खेळ आणि खेळच!
टेड संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या डॉ. स्टुअर्ट ब्राऊन यांच्या व्याख्यानातील काही भाग.
डॉ. स्टुअर्ट ब्राऊन हे मनोविकारतज्ज्ञ आहेत. तुरुंगातील काही कैद्यांसंदर्भात ते संशोधन करत होते. हे कैदी खून केल्यामुळे तिथे आले होते. या सर्व लोकांच्या कहाण्यांमधे त्यांना एक समान धागा दिसला: या सर्वांचं बालपण खेळाला पूर्णतः पारखं झालेलं होतं.
ही गोष्ट त्यांना फार वैशिष्ट्यपूर्ण वाटली. नंतर त्यांनी हजारो लोकांशी बोलून प्रत्येकाच्या जीवनातलं खेळाचं नातं तपासलं, नोंदवलं. तेव्हा भरपूर खेळायला मिळणं आणि आयुष्यात यशस्वी होणं यात गाढ संबंध आहे असं त्यांना दिसून आलं.
पुढे त्यांनी खेळ या विषयावर भरपूर अभ्यास केला. जेन गुडाल आणि नॅशनल जिओग्राफिक सोसायटी यांच्या मदतीने जंगलातील प्राण्यांचासुद्धा अभ्यास केला. या अभ्यासामधून त्यांना दिसलं, की चांगलं जगणं, तगून राहणं यासाठी प्राण्यांची वागणूक, विशेषत: बुद्धिमान प्राण्यांची वागणूक खेळामधे उत्क्रांत झालेली आहे.
प्राण्यांमधे दिसणार्या खेळकरपणाबद्दल त्यांनी अनेक उदाहरणे चित्रफितींमधून नोंदवली आहेत. शिकार करणारे प्राणी अनेकदा शिकार करण्याऐवजी खेळत बसतात. भूक लागलेली असेल, शिकार करण्याची ताकद-संधी सर्व काही असूनही नैसर्गिक खेळ घडून येताना दिसतो. एका ध्रुव प्रदेशातल्या अस्वलाची आणि छोट्या खेळकर कुत्र्याची एक चित्रफीत दाखवून ते म्हणतात की डोळ्यात खेळकरपणा दिसला (प्ले सिग्नल) की प्राण्यांची वागणूक बदलते, आणि खेळ सुरू होतो. हा खेळ-खेळकरपणा पिल्लांच्या वाढीसाठी, जगण्यासाठी फार महत्त्वाचा असतो.
खेळाचा पिल्लांवर काय परिणाम होतो याबद्दल बरीच संशोधनं झालेली आहेत आणि त्यांचे निष्कर्ष आता सुस्पष्टपणे मांडले गेलेले आहेत.
उंदराच्या पिल्लांवर एक प्रयोग केला गेला होता. पिंजर्या.त खेळू शकणारे; खेळणारे असे दोन गट घेतले गेले. त्यापैकी एका गटाचा खेळ चालू ठेवला. दुसर्या गटाचा खेळ बंद केला गेला. त्यानंतर काही दिवसांनी त्या सर्व पिल्लांना मांजराचा वास येत असणारी कॉलर लावली. साहजिकच जिवाच्या भीतीने सर्व उंदीर प्रथम लपले. खेळ चालू असणार्याै गटांतील पिल्लं हळूच बाहेर येऊन शोधून पाहू लागली – काय होतंय ते. पण खेळ थांबवलेल्या गटातील एकही पिल्लू पुन्हा लपलेल्या जागेतून बाहेर आलं नाही, ती सगळी पिल्लं मरून गेली.
उंदरांवरच्या प्रयोगात असं दिसलं की तगून राहण्यासाठी खेळत राहणं महत्त्वाचं ठरतं. ब्राऊन म्हणतात की असंच माणसांमधेही खेळणं महत्त्वाचं ठरत असणार. (कारण आपल्याही मेंदूमधे उंदरांच्या मेंदूसारखेच न्यूरोट्रान्समीटर असतात, बाह्य भागातील पेशींची रचनाही सारखीच असते.)
खेळ ही उत्क्रांतीमधली एक पायरी आहे. ती फक्त काही विशिष्ट बुद्धिमान प्राण्यांमधेच दिसते. उदा. सस्तन प्राणी. या प्राण्यांच्या मेंदूची जडणघडण होण्यामधे खेळाची कळीची भूमिका असते.
तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं की खेळ म्हणजे फावल्या वेळातला ‘टाइम-पास’ नव्हे किंवा पुढच्या आयुष्याची रंगीत तालीमही नव्हे. सर्व प्रकारचे खेळ हे यापेक्षा वेगळेच असतात. त्यांना स्वतंत्र जैविक अस्तित्वअसतं. झोपेसारखं, स्वप्नांसारखं स्वतंत्र महत्त्व असतं. इतर अनेक गोष्टींप्रमाणे झोप, स्वप्न आणि खेळ याही गोष्टींनी स्मृती पक्क्या होतात.