प्रकल्प : वीजक्षेत्र
१२ जानेवारीला मी ‘कमला निंबकर बालभवन’ शाळेला पहिल्यांदा भेट दिली. फलटणमधली ही प्रसिद्ध शाळा. नव्या, प्रायोगिक पद्धतीनं शिक्षणाचा विचार केला जाणारी.
ऐंशीच्या दशकाच्या मध्यात शाळेची सुरुवात झाली. इथले बहुसंख्य समाजाच्या दुर्बल गटांतून आले आहेत. सर्वच स्तरांतून आलेल्या मुलांना शाळा त्यांचं दुसरं घर वाटावी इतकी आपलीशी वाटते. शाळेतलं मोकळं वातावरण त्यांना स्वतंत्रपणे विचार करायला उद्युक्त करतं, संवेदनशील, कल्पक बनवतं.
शाळेला भेटण्याआधी सुमारे आठवडाभर मला कल्पना दिली होती त्याप्रमाणं ‘वीज’ या विषयावर मुलांनी केलेल्या काही एका अभ्यासाला धरून मी त्यांच्या मुख्यतः तांत्रिक व इतरही प्रश्नांची उत्तरं देणार होते आणि त्याच अनुषंगानं त्यांना वीजक्षेत्राची सोप्या भाषेत ओळखही करून देणार होते.
शाळेत ह्या प्रकारचा उपक्रम राबवला जाणं हीच प्रथम आनंदाची बाब होती पण त्यानंतरचा शाळेतला प्रत्यक्ष अनुभव मला अधिकच थक्क करणारा होता.
माझी लहानशी मांडणी, वीजनिर्मिती, विजेचं प्रक्षेपण आणि तिचं वितरण यावर होती. विजेचं जतन करून, तिचा जास्त कार्यक्षमतेनं कसा वापर करता येईल, यावर मी बोलणार होते.
पण त्याआधी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजिरीताई निंबकरांनी मला शाळा आणि प्रकल्पासाठी निवडलेल्या या विषयाची पार्श्वभूमी सांगितली आणि मुलांनी तयार केलेलं प्रदर्शन दाखवूनही आणलं.
त्यांनी सांगितलं की दरवर्षी शिक्षक व विद्यार्थी एकत्र मिळून त्यांना सद्य सामाजिक परिस्थितीत महत्त्वाचा वाटणारा विषय निवडतात आणि संपूर्ण दोन महिने फक्त त्याच विषयाच्या कामासाठी देतात. पहिली ते दहावीपर्यंतचे सगळे विद्यार्थी यात सहभागी होतात.
पुस्तकं वाचून, जाणकारांना भेटून-बोलून व इतर अनेक तर्हांनी माहिती जमा करून ते ती त्यांचे पालक, शिक्षक व माझ्यासारखे शाळेला भेट द्यायला आलेल्या लोकांसमोर सादर करतात.
यावर्षी त्यांनी ‘वीजक्षेत्र’ हा विषय निवडला होता. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र वीज टंचाईच्या भयानक छायेखाली असल्याचं ते पाहत होते. वीज कंपनी त्यावर उपाय म्हणून अनेक आराखड्यांच्या मांडण्या-पुनर्मांडण्या करत आहे. यावर्षी ‘अक्षय प्रकाश योजने’ सारख्या काही वीजयोजना फलटणमधे राबवल्या गेल्या. या योजनांद्वारे ग्राहकांच्या सहभागानं वीजभाराचं पुनर्नियोजन केलं जातं. चोरीच्या प्रमाणात घट करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि विविध मार्गांनी उर्जेचं जतन केलं जातं. त्यामुळे फलटणवासी आधीच या प्रश्नाबाबत जागरूक होते. याच कारणामुळे कमला निंबकर बालभवनाच्या शिक्षक-विद्यार्थ्यांनी ऊर्जा क्षेत्र – वीज निर्मिती, प्रसारण, वितरण व वापर हे विषय त्यांच्या वार्षिक प्रकल्पासाठी निवडले.
या अभ्यासाखाली येणारे मुद्दे त्यांनी वेगवेगळ्या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांच्या (आणि शिक्षकांच्याही) गटांमधे विभागून घेतले. त्यांचे गटकाम आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक सहभागाची, कष्टांची परिणती इतके देखणे प्रदर्शन उभे राहण्यामधे आणि ऊर्जाक्षेत्रातल्या विविध बाजू त्यातून उत्तमरित्या सादर होण्यामधे झाली होती.
पहिली ते चौथीच्या लहान विद्यार्थ्यांनी ‘ऊर्जेचा वापर’ हा विषय हाताळला होता. स्वतःच्या आणि शेजार्यांच्या घरात विजेवर चालणार्या कोणकोणत्या वस्तू आहेत ह्याचा त्यांनी आढावा घेतला होता. शिवाय वीज बिलं गोळा करून कोणत्या वस्तूंवर किती वीज खर्च होते हे दाखवणारा वीजमागणीचा एक तक्ताच तयार केला होता. (चौकट पहा)
मोठ्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वीजनिर्मिती, प्रसारण व वितरणावर अभ्यास केला होता. त्यांच्यापैकी काही मुलं महाराष्ट्रातल्या वीजकेंद्राना भेटी देऊन, माहिती गोळा करून आली होती.
त्या माहितीच्या आधारे त्यांनी ऊर्जानिर्मितीच्या पारंपरिक व अपारंपरिक मार्गाबद्दल तक्ते अन प्रतिकृती तयार केल्या. एरवी कठीण वाटणार्या सगळ्या संकल्पना त्यांनी साध्या सुंदर तक्त्यांमधे अगदी सोप्या करून मांडल्या होत्या. एका चित्रात तर कोयनेच्या जलविद्युत प्रकल्पाची जनित्रांसह काढलेली आकृती मला स्पष्ट आठवते.
पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची मांडणी वीज बचत आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अक्षय प्रकाश योजनेवर होती.
त्यांनी विजेचं महत्त्व, तिच्या बचतीची निकड यावर चक्क कथा-कविता रचल्या होत्या. वीजक्षेत्रातले प्रश्न निदर्शनाला आणून देणारी चित्रे काढून त्यावर घोषणाही लिहिल्या होत्या. संसाधनांची कमतरता, प्रदूषण ते ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत
अनेक प्रश्न मांडले होते. वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांनी वीज बचतीचा आणि अक्षय प्रकाश योजनेसारख्या योजना अवलंबण्याचा संदेश दिला होता.
मी गेले तो प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. इतक्या अभिनव गोष्टी पहायला मिळाल्यानं मी भाग्यवानच ठरले असं म्हणायला हवं.
संध्याकाळी सांगता करण्यासाठी शाळेने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतल्या अधिकार्यांना प्रदर्शनाला निमंत्रित केले होते. ते चर्चा करणार होते.
हे सारं पाहिल्यानंतर मी माझ्या मांडणीची वही तशीच बंद करून ठेवून दिली. मुलांनी या विषयावर भरपूर काम केले होते. त्यानंतर पुन्हा त्यांना ग म भ न सांगण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून मी त्यांना सोबत आणलेली कोळशाच्या खाणींची आणि वीज केंद्रांची चित्रं दाखवली आणि उरलेला वेळ प्रश्नोत्तरांसाठी मोकळा ठेवला.
इथे पुन्हा एकवार मुलांनी मला आश्चर्य व आनंदाचा धक्का दिला.
सगळ्या अभ्यासामुळे परिपक्व झालेली मुलं अनेक अर्थपूर्ण आणि तितकेच संवेदनशील, वेगवेगळ्या पर्यायवाटा शोधणारे प्रश्न विचारत होती. त्यांच्यात असा दृष्टिकोन निर्माण होण्यात ‘कमला निंबकर बालभवन’चा मोठा वाटा होता.
सुरुवात काही तांत्रिक प्रश्नांनी झाली – ‘ऊर्जेचा साठा करून ठेवता येईल का?’ आपल्याला सगळीकडे विजेच्या ऐवजी सौरऊर्जेचा वापर करता येईल का?
…पण जशी जशी चर्चा पुढे जाऊ लागली तसं तसं अधिक मोकळेपणानं त्यांनी ऊर्जा वापरातल्या विषमतेबद्दल बोलण्यास सुरुवात केली. वीज वापराच्या संधींमधली, तशीच दर्जामधली विषमता.
‘‘ग्रामीण भागात शहरांपेक्षा जास्त भारनियमन का होतं?’’ हा सातवी मधल्या विद्यार्थ्याचा प्रश्न होता.
अशा प्रश्नांची थातुरमातुर उत्तरं देणं शक्यच नव्हतं. आमची चर्चा मग एरवी गृहीत धरल्या गेलेल्या, महत्त्वाच्या न समजलेल्या पण नेमक्या मुद्यांना हात घालणारी होत गेली.
मी जेव्हा त्यांना उलट प्रश्न विचारला की विजेच्या बचतीसाठी त्यांनी स्वतः कोणकोणते प्रयत्न केले – तेव्हा जवळपास प्रत्येकानं, त्यानं स्वतः अमलात आणलेल्या किंवा पालकांकडून करवून घेतलेल्या गोष्टींची यादी सांगितली.
हिवाळ्याच्या दिवसात रात्री फ्रिज बंद ठेवण्यापासून ते टीव्ही वरचे कार्यक्रम पाहणं कमी करण्यापर्यंत.
‘कमाल मागणीची वेळ कोणती आणि त्या काळात वीज वापर का कमीत कमी हवा’, हेही त्यांना एव्हाना माहीत झालं होतं. आपापल्या पालकांनी इस्त्रीचा वापर दुपारच्या, कमी ऊर्जा वापराच्या काळात करण्याविषयी त्यांनी पुरेपूर आग्रह धरला होता.
या प्रकल्पाची सांगता इथेच होत नाही तर यावर शाळेच्या संचालिकांनी एक ‘महाचर्चा’ आयोजित करून नागरिकांच्या समस्यांना समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्नही केलेला आहे. या महाचर्चेत सर्वांनी सहभाग घेतला होता. वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. कुमठेकरसाहेब त्याचप्रमाणे कार्यकारी अधिकारी श्री. शेखसाहेब यांनी सहभागी प्रेक्षकांच्या प्रश्नांना समर्पक व समाधानकारक उत्तरे देऊन प्रेक्षकांची मने जिंकली. सर्वांनीच मनोमन वीज बचतीची प्रतिज्ञा केली.
(लेखातील चौकटी स्वामिनी रुद्रभटे, शिक्षिका – कमला निंबकर बालभवन, फलटण)
पहिली ते चौथीचे विद्यार्थी शाळाभर फिरून जणू प्रत्येक विद्यार्थ्यांची मुलाखतच घेत होते. दररोज मधल्या सुट्टीनंतरचा वेळ प्रकल्पकामासाठी काही दिवस दिला होता. त्यामुळे या छोट्या बालकुमारांच्या मुलाखतींना वेग आला होता. तुमच्याकडे मिक्सर आहे का? ओव्हन आहे? फ्रीज? आणि खोल्या किती? त्यावरून बल्ब किती? वीजेची आणखी अन्य उपकरणे किती? याची जंत्रीच तयार केली.
हे विद्यार्थी केवळ जंत्री करून थांबले नाहीत तर कोणती वस्तू किती प्रमाणात आहे याचा प्रमाणबद्ध आलेखही त्यांनी तयार केला. सर्वसामान्य/मध्यमवर्गीय/आणि उच्चभ्रू अशा तीन गटातून कोणती उपकरणे किती प्रमाणात वापरली जातात याचा सर्व्हेदेखील केला.
उदाहरण म्हणून एक आलेख पहा.
याशिवाय शेतीसाठी विजेचा आवश्यक तिथे वापर कसा केला जातो हे चित्रांच्या माध्यमातून मोटार-पंप, मळणी यंत्र, स्प्रिंकलर इ. काढून उत्कृष्ट चित्रकलेचा नमुना दाखवून दिला आहे. तसेच लघुउद्योगापासून फरशी पॉलिशिंग मशीन, गाड्या दुरुस्ती व धुणे, सीड्स-उद्योग यालाही वीज कशी व किती लागते ही चित्रे काढलेली दिसतात.