वेदी – लेखांक – २
वेद मेहता यांचे त्यांच्या तरुण वयातल्या अनुभवांसंबंधीचं ‘आंधळ्याची काठी’ हे शांता शेळके यांनी भाषांतर केलेलं पुस्तक आपण वाचलं असेल. ‘वेदी’ हे छोट्या अंध मुलाच्या भावविश्वावर आणि संस्थांतल्या जीवनावर प्रकाश टाकणारं वेद मेहतांचं पुस्तक. सुषमा दातार यांनी अतिशय संवेदनशीलतेनं केलेलं त्याचं भाषांतर लेखमालेच्या स्वरूपात आपल्या समोर ठेवत आहोत.
शाळेत आल्यानंतर काही दिवसांनी काय झालं… रासमोहनबाई त्यांच्या ड्रेसिंग टेबलाजवळ बसल्या होत्या.
‘‘तुम्ही काय करताय?’’ मी विचारलं.
‘‘मी चेहर्याला क्रीम आणि पावडर लावतेय.
‘‘मला पण लावता?’’
त्या खाली वाकल्या आणि माझ्या गालावर कोल्डक्रीमचा एक छोटासा ठिपका ठेवला.
‘‘अजून.’’ मी म्हणालो.
त्या हसल्या आणि माझ्या सबंध चेहर्यावर क्रीम लावलं आणि चोळलं.
‘‘आता थोडी पावडर पण लावा.’’
त्या परत हसल्या आणि म्हणाल्या ‘‘तुझी आई तुला असं लावायची का?’’
मला जरा विचार करायला लागला. मला आठवलं. ममाजी क्रीम लावायच्या तेव्हा त्यांच्या मांडीवर चढून बसायला मला खूप आवडायचं. माझाही वास त्यांच्यासारखा येईपर्यंत त्या मला क्रीम आणि पावडर लावायच्या तेव्हा त्यांच्या हातांना मी स्पर्श करत असे.
मी रासमोहन बाईंच्या मांडीवर चढायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला दूर सारलं. म्हणाल्या ‘‘जा जाऊन हात तोंड धुवून ये.’’
‘‘काकू मला अजून पाहिजे.’’
‘‘जा आणि धुवून टाक. तुझ्या श्रीमंत घरात क्रीम आणि पावडरवर खर्च करायला फार काही वाटत नसेल पण इथे ते महागाईचं वाटतं बरं.’’ त्या म्हणाल्या.
‘‘किती रुपये पडतात?’’
‘‘खूप पडतात.’’
‘‘आयाला मला अंघोळ घालायला सांगा.’’ मी ओरडलो.
‘‘आया आत्ता हियाकडे लक्ष देतेय. तिला वेळ नाहिये. आणि तू आता मोठा मुलगा झाला आहेस. आपली आपण अंघोळ करता आली पाहिजे.’’ त्या म्हणाल्या.
‘‘मला आयाच पाहिजे.’’
‘‘तुला तुझ्या घरात अगदी लाडावून ठेवलेलं दिसतंय. तुझ्यासाठी इथे स्पेशल आया नाहिये. तुझं तुला सगळं करता आलं पाहिजे.’’
हीया रडायला लागली. त्या तिकडे धावल्या. मी त्यांच्या मागून गेलो आणि त्यांचा पदर ओढू लागलो पण त्या हियाकडेच लक्ष देत राहिल्या.
खूप वर्षांनी डॅडीजींनी मला माझ्या ह्या शाळेत जाण्याबद्दल सांगितलं. झालं असं… ‘‘तुझी दृष्टी गेली तेव्हा मला अंध माणसांबद्दल काहीच माहिती नव्हती.’’ ते म्हणाले होते. मी जेमतेम चार वर्षांचा असेन, मेनेंनजायटिसच्या आजारात मी आंधळा झालो. ‘‘इतरांसारखंच मी फक्त रस्त्यावर अंध माणसांना पाहिलं होतं, अडखळत, चाचपडत शहरातून चालताना. त्यांच्या एका हातात बहुतेकवेळा एक काठी असायची आणि दुसर्या हातात पत्र्याचा वाडगा असायचा. शिवाय मी डॉक्टर आणि आरोग्य अधिकारी असल्यामुळे खेडेगावातल्या फिरतीवरही मी अशी माणसं पाहायचो. पण एकत्र कुटुंबात त्यांची कुणी ना कुणीतरी काळजी घ्यायचं. सगळ्या प्रकारची माणसं त्या मोठ्या कुटुंबात सामावली जायची. पण तरीही त्यांची परिस्थिती जखमी प्राण्यापेक्षा जराशीच बरी असायची असंच म्हणावं लागेल. तेव्हा मी ठरवलं माझा अंध मुलगा असा नातेवाईकांच्या दयेवर अवलंबून राहणार नाही. तुझ्या इतर भावाबहिणींप्रमाणे तू आत्मनिर्भर व्हावंस असं मला वाटायचं. कुठेही गेलास तरी तुला ताठ मानेनं जगता यावं असं वाटायचं. मग मी तुझ्यासाठी अंधशाळा शोधायला लागलो. एवढ्या मोठ्या देशात फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शाळा आहेत आणि त्यासुद्धा मुंबई आणि कलकत्त्याला असं कळलं. आपल्या सारख्या पंजाब्यांना त्या कलकत्त्याच्या खाईत राहणं शक्यच नाही म्हणून तो विचार सोडून दिला. मुंबईच्या वर्तमानपत्रातल्या सल्ला देणार्या कॉलमध्ये जाहिरात दिली. उत्तर आलं दादर अंध शाळेच्या श्री. रासमोहन यांच्याकडून.
‘‘त्यांनी स्वतःची माहिती दिली की ते तरुण आहेत. त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांना एक छोटी मुलगी आहे. त्यावरून मला वाटलं, हे चांगले कुटुंबवत्सल गृहस्थ आहेत. त्यांनी असंही लिहिलं होतं की ते ख्रिश्चन आहेत आणि अमेरिकेत शिकून आले आहेत. त्यामुळे मला वाटलं, त्यांचे अंधांविषयी आणि त्यांच्या शिक्षणाविषयीचे विचार आधुनिक असणार. आपल्या हिंदू बाधवांसारखी ‘कर्माची फळं भोगायची म्हणून आंधळेपणा आलाय’, अशी त्यांची समजूत नसणार. मी त्यांना पत्र लिहिलं. तिथली राहण्या जेवण्याची व्यवस्था आपल्या घरच्याइतकी चांगली नसणार याची मला कल्पना होती. म्हणूनच तुला त्यांच्या घरी जेवून राहून शाळेला जाता येईल, शिकता येईल का याबद्दल मी त्यांना विचारलं होतं. त्याचे पैसे देण्याची मी तयारी दाखवली होती. मग त्यांचं उत्तर आलं होतं. ते तुला आपल्या मुलासारखं सांभाळतील आणि जेवणा-राहण्याचा खर्च महिन्याला चाळीस रुपये येईल असं त्यांनी कळवलं. आपल्या ओमभैय्यासाठी सिमल्याच्या बिशप कॉटन शाळेचा महिना सत्तर रुपये खर्च आम्ही करतच होतो आण