काय करावं समजत नाही (प्रश्न पालकांचे उत्तर शोधायचे)
मुलं मोठी होत असताना आपल्याला रोज नव्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. उपदेश कितीही उपलब्ध असला तरी आपलं उत्तर आपल्यालाच शोधायचं असतं. सतत नवे प्रश्न आपल्याला दिसतात, भासतात, कित्येक वेळा काचतात आणि भेडसावतातही. अनेकदा असे प्रश्न पालकनीतीला विचारले जातात. वैयक्तिक पातळीवर चर्चा होतात. या चर्चांमधून सापडणारी उत्तरं इतर पालकांनाही मिळावीत म्हणून ही नवी लेखमाला सुरू करत आहोत. अशा प्रश्नाचे एक उदाहरण आपण इथे पाहताच आहात.
आपल्याला टोचणारे प्रश्न आपण ४०० शब्दात आमच्याकडे पाठवा. प्रातिनिधिक प्रश्नांना पालकनीती परिवारातील वेगवेगळे तज्ज्ञ उत्तर देतील. उत्तर तुमचं तुम्हालाच सापडलं असेल तर तेही लिहा. आवश्यक असेल तर त्यावरच्या पालकनीतीच्या टिप्पणीसह प्रसिद्ध करू. आपले लेखन palakneeti@gmail.com वरही पाठवू शकता.
संपादक
रात्री साडेनऊ पावणेदहाची वेळ. जेवणं झाली होती. मी टीव्ही बघत बसले होते. दिवसभराच्या दमणुकीनंतर पार थकून गेले होते. उठून काही बोलावं – करावं एवढा हुरूप नव्हता.
राणी (वय १६) अजून घरी आली नव्हती. आठवड्याभरानंतरच्या नृत्याच्या कार्यक्रमाच्या तालमी अखंड चालल्या होत्या. वेळाचा काही धरबंध राहिला नव्हता. तीही कंटाळली होती. दुपारीच म्हणत होती आज काहीही करून लवकर सटकणार मी. पण अजून पत्ता नव्हता. शेवटी दहाला आली. तिच्या थकल्या – त्रासलेल्या चेहर्यावरून आत्ता कुणाशी काही बोलायची इच्छा नाहीये हे स्पष्ट दिसत होते.
सुयश (वय २२) टेनिसच्या प्रॅक्टीसहून परतला होता. जेवण व्हायचं होतं. आवरा आवरी चालली हाती. राणी घरात येताच तो म्हणाला, ‘‘काय, नाही जमलं वाटतं लवकर यायला?’’ त्याच्या वाक्यानं आणि बहुधा त्यातल्या सुरानं राणी सटकली, ‘‘माझ्या हातात आहे का ते?’’ एरव्ही शांत स्वभावाची राणी एकदम सटकेल असं सुयशच्या ध्यानीमनीही नव्हतं. त्यानं नेहमीसारखी सहजच तिची चेष्टा केली असावी. त्याचाही पारा एकदम चढला. ‘‘अरे, पण नीट सांग ना, ओरडते कुणावर?’’
‘‘नीटच सांगतेय ना, माझ्या हातात नाहीये लवकर येणं.’’
‘‘एवढं ओरडण्याची काय गरज आहे पण? तू एकटी दमतेस का? आम्ही काय झोपा काढतो का घरी?’’
‘‘मला आता काही एक बोलायचं नाहीये.’’ एव्हाना राणीचे डोळे भरून आलेले.
‘‘आई, हिला सांग माझ्यासमोर हा आगाऊपणा चालायचा नाही. नीट वागायचं.’’
‘‘तू नीट वागतोस का? काय म्हणून तुझी दादागिरी सहन करायची मी?’’
‘‘मी काय दादागिरी केल्येय ग? लहान लहान म्हणून सोडून देतो म्हणून जास्त करतेस का?’’
‘‘बास आता ! मला नकोय हे बोलणं’’
‘‘आई, ही नेहमी अशीच वागते. तिची घुंगराची पिशवी नेहमी इथे हॉलमधे लोळत पडते, मी काल रात्री तिला उचलून दिली तर माझ्याच अंगावर आली.’’
राणी तणतणत उठली, हातातला मोबाईल फेकून दिला आणि आतल्या खोलीत निघून गेली.
आता तर सुयश भयंकर चिडला. कपाटाला लाथ मारली. ‘‘मी अकांडतांडव करू शकत नाही का?’’
हे सगळं बघत मी सोफ्यावर. भांडण या थराला जाताना बघताना मीही वैतागत चालले होते. भांडणात पडण्यासाठी शब्द हिरिरीने तोंडापाशी येत होते. पण मी निग्रहाने गप्प बसले. एवढ्या मोठ्या मुलांच्या भांडणात आपण पडावं का? दोघं संतापलेले. कुणाही एकाच्या बाजूने बोलले तर आगीत आणखी तेल पडणार.
त्यापेक्षा त्यांची जेवणं झाली, पोटात गेलं तर ते अधिक शांत होतील या हेतून ताटं वाढायला घेतली.
राणी खूपच अस्वस्थ झाली होती. रडणं थांबतच नव्हतं. तिला जवळ घेऊन फक्त थोपटत राहिले. थोडी शांत झाल्यावर जेवली. तिला एकच सांगितलं, ‘‘तू दुपारी लवकर येते म्हणालीस म्हणून विचारलं दादानं. वाकड्यात शिरण्याचा हेतू नव्हता अगं त्याचा.’’
‘‘मी त्याच्या वस्तू उचलत नाही का? मग एकदा उचलली बॅग तर त्याचा एवढा का issue करायचा?’’
‘‘पण नक्की काय झालं होतं काल?’’
‘‘मी झोपले होते. रात्री ११ ला यानं घुंगरांची बॅग आणून माझ्या पायांवर ठेवली. मी म्हणले बॅग खाली ठेव, मला त्रास देऊ नको. नाही ठेवणार म्हणाला. असा त्रास देतो मला. तो उशीरा झोपतो. मला लवकर उठून कॉलेजला जायचे असते. याचा time pass मूड असतो. पण माझा नसतो ना !’’
‘‘बरं, खूप दमलीयेस तू, जेव आणि झोप आता. आपण सकाळी बोलू.’’
मला कळत नव्हतं कशी सोडवायची यांची भांडणं? आणि खरं तर मी सोडवायची का? मी सोडवून सुटणार आहेत का? त्यांचं त्यांनीच बोलायला हवंय, परस्परांना समजून घ्यायला हवंय. नेहमीच भांडतात, एकमेकांना लागेलसं बोलतात. मग पुढे काही काळ थोडा अबोला. नि मग परत सगळं सुरळीत होतंय असं वरकरणी जाणवतं.
मात्र या निमित्तानं अनेक संदर्भ, अडचणी जाग्या होऊन समोर आल्या.
सध्या या दोघांतली भांडणं वाढलीयेत. संतापाचे उद्रेक वारंवार होऊ लागलेत. एकमेकांना समजावून घेऊन संवादाच्या मार्गानं प्रश्न सोडवायचा मार्ग त्यांना तितकासा रुचत नाही. एकतर अद्वातद्वा भांडण, नाहीतर संपर्कच टाळायचा. जाणीवपूर्वक, मुद्दाम ठरवून एकमेकांसाठी काही करायचा विचार मनात फारसा येत नाही. आला तरी टिकत नाही. काय करावं? आजकाल त्यांचा आपला संवाद खूप कमी झालाय. ते स्वतःत मग्न असतात. घरी आले तरी मोबाईल, SMS, internet. घरात दुसरं कुणी आहे की नाही याचीही दखल नसते. मला पूर्वी खूप आवर्जून वाटत असे, घरातल्या कामांच्या जबाबदार्या सर्वांनी मिळून घ्याव्यात. अलीकडे मात्र मी तो नादच सोडलाय. त्यासाठी सातत्यानं वाद घालत बसायचा आता मला कंटाळा आलाय. नि त्यातनं काही साधतंय असंही दिसत नाही.
स्वातंत्र्याच्या त्यांच्या आणि माझ्या कल्पना निरनिराळ्या आहेत. कितीही प्रयत्न केला तरी त्यांची living style, मित्र-मैत्रिणी, बेफिकीरी, प्रायॉरिटीज नाही उमगत. चुकाच दिसत राहतात. काळजीही वाटते. पण सूचना, उपदेश, चौकशा, समजावून सांगणे ह्या कशाचाही दुरूनही वास आला तरी मुलं सावध होतात, पळ काढतात नि त्यांनी मला टाळायला लागावं हे मला काहीही झालं तरी अजिबात नकोय.