वेदी – लेखांक – ३

मुलांचं वसतिगृह

श्री. व सौ. रासमोहन यांच्याबरोबर राहायला लागून एखादा आठवडा झाला असेल. एक दिवस बाई जेवणाच्या वेळी मला म्हणाल्या, ‘‘आमची झोपायची जागा फारच लहान आहे. तू इतर मुलांबरोबर त्यांच्या वसतिगृहात झोपायला गेलास तर सोयीचं होईल.’’
‘‘पण आपण आधी श्री. मेहतांना तसं सांगायला हवं ना?’’ श्री. रासमोहन म्हणाले.
‘‘श्री. मेहता चांगले सुखवस्तू आहेत. आपल्या झोपायच्या जागेची अडचण त्यांना कळली तर ते नक्की समजून घेतील.’’
‘‘मुलांच्या जागेतलं अंथरूण याच्यासारख्या चांगल्या घरातल्या मुलाला सोयीचं नाही होणार. पण मला वाटतं आपण वेदीसाठी एक स्पेशल पलंग आणूया. अर्थातच त्याचं खाणं पिणं आपल्याबरोबर होईल. याला खरोखरीच काही शिकायचं असेल तर त्यानं इतर मुलांमध्ये वावरायला हवं. अति काळजी आणि लाड या गोष्टी अंध मुलासाठी फारच वाईट असतात.’’
‘‘कुठं आहे ती जागा? मला नाही तिथं जायचं.’’ मी म्हणालो.
‘‘अरे त्या दरवाजापलीकडेच तर आहे. या जेवणघराच्या एका बाजूला मुलांची झोपण्याची खोली आणि मुलांचा जिना, तू नेहमीच तर त्यावरून जा ये करतोस. मुलींची खोली दुसर्या बाजूला. मुलींच्या जिन्यापलीकडे.’’ रासमोहन म्हणाले.
‘‘मी वरच्या मजल्यावर हियाबरोबर राहणार.’’

हे बोलणं झाल्यावर एक दोन दिवसांनी त्यांनी मला बैठकीच्या खोलीतून, हाताला धरून काही पावलं चालवत नेलं. मुलांच्या जिन्यापलीकडच्या झोपायच्या खोलीत आम्ही गेलो. त्यांनी एका मुलाला हाक मारली. माझ्या दुप्पट उंची असलेला एक मुलगा आला. तो म्हणाला ‘‘वेदी, हा तुझा मोठा भाऊ देवजी. हा तुझी अगदी प्रेमानं देखभाल करेल.’’
मी रासमोहनच्या पायाला घट्ट धरलं आणि म्हणालो ‘‘तो माझा भाऊ नाहीये. मला हियाबरोबर राहायचं आहे.’’
त्यांनी माझे हात सोडवले आणि ते जायला लागले आणि त्यांच्या पावलांचा क्लिक क्लिक आवाज हळूहळू नाहीसा होत गेला. मी त्यांच्या पाठीमागे पळत जाणार होतो तेवढ्यात….. लोखंडी जाळीचा सरकता दरवाजा बंद झाल्याचा खटाक् असा आवाज आला आणि ते निघून गेले.

देवजीनं खाली वाकून माझा गालगुच्चा घेतला. त्याचे हात लहानसे आणि गार गार होते. तो मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणाला, ‘‘तुझे गाल कसले गोड, गुबगुबीत आहेत ! तू चांगल्या खात्यापित्या श्रीमंत घरातला असणार!’’
‘‘मला हियाकडे जायचंय! मला काका, काकूंकडे जायचंय.’’ मी रडायला लागलो.
‘‘तू पूर्णपणे अंध आहेस का?’’ देवजीनं विचारलं.
‘‘हो मला अजिबात दिसत नाही.’’ मी त्याचा हात धरून ओढत ओढत सरकत्या दरवाज्याकडे नेऊ लागलो. ‘‘ मला काका काकूंकडे ने.’’
‘‘मला थोडं दिसतं. मी पूर्ण अंध नाहीये.’’ माझ्या चेहरा दोन्ही हातात धरून देवजी म्हणाला.
‘‘मला हियाकडे जायचंय.’’
‘‘हियाला बोलता कुठे येतं. इथे मुलांच्या खोलीत तुला मजा वाटेल.’’ त्यानं मला खोलीत थोडं आत नेलं आणि एका लाकडी फळीवर बसवलं.
‘‘हे काय आहे?’’ मी त्या फळीवर हात फिरवत विचारलं. तो प्रकार म्हणजे जाडशा लोखंडी चौकटीवर एका पुढे एक फळकुटं ठेवलेली होती.
‘‘माझा पलंग आहे. तू त्याच्यावर खेळलास तरी चालेल. तुझ्यासाठी अजून पलंग आलेला नाहीये पण ते आणणार आहेत. तो खास स्प्रिंग लावलेला असणार आणि शिवाय त्यावर मच्छरदाणी असेल.’’
देवजीनं मला मुलांच्या शेजघरात फिरवलं. ती एक लांबलचक खोली होती. खोलीत दोन्ही बाजूला ओळीत त्याच्या पलंगासारखेच पलंग होते आणि मधे जायला यायला अरुंद वाट होती.
तेवढ्यात आत येणार्या मुलांचा ओरडाआरडा आणि खिदळण्याचा आवाज आला. देवजी त्यांना मराठीत काहीतरी म्हणाला.
‘‘त्याला उंच धरा म्हणजे थोडं दिसणार्यांना तो दिसेल.’’ कुणीतरी मोडक्यातोडक्या हिंदीत म्हणालं. देवजीनं मला उंच धरलं आणि परत खाली ठेवलं.
बरीच मुलं एकदम पुढे आली आणि मला हात लावू लागली. मुलं सारखी माझ्या गालाला हात लावत होती.
‘‘व्वा कसले गोबरे गाल आहेत’, एकजण म्हणाला. ‘‘कसले गोल गोल आहेत याचे गाल’, दुसरा एक जण म्हणाला. एक मुलगा माझे कपडे ओढत म्हणाला, ‘‘याचे कपडे मऊ आणि इस्त्री केल्यासारखे आहेत.’’ देवजीनं त्या मुलांना बाजूला करायचा प्रयत्न केला. पण कुणी हलेचना. काही मुलांनी माझे हात त्यांच्या खरखरीत हातात घट्ट धरले. ‘‘कसले मऊ मऊ हात आहेत याचे.’’ एकजण म्हणाला. ‘‘मुलींच्यासारखे मऊ आहेत हात.’’ दुसरा म्हणाला.
एकानं माझे दोनही हात हातात घेतले आणि म्हणाला ‘‘किती मऊ! कधी काम करायलाच लागलेलं नाही.’’ त्याचे खरखरीत हात माझ्या हातावरून फिरत होते. विश्वास बसत नसल्यासारखे.
‘‘तुझं नाव काय?’’
‘‘वेदी’’
‘‘वेदी ! वेद असणार. त्याचं झालं असेल वेदी.
हो ना?’’
‘‘हो’’. मी म्हणालो.
‘‘त्याला तसं म्हणतात कारण तो लहान आहे.’’ कोणीतरी म्हणालं.
मी लांब जायचा प्रयत्न केला. ज्यानं माझे हात धरले होते त्यानं हसून ते अजून घट्ट धरले. ‘‘तू हसत का नाहीस?’’ त्यानं एकदम विचारलं. सगळे हसले.
‘‘त्याला सोडून द्या बरं. तो रासमोहनजींचा पाहुणा आहे. काल वर्गात त्याच्याशी ते कसे प्रेमानं हलक्या आवाजात बोलले ते ऐकलं नाही का तुम्ही?’’ देवजी म्हणाला.
मला परत तो पावलांचा क्लिक क्लिक आवाज ऐकू आला. रासमोहन येत होते. ‘‘बूटवाले!’’ कुणीतरी ओरडलं. मुलांनी माझा हात सोडून दिला आणि मागे झाले. बुटांचा आवाज हळू हळू मोठा होत असताना एक प्रकारची गंभीर शांततापण होती. तेव्हा माझ्या एकदम लक्षात आलं – या मुलांच्या खोलीत आल्यापासून मी दुसर्या कुणाच्याच बुटांचा आवाज ऐकला नव्हता. फक्त अनवाणी पायाची सरसर ऐकू आली होती.
-०-
त्या संध्याकाळी माझ्यासाठी एक स्पेशल पलंग आणून ठेवला. तो मुलांच्या लाकडी फळकुटाच्या पलंगांपेक्षा तर वेगळा होताच पण मी घरी झोपायचो किंवा हियाजवळ झोपायचो त्या पलंगापेक्षाही वेगळा होता. त्या पलंगाला गुळगुळीत अशी लोखंडाची चौकट होती. पायागती आणि उशागती उंच कठडे होते. शिवाय मच्छरदाणी लावायला उंच दांड्या होत्या. पलंगाला स्प्रिंग होत्या आणि त्यावर चांगली जाडजूड गादी होती. तो पलंग देवजीच्या आणि दरवाज्याजवळच्या कोपर्यातल्या पलंगाच्या मध्ये ठेवला होता. तो कोपर्यातला पलंग होता डोळस मास्तरांचा. ते मुलांच्या वसतिगृहाचे प्रमुख होते आणि त्या खोलीतल्यांच्यापैकी फक्त त्यांनाच पूर्ण चांगलं दिसायचं.

मुलांनी माझ्या पलंगाला ताबडतोब नाव देऊन टाकलं. ‘हॉस्पिटल बेड’. मला काही तो पलंग आवडला नाही. झोपायची वेळ होऊनसुद्धा मला त्यावर चढून झोपावसं वाटत नव्हतं. पण देवजीनं मला उचलून मच्छरदाणीच्या आत पलंगावर ठेवलं आणि मच्छरदाणी नीट गादीखाली खोचून घेतली.
‘‘मला वरच्या मजल्यावर काकूंकडे जायचंय.’’ मी ओरडलो.
‘‘मी आहे ना तुझ्याजवळ.’’ देवजी म्हणाला.
‘‘मला बाथरुममध्ये जायचंय.’’ मी म्हणालो.
देवजीनं मला व्हरांड्यातून बैठकीच्या खोलीच्या दारासमोरून सरकत्या दरवाज्याच्याही पुढे एक छोट्या खोलीत नेलं.’’ ही मुलांची सार्वजनिक मोरी आहे,’’ तो म्हणाला आणि मला नळ आणि जमिनीतलं एक भोक कुठं आहे ते दाखवलं. ‘‘या भोकावर बसून तू शू कर’’, त्यानं सांगितलं.
‘‘मी त्यात पडेन ना’’, मी त्याला म्हणालो. मला रासमोहन यांच्या बाथरुममध्ये ने म्हणून हट्ट केला. त्यांच्या बाथरुममध्ये कमोड होतं.
‘‘मी तुला धरतो. घाबरू नकोस.’’ मी तरीही ऐकलं नाही. ‘‘नाही. मला काकूंकडेच जायचंय.’’
मी अकांडतांडव केलं, रडलो आणि शेवटी देवजीनं सांगितलं तसा बसलो आणि शू केली.

देवजीनं मला परत आणून पलंगावर नीट झोपवलं. ‘‘तू इथला खास मुलगा आहेस. तुझ्याकडे बूट आहेत, गादी आणि मच्छरदाणी आहे. मुलांच्या आणि मुलींच्या खोल्यांमध्ये कुण्णाकडे हे काही नाहीये. पण ते राहू दे…. काय रे रासमोहन काका काकूंचा पलंग कसा आहे?’’

मला काही सांगता आलं नाही. मला माहीत नव्हतं किंवा आठवत नसावं. मी ममाजींच्या डॅडिजींच्या पलंगावर नेहमीच चढून बसायचो पण रासमोहनकाकांच्या पलंगावर चढलोच नव्हतो. मग मी म्हणालो, ‘‘मला वाटतं हिया त्यांच्या पलंगावर झोपते.’’ देवजी हसला. ‘‘झोप आता’’ असं म्हणून त्याच्या पलंगावर झोपायला गेला.

मला काही नीट झोप लागेना. माझा पलंग इतर पलंगांपेक्षा थोडा लांबट होता. तो थोडा जायच्या यायच्या वाटेतच यायचा. त्यामुळे बाथरूमला येता जाता मुलं त्याला धडकायची.

मला सरकत्या दरवाज्याचा आवाज आला. मग रासमोहनकाकांच्या बुटाचा क्लिक क्लिक आवाज, ‘‘लेफ्ट राईट, लेफ्ट राईट.’’ तरीही त्यांची पावलं हलकी हलकी पडताहेत असं वाटायचं. उंच टाचांचे बूट घतलेल्या ममाजीच जणू. मी सगळ्या मुलांना झपाझप आपापल्या पलंगात गुडूप होताना ऐकलं. मग सगळी खोली शांत झाली. ‘‘कुणीही काही आवाज करायचा नाही.’’ रासमोहन त्यांच्या उंच किनर्या आवाजात म्हणाले. आत येऊन दिव्याचं बटण बंद केलं. अगदी घरी ममाजी करतात तसं. ‘‘माझी पट्टी वापरून कुणालाही शिक्षा करायची माझी इच्छा नाही. बघा, डोळस मास्तर झोपलेसुद्धा.’’ ते निघून गेले.

पलंग फारच मोठा होता. ती खोली केवढी मोठी पण तरी त्यात गर्दी होती. मी रडलो. मग मी झोपलो. मग जागा झालो. आजूबाजूला कुणी कुणी घोरत होतं, कुणी कुरु कुरु दात खात होतं. माझे हुंदके दाबून टाकण्यासाठी मी उशीत डोकं खुपसलं.

तेवढ्यात…. माझी मच्छरदाणी कुणीतरी वर करतंय असं मला वाटलं. मी श्वास रोखून धरला. आणि शांत पडून राहिलो. मी देवजीची हाक ऐकली, ‘‘वेदी’’ तो हळूच म्हणाला. मी उशी आवळून रडत राहिलो.
‘‘इतर मुलांनी ऐकलं तर काय म्हणतील?’’, त्यानं मला उशीसकट उचललं आणि खोलीच्या बाहेर नेलं. मुलांच्या जिन्याच्या पायरीवर तो बसला आणि मला शेजारी बसवलं. हळूच कुजबुजत्या आवाजात म्हणाला, ‘‘तुला घरची आठवण येतेय. आईची आठवण येतेय. मला इथे आणलं तेव्हा मीसुद्धा असाच रडलो होतो. माझं पूर्वीचं आधारगृह मला आठवायचं. पण थोड्याच दिवसात मी ते विसरूनसुद्धा गेलो. तू पण आईला विसरशील आणि इथे राहायला आवडायला लागेल तुला. आपल्या इथे झोपाळे, सीसॉ, डबलबार आहेत. तुला चांगलं चढता येतं?’’
‘‘कुठं आहेत ते मला बघायचंय.’’
‘‘ते मागच्या अंगणात आहेत. आत्ता रात्र झाली आहे ना, मी उद्या दाखवीन.’’ असं म्हणून त्यानं माझे गाल ओढले.
मी त्याच्या चेहर्याला स्पर्श केला. किती बारकुळा आणि खरखरीत होता त्याचा चेहरा! मी पटकन हात मागे घेतला.
तो हसला. परत माझे गाल ओढले आणि विचारलं, ‘‘याला पंजाबी भाषेत काय म्हणातात?’’
‘‘गल्ल’’. मी हसत म्हणालो. देवजीच्या समोर पंजाबी शब्द म्हणायला मजेशीरच वाटलं.
‘‘आता पंजाबीत म्हण, ‘मला देवजी नावाचा एक प्रेमळ मोठा भाऊ मिळाला आहे.’’
‘‘मी नाही म्हणणार’’.
‘‘ए म्हण ना.’’
मी म्हटलं आणि त्यानं माझ्या मागोमाग तेच वाक्य म्हटलं.
‘‘तुझं बोलणं बदकासारखं वाटतंय.’’ मी म्हणालो आणि आम्ही दोघं हसायला लागलो.
‘‘नाही नाही रासमोहनसरांचा आवाज बदकासारखा आहे.’’ तो हळूच कुजबुजला. मग आम्ही पुन्हा खूप हसलो. ‘‘तू काकांना रासमोहन सर असं का म्हणतोस?’’ मी त्याला विचारलं. ‘‘मी गरीब आहे रे. मी त्यांना काका कसं म्हणणार? शिवाय मला काका वगैरे कुणीच नातेवाईक नाहीत. मी अगदी एकटा आहे.’’
‘‘तू लहान बाळ होतास तेव्हा कुणाकडे राहायचास?’’
‘‘मी मिशनमधल्या मिशनरी मम्मी डॅडीकडे राहायचो.’’
‘‘मिशनरी म्हणजे काय?’’
‘‘मिशनरी? मिशनरी? काय बरं ! हां. मिशनरी म्हणजे रासमोहनसारखे. ते तुझे मिशनरी काका काकू आहेत.’’
‘‘पण तुला मिळाले कसे हे मिशनरी ममी डॅडी?’’
‘‘मला कुणी तरी सांगितलं की मी बाळ असताना त्यांच्याकडे आलो. त्यांनीच माझं नाव देवजी ठेवलं. मी आता पंधरा वर्षाचा आहे. मी इथे सात वर्ष झाली राहतो आहे. मी आठ वर्षाचा असताना माझ्या मिशनरी ममी डॅडींनी मला या शाळेत पाठवलं.’’
‘‘ते कुठे आहेत आता?’’
‘‘त्यांच्या मिशनच्या अनाथाश्रमात.’’
‘‘मी तिथे….’’
‘‘शूऽऽऽ मुलांची झोपायची खोली सोडून आपण बाहेर आलोय. कडक नियम मोडलाय आपण. डोळस मास्तरांना कळलं आणि त्यांनी रासमोहनसरांना सांगितलं तर ते आपल्याला पट्टीनं मारतील.’’
त्यानं माझा हात धरला आणि आम्ही हळूच परत आत गेलो.

संजयबद्दल…
मृत्यू अनिवार्यच असतो. शरीराच्या व्याधींशी लढायचं असतं, पण मृत्यूला स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसतंच. मृत्यूशी भांडण होतं ते प्रियजनांना घेऊन जातो, तेव्हा. एरवी स्वीकारसुद्धा म्हणू नये इतकं ते सहज, स्वाभाविक असतं.
संजय संगवईंच्या निधनाची बातमी ऐकली. संजयशी गेल्या पंधरा वर्षांची ओळख आहे. (होती म्हणायला हवं होतं का? पण ओळख कशी संपेल?) पण त्या ओळखीला मैत्री काही म्हणता यायचं नाही. चळवळीच्या एखाद्या कार्यक्रमासाठी क्वचित एकत्र प्रवास करणं, मेधा पाटकरांच्या उपोषणाच्या काळात तिथे एकत्र असणं, कधी एखाद्या विषयावर दोन तीन तास तावातावानं चर्चा करणं आणि असंच.

पण तरीही तो पालकनीतीच्या विचारांचा साथी होता. पालकनीतीनं ज्या मूल्यांसाठी काम आरंभलंय त्या मूल्यांचा तो मित्रच होता, फार जवळचा. अन्याय, विषमतेशी त्याचा सातत्यानं सक्रीय लढा होता. पर्यावरणाच्या जपणुकीच्या, समंजस साधेपणाच्या, वंचितांसाठी अविचलपणे लढण्याच्या रस्त्यावरचा वाटाड्या होता. रसिक, कलासक्त होता. जीवनाकडे प्रसन्नतेनं आणि तरीही त्यातल्या वैयर्थ्याकडे तटस्थपणे, पण गंमतीने पाहू शकणारा होता.
त्याला अभिजात संगीतात विलक्षण गती होती, हे एकदा अपघातानंच कळलं होतं. तेव्हा पालकनीतीच्या ९६ दिवाळी अभिव्यक्ती विशेषांकात त्याला संगीताबद्दल लिहायला सुचवलं होतं. त्यानंही ते मानलं होतं.

दहाबारा वर्षांपूर्वीच त्याच्या कमजोर हृदयाबद्दलही कळलं होतं. त्याचवेळी त्याचं हृदय आणि फुफ्फुसे संपूर्ण काढून, नवीनच टाकायला हवीत असं तज्ज्ञांनी सुचवलं होतं. ह्या गोष्टीला खूप खर्च येणार होता. त्यासाठी पैसा गोळा करायलाही सुरवात झाली होती. अर्थात ती रक्कम अक्षरशः प्रचंड होती, कार्यकर्त्यांच्या ताकदीबाहेरचीच होती, पण स्वतः संजयनं तर उडवूनच लावलन्. आंदोलनांसाठी किमान पैसे मिळवता मिळवता इथं नाकी नऊ येतात, एका माणसावर एवढे पैसे कुठे घालवायचे – तो हसलाच होता.

तज्ज्ञांचं न ऐकल्यानं आता संजय संपणार असं वैद्यकीय विज्ञानावर भयंकर विश्वास असल्यानं, आम्हा अनेकांना वाटलं, पण त्याच्या दुखर्या दुर्बळ शरीरातल्या निरतिशय कणखर मनाकडे आमचं दुर्लक्ष झालं होतं. संजय संपला तर नाहीच, खचलाही नाही, थांबलासुद्धा नाही. त्याचं लिखाण, त्याचं आंदोलनातलं काम, अविश्रांत प्रवास सगळं सुरूच राहिलं – आतापर्यंत.

नर्मदा आंदोलन काय, एन्रॉन काय, एस्.ई.झेड. काय, प्रश्नांची कमतरता इथं नव्हतीच. त्यातही बळाच्या जोरावर चळवळी चिरडण्यासाठी यंत्रणा सज्ज होत्या. अशा वेळी देखील आपल्या इतक्या फाटक्या शरीरानं आपण कसं हे अंगावर घ्यायचं असा प्रश्न ह्या माणसानं मनातसुद्धा येऊन दिलेला दिसत नाही.

२००२ साली त्याच्यावर भ्याडपणानं आणि गैरसमजानं हल्ला झाला होता तेव्हा त्याला तेथून इस्पितळात नेण्यासाठी मी गेले होते. तो सरळसरळ हबकलेला, काहीसा घाबरलेलाही दिसला. ते साहजिकच होतं. पण लगेच दुसर्या दिवसापर्यंत ही धास्ती पार निचरून गेली होती.

संजय आठवतो, तासंतास खुरमांडी घालून लिहित बसलेला. वैयक्तिक मान, पद, पैसा कशाकडे ढुंकूनही न पहाता अविरत काम करणारा. झोपलं की छाती दुखते म्हणून रात्र रात्र लिखाण करत बसून राहणारा.
ज्या कामांत तो झोकून देऊन होता त्यात सहकार्यांशी, इतरांशी त्याचे मतभेद होत नसतील असं मानणंही अवघड आहे, पण हे मतभेद विचारांचे असत. स्वतः संजय ठामपणे आणि तरीही सभ्यता, कामाबद्दलची ओढ न सोडता, ती कधीही पणाला न लावता ह्या मतभेदांना प्रतिसाद देत असे. पक्षाची भूमिका लावून धरण्यापुरता वैचारिक अभिनिवेश तो कधीच घेत नसे. पण स्वतःच्या मतांशी, विश्वासाशी प्रतारणाही स्वीकारत नसे. अनपेक्षित नसूनही त्याच्या मृत्यूनं मनात वेदनांची कळ उठते आहे. मृत्यूशी भांडण होतं आहे.

संजीवनी कुलकर्णी

शिक्षक-शिकवणं-शिकणं
शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकाची भूमिका आणि शाळेतलं वातावरण हे अतिशय महत्त्वाचे असते. जेव्हा आपलं मन, शरीर आणि हृदय यांचा उत्तम मेळ जमून येतो तेव्हाच फुलणं सुंदर, नैसर्गिक आणि सोपं असतं. तिथे स्पर्धा, सक्ती आणि भीतीला अजिबात जागा नसते. संवेदनक्षमतेनं इतरांचा विचार करण्यातूनच स्वयंशिस्तीचा उगम होतो, बाहेरून लादलेल्या शिस्तीतून नव्हे. जेथे स्वातंत्र्य आहे, भीती नावालाही नाही, नियंत्रण नाही, तिथे मूल पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकतं आणि त्याचा स्वतःचा शोध सुरू होतो. शिक्षणातून जर आपल्याला व्यक्ती व्यक्तींमधे सुयोग्य नाती जोपासली जावीत असं वाटत असेल, तर मूल शिक्षकाशी कसं वागतं हा फार कळीचा मुद्दा बनतो. शिकणं हे अतिशय सूक्ष्म-सखोल पातळीवर होत असतं. संवाद-स्पर्श यांतून भावना समजावून घेणं नि बुद्धीच्या पातळीवर त्यांचा अर्थ लागत जाणं हे शिकताना अतिशय आवश्यक आहे. शिक्षकाच्या मनात जेव्हा ही स्वतःला शोधण्याची प्रक्रिया अखंड चालू असेल, तेव्हाच शिक्षक मुलाच्या मनातले सगळे अडथळे दूर करू शकेल. आपण एक सत्ताकेंद्र अथवा आदर्श बनून राहात नाही ना? इकडे त्याचं सदैव लक्ष पाहिजे. कारण हे नातं वर खाली नसून परस्पर संवादाचं आहे. शिक्षकाला मुलांपेक्षा जास्त माहिती असते, समज असू शकते, तरीही त्याचा ‘शोध’ अमर्याद चालू राहिला पाहिजे. शिकवणं म्हणजे खरं शिकणंच.

शिक्षकाचं विद्यार्थ्यांशी थेट नातं हा शिक्षणाचा गाभा आहे. प्रत्येक मुलाला समजून घेणं, शांत – सावधपणे आणि जाणतेपणाने करायला हवे. त्यासाठी प्रत्येकाकडे पूर्ण लक्ष असायला हवं.
नुसती कौशल्यं शिकवण्याच्या पलीकडे जाऊन, प्रत्येकाला स्वतःच्या क्षमतेचा, आवडीचा शोध घेता यावा, त्याच्या फुलण्याला वाव मिळावा, असं वातावरण निर्माण करायचं म्हणजे शिक्षकावर फार मोठी जबाबदारी येते.
जे. कृष्णमूर्ती
(‘जे. कृष्णमूर्ती यांचा शिक्षण विचार’ या श्रीमती विद्या पटवर्धन
यांनी संकलित केलेल्या टिपणामधून साभार.)