लायब्ररीत बदल
आधीही इथं बदल झालेयत
म्हणजे शेल्फं आणि रॅक्सची वेगळी मांडणी केली जायची
पुस्तकं विषयवार इकडून तिकडं हलवली जायची
इश्यू आणि डिपॉझिट काऊंटरच्या दिशा बदलल्या जायच्या
आणि काही दिवसांनंतरचा असा बदल चांगला वाटायचा
पण यावेळच्या पुनर्व्यवस्थेचे परिणाम काही वेगळेच आहेत.
किशोर आणि तरुणांची गर्दीच असायची इथं
जुलै आणि फेब्रुअरीत जी वाढलेली असायची
आणि कितीदा तरी रिकामी खुर्ची मिळणं किंवा निवांतपणे वाचणं अवघड व्हायचं
पुस्तकं घ्यायला आणि जमा करायला दहा दहा मिनिटं लागायची-
दोनशे रुपये वार्षिक किंवा दहा रुपये दैनिक प्रवेश फीच्या निर्णयाने
त्यांच्यापैकी अनेकांना कुठं पाठवलंय् माहीत नाही
त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबांसाठी एवढे पैसे
खूप जास्त आहेत किंवा ते वाया घालवणं आहे.
आता एक माणूस बसवला गेलाय्
ज्याचं काम येणार्यांचं कार्ड चेक करणं आहे
जे तो रुबाबदार निर्दयतेनं करीत असतो
अजूनही कितीतरी अशी मुलं-मुली येतात
ज्यांना नव्या व्यवस्थेचा पत्ता नाही
फी सांगितल्यावर ती थबकतात
हे केव्हा झालं आधी तर असं नव्हतं
किंवा फक्त एक तेव्हढं बघायचं होतं असं काही म्हणत
उतरलेल्या चेहर्यांनी उलटपावली परततात
फक्त मुली खाली जाताना हसतात टोळक्यानं असतील तर
ते प्रौढ आणि वृद्ध आता इथं दिसत नाहीत
जे ज्यादा युरोपिअन अदबीनं स्त्री-सहायिकांशी
जुन्या काळाबद्दल आणि जगण्याबद्दल गप्पा मारायचे
आणि समाधान झालेलं नसतानाही हसून
मागच्या कुठल्यातरी टेबलावर बसून
हळूहळू पेंगायला लागायचे.
नवे कल आणि उपयुक्तता पाहता आता
अर्थ-वाणिज्य-माहिती तंत्रज्ञान आणि समाजशास्त्रीय
पुस्तकांना प्राधान्य दिलं जातं
वॉर्सा तहाऐवजी इस्लामी विचारांवरची सामग्री
उपलब्ध केली जात आहे
कलेवरची नवी पुस्तकं कमी होताहेत, मागणी कमी सांगितली जात आहे
जुनी कार्ड-व्यवस्था बंद करण्यात आली आहे
त्याऐवजी आता कम्प्यूटर आणि सीडीरॉम आले आहेत
ज्यातून कितीतरी अधिक विस्तृत माहिती मिळू शकते
पण लोकांना ते अजून ऑपरेट नाही करता येत
हात लावायला घाबरतात आणि सहायिकांची मदत घ्यायला आणखीनच
म्हणून अगदी नाईलाजानं कुणी
त्या तरुणांना विचारतं
ज्यांना ते आश्चर्य आणि ईर्षेनं बघतात
नवी मशीन्स सफाईनं चालवताना.
एवढं निश्चित आहे की आता केव्हाही जा बसायला जागा मिळतेच
अगदी मनासारखी आणि गोंगाटही कमी झालाय
याचं एक कारण हे आहे की एकूण गरज ओळखत
व्यावसायिक ग्रंथालय वेगळं केलं गेलंय आणि
सोयीसाठी ते खालच्या मजल्यावरच आहे
पाहा तिथं जाऊन केवढी गर्दी आहे
आणि हे निश्चितय् की लवकरच तीही जागा अपुरी पडेल
अशी लोकांची गर्दी वाढते आहे.
जे बदललेल्या काळात इम्पोर्ट-एक्स्पोर्ट करू पाहताहेत
किंवा प्रसिद्ध विद्यापीठं, तांत्रिक संस्थांमध्ये ज्यांना प्रवेश हवा आहे
ते बिग ऍपल सिलिकॉन व्हॅलीचा उल्लेख असा करतात
जणू ती दिल्लीची उपनगरं किंवा इंडियाची करन्सी आहे
त्यांना ग्रीनकार्ड मिळवायचं आहे, पुस्तकं किंवा वृत्तपत्रं नाही
त्यांना हवीय काही माहिती फारात फार काही झेरॉक्स प्रती
त्यांना जाणून घ्यायचंय् की हे सगळं मटेरिअल
इंटरनेटवर अव्हेलेबल आहे की नाही ते
कार पार्किंगच्या समस्येनं वैतागून
ते सुरक्षा कर्मचार्यांशी इंग्रजीत भांडतात
(सततची प्रदर्शनं आणि आंतरराष्ट्रीय अतिरेक्यांच्या
कारवायांच्या भीतीनं आधीच राजधानीच्या
मधोमधचा हा भाग सतर्कतेचं क्षेत्र झालाय्-)
तीस वर्षं जुने सूट-टाय घातलेले
किंवा मळक्या पँट अन् सदरे घातलेले
किंवा स्वतःशीच बोलत हसणारे लोक
आता इथं येत नाहीत जे फोटोकॉपी करणार्याला रेट विचारायचे
आणि मग दिवसभर आपल्या जुन्या रेघांच्या वह्यांत
लिंकन किंवा इमर्सनच्या चरित्रांतून नोटस् घेत राहायचे
त्या वृद्ध स्त्रियाही नाहीत ज्या चौकशी सहायिकेला
प्रश्न विचारून वैताग आणायच्या.
घाम, आशा आणि थोड्या घाबरण्याचाही वास असलेली
ती अर्धवट सणकी वेश्याही आता येत नाही
न्यूयॉर्कर किंवा नॅशनल जिओग्रफिक घेऊन
तरुण आणि प्रौढांना तिच्यात रस वाटेल
या प्रतीक्षेत जी तासन्तास बसायची जवळपास रोज अयशस्वी
कधी कधी एअरकंडिशनिंगच्या सुखात झोपून जायची
आपल्याच मंद्र घोरण्यानं उठून टेबलावरचं
कुठलंही मासिक किंवा पुस्तक हातात उलटं पकडत.
प्रवेशशुल्क देऊ न शकणार्या किशोरांनी-तरुणांनी माहीत नाही कोणते पर्याय शोधले
पण प्रौढ, वृद्ध आणि महान व्यक्तींच्या चरित्रांतून नोटस् घेणार्यांनी
शोधून काढलंय एक निमसरकारी ग्रंथालय थोडंच दूर असलेलं
त्यात भलेही वातानुकूलन नाही पण कूलर आहेत
मागे कँटीन आहे, जिथं स्वस्तात ब्रेड-पकोडा मिळतो
फक्त एवढंच की इथं आपल्याकडचीच नियतकालिकं आणि पुस्तकं आहेत
तीही बहुतेक गंभीर
म्हणून एक-दोन वर्तमानपत्रं आणि पुस्तकं उलटल्यावर
ते आराम करू लागतात
आसपासच्या किंवा दुसरीकडे पेंगणार्या कर्मचार्यांसारखे
संशोधक विद्यार्थ्यांच्या निःसंकोच हसण्यात.
पण ती सावळी वेश्या, जी अधिक फायदेशीर दिवस घालवू इच्छिते
आणि लायब्ररी दहा ते सहा उघडी असूनही तिथं घुसत नाही
आणि शहरातल्या केंद्रीय भारतीय नाट्यशाळेजवळ किंवा
उपग्रह निदेशालयाच्या आसपास घुटमळत असते
संध्याकाळ होता होता तिला शक्यता अन् समाधान वाटू लागतं
जेव्हा स्ट्रगल किंवा काम करणार्या आर्टिस्टस्ची गर्दी होऊ लागते
आणि आपली काळी-चमचमती-भुरकट झोळी घेऊन
ती या किंवा त्या टोळीजवळ हसत उभी असते
काहीही आश्चर्य नाही ती लवकरच जर कुठल्यातरी तळघरनाट्य किंवा पथनाट्य
किंवा एखाद्या सिरीअलमध्ये
आपल्यासारख्याच एखाद्या भूमिकेत दिसेलही.
तिकडे त्या लायब्ररीच्या बदलामुळे व्यवस्थापन संतुष्ट आहे
‘काहीही मोफत मिळायला नको’चं तत्त्व यशस्वीपणे लागू झालं
स्थानिक इंग्रजी वर्तमानपत्रात कुठे काही विपरीत पत्र किंवा टीका नाही
व्यवस्था अधिक खुली आणि सुव्यवस्थित झालीय्
संकल्प असेल तर यशस्वी पुनर्संयोजनात अडचण येत नाही
जागा तेवढीच आहे पण देखणी वाटतेय् आणि वस्तू नीट मांडलेल्यायत
जा-ये जेवढी कमी, कार्यकुशलता आणि गुणवत्ता तेवढी अधिक वाढेल
आता आवाज फक्त टेलिफोन स्त्रीसहायिका कम्प्यूटर बटनं
मायक्रोफिल्म मशीन्सचे आहेत
(छतात लावलेले सुरक्षा कॅमेरे दिसतही नाहीत अन् ऐकूही येत नाहीत)
हां, झेरॉक्स करणारे दोन हरयाणवी कर्मचारी तेवढे
अजूनही जरा जास्तच बोलतात
कधी-कधी आपापसात आधीच्या काळाच्या आठवणी काढत
जेव्हा काही एक मनाई असतानाही
कधी काळी बाजार-चौकासारखं जिवंत तेज इथं होतं.