संवादकीय
प्रिय पालक,
प्रत्येक महिन्यात पालकनीती तुमच्या भेटीला येते. त्याच्यासाठी तयारी करत असताना आठवत होतं, की गेल्या महिन्यात काय काय घडलं, कोणत्या प्रतिमा मनावर कोरल्या गेलेल्या आहेत? शब्दांहून दृश्य प्रतिमा जास्त परिणामकारक असतात. अनेकदा शब्दांना दृश्यांचा आधार मिळाला तर त्यांचा ठसा मनावर कोरला जातो.
कैरोतल्या चौकात जमलेले हजारो लोक – निर्दयी हुकूमशहाच्या विरोधात निदर्शन करण्यासाठी ते आयुष्याला असण्या-नसण्याच्या खुंटीवर टांगूनच इथं आलेले आहेत. रणगाड्यांच्या समोर तरुण मुलं सरळ आडवी झोपून त्यांचा मार्ग अडवू पाहत आहेत. त्यांच्या सर्वात्मक जीवनेच्छेला वैयक्तिक जीवनाच्या असण्या-नसण्याचं देणंघेणं उरलेलं नाही.
आणखी एक प्रतिमा – आपल्या इकडची भीमसेनजी गेल्याची. संगीताच्या क्षेत्राशी परिघाच्याही बाहेरून कौतुक करण्याइतकाच संबंध असणार्यांनासुद्धा आत कुठे तरी तुटलं. वाईट वाटलं.
भीमसेनजींच्या रूपानं जी कला आपल्या सर्वांच्या जीवनात वसते आहे, ती नेमकी काय आहे? आपल्याला ती काय देते? ती कला जीवनाला समृद्ध करते. आपलं जगणं समृद्ध करणारा एक माणूस काळाआड गेलाय ह्या पोकळीची जाणीव पंडितजींच्या निधनानंतर आपल्यासारख्या सर्वांनाच जाणवली असेल.
आपलं मन पुढच्या प्रतिमेकडे वळतं. तिथं आजवरच्या परिचयाहून वेगळ्याच एका माणसाकडे आपण बघत राहतो. भेसळ माफियांवर कारवाई करायला गेलेले श्री. सोनावणे असतात ते. त्यांना जाळून टाकलेलं असतं. आपण हतबुद्ध होऊन बघत राहतो. खरं म्हणजे पूर्वी अशा प्रसंगांना सिनेमात शोभणारे असं म्हटलं जायचं. आता तसे अनेकदा घडतात. त्यामुळे आपण सरावलेलो आहोत.
आज आपलं आयुष्य खूप व्यामिश्र, गुंतागुंतीचं झालेलं आहे, आणि हतबुद्ध झालो तरीही जगण्याच्या इच्छेनं आपल्याला उत्साह आणावा लागतो. संघर्षासाठी बळ गोळा करावं लागतं. त्यासकट आपण ह्या सगळ्याच प्रतिमांकडे बघत राहिलेलो आहोत.
पालकनीती आता पंचविसाव्या वर्षात आहे. आजवर आपण काय काय म्हणण्याचा प्रयत्न केला? परिस्थिती बदलायचीच असं ठरवून निघालो असलो, तर ते साध्य झालं का? कुठवर पोचलो? कुठं कमी पडत आहोत? हे प्रश्न पालकनीती ह्या मासिकासंदर्भात आणि त्याहून जास्त संकल्पनेसंदर्भात पडत आहेत, आणि आमची विनंती आहे की ह्या विचार विमर्शात आपण सर्वांनीही सहभागी व्हावं.
‘आम आदमी’च्या भल्यासाठी काम करणार्या यंत्रणेला निदान तोंडापुरतं तरी सर्वांसाठी आरोग्य, सर्वांसाठी शिक्षण, सर्वांसाठी काम आणि सर्वांसाठी अन्न असं म्हणावं लागतं आहे. पण त्या दिशेनं जाण्यासाठी आवश्यक असलेली खरीखुरी इच्छा तिथे आहे किंवा नाही हा प्रश्नच आहे. ‘पालकनीती’साठी हे सर्वच विषय महत्त्वाचे. सोनावणेंच्या खुनामुळे, टू-जीच्या भ्रष्टाचाराने पालकनीती अस्वस्थ होते, पंडितजींच्या जाण्याने कातर होते आणि इजिप्तमधल्या क्रांतीने प्रभावितही. कारण आज निराश करणारं सामाजिक वास्तव बदलावं, आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यांत काही भलं घडावं या मूळ आशेने तर आपण धडपडत असतो. निराश झालो तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो.
पालकनीतीच्या संकल्पनेतील पालकत्वाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोचवता येईल याबद्दलही विचार करतो आहोत. मराठीमधे नियतकालिक, मासिकाच्या स्वरूपात अशा प्रकारचा रचनात्मक संवाद प्रभावी होण्याला अंगभूत मर्यादा आहेत. अधिक वेगाने एकमेकांशी संपर्क साधणार्या नव्या तंत्रयुगातील माध्यमांचा आपल्याला काही उपयोग करून घेता येईल का यावर आम्ही विचार करतो आहोत. तुम्हीदेखील या प्रक्रियेत सहभागी व्हावंत, आपल्या सूचना कळवाव्यात आणि जेवढ्यांना शक्य त्यांनी प्रत्यक्ष योगदानही द्यावं असं मनापासून आवाहन करतो आहोत.