मला कवडसे हवे आहेत
आमच्या लहानपणी
आम्ही वेळ ओळखायचो
सावलीवरून.
घराच्या सावलीवरून
आढ्याच्या सावलीवरून
कुंपणाच्या सावलीवरून
विहिरीच्या सावलीवरून
अंगणातील झाडावरून
अन् स्वतःच्याही
सावलीवरून.
आमच्या लहानपणी
आम्ही वेळ ओळखायचो
उन्हावरूनही.
घराच्या दरवाजातून
हळूच प्रवेश करणार्या
सकाळच्या कोवळ्या उन्हावरून
अन् दुपारी
घराच्या कौलारू छतातून
सारवलेल्या जमिनीवर
अन् भिंतीवर पडणार्या
गोलसर किंवा
लंबगोल कवडशांवरून.
हा कवडसा पाहिला
की आमचं मन
आनंदी होई
आम्ही तो पकडायला बघू
भिंतीवरून किंवा जमिनीवरून
तो आमच्या हातावर येई.
आम्ही त्याला मुठीत
बंद करू पाहू.
तो मूठ फोडूनही
बाहेर येई.
आम्हाला तो कवडसा आवडे
हे कवडसे वेचत
आम्ही मोठे झालो.
हाच ‘कवडसा’ मोठेपणी
आमच्या मनात
‘आशेचा किरण’ होऊन
स्थिर झाला.
आम्ही आशावादी झालो.
आशावादी असणं
केव्हाही चांगलंच असतं.
आता मला पण माझ्या मुलांना
कवडसे दाखवावे वाटतात.
गंमतच आहे !
तेव्हा आमच्या आई वडिलांनी
हा ‘कवडसा’ आहे म्हणून
सांगितलं नव्हतं किंवा
दाखवलंही नव्हतं.
ते आमच्या पुढ्यात होेते
म्हणून आम्ही ते वेचत होतो.
मोठं झाल्यावर अभ्यासातून कळलं
त्याला ‘कवडसा’ म्हणतात म्हणून.
नंतर आणखी मोठे झालो
आणि आणखी कळलं,
कवडसा आशेच्या किरणालाही म्हणतात.
हां,
तर मला माझ्याही मुलांना
कवडसे दाखवावे वाटतात.
मी शोधते.
पण, हाय रे दैवा !
एकही कवडसा दिसत नाही
कसा दिसणार?
माझं घर आता कौलारू राहिलं नाही
ताटव्याच्या भिंतीचं तर नाहीच.
ते झालं दगड-विटा-सिमेंटच्या
भक्कम भिंतीचं आणि
अभेद्य छतांचं.
त्या अभेद्य छताला
भेदून येण्याची प्राज्ञा
सर्व ग्रहांना आपल्याभोवती
फिरायला लावणार्या
सामर्थ्यशाली सूर्यातही नाही.
मग कोठून येणार तो
मनाला उमेद देणारा
कवडसा?
हा कवडसा माझी मुलं
पाहू शकली नाहीत
तर उद्या आशेचे कवडसे
ते कोठून आणतील?
आशेचे कवडसे ज्यांच्यापाशी नसतील
ती मुलं किती निराशावादी असतील !
ही निराशावादी मुलं
आनंदी आणि शांत जीवन जगतील?
नाही नाही !!!…
मला माझ्या मुलांनी
आनंदी आणि शांत असावं वाटतं.
मला कवडसे दाखवायलाच हवेत,
मला ठाऊक आहे
ते कोठे आहेत.
मला तिथं जायलाच हवं
तिथून कवडसे आणायलाच हवेत
निश्चित !
ते अजूनही तिथंच आहेत.
कौलारू घरात
हां हां तिथंच
ताटव्याच्या भिंतीत
नक्कीच तिथंच
गवताच्या छतात
मोडकळीस आलेल्या खोपटात.
माझं घर अभेद्य झालं
म्हणून काय झालं
मला निश्चित कवडसे
आणता येतील.
माझ्या त्या बांधवांच्या घरातून
आणि ठेवता येतील
माझ्या मुलांच्या मुठीत
माझी मुलं हेच कवडसे घेऊन
आशेचे किरण होतील.
आणि खरं सांगू
तेव्हा काय होईल?
माझी मुलं त्या बांधवांचीही घरे
अभेद्य करतील
कारण त्यांना कळेल,
माझ्यासारखाच हक्क आहे
त्याला जगण्याचा
अन् सुरक्षित राहण्याचा.
तो त्याचा हात हातात घेईल
आणि कडकडून मिठी मारेल
कवडसा मिळाल्याच्या आनंदात.
नंतर त्या बांधवाच्या घरातही
कवडसे पडणार नाहीत.
कारण माझ्या मुलांना हेही कळेल
याच भोकांतून
थेंबही गळतात पावसाचे
अन् माय रात्र जागते
पोरगं कोरडं राहण्याच्या विवंचनेत.
माझी मुलं ती भोकं बुजवतील
आणि खूप कवडसे पडतील
दोघांच्याही मनात.