पालकनीती – ऑक्टोबर नोव्हेंबर २०१०
मातीत पडलेलं बी
तिच्यातलंच काहीबाही घेत
उलून येतं आतून….
वाढतं…. बदलतं….
अर्थवान करतं स्वतःचं ‘बी’ पण
आणि मातीचं मातीपणही.
…अशी तर न बदलणारीच असते बदलाची रीत.
पण…
काळाच्या बाळानं टाकलेल्या
दरेक वर्षाच्या एकेका पावलागणिक
आम्ही काल घेतलेल्या
श्वासांच्या उच्छ्वासांनी
काय काय रुतवून रुजवून ठेवलंय
इथल्या हवेत… मातीत…. घाईघाईनं?
…. जे वाढतंय हव्याशा नि नकोशाही
सगळ्याच दिशांनी – आणि…
बदलवतंय का….
चिरंतन बदलाची आतून सहज
उमलण्याची रीत?
बघायला तर हवंच ना
थोडं आत – थोडं बाहेर – जरासं थांबून
बोलायला हवंच ना
थोडं आपल्याच पायाखालच्या
मातीशी…. आणि त्यातलंच
काहीबाही घेत
पुढे वाहणार्या हवेशीही !
सुजाता लोहकरे