होमलेस टू हार्वर्ड
मी अमेरिकेत राहत असतानाची गोष्ट. अमेरिकेतील ABC (American Broadcasting Corporation) या दूरदर्शन वाहिनीवरील ‘ट्वेंटी – ट्वेंटी’ नावाचे वार्तापत्र दाखविले जाते. १९९९ साली ‘From Homeless to Harvard’ हा सत्यघटनेवरील कार्यक्रम पाहिला. ‘एलिझाबेथ मरे’ नावाच्या एका मुलीच्या आयुष्यातील हा प्रवास. मनाचा ठाव घेणारी, प्रेरणादायी अशी ही सत्य कहाणी नुसती पाहून विसरावी अशी नव्हतीच मुळी. ती कहाणी व त्या अनुषंगाने येणारे विचार, भावना लगेचच कागदावर उमटल्या. इतरांपर्यंत हा जीवन संघर्ष पोहचावा असे आवर्जून वाटले.
‘छात्र प्रबोधन’ व लोकसत्ताच्या ‘चतुरा’मधे माझा ‘होमलेस टू हार्वर्ड’ हा लेख प्रकाशित झाला आहे. मधल्या पाच वर्षांच्या काळात एलिझाबेथने नक्कीच अनेक नवीन गोष्टी केल्या असणार असा अंदाज होता. त्याचा शोध इन्टरनेटवरून घेतला. लिझचं आयुष्य नि विचार एवढे झपाटून टाकणारे आहेत की थोडक्यात का होईना पण ते आपल्यासमोर मांडावेत असा मोह पडल्याशिवाय राहात नाही.
प्रीती केतकर यांनी चतुरामधील माझ्या लेखातील मजकुराची निवड अतिशय नेमकी अशी केली आहे. संक्षिप्तात पण सर्व कहाणी आपल्यापर्यंत पोहचेल अशी ही मांडणी आपल्यासमोर ठेवत आहोत. मुळातील संपूर्ण लेखही आपल्याला पालकनीतीशी संपर्क साधला तर मिळू शकेल. काही वेबसाईट्स लेखाच्या शेवटी देत आहोत. तिथेही माहिती, फोटो, लिझच्या भाषणाची झलक, तिचे पुस्तक अशी माहिती मिळू शकते.
एलिझाबेथ, तिचे आईवडील आणि बहीण असं हे न्यूयॉर्कमधे राहणारं कुटुंब. आईवडील दोघंही व्यसनाधीन. व्यसनपूर्तीसाठी घरातल्या वाटेल त्या वस्तू विकणारे हे आईवडील पालक म्हणून मुलींच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नव्हते किंवा त्यांची काळजीही घेऊ शकत नव्हते. एकदा त्यांनी मादक पदार्थ घेण्यासाठी एलिझाबेथचा स्वेटरच विकून टाकला. न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी स्वेटर ही प्राथमिक गरजेची वस्तू ठरते हे लक्षात घेतले म्हणजे तो विकण्यातला आईवडिलांचा निष्काळजीपणा आणि त्यामुळे मुलींची कशी आणि किती आबाळ होत होती याची तीव्रता लक्षात येते. पण त्याबद्दल एलिझाबेथच्या मनात जराही कटुता नाही. ‘व्यसनाधीनता हा रोग होता. त्यामुळे ते आमच्यासाठी काही करूच शकत नव्हते’, हे सत्य तिनं ज्या प्रगल्भतेनं स्वीकारलं ते बघून थक्क व्हायला होतं.
अवघ्या नवव्या वर्षी कुटुंबाचं कर्तेपण तिच्या अंगावर पडलं. घरभाडं देऊ न शकल्यामुळे रस्त्यावर राहणं, शेल्टर होममध्ये मिळालं तर जेवणं अशा बिकट परिस्थितीत ती राहात होती. हे सगळं कमी होतं म्हणून की काय तिच्या आईला एड्स असल्याचं निदान झालं. आईची काळजी घेण्याची जबाबदारीही तिच्या एवढ्याशा खांद्यांनी पेलली. ती पंधरा वर्षाची असताना तिची आई वारली. आईच्या मृत्यूनं तिला जीवनाची क्षणभंगुरता तीव्रतेनं जाणवली. त्यामुळे तिला आता, ‘माझी जबाबदारी सर्वस्वी माझ्यावर आहे’, याची प्रकर्षानं जाणीव झाली.
इथे एक विचार मनात येतो की आईपणाची कसलीही क्षमता नसलेल्या आईच्या मृत्यूनंतर तिला सर्वस्वी निराधार झाल्याची भावना का मनात यावी? तिच्या म्हणण्याप्रमाणे आईचं प्रेम, पराकोटीची व्यसनाधीनता, मुलीसाठी काहीही करण्याची असमर्थता या सगळ्याला पुरून उरलेलं, मुलीला अवघ्या पंधरा वर्षापर्यंतच्या आयुष्यातल्या इतक्या बिकट प्रसंगांना तोंड देण्याचं सामर्थ्य देणारं हे आईचं प्रेम किती उत्कट असेल हे लक्षात येतं आणि कुठेतरी त्याबद्दल एक प्रकारचं नवलही वाटत राहतं.
आजपर्यंत सुप्त असलेल्या क्षमता वापरून आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं तर शिक्षणाची गरज होती. आत्तापर्यंत परिस्थितीमुळे तिचं स्वतःच्या शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. म्हणून तिनं नव्यानं शाळेत प्रवेश घेतला. अमेरिकेत पब्लिक स्कूलमधे शिक्षण मोफत असल्यामुळे ती शिकू शकली. जिद्द, चिकाटी आणि हुषारीच्या बळावर तिनं चार वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्षातच पूर्ण केला, तोही ‘ए’ ग्रेड मिळवून ! नुसतं माध्यमिक शिक्षण पूर्ण करून ती थांबणार नव्हती. एकदा शाळेच्या सहलीबरोबर बॉस्टनला गेलेली असताना ती हार्वर्ड विद्यापीठ बघायला गेली होती. ते बघून ती खूप भारावून गेली होती. आणि, ‘जर मला इथे शिकण्याची इच्छा असेल तर हे विद्यापीठ माझं का होणार नाही?’ हाच ध्यास तिनं घेतला होता.
अनेक संकटांना, अडथळ्यांना तोंड देत शिक्षण घेणार्या गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ‘न्यूयॉक टाइम्स’ तर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार होती. तिची बुद्धिमत्ता पारखून तिच्या एका शिक्षकांनी त्या शिष्यवृत्तीसाठी तिनं प्रयत्न करावा असा आग्रह धरला. त्यासाठी स्वतःच्या आयुष्यात यासंबंधात घडलेल्या गोष्टी निबंध स्वरूपात लिहून पाठवायच्या होत्या. एलिझाबेथनं तिच्या आयुष्यातले बिकट प्रसंग, त्यातून ती काय शिकली याबद्दल लिहून पाठवलं. एकूण तीन हजार अर्ज आले होते आणि जागा होत्या फक्त सहा ! निवडक एकवीस जणांना मुलाखतीसाठी बोलावलं त्यात एलिझाबेथ होती. मुलाखत घेणारं मंडळ तिची कथा ऐकून थक्क झालं होतं. मुलाखत संपली तेव्हा एलिझाबेथ सोडून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं.
तिला शिष्यवृत्ती मिळाली. दर वर्षाला बारा हजार डॉलर्सप्रमाणे तिला शिष्यवृत्ती मिळणार होती. न्यूयॉक टाईम्सच्या अंकात शिष्यवृत्ती मिळालेल्या सहा मुलांची नावं आणि त्यांच्या जीवनकथा प्रसिद्ध झाल्या होत्या. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे लोकांनी त्या वाचून त्यातून प्रेरणा घेऊन आपण होऊन पुढाकार घेऊन आर्थिक मदत गोळा केली. जमा झालेल्या दोन लाख डॉलर्समधून आणखी
पंधरा गरजू विद्यार्थ्यांना अशा शिष्यवृत्त्या देता आल्या !
हार्वर्डमधील शिक्षण सुरू होईपर्यंत ती न्यूयॉर्क टाईम्सच्या कार्यालयात काम करत होती. अवघ्या अठराव्या वर्षी अशा संस्थेत काम करणं हे विशेष कौतुकास्पद होतं. नोकरी लागल्यानंतर ती बर्याच काळानंतर आपल्या बहिणीबरोबर पुन्हा स्वतःच्या घरात राहायला आली. तिचं आयुष्य बदललं खरं पण संकटांनी काही तिची पाठ सोडली नाही…. तिच्या वडिलांनाही एड्स असल्याचे कळलं !
हार्वर्डमधे तिला स्वकष्टानं, अतिशय गौरवपूर्ण रीतीनं प्रवेश मिळाला होता. तिथे येणारी अनेक मुलं खाजगी शाळांमधे शिकलेली असतात. (अमेरिकेत खाजगी शालेय शिक्षण अतिशय महागडं असतं. त्यामुळे तिथं शिकलेली मुलं समाजाच्या कोणत्या स्तरातील असतील याची सहजच कल्पना येईल.) तिथला अभ्यास, इतर उपक्रम, घर सोडून राहणं ही अशा सुस्थितीतून आलेल्या मुलांसाठीसुद्धा जुळवून घेण्याचीच बाब असते. त्या वातावरणात रमणं, विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडूनच्या अपेक्षा, दर्जा जपत तिथं स्थिरावणं ही सर्वांसाठीच एक प्रक्रिया असते. त्याची सवय व्हायला काही काळ जावा लागतो. अशा परिस्थितीत एलिझाबेथला तिच्यात आणि तिच्यासोबत शिकणार्या वर्गमित्र-मैत्रिणींमधे समान धागे सापडणं हे अवघडच होतं. अखेर काही काळानंतर तिनं ते विद्यापीठ सोडलं. त्याची कारणं देताना ती म्हणते, ‘‘माझे वडील खूप आजारी आहेत. त्यांची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्वर्ड ही माझ्यासाठी योग्य जागा नाहीये. त्यापेक्षा न्यूयॉर्कमधे माझ्या मित्रमंडळींबरोबर आणि खास करून माझ्या वडिलांच्या आजारपणात त्यांच्याबरोबर राहणं हेच मला जास्त सुखाचं वाटेल याची मला खात्री आहे.’’ ‘हार्वर्डसारखं विद्यापीठ माझ्या सहजप्रवृत्तीला साजेसं नाही’ हे प्रांजळपणे सांगण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे हे उल्लेखनीय आहे. तिच्या लेखी ते उत्तम ‘साधन’ होतं. पण तिचं अंतिम साध्य नव्हे.
‘वॉशिंग्टन स्पीकर्स ब्यूरो’ या संस्थेतर्फे ती अमेरिकेत ठिकठिकाणी ‘होमलेस टू हार्वर्ड’ या स्वानुभवावर बोलायला जाते. अनेकांसाठी तिचे हे अनुभव प्रेरणादायी ठरतात. ‘लाइफ टाईम मूव्हीज’नं ‘होमलेस टू हार्वर्ड : द लिझ मरे स्टोरी’ हा लघुपट तयार केला. एकेकाळी निराधार, बेघर असलेली एलिझाबेथ आता प्रसिद्धीच्या झोतात आलेली, अनेकांना आदर्श ठरलेली ‘लिझ मरे’ झाली आहे. आपल्या नशिबाला दोष न देता, प्रयत्नांवर विश्वास ठेवत एलिझाबेथनं तिच्या जीवनाला दिलेली कलाटणी बघताना मनात एक विचारचक्र सुरू होतं – ‘तिच्या मनात आईवडिलांबद्दल अजिबात राग नाही किंवा बालपणाच्या कटू आठवणींबद्दल तक्रारही नाही. उलट आयुष्यातले अडचणींचे डोंगर पार करायचं बळ तिला आईवडिलांच्या प्रेमातूनच मिळालं असं म्हणून ती सारं श्रेय त्यांना बहाल करून टाकते. लेखात वर्णन केल्याप्रमाणे मुलाखतीत बोलताना ती अमेरिकन लोकांच्या सहज प्रवृत्तीला अनुसरून भावनांचं प्रदर्शन करत नाही, तिच्या बोलण्यात कुठेही भडकपणा किंवा आपण फार मोठं काही मिळवलं असा कणमात्रही अहंकार नाही. संस्कारक्षम वयात निराधार अवस्थेत अक्षरशः रस्त्यावर पडलेली ही मुलगी – तिचं आयुष्य भरकटण्याची, वाईट मागर्ाला लागण्याचीच शक्यता जास्त असताना इतकी प्रगल्भ, संतुलित, समंजस आणि तरीही इतकी साधी, सुजाण मुलगी कशी बनली असेल?’
शेल्टर होममध्ये एका बावीस वर्षाच्या मुलीचं तिला पत्र आलं की शेल्टरच्या नियमानुसार झोपायची वेळ झाल्यामुळे तिला ‘होमलेस टू हार्वर्ड – द लिझ मरे स्टोरी’ हा लघुपट पूर्ण बघता आला नाही. या मुलीनं आपलं आयुष्य बदलेल, आपण परत कधीतरी घरात राहू शकू ही आशाच सोडून दिली होती. तो लघुपट पूर्ण पाहिला तर आपल्यात काही आशा जागी होईल असं तिला वाटलं. हे कळल्यावर एलिझाबेथनं तिला आपल्या अपार्टमेंटमधे स्वतःबरोबर उरलेला लघुपट पाहायला बोलावलं. एवढंच नाही तर नंतरही ती त्या मुलीला भेटली, तिचं पूर्वायुष्य जाणून घेतलं, तिच्यातल्या क्षमतांची तिला जाणीव करून दिली. ‘तू आयुष्यभर बेघर राहणार नाहीस’, हा विश्वास तिच्यात जागवला. आज ती मुलगी काही संस्थात स्वयंसेविकेचं काम करते. तिनं पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. एलिझाबेथशी तिचा संपर्क टिकून आहे. एलिझाबेथ आजही अशा बेघर लोकांशी अतिशय सहृदयेनं वागते.
तिच्या मुलाखती, लघुपट, तिचे पुस्तक या सगळ्यांतून ती अनेकांना कायम भेटत राहील. भिडत जाईल… आणि इतरांनाही त्यातून काही स्फुरत राहील.
स्वतःतील जाणीवपूर्वक बदल, त्यासाठीचा मनोनिग्रह आणि अविरत प्रयत्न याची साक्ष देणारा असा हा लिझ मरेचा जीवनप्रवास. परिवर्तनशील मानसिकता उराशी बाळगून प्रवाही जगणं… तिच्या वैयक्तिक आयुष्यात तर हा बदल समाधानकारक, आनंददायी ठरलाच, पण त्यापलीकडे जाऊन अनेकांसाठी तो प्रेरणादायी आहे. तिच्या जीवन कहाणीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अनेकांच्या आयुष्यात बदलाचे बीज पेरण्याचे सामर्थ्य आहे.