्यागत आपला पर्णसंभार उतरवून टाकला होता.
गारठ्याची लहानशी झुळूक आली तरी माझ्या पाठीवर काटा फुलत होता.

पप्पू एक क्षणभर माझ्यापाशी घुटमळला नि पुन्हा कुठे तरी धावत निघून गेला. या गोष्टीचंही मला वाईट वाटलं. आधी घरामध्ये आमची भांडणं होत तेव्हा तो माझ्याशी लगटून असे. काही न का बोलेना, पण आपला बसून असायचा. त्याच्या मौनामुळेही मला एक दिलासा मिळे. काही वेळाने तो खोदून खोदून आमच्या भांडणाचं कारण विचारी. नंतर हे-ते असं काहीतरी मला सांगायचा-शिकवायचा. अलीकडे, मला रडताना पाहिलं की तो पळून जातो.
तो गेल्यावर खाली मान करून आपले डोळे मी पुसून घेतले आणि तोंडावर पदर घेऊन हुंदके दाबायचा प्रयत्न करीत राहिले.

मी मैदानाकडे नजर टाकली. दूरवर पप्पू एकटाच उभा होता. अधूनमधून खाली वाकून गवतातून तो काहीबाही वेचत होता. गोल दगड, पेनाची टोपणं, लोखंडी तुकडे, लहान लहान चकत्या असलं काहीतरी उचलून खिशात भरत होता. त्याच्या जवळच दुसरी दोन मुलं होती. आतापासूनच लोकरीचे उबदार कपडे त्यांनी अंगावर चढवले होते आणि आपसातच त्यांच्या खोड्या सुरू होत्या. त्यांना पाहून माझ्या मनाला वाईट वाटलं… आपल्या मुलालाही तसे नवे हातमोजे आणि चांगले बूट वगैरे असावेत असं माझ्या मनालाही वाटत नव्हतं काय? पण यांना कुठे आपल्या कामातून सवड आहे! ‘‘जा. तूच जाऊन घेऊन ये. माझ्याकडे पैसे नाहीत. स्वत: कमवा नि हवं ते घ्या.’’ ते चिडून सांगतात. एक वेळ मनात येतं की गळफास लावून मरून जावं… मी काही स्वत:साठी मागतेय का तुमच्याकडे? मुलं माझी आहेत तशी ती तुमची नाहीत काय? डोळ्यांत अगदी सुया टोचताहेत असं वाटतंय. माझं डोकं चांगलं गरगरायला लागलं होतं.
आताशा, पप्पूचं लक्षण ठीक दिसत नव्हतं. दिवसेंदिवस त्याचा हट्टीपणा वाढत चालला होता. अगदी डोक्यावर चढून बसला होता. आई-बाप भांडत असतील तर मुलं बिघडणार नाहीत तर काय होणार?

दूरवर पप्पू आता त्या दोन मुलांच्या पुढ्यात दगड रोवल्यागत घुम्म उभा होता. आतापासूनच त्याच्यातील पुरुषीपणा दिसत होता. घुम्म होऊन समोर बघत राहाणं आणि तोंडानं काही न बोलणं! नुसताच घुमून काय असतो, एक नाही की दोन नाही. ना बोलतो ना खेळतो…दगड-गोट्या खिशात भरून खुळखुळवत असतो… हा कुठं धावत नाही की पळत नाही, तर त्याला बोलवा तरी कशाला?
काही वेळ तो तिथंच थांबला नि मग तिथून निघाला. हळूहळू रमतगमत तो एका बाजूला चालला होता.

गुलनारची आई मैदानातून परत येऊन माझ्यापाशी बसली. माझे डबडबलेले डोळे तिने पाहिले. पण ती काही बोलली नाही. बायकांना एकमेकींचं दु:ख आपसूक कळतं.
‘..बाजारात एवढे काही खराब बटाटे आलेयत म्हणून सांगू. पाच किलो आणले, तर त्यातले अर्धेअधिक सडके…’ ती सांगत होती. पप्पू लांब कुठेतरी गेला होता. त्याच्यामागे पळायला ताकद तरी कुठून आणायची होती? जे काय व्हायचं ते होईल. बिघडतोयस तर बिघड बाबा! गुलनारच्या आईच्या बोलण्याकडे माझं लक्ष नव्हतं. माझे डोळे पप्पूवरच खिळून राहिले होते.

मला एकदम काळजी वाटू लागली. भानावर येऊन मी बाकड्यावरून उठले. बिचारं पोर. त्याला कुठे काही विंचूकाटा चावला तर? मी मैदानात पाहिलं. पप्पू कुठे दिसत नव्हता. ती दोन मुलं अजूनही तिथेच दंगामस्ती करीत होती. पप्पू तिथेही नव्हता. थोड्या वेळापूर्वी बघितलं तेव्हा ते मैदानाच्या कोपर्यावर असलेल्या मुलांच्या शाळेच्या भिंतीजवळ उभा होता. त्यावेळी मी सावध असते तर त्याला जवळ बोलावून घेतलं असतं. तेव्हा तो नजरेच्या टप्प्यात तरी होता. तिथून तो कुठे तरी गायब झाला होता. मैदानात चहुकडे धुंडाळलं. पण पप्पूचा पत्ता नव्हता. शाळेच्या कोपर्यावरून वळून मी शाळेच्या इमारतीच्या पुढे रस्त्यावर आले. तिथली वर्दळ बघून माझा जीव घाबरला. हमरस्त्याच्या कडेला फूटपाथवरही कुठे तो नव्हता. एका दुकानासमोरून पुढे जाऊन तिथल्या एका हॉटेलच्या फाटकापर्यंत मी पोचले. पप्पू तिथे नसणार हे ठाऊक असून मी आत शिरले. तिथेही तो नव्हताच. तिथून बाहेर पडल्यावर माझ्या मनाचा ठाव सुटला. आता कुठं शोधायचं? स्वत:ला बोल लावत मी पुन्हा मैदानात परतले.

मी शाळेच्या कोपर्यावरून वळत होते, तेव्हा तिथल्या छोट्याशा भिंतीमागून पप्पू बाहेर येताना दिसला. तो आपल्याच तंद्रीत होता. माझा जीव भांड्यात पडला.
‘‘तू इथे काय करतोयस रे पप्पू?’’ असे म्हणत मी त्याच्याकडे झेपावले.
‘‘अरे, मला सांगून तरी जायचंस? का असा जीव गाळतोयस माझा?’’
मला पाहिल्यावर तो एकदम थबकला आणि त्याने आपले दोन्ही हात पाठीमागे घेतले.
‘‘काय आणलेयस तू पप्पू?’’
तो काही बोलला नाही. उगीच एकटक माझ्याकडे पाहात राहिला.
‘‘चोरी वगैरे केली असशील तर सांग. मी काही म्हणत नाही तुला.’’ अजूनही तो भोकर डोळ्यांनी माझ्याकडे पाहात होता.
‘‘नाहीये गं काही. मी चोरी नाही केली.’’
त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी त्याला आपल्याबरोबर घेतले. अंधार आता वाढत होता. मैदानातील गवतात पप्पूला आता अधिक वेळ राहू द्यायला मी तयार नव्हते. हळूहळू आपले पाय ओढत तो माझ्यामागे येत होता.
…तो बराच उद्धट होत चालला आहे. माझा मेलीचा सारा जन्म व्यर्थच गेला म्हणायचा! बायको म्हणून आणि आई म्हणूनसुद्धा.
पायर्या चढून वर आल्यावर मी बेल दाबली आणि आता, दरवाजा उघडला की कोणतं रामायण घडणार याची शिणलेल्या मनाने वाट पाहात उभी राहिले. पाय अगदीच गळून गेले होते. डोकंही सुन्न झालं होतं.
मला जे वाटत होते तेच घडलं. दरवाजा उघडल्याबरोबर पप्पू आपल्या वडिलांकडे धावत गेला. त्याच्या पायांत एकदम एवढा जोर कुठून आला होता, कोण जाणे! मी बघतच राहिले. नंतर आपले ओठ शिवून कपडे बदलायला आपल्या खोलीत गेले.

अजून मी पायातील चपलाही बाजूला सारल्या नव्हत्या आणि ओढणी एकीकडे टाकून कपडे बदलणारच होते. एवढ्यात पप्पू आपल्या वडिलांना हाताला धरून माझ्या खोलीकडे आणू पाहतोय असं दिसलं. ‘‘पप्पा, चला ना. चला.’’
वडील बापडे एखादं पाऊल पुढे टाकून थबकत होते. पप्पू त्यांना पुन्हा ओढत होता.

माझ्या अगदी पुढ्यात येऊन पप्पूने आपल्या दुसर्या हातात धरलेला पिवळ्याजर्द नि पांढर्या शुभ्र अशा छोट्या जंगली फुलांचा लहानसा गुच्छ नाचवला व म्हणाला,
‘‘तुम्ही द्या पप्पा!’’
मी पटकन् पुढे होऊन पप्पूला पोटाशी कवटाळलं. माझ्या मिठीत त्याची बटुमूर्ती थरथरते आहे असं मला वाटलं.