का?

का पुन्हा मला खजील करतोस?
का दिसतोस मला पुन्हा, पुन्हा
चहाच्या गाडीवर, हॉटेल, धाब्यावर
तुझ्या हातून चहा घेताना
आम्हाला मळमळत नाही, की तुझ्यासाठी मन कळवळत नाही.
मुले राष्ट्राची ‘संपत्ती’ असं म्हणतात
म्हणून लहानपणापासूनच
पैसे कमवायला हवेत….!

मी थांबवतो तुला
पण तू थांबत का नाहीस?
भटक्या विमुक्ताच्या लेकरा
जन्मभर का असाच भटकत फिरणार आहेस?
तुझ्या बहुरूप्याच्या नकला बघून
हसूच येत नाही बघ
दोरीवरून स्वतःचा तोल सावरणारा तू शिक्षणाच्या दोरीत
येणारच नाहीस का?
शिक्षण कायद्याचा वाजणारा नगारा
तुझ्या ढुमक्याच्या नादात,
कधी ऐकणारच नाहीस का…?

शालाबाह्य लेकरांपुढं व्यवस्था
आणखी कितीदा हरणार आहे…?
माझ्याच पोटचं लेकरू मला,
या लेकरांमध्ये
कधी दिसणार आहे…?