बालशाळा – औपचारिक शिक्षणाची पहिली पायरी
‘बाळांचं शिकणं’ ते ‘औपचारिक शिक्षण’ यामधलं अंतर ओलांडायला मदत करण्यासाठी बालशाळा हा मार्ग आहे.
बालकाच्या सर्वसाधारण विकासावर, विशेषतः बौद्धिक व भाषिक विकासावर त्याच्या आयुष्यातील सुरुवातीच्या अनुभवांचा फार मोठा परिणाम होतो यावर गेल्या तीस वर्षातील मेंदू-विकास संशोधनाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे बालशाळा समृद्ध असणं किती महत्त्वाचं आहे ह्याची आपल्याला नव्यानं आठवण होते.बालशाळेत शिकत असताना मुलांचा बौद्धिक विकास जास्तीतजास्त कसा होईल हे जाणून घेताना आपल्याला अगदी लहान मुले कशी शिकतात हे माहीत असायला हवं.
बालवयातील शिकणं आणि मोठ्या वयात औपचारिक व्यवस्थेत शिकणं यात फार फरक आहे. लहान मुलं परिसरातील विविध प्रेरकांना प्रतिक्रिया देत देत शिकत असतात. ती त्यांना आकर्षक, वेधक वाटणार्या गोष्टींकडेच फक्त लक्ष देतात. याउलट औपचारिक शिक्षणात शिक्षकांनी दिलेली माहिती- मग ती अगदी नीरस व अनाकर्षक असली तरी ऐकून घ्यायची असते, त्यावर मनात विचार करायचा असतो. यासाठी मुलांना तीन महत्त्वाची कौशल्ये अंगी बाणवावी लागतात – लक्ष देणं, ऐकलेलं लक्षात ठेवणं आणि स्वयंनियंत्रण. स्वयंनियंत्रण हे एक कळीचे कौशल्य आहे. आपल्या विचारप्रक्रियेवर आणि त्यानंतरच्या कृतीवर आपलं स्वत:चं नियंत्रण मिळवणं म्हणजे स्वयंनियंत्रण.
ज्या परिसरात मूल मनमोकळेपणानं खेळूवावरू शकतं आणि हवी ती वस्तू, खेळ खेळायला घेऊ शकतं, अशा परिसरात मूल अनेक कौशल्यं शिकतं. ही कौशल्यंच त्याच्या पुढील औपचारिक शिक्षणाचा पाया घालतात. मुलांना करावंसं वाटतं ते करण्याची, हाताळावंसं वाटतं ते साहित्य हाताळण्याची संधी असली तर मुलांचा शिकण्याच्या प्रक्रियेतला रस टिकून राहतो. मुलांना निवडीचं स्वातंत्र्य द्यायला हवंच, पण त्याबरोबर त्यांच्याकडून असणार्या वागणुकीच्या अपेक्षाही स्पष्ट केलेल्या असायला हव्यात. त्यासाठी बालशाळांमध्ये दिनक्रम ठरवून त्यानुसार काम केलं जायला हवं. दिलेल्या नियमांनुसार काम करण्यानं मुलांना आपल्या मर्यादा व जबाबदार्या लक्षात येतात. तसेच वर्गातील इतरांच्या हक्काची जाणीवही निर्माण होते. आपल्या कृती व विचारांचा ताबा मिळवण्याची क्षमता यातूनच विकसित होते. हाच औपचारिक शिक्षणाचा पाया आहे.
बालशिक्षण आणि भाषाविकास
भाषाविकास हा बालशाळेच्या अभ्यासक्रमाच्या केंद्रस्थानी असायला हवा कारण त्यातूनच बालकाचा बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकास होतो.
वर्गात मुलांच्या एकमेकांशी किंवा शिक्षकांशी असणार्या संवादातूनच मुलांचा भाषाविकास होत जातो. एकंदर समज वाढण्याचा मार्गही हाच असतो. मुलं सुरुवातीला एकेरी शब्दांनी बोलतात. त्यानंतर मोठ्यांच्या अनुकरणातून पूर्ण वाक्यात त्यांना बोलता यायला लागतं. भाषा म्हणजे शब्दांची काही एक विशिष्ट मांडणी आहे, त्यात योग्य प्रश्न विचारून हवी ती माहिती मिळवता येते, आपली अपेक्षा व्यक्त करता येते, पुरी करून घेता येते, हे मुलाला कळू लागतं. थोडक्यात मूल भाषेची वेगवेगळी कार्यं शिकतं. त्यासाठी मोठ्यांकडून पद्धतशीर व जाणीवपूर्वक प्रयत्न मात्र व्हायला हवेत, म्हणजे मुलाला भाषेचा नेमका वापर करण्याची सवय होईल.
बालशाळेतल्या वर्गाची रचना कशी असावी, हेही या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. एक गोष्ट सातत्यानं आठवणीत असावी की इथे आपण जे काही करू त्यामागं विद्यार्थीकेंद्री विचार असायला हवा. वर्गात मुलं पाच-सहा गटात काम करू शकतील. प्रत्येक गटात सामान्यपणं चार-पाच मुलांना एकत्र बसून खेळता येतील असे खेळ ठेवावेत. उदाहरणार्थ चित्रकलेच्या वेळी प्रत्येकाला कागद व ब्रश वेगवेगळा असला तरी रंग, खळ, चिकटकामाच्या वस्तू इत्यादी इतरांबरोबर वाटून घ्याव्या लागतात. तसं जरूर करावं. यातून मुलांना एकमेकांबरोबर वागायची, वाटून घेण्याची सवय होणार असते. भातुकलीच्या खेळात दुकान, दवाखाना, घर, शाळा यासारख्या विशिष्ट विषयाशी संबंधित गोष्टी मांडाव्यात. कुठे खेळायचं हा निर्णय मात्र मुलांचाच असू द्यावा. म्हणजे मुलांना मोकळेपणाने हवं ते साहित्य हाताळता येतं, समवयस्कांच्या गटात बसून खेळता येतं, प्रश्न विचारता येतात, इतरांचं ऐकून घ्यायचीही संधी मिळते (ही आजकाल अनेक मध्यमवर्गीय मुलामुलींना मिळतच नाही) आणि एखाद्या अडचणीतून कसा मार्ग काढायचा याचा विचार करायलाही मुलं शिकू लागतात. मुलं आपापलं काम करत असताना शिक्षकांनी मुलांचं निरीक्षण करावं, शिवाय कधीकधी त्यांच्याशी गप्पा मारून ते काय करत आहेत, का करत आहेत असं विचारून त्यांची भूमिका समजावून घेण्याचाही प्रयत्न करावा. शिक्षक व समवयस्कांशी मोकळेपणानं संवाद करताकरता भाषिक कौशल्यांचा विकास तर होतोच परंतु सामाजिक, भावनिक व बौद्धिक कौशल्यांचाही विकास होतो.
अगदी लहान मूलदेखील एखादी गोष्ट निवडतं तेव्हा त्याच्यामागं त्याचा काहीतरी विचार असू शकतो. ‘असं केल्यानं असं होईल’ असा तो समस्यापूर्तीचा तर्कशुद्ध विचार असतो, मूल लहान असल्यानं त्यातली गृहितकं आपल्या दृष्टीनं कधीकधी चुकीची असू शकतात इतकंच. चित्र काढणार्या एखाद्या मुलाला रंग, आकार व मांडणीचा विचार करावा लागतो. नंतर आपण केलेल्या निवडीची निष्पत्ती पाहून त्यात बदल करण्याचाही विचार त्याला करता येतो. अर्थात् या विकासासाठी शिक्षकांची भूमिका, योग्य ठिकाणी केलेली मदत आणि मुलानं जे काही केलं असेल त्याबद्दलचा प्रतिसादही आवश्यक असतो.
शिक्षक हा मुलांच्या दृष्टीनं भाषेचा आदर्श असतो. प्रसंगी पालकांहूनही अधिक विश्वासानं मुलं शिक्षकांचं अनुकरण करतात. त्यामुळे शिक्षकांनी वर्णन करताना, अनुभवकथन करताना, माहिती देताना, प्रश्न विचारताना नेहमी नेमकी आणि समर्पक भाषा वापरायला हवी. त्यामुळे मुलंही स्वतःला व्यक्त करण्यासाठी सुयोग्य शब्दांच्या शोधात राहतात.
मुलांना स्पष्ट सूचना देणं आणि त्यांच्या कृतीवर योग्य प्रतिसाद देणं ही मुलांचा भाषिक विकास साधण्याची महत्त्वाची साधनं आहेत. शिक्षकाची भाषा जितकी साधी पण सुस्पष्ट तितकी विद्यार्थ्याची समज चांगली.
लहान मुलं जेव्हा नव्यानं काही शिकण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना कौतुक, आधार आणि गरज पडल्यास दुरुस्तीही हवी असते. शिक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादातून मुलांना प्रोत्साहन मिळतं. याचा अर्थ कशालाही केवळ ‘वा छान!’ ‘सुंदर!’ म्हणणं असा मात्र अजिबात नाही. त्यापेक्षा ‘तू तुझ्या चित्रात वापरलेले रंग मला फार आवडले.’ किंवा ‘तू घर किती विचारपूर्वक बांधत होतास ते मी पाहत होते.’ यासारखा अभिप्राय मिळाला तर आपण केलेल्यातलं ताईंना नेमकं काय आवडलं हे मुलांना कळतं. आणि पुढच्या वेळी आणखी चांगलं करण्याची इच्छाही वाढीस लागते.
ऐकता येणं
मुलांनी शिक्षकांचं ऐकलं पाहिजे अशी सामान्यपणे अपेक्षा असते, त्याच न्यायाने शिक्षकांनीही मुलांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि मुलांनी मुलांचंही ऐकायला हवं. संवादाच्या या महत्त्वाच्या अंगाकडे वर्गात कित्येकदा दुर्लक्ष केलं जातं. मुलं चित्रं काढत असताना, लिहित – वाचत असताना, भातुकली खेळताना एकीकडे आसपासचे संवाद ऐकतही असतात. छोटी मुलं विचार कशी करतात, समजून कशी घेतात, विविध कौशल्यं कशी आत्मसात करतात हे समजून घेण्यासाठी शिक्षकांनी मुलांचं बारीक निरीक्षण करणं व त्याच्या काटेकोर नोंदी ठेवणं आवश्यक असतं. मुलांच्या मनोव्यापारांची जाण निर्माण झाल्यावर शिक्षक मुलांना शिकण्यासाठी अधिक चंागली मदत करू शकतात .
मुलांनी ऐकावं, ऐकलेल्या शब्दांचा अर्थ त्यांना समजावा, त्यावर आवश्यक तो विचार सहज व्हावा हे कौशल्य विकसित करण्यासाठी वर्गात अनेक उपक्रम करता येतात. गाणी ऐकणं, सर्वांनी मिळून बालगीतं म्हणणं, सूचना ऐकून त्यांचं पालन करणं, शब्दाचा पहिला व शेवटचा उच्चार ओळखून शब्दांच्या भेंड्या खेळणं, आपले अनुभव सांगणं, इतरांचे अनुभव ऐकणं, गोष्टी ऐकणं या सर्वांचा उपयोग होतो.
लेखी भाषा
औपचारिक शिक्षणासाठी तोंडी भाषेकडून लेखी भाषेकडं वळणं गरजेचं आहे. बालशाळेत लिखित भाषेचा योग्य वापर करून याला चालना देता येईल. वर्गातील विविध वस्तू, फर्निचर इत्यादींची नावे मोठ्या अक्षरात लिहून त्या चिठ्या लावून ठेवणं, ‘चपला येथे काढा’, ‘ओळीत चाला’ यासारख्या पूर्ण वाक्यातील सूचना योग्य ठिकाणी लिहून ठेवून दिवसभरात त्या वेळोवेळी वापरणं असं आवर्जून करावं.
वर्गात एक वाचन कोपरा असा असावा की तिथे गोष्टीची पुस्तकं, मासिकं, चिकटवह्या, वर्गाच्या फोटोंचे अल्बम, मुलांनी बनविलेली पुस्तकं इत्यादी साहित्य ठेवावं. लेखन कोपर्यात कागद, पेन्सिल, खडू, क्रेयॉन्स इत्यादी लेखन साहित्याबरोबर गोष्ट, कविता, निरोप, यादी, पाकक्रिया इत्यादी वेगवेगळ्या लेखन प्रकाराचे नमुने भिंतीवर लावावेत. या कोपर्याचे उद्दिष्ट म्हणजे मुलांनी पारंपरिक पद्धतीनं अक्षरं घोटवण्यापेक्षा आपलं स्वतःचं लिखाण करायला प्रोत्साहन देणं हे आहे. लहान वयात अक्षरं घटवून घेण्यानं मुलांच्या स्वतंत्रपणे विचार करण्याच्या व अभिव्यक्तीच्या ओघावर बंधनं येतात. एकदा मुलाला आपल्या कल्पना व विचार लिखाणातून व्यक्त करण्याचा आत्मविश्वास आला की तो/ती आपसूकच पारंपरिक लिखाणाकडे वळते.
मात्र हा संपूर्णच वेगळा विषय असल्यानं त्याचं विवरण या लेखात पुरेसं होणार नाही, त्यासाठी स्वतंत्रच मांडणी आवश्यक आहे.