बालमन आणि ‘बालभारती’ (इ. पहिली ते चौथी)
मराठी ‘बालभारती’च्या इयत्ता पहिली ते चौथीच्या पाठ्यपुस्तकांचे परीक्षण एका कार्यशाळेच्या निमित्ताने मला करता आले. भाषेचे शिक्षण हे सर्व शिक्षणात केंद्रवर्ती असते. त्यामुळे या पाठ्यपुस्तकांचे परीक्षण भाषा, साहित्यमूल्य व शिक्षणशास्त्र या संदर्भात जसे करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे ‘बालमना’च्या कोनातूनही करणे आवश्यक आहे. बालमनाची नैसर्गिक वृत्तिवैशिष्ट्ये आणि अभ्यासक्रम यांचा सांधा जुळण्याचे काम क्रमिक पुस्तकांतून कशाप्रकारे घडते, याकडे येथे लक्ष वेधायचे आहे.
पहिली ते चौथीचा विद्यार्थीवर्ग हा खरे तर संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेत पायाभूत महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या शिक्षणक्रमात भाषा आणि भाषेच्या माध्यमातून इतर विषय आत्मसात करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून असते. भाषेवर पडणारी ही दुहेरी जबाबदारी लक्षात घेता भाषेच्या पाठ्यपुस्तकांचे बालमनाशी जिव्हाळ्याचे नाते लागणे कसे गरजेचे आहे, हे समजते.
‘भावजीवन’ : जडण-घडण
या इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या भावजीवनाशी नाते असणारे विषय पाठ्यपुस्तकांत हवेत, असे म्हटले जाते. खरे तर या वयोगटातील मुलांच्या भावजीवनाची जडणघडणच या पाठ्यपुस्तकांमुळे होत असते. ‘भावजीवन’ ही एक अमूर्त संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे आंतरिक जीवन असते. हेच त्याचे ‘भावजीवन’. या भावजीवनात व्यक्तीच्या संवेदना, भावना, विचार, स्मृती व स्वप्ने यांना स्थान असते. एखादी इमारत बांधताना जसा पाया भक्कम करणे, एकेक वीट उभारणे अशा पद्धतीने बांधकाम चालते, तसेच भावजीवनाच्या घडणीसाठीही आवश्यक असते. भावजीवनाची उभारणी शब्दांच्या त्या साठविलेल्या संवेदना, भावना, विचार, स्मृती, स्वप्ने यांच्या ठशांच्या – आधारे होत असते. (काही अपवाद वगळता!) हे भावजीवन जितके समृद्ध असेल, तितके व्यक्तीचे आंतरिक सामर्थ्य वाढत असते. व्यक्तीला आयुष्यभर सोबत करील – अगदी एकटेपणातही एकाकी वाटू देणार नाही! – असे पाथेय लहानपणीच मिळणे आवश्यक असते.
विविध भावबंध
या पार्श्वभूमीवर आता ‘बालभारती’चा विचार करूया. ‘बालभारती’ (इ. तिसरी)च्या ‘चित्रे’ (जी. ए. लेखक) या पाठातील पुढील परिच्छेद पाहा.
‘‘बिम्मला एकटे वाटू लागले. तो इकडे तिकडे रेंगाळला. मग तो सोप्यावर आला. खुर्चीवर उभे राहून त्याने कपाट उघडले. त्यात गंमतीच्या पुष्कळ वस्तू होत्या. हिरव्या काचेची दौत, तांबड्या मेणबत्त्या, बंद पडलेले जुने घड्याळ, रंगीत दोरे, हिरव्या-निळ्या मण्यांचा झगा घातलेली एक हात मोडलेली काचेची बाहुली, अंग दाबताच पत्र्याच्या बटणामधून कुई आवाज करणारे रबरी बदक! पण त्या सार्यांत बिम्मला फार आवडला तो रंगीत खडूंचा डबा!’’ (पृ. ३०) येथे वर्णन केलेल्या या अनेक गोष्टींना बिम्मच्या भावजीवनात स्थान आहे. तुम्हांआम्हांला मोलाच्या न वाटणार्या अशा अनेक गोष्टी मुलांच्या मनात वेगवेगळ्या कारणांनी आठवणींच्या धाग्यांमुळे दृढ झालेल्या असतात. मुलांच्या मनाचा हा नाजूक कप्पा या पाठात अचूक आला आहे. सिद्धहस्त लेखक जी. ए. कुलकर्णी यांचा हा पाठ आहे. यात बिम्मच्या मनात मोडक्यातोडक्या वस्तूंविषयी निर्माण झालेले भावबंध वाचता येणे महत्त्वाचे आहे. पहिलीतील ‘बोला बाई बोला’ ही शांता शेळके यांची कविता मुलांच्या मनातील आईविषयीची भावना व्यक्त करते. वस्तूंप्रमाणेच घरातील आणि घराबाहेरील व्यक्तींविषयीचे भावबंध हेही भावजीवनाचे अस्तर असते. ‘अशी जिव्हाळ्याची अनेक नाती असतात’, असा भाव मुलांच्या मनात रुजणे आवश्यक असते. आईशी असणारे खास नाते व्यक्त करणारे काही पाठ येथे लक्षात घ्यावे लागतात. तान्हुल्यासाठी जीव धोक्यात घालून घरी परतणारी ‘हिरकणी’ (इ. चौथी), आपल्या एकुलत्या एका मुलाची फोटोफ्रेम नेताजींना अर्पण करणारी माता (पाठ – ‘सुभाषचंद्र बोस’ – इ. चौथी) ‘मला माझ्या आईचा अभिमान वाटतो’ (इ. चौथी) मधील मुलगी या व्यक्तिरेखा महत्त्वाच्या आहेत. ‘माझे घर’ ही इयत्ता दुसरीची कविता मुलांभोवतीचा हा सर्वात जवळचा नात्याचा कोश वर्णन करते. यापलीकडे जाऊन इतर नातेवाईक आणि नात्यापलीकडच्या परिचितांमधला जिव्हाळा व्यक्त करणारे संदर्भ त्यामानाने कमी प्रमाणात आहेत. ते असे : सुट्टीत आजोळी रमणारी सुलभा (‘साकव’ – इ. दुसरी). तसेच, लता मंगेशकर यांनी आपले शेजारी बाबूराव पेंटर यांच्या कुटुंबाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते ‘माझ्या आठवणी’मध्ये उलगडून दाखवले आहे. सानेगुरुजींच्या पत्रातही (इ. चौथी) हा नात्याचा गोडवा आहे.
व्यक्तीचे नाते इतर व्यक्तींप्रमाणेच प्राणी, पक्षी, वनस्पती या निसर्गघटकांशीही जुळत असते. त्या नात्यांनाही भावजीवनात स्थान असते. या दृष्टीने यातील ‘एक होता ससा’, (इ. दुसरी), ‘मायाळू हत्ती’ (इ. पहिली, भाग १) हे पाठ प्राण्यांचे भावविश्व व्यक्त करतात. ‘उठा उठा चिऊताई’ (इ. दुसरी) ही कुसुमाग्रजांची कविता तर पक्ष्यांशी मुलांचे नातेच जोडते. त्यांचीच ‘हळूच या हो हळूच या!’ ही कविता (इ. चौथी) फुलांचे भावजीवन उलगडून दाखवताना त्यांची आणि मुलांची भावनिक समरसताही साधते.
व्यक्तीच्या भावजीवनाला स्वप्नांमुळे चैतन्य मिळत असते. ‘बालभारती’तील ‘चालता चालता काय होते?’ (इ. तिसरी), ‘झाडे लावू’ (इ. चौथी), ‘छोटेसे बहीणभाऊ’ (इ. चौथी), ‘मला व्हायचंय अंतराळवीर’ (इ. चौथी) या कविता विद्यार्थ्यांच्यात स्वतःच्या आणि समाजाच्या सुंदर भविष्याची स्वप्ने पेरणार्या आहेत. त्यातून मुलांच्या मनात उद्याविषयीची आस्था, उत्साह आणि आशावाद रुजत जातो.
अशा चैतन्यपूर्ण भावबंधांनी विणलेले भावजीवन नुसते आकाराला येऊन पुरेसे होत नाही. या भावजीवनाच्या जडणघडणी इतकेच त्याचे पोषण व संवर्धनही महत्त्वाचे आहे.
भावजीवनाचे पोषण
विद्यार्थ्यांच्या भावजीवनाचे पोषण करण्यासाठी विद्यार्थ्यांची वयानुरूप वृत्तिवैशिष्ट्ये हेरणे आवश्यक असते. त्या वृत्तींशी पाठांमधील आशयाचा मेळ जुळला की त्या वृत्ती बहरून येतात. या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण वृत्तिविशेष केंद्रस्थानी ठेवून त्याभोवती जमा होणारे पाठ लक्षात घेऊ या.
१) कुतूहल
बालमनाचा व्यवच्छेदक वृत्तिविशेष म्हणजे कुतूहल. हे कुतूहल अनेकपदरी असते. ते मुलाचे लक्ष भोवतालच्या जगाकडे ओढून नेत असते. बाह्य वास्तवातील घटक त्याच्या जाणिवेत शोषले जाण्यासाठी कुतूहलवृत्तीचे पोषण व्हावे लागते. पाठ्यपुस्तकातील ‘भूर जाऊ’ (इ. दुसरी), धरत्रीले दंडवत (इ. चौथी) ‘फुलपाखरू’ (इ. पहिली, भाग २) या कविता मुलांच्यातील कुतूहल जागे ठेवणार्या आहेत. ‘‘मी धरू जाता, येई न हाता, दूरच ते उडते, फुलपाखरू ॥हा ग. ह. पाटील यांच्या ‘फुलपाखरू’ या कवितेचा शेवट कुतूहल खेळतं ठेवणारा असा अतिशय स्वाभाविक आहे. अशाच कुतूहलाचे मूर्त रूप आहे दा. अ. कारे यांची ‘झुळूक मी व्हावे’. इ. चौथीची कविता मुलांच्या मनातील कुतूहलाला जणू वाट करून देते.
‘‘कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी’’ अशा कोणत्याही मनाई हुकुमाला न जुमानता संचार करण्याची ओढ मुलांमध्ये असते. ‘झुळूक व्हावे’ या इच्छेमागे हेच कुतूहल आहे. यात माहितीच्या अंगाने कुतूहलपूर्ती करणारे काही पाठ आहेत. ते म्हणजे ‘असा पडतो पाऊस’ (इ. दुसरी), ‘बलाढ्य मुंगी’ (इ. चौथी), ‘पत्राचा प्रवास’ (इ. दुसरी), हे पाठ होत. तर ‘राजू आरशात पाहतो’
(इ. तिसरी) हा पाठ म्हणजे माकडाच्या मनातील कुतूहलाचे मार्मिक चित्रण आहे.
२) संवेदनशीलता
मुलांचे ऐंद्रिय संवेदन तल्लख राखण्यास मदत करणे व त्याद्वारे मनाची संवेदनशीलता जपणे, हेही पाठांमधून घडावे लागते. त्यासाठी निरीक्षण, सौंदर्यदृष्टी, आस्वादक्षमता याही मानसिक शक्तींचे पोषण होणे आवश्यक असते. ‘जिकडे तिकडे पाणीच पाणी’ (कवी शंकर वैद्य, इ. तिसरी) ही कविता सौंदर्यदर्शनाचा आनंद जणू नादातून व लयीतून प्रकट करते. ‘झुळूक मी व्हावे’ या कवितेतील प्रतिमासृष्टीही गंध, नाद आणि स्पर्शसंवेदना जाग्या करणारी आहे. सानेगुरुजींचे पत्र आणि जी. ए. कुलकर्णी यांची कथा म्हणजे रंगसंवेदनेचा फुललेला ताटवाच आहे. ‘हळूच या हो हळूच या’, ‘गाणे अमुचे जुळे’ (इ. तिसरी) या कविता संवेदनशक्ती उमलवायला मदत करणार्या आहेत. भा. रा. तांबे यांची ‘सायंकाळची शोभा’ ही कविता निसर्गातील रंगछटांची पखरण समोर ठेवते. या कवितेतील गतिमानता ही केवळ चालीत नाही. पाडगावकरांच्या कवितेतील ‘गाणे’पण हेही विस्तारत जाणारे आहे.
‘‘गाणे अमुचे झुळझुळ वारा
गाणे अमुचे लुक लुक तारा’’
या त्यातील ओळी तसेच तांबे यांच्या कवितेतील
‘‘झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे
किती दुसरी उडती
हिरे, माणके, पाचू फुटूनी पंखचि गरगरती !’’
या ओळी प्रत्येक क्षणात भरलेली नाचरी लय अनुभवायला देतात. मनाने असा तरल अनुभव घेता आला तर ‘मन विस्तार पावणे, मन विरघळून जाणे, मन उजळणे’ म्हणजे काय, याची प्रचीती येऊ शकते. मनाची ही लवचीकता वाढविण्यासाठी अशा सौंदर्यवादी कविता उपयुक्त ठरतात.
३) उत्साह/क्रीडावृत्ती
वयानुरूप मुलांमध्ये असणारा उत्साह हा त्यांच्या चपळ हालचालींमधून जसा दिसत असतो, तसाच साहस, नावीन्यपूर्णता यांच्याकडे ओढ घेणे यामागे हीच वृत्ती मूळ असते. या वृत्तीचे पोषण करणारे काही पाठ नेमलेले आहेत. ‘शाबास माझ्या पुता’ (इ. तिसरी) मधील लहानग्या जितूचे प्रसंगावधान, कल्पनाशक्ती व साहस प्रशंसनीय आहे. ते मुलांना प्रेरक ठरते. ‘तेनाली राम’ (इ. तिसरी) ची कल्पकता चोरांना फजित करते. त्याच पाठ्यपुस्तकातील शिरीषकुमार हा पाठही अमाप उत्साहाला योग्य दिशा मिळाली की येणारी अर्थपूर्णता दाखवून देतो. खेळात दंग होण्याची बालवृत्ती व्यापक होत होत निरपेक्षपणे ध्येयपूर्तीत रमण्याइतकी आदर्श ठरू शकते. एडिसनची प्रयोगशीलता व त्यातील तन्मयता, धावपटू भाग्यश्री बिलेची जिद्द, शिवशंकरचा धाडसीपणा, ओढ्यावर पूल बांधणार्या गोविंदाची चिकाटी हे सारे सळसळत्या उत्साहाला योग्य दिशेने बांध घातल्यावर दिसणारे आविष्कार आहेत. मुलांच्या मनात हे आदर्श ठसतात.
या आदर्शरूपांच्या अलीकडच्या पातळीवरही क्रीडावृत्ती दैनंदिन जीवनात व्यक्त होत असते. अगदी शब्दाच्या उच्चाराची मजा अनुभवण्यापासून ते दुसर्याची फजिती बघण्यातली मजा अनुभवण्यापर्यंत ‘गंमत करण्याची’ ही वृत्ती म्हणजे छोट्यांची निर्व्याज क्रीडावृत्ती असते. ‘भिंगरी’ (इ. पहिली, भाग १), ‘फुगा फुटला’ (इ. पहिली, भाग २), ‘माकड आणि टोपीवाला’ (इ. दुसरी), ‘मी क्रिकेट खेळतो’ (इ. तिसरी) ‘गंमतजंमत’ (इ. पहिली, भाग २), ‘चांदोबा पाण्यात पडला’ (इ. पहिली, भाग १), ‘झोपाळा गेला उडून’ (इ. दुसरी), ‘ये रे ये रे कोल्होबा’ (इ. दुसरी) हे पाठ यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. इयत्ता चौथीसाठी नेमलेले ‘अति तेथे माती’ हे नाटुकले राजाची फजिती एकप्रकारे लक्षात आणून देते. त्यातील शब्दनिष्ठ विनोदाचा आनंद घेणे, ही भाषा अनुभवण्याच्या पातळीवरची क्रीडावृत्तीच आहे.
४) संस्कारक्षमता
विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची भूमिका शिक्षणामध्ये असते. याचे कारण मुळात या वयातील मुले ‘निरागस’ असतात आणि म्हणून ती संस्कारक्षम असतात, हे होय. हे संस्कार केवळ ठोकळेबाज विचारांमधून होत नसतात. त्यासाठी जिवंत व्यक्तिरेखा व सर्जनशील साहित्यकृतींची गरज असते. म. गांधीजींच्या निश्चयीवृत्तीचे दर्शन घडविणारा पाठ (इ. तिसरी) खरे तर शिक्षण हे कसे चोवीस तास चालू असते, याकडेही लक्ष वेधतो. सतत डोळ्यांसमोर राहावा म्हणून भिंतीवर रोज एक श्लोक ते चिकटवत व जातायेता पाठ करीत. यातून शिक्षणशास्त्राचे एक तत्त्व कळते. संस्कार घडविण्यासाठी सातत्याने प्रभाव पडावा लागतो, हे ते तत्त्व होय. ‘पोपटपंची’ (इ. चौथी) ही गोष्टही शिक्षणशास्त्रातील सिद्धांताचेच निरूपण करते. ‘सवय शिस्तीची’ (इ. तिसरी), ‘रूप नको, गुण पाहा’ (इ. पहिली, भाग २), ‘फुलांची भेट’ (इ. तिसरी) इत्यादी पाठ दैनंदिन जीवनातील सवयी, वर्तणूक याविषयी संस्कार करतात तर ‘वीरांगना’, ‘क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद’ (इ. चौथी), ‘जय भारता’ (इ. तिसरी), ‘नदीचे गाणे’ (इ. दुसरी), विद्यार्थ्यांनो जागृत व्हा’ (इ. चौथी), ‘एवढीशी चूक’ (इ. दुसरी) हे पाठ मूल्यसंस्कारदृष्ट्या महत्त्वाचे आहेत.
५) वास्तवाची वेगळी जाणीव
मुलांमध्ये या वयात आढळणारे अद्भुततेचे आकर्षण जाणून घेताना असे लक्षात येते की त्यामागे मुलांच्या मनातील वास्तवाची वेगळी जाणीवच मुख्य असते. मुलांची तर्कशक्ती ही एक स्वतंत्र गोष्ट असते. त्यांना ‘खरे भूत’ ‘खोटे’ असते हे माहीत असते आणि ‘खोटे’ म्हणजे ‘पुस्तकातले’ भूत ‘खरे’ वाटत असते ! त्यांच्या जाणीवविश्वात सत्य व कल्पित यांच्यात कप्पेबंदपणा नसतो. त्यांची वास्तवाची जाणीवच अनेकपदरी असते. त्यामुळे त्यांच्या या वृत्तिविशेषाशी संवादी असे काही पाठ पाठ्यपुस्तकात असणे सुसंगत ठरते.
‘चेतनीकरण व रूपबदल’ या तत्त्वाचा आविष्कार करणारे पाठ मुलांच्या अद्भुततेच्या आकर्षणाशी नाते सांगतात. ‘चेतनीकरण’ म्हणजे निर्जीव वस्तूला जिवंत मानून बोलते करणे. तिसरीला नेमलेला ‘डोंगरदादा’ हा पाठ यादृष्टीने उल्लेखनीय आहे. सर्व प्राणिमात्रांशी जिव्हाळ्याने वागणारा, ‘लेकुरवाळा’, हसताबोलता डोंगर या पाठात जिवंत होतो.
विंदा करंदीकरांची ‘लपंडाव’ ही कविता (इ. दुसरी) तसेच वि. म. कुलकर्णी यांची ‘ज्योत’ ही कविता (इ. तिसरी) ‘रूपबदला’च्या माध्यमातून मुलांच्या मनातील अद्भुततेचे आकर्षण खेळते ठेवते. ‘असा पडतो पाऊस’ (इ. दुसरी) हा पाठही जलचक्रातील ‘पाणी – वाफ – पाऊस’ हे रूपबदल समोर ठेवतो. इ. तिसरीची ‘या बालांनो या रे या’ ही कविता,
‘या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया’
अशा शब्दात वास्तवाच्या आसपास वावरणारे अद्भुताचे विश्वच डोळ्यांसमोर रेखाटते. हे अद्भुताचे आकर्षण एकप्रकारे मुलांमध्ये आशावाद पेरू शकते. भोवतालचे कुरूप वास्तव कात टाकून सुंदर जग आकाराला येऊ शकते; हा त्या ‘अद्भुत रूपबदला’तून ध्वनित होणारा विश्वास असतो. यातून कल्पनाशक्तीचा विकासही होतो.
बालमनः विकासप्रक्रिया
लहान मूल मोठे होत असताना त्याच्यामधील ‘मी’च्या जाणिवेचेही विकसन होत असते. यात ‘मी कोण?’ हे भान येणे, हा सुरुवातीचा टप्पा असतो. यादृष्टीने ‘माझा हात’ (इ. पहिली, भाग २) ‘मी कोण?’ (इ. दुसरी) हे पाठ वाचता येतात. ‘माझा’ ही जाणीव ‘मी’च्या एकसंध व्यक्तिमत्त्वाचा साक्षाकार घडविणारी असते. ‘मोत्याची शेपटी’ (प्र. के. अत्रे, इ. पहिली, भाग २) ही गोष्ट यादृष्टीने समजून घ्यायला हवी. स्वतःची शेपूट पकडण्यासाठी धावणारा मोत्या हे या वयातील आत्मभान उमलणार्या वयातील मुलांचे प्रतीक आहे.
वाढीच्या वयात आत्मभान जागृत झालेली मुले आत्मकेंद्री होताना दिसतात. या टप्प्यात त्यांना भोवतालाशी विविध नात्यांचे जाळे विणून जोडण्याची गरज असते. हे भान असलेला पाठ म्हणजे ‘देतो तो देव’ (इ. दुसरी), ‘आपल्या घरचे रसाळ गरे आपण सर्वांना पोहोचवून मग शेवटी खायचे’ हे शिकवणारी विनूची आई बालमनाच्या विकासाला योग्य दिशा देणारी आहे.
वाढीच्या वयात खरे तर ‘स्व’ आणि ‘इतर’ यांच्यात जसा पूल जोडायचा असतो, तसाच ‘मुक्तपणा’ आणि ‘नियमबद्धता’ यांच्यातही तोल साधायचा असतो. मुलांच्या स्वाभाविक अशा मुक्तपणाच्या आकर्षणाचे रंग अनेक पाठांमध्ये आहेत. पाठ्यपुस्तकातील ‘झू, झू झोपाळा’
(इ. पहिली, भाग १), अनेक कवितांमधली मुक्त धुंदीची जाणीव, ‘उठा उठा चिऊताई’ मधली उशिरा उठणारी चिमणी ही रूपे बालस्वभावाला मोहविणारी आहेत. त्याचबरोबर त्यांच्यातील सांघिकवृत्ती जागी करणारे पाठही आहेत ज्यातून त्यांना नियमपालन व इतरांच्यात मिळूनमिसळून राहणे शिकावे लागते. यादृष्टीने विचार करता ‘पतंग’ (इ. दुसरी) ही कविता लक्ष वेधून घेते. या कवितेत पतंगाचा मुक्तपणा आणि खेळातील सांघिकता व नियम यांचा मेळ चांगला जुळतो.
मुलांचे सामाजिकीकरण निकोपपणे होण्यासाठी त्यांना दोस्तमंडळी भेटावी लागतात. ‘चला सुट्टी झाली’ (इ. पहिली, भाग २), ‘अशी असावी मैत्री’ (इ. तिसरी), ‘बलाढ्य मुंगी’
(इ. चौथी) इत्यादी पाठ सांघिक भावना विकसित करणारे आहेत.
विकासाचे टप्पे हे क्रमाक्रमाने येत राहतात – ‘मी’च्या जाणिवेचे भान, कुटुंबियांच्या नात्यांचे भान, भोवतालच्या परिसराचे भान असे टप्पे पार करता करता अपरिचित वास्तवाचे मनाने आकलन करून घेण्याचा टप्पा येतो. यात ‘चणिया’ सारखा पाठ (इ. तिसरी) दूरच्या वास्तवाचे – एका जंगलातील आदिवासी मुलाचे – रूप समोर ठेवतो. तर ‘देवगिरी’ सारखा पाठ (इ. चौथी) स्थलदृष्ट्या तसेच कालदृष्ट्या अपरिचित वास्तवाचे रूप समोर ठेवतो. सांस्कृतिक वारसा ही कल्पना या वास्तवाच्या ज्ञानातूनच मनात रुजते. याही पुढचा टप्पा म्हणजे अमूर्ताचे आकलन होय. कुसुमाग्रज, पाडगावकर, कारे, तांबे यांच्या कवितांमधील प्रतिमा जाणून घेताना नकळत अमूर्ताचे आकलन होत असते. उदा. ‘झुळूक’ ही अमूर्तच असते. पण तिच्या असण्याची ओळख कशी होते, हे पाहण्याजोगे आहे. तसेच ‘चेतनीकरण’ या रूपातूनही अमूर्ताचे आकलन करून घेणे शक्य होत असते.
पाठ्यपुस्तकांतील त्रुटी
पाठ्यपुस्तकांतील बालमनाच्या वृत्तिवैशिष्टयांना पुरेसा न्याय देऊ न शकणार्या गोष्टींचाही निर्देश करायला पाहिजे.
इ. पहिलीच्या (भाग पहिला) पाठ्यपुस्तकातील आज्ञार्थी वाक्ये निर्जीव वाटतात. ती मुलांना नकळत हुकूम करायला शिकविणारी म्हणूनही खटकतात.
उदा. आई, सरबत कर, अमर सरबत आण. त्याच पुस्तकातील ‘अबब! केवढे मोठे धरण!’ अशी वाक्ये तद्दन पुस्तकी, कृत्रिम वाटतात.
पाठांमध्ये विशेषणांचा केलेला उपयोग मुलांच्या विचारांना चालना देण्यात अडथळा आणतो. उदा. ‘लोभी कुत्रा’ (इ. दुसरी) तसेच त्याच पाठ्यपुस्तकातील ‘आमची मंजू’ या पाठात ‘ही आमची मंजू, फार गुणी मुलगी’ असा सुरुवातीलाच तिचा विशेषणयुक्त परिचय करून दिला जातो. असा बरावाईट शिक्का बसलेल्या रूपात व्यक्ती किंवा वस्तू समोर ठेवण्यापेक्षा त्या व्यक्ती/वस्तूचे वागणे चांगले – वाईट कसे आहे, हे शेवटी यायला हवे. त्यातून मुलांना चांगले – वाईट याचा विवेक यायला मदत झाली असती. त्याच पाठ्यपुस्तकातील ‘माझे घर’ या कवितेतील ‘माझ्या भावंडांचा मेळा’ ही ओळ आजच्या कुटुंबनियोजन धोरणाचा विचार करता कितपत प्रस्तुत ठरते?
‘पहिली – भाग दोन’च्या पाठ्यपुस्तकातील ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ हा पाठ मुलांच्या दृष्टिकोनातून ‘तिळगूळ’ या पदार्थाचा आस्वाद अजिबातच घेत नाही. त्यामुळे सण साजरा होण्यातील आनंद त्यातून झिरपत येत नाही. या स्तरावरील पाठ्यपुस्तकातील कवितांमध्ये छंदोबद्ध किंवा आघातयुक्त लय असणे आवश्यक आहे. सर्वच कविता या दृष्टीने समाधानकारक नाहीत. काही गद्य विधानात्मक कविता (उदा. ‘अक्कू बक्कू’, इ. दुसरी) टाळायला हवी होती. काही कवितांमध्ये एखाद्या ठिकाणी लय खंडित होते तेथे र्हस्वदीर्घ योग्यरीत्या वापरून संपादन करून लय प्रवाही ठेवायला हवी होती. उदा. ‘नदीचे गाणे’ (इ. दुसरी) ही कविता.
पाठ्यपुस्तकात निव्वळ पुस्तकी माहिती देणारी भाषाशैली फार खटकते. अशी शैली बालमनाशी संवाद साधू न शकल्यामुळे संस्कारही करू शकत नाही. ‘कंधारची सहल’ (इ. तिसरी) हा पाठ अशा कृत्रिम शैलीचा नमुना आहे.
पाठ्यपुस्तकांतील प्रश्न पाठाच्या गाभ्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वळविणारे हवेत. या दृष्टीने पाहता कवितांवरील प्रश्न वरवर घोटाळणारे वाटतात. त्यामुळे अध्यापनही वरवरच्या – शाब्दिक आकलनाच्या – पातळीवर रेंगाळण्याची भीती वाटते. उदा. ‘पतंग’ या कवितेवर ‘पतंग उडविण्याचा खेळ का चांगला आहे?’ असा प्रश्न विचारला तर विद्यार्थ्यांना या खेळातील मुक्ततेचा आनंद आणि त्याचवेळी मित्रांच्या संगतीचा आनंद (सांघिक भावना) अशा गाभ्यापर्यंत नेता येईल. असो.
पहिली ते चौथीच्या पाठ्यपुस्तकांमधील पाठ हे सुटे घटक न मानता त्यामागील बालमनाच्या वृत्ति-वैशिष्ट्यांना जोडणारे धागे एकात्मरीत्या समजून घेतले तर शिक्षकाला अध्यापन करताना काही मर्मदृष्टी देता येईल. या दृष्टिकोनातून हे परीक्षण केले आहे.
संदर्भ – मराठी ‘बालभारती’ (इ. पहिली ते चौथी), महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे, सुधारित आवृत्ती २०००.