मूल (आत्ता) का नको?
गर्भपात ही आजच्या काळात तशी सोपी बाब झालेली आहे, त्यामुळे असा निर्णय घेताना अनेकदा फारसा विचार केला जात नाही. बाब सोपी असली तरी ती आपल्या शरीराशीच जोडलेली आहे, औषधाचे, शस्त्रक्रियांचे काही नकोसे परिणाम घडून जाण्याची शक्यता असतेच. त्यांचीही आठवण ठेवायला हवी.
कन्सल्टिंग रूममध्ये माझ्यासमोर तीन खुर्च्या आहेतच. चौथीचीही सोय करता येते. परवा अनघाबरोबर आलेल्या तीन-चार बायकांपैकी एकीला मात्र, उभंच रहावं लागलं. अनघा, तिची सासू, आई, त्यांना घेऊन आलेली माझी जुनी पेशंट – अनघाची नणंद – सगळ्यांची खोलीत गर्दी झाली होती. सगळ्या प्रसन्न चेहेर्यानं हसत होत्या !
‘‘अनघा काल यु.एस.हून आली’’
‘‘अजून जेट लॅग आहेच’’
‘‘पण आम्ही म्हटलं तुम्हाला लवकरात लवकर भेटावं’’
‘‘त्याचं काय झालं, इकडे आल्यावर तिच्या लक्षात आलं की तिची पाळी चुकली आहे.’’
‘‘आज सकाळीच युरिन टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आहे’’
एकेकजण एकेक वाक्य उत्साहानं बोलत होती.
‘‘अरे वा, आपण तपासूया तिला’’ मी अनघाशी बोलायला सुरुवात केली.
‘‘पण डॉक्टर’’ अनघाची सासू म्हणाली, ‘‘त्यांना नको आहे हे.’’
‘‘असं? का बरं?’’ मी विचारलं.
‘‘लग्न होऊन सातच महिने झाले आहेत.’’
‘‘ते दोघं अमेरिकेतच आहेत.’’
‘‘ती एकटीच पुढे आली आहे. तो मागून येईल.’’
इथे आल्यावरच समजलं की दिवस गेलेत म्हणून ‘‘हो, पण ह्या सगळ्याचा संबंध… प्रेग्नन्सी नको असण्याशी – गर्भपात करवून घेण्याशी कुठे येतो?’’ मी अनघाकडे वळून म्हटले.
‘‘नाही, पण डॉक्टर हे सगळं इतकं अनपेक्षित आहे. वी आर नॉट मेंटली प्रिपेअर्ड फॉर इट येट’’ अनघा म्हणाली.
‘‘म्हणजे काय गं?’’
‘म्हणजे काय’ ते अनघाला नीट सांगता येईना.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे योग्य डॉक्टरकडे गेल्यास गर्भपाताची योग्य पद्धत उपलब्ध होऊन सुरक्षित गर्भपात होऊ शकतो. त्या पद्धतीबद्दल चर्चा होऊ शकते. पण गर्भपात का करायचा ह्याबद्दल मात्र अनेकांच्या मनात गोंधळ दिसतो.
सुरक्षित गर्भपात हा प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. तिच्या पोटातील गर्भ हवा की नको हे ठरविण्याचं स्वातंत्र्य तिला आहे. १९७१ च्या गर्भपात कायद्यानुसार ठरावीक कारणासाठी गर्भपात करून घेण्याचा अधिकार स्त्रीला देण्यात आला आहे. त्या कायद्यानुसार पाचव्या महिन्यापर्यंत वैद्यकीय कारणांसाठी गर्भपात करवून घेता येतो. कायद्यामध्ये सांगितलेली कारणं अशी आहेत.
– गर्भनिरोधक साधनांचा वापर करूनही गर्भ राहिला असल्यास,
– काही औषधे, रसायने, किरणोत्सर्ग ह्यांनी गर्भामध्ये व्यंग होण्याची शक्यता असल्यास.
– वाढणार्या गर्भामुळे मातेला शारीरिक / मानसिक हानी पोचणार असेल तर.
– बलात्कारानंतर गर्भधारणा झालेली असल्यास.
कायद्यानुसार १८ वर्षावरील स्त्रीला तिच्या एकटीच्या विचाराने संमतिपत्रांवर सही करून गर्भपात करवून घेता येतो.
ही सगळी कायद्याची बाजू समजावून घेऊनही पहिल्यांदाच दिवस राहिले असताना आत्ता बाळ ‘नको’ म्हणून गर्भपात करून घ्यायला येणार्या जोडप्यांबरोबर बराच वेळ देऊन बोलावं लागतं.
जोडप्यांकडून ह्या संदर्भात आर्थिक बाबींचा विचार प्रकर्षानं होताना दिसतोय. अमूक एका पातळीचं आर्थिक स्थैर्य आलेलं नाही तोपयर्र्ंत मूल नको – दिवस राहिले तरी ते नको असा काहीसा विचार दिसतो.
‘संपूर्ण कुटुंब’ असा विचार ह्यामध्ये दिसत नाही. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये, परवडणं, न परवडणं ह्याचा विचार न होता नवा पाहुणा सामावला जायचा. (एखाद्या आळशी, न कर्त्या माणसाच्या मुलांना पोसावं लागतंय म्हणून कदाचित चिडचिड व्हायची, पण त्या मुलांना पोटाला काही कमी पडायचं नाही.)
आता विभक्त कुटुंब आहेत. एकेकच मुलगा असला तरी त्याच्या लग्नानंतर तो आईवडिलांपासून वेगळा राहतो. संबंध सौहार्दाचे असतात. आर्थिक पातळीवर दोन्ही घरात सुबत्ता असते, पण पहिलं गरोदरपण चुकून लवकर राहिलं तर मात्र घाईनं गर्भपात करवून घेण्याचा त्या जोडप्याचा निर्णय असतो. ‘‘आम्हाला आत्ता शक्यच नाही’’ असं ते वाक्य असतं, वेगळे राहिलेले त्यांचे आईबापही ‘त्यांचं त्यांना ठरवू दे’ असं म्हणून हात झटकताना दिसतात.
अनघाचं असंच झालं होतं. तिच्या आईला आणि सासूला मी विचारलं की, ‘‘तिच्या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे?’’ त्या म्हणाल्या, ‘‘आमचं काही म्हणणं नाही. त्यांचं त्यांना ठरवू देत. शेवटी त्यांना वाढवायचं आहे. ते तिकडे अमेरिकेत राहणार आहेत.’’ गर्भपात करून न घेता हा गर्भ वाढवावा, अशीही एक बाजू असते – ह्याची जाणीवही त्यांनी अनघाला करून दिली नव्हती. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर अनघाने तिच्या नवर्याला अमेरिकेत फोन केला. त्यानंही सांगितलं, ‘‘एमटीपी करून घे, आपल्याला आत्ताच मूल नको.’’ संध्याकाळी ती सगळी मंडळी माझ्याकडे आली.
गर्भपाताच्या पद्धती, भूल देण्याच्या तुलनेनं सुरक्षित पद्धती किंवा जर गर्भ ६ आठवड्यांच्या आतलाच असला तर उपलब्ध होऊ शकणारी गोळ्या घेण्याची सोय ह्या सगळ्या गोष्टींमुळे गर्भपात करवून घेणं हे काही अंशी सोपं झालं आहे. अवघड भाग आहे तो गर्भपात करवून घेण्याचा निर्णय घेणं हा. ‘आम्ही मेंटली प्रिपेअर्ड नाही आणि ही प्रेग्नन्सी प्लॅन्ड नव्हती !’ ही वरचेवर ऐकू येणारी वाक्यं आहेत. आयुष्यात कितीतरी गोष्टी अनप्लॅन्ड असतात. बर्याच वेळा त्या टाळणं आपल्या हातातही नसतं. केवळ साधन उपलब्ध आहे म्हणून गर्भपात करून घ्यायचा – हे किती बरोबर आहे? आणखी एक गोष्ट – गरोदरपण नको म्हणून त्याला पूरक अशा अनेक सबबी सांगता येतात; तसाच ‘हे आपल्याला ठेवायचं आहे’ तर काय घडू शकतं, ह्याचाही विचार करायला हवा.
आणखी एक मोठी शंका असतेच – किंबहुना डॉक्टरांकडून एक दिलासा हवा असतो, ‘‘डॉक्टर, म्हणजे आम्हाला आता हे मूल नकोच आहे पण नंतर जेव्हा हवं असेल तेव्हा दिवस रहायला काही त्रास होणार नाही ना?’’
मेडिकल स्टॅटिस्टिक्स – वैद्यकीय संख्याशास्त्र ही मोठी अवघड गोष्ट आहे. एमटीपी – गर्भपात केल्यानंतरच्या गुंतागुंतींच्या यादीत वंध्यत्व आहेच. भूल देऊन गर्भपात करताना – क्युरेटिंग करताना जास्त रक्तस्राव होणं, गर्भाशयाच्या पिशवीला धक्का लागणं, गर्भनलिकांना जंतुसंसर्ग होणं अशा अनेक गोष्टी घडू शकतात. चांगल्या दवाखान्यात, योग्य डॉक्टरांकडून गर्भपात करून घेतल्यास गुुंतागुंत होण्याची शक्यता खूप कमी असते. पण कुठलंही शल्यकर्म हे ‘१०० टक्के सुरक्षित’ असं सांगता येत नाही. पहिल्यांदा गर्भपात करून घेणार्या सगळ्याच जोडप्यांना पुढचं मूल होण्यासाठी अडचण येते असं नाही; पण काहींच्या बाबतीत ती शक्यता असतेच. अगदी एमटीपीची प्रत्यक्ष प्रक्रिया काही त्रास न होता पार पडली असली तरी अशा जोडप्यांची नंतर वाट पाहण्यात आणि उपचार करून घेण्यात बरीच मानसिक, शारीरिक, आर्थिक शक्ती खर्च होते.
२८ वर्षांची सविता तिच्या सासूबरोबर आली होती. पाच-सहा महिने प्रयत्न करूनही सविताला दिवस राहत नव्हते. त्यासाठी तिच्या तपासण्या चालू होत्या. खरी गोष्ट अशी होती की पहिल्या वेळी दिवस राहिले तेव्हा सवितानं गर्भपात करवून घेतला होता. सविता आणि युवराजचं लग्न डिसेंबरमध्ये झालं होतं. जानेवारीत लगेच दिवस राहिले तेव्हा त्यांनी गर्भपात करवून घेतला. त्याचं कारण सविताची सासू सांगू लागली, ‘‘अहो काय सांगायचं, आम्हाला न सांगताच हे दोघं परस्पर जाऊन हा उद्योग करून आले.’’ त्या पुढे म्हणाल्या, ‘‘ह्या दोघांनी जातीबाहेर लग्न केलं आहे. तिच्या घरून त्यांना खूप विरोध आहे. आम्ही तिला घरी आणली. पण तिच्या आईवडिलांची त्यांना फारच भीती वाटत होती. त्यामुळे दिवस राहिले तेव्हा दोघांनी आम्हालाही न सांगता गर्भपात करून घेतला.’’
जानेवारीमध्ये हा गर्भपात करून घेतला आणि एप्रिलपासून दिवस रहावेत म्हणून उपचार करवून घेण्यास सुरुवात झाली. त्या उपचारांची सुरुवात मोठ्या डॉक्टरांकडे झाली. त्या डॉक्टरांनी दोघांच्या सर्व तपासण्या करून घेतल्या. सविताच्या सर्व प्रकारच्या हॉरमोन्सच्या तपासण्या झाल्या. युवराजचं वीर्य तपासण्यात आलं. सविताला स्त्रीबीज वाढवण्यासाठी औषधं देण्यात आली. दर महिन्याला सोनोग्राफी करून स्त्रीबीज तयार होतं किंवा नाही हे तपासण्यात येऊ लागलं.
सगळं ऐकून मी थक्क झाले ! एक सर्वसाधारण जोडपं, जिथे प्रजननक्षमता सिद्ध झालेली आहे, तिथे पुढच्या चार महिन्यात एवढ्या तपासण्या? मोठं कारण नसताना प्रथम गर्भाचा गर्भपात करणार्या पेशंटशी विश्वासानं, दमानं बोलायला वेळ नसणारे डॉक्टर… त्यानंतर तीन महिन्यांनीच त्यांना तपासण्या, औषधं ह्याच्या चक्रात ढकलणारे डॉक्टर…
आधार देणार्या आईबापांना (सासू सासर्यांना) विश्वासात न घेता निर्णय घेऊन गर्भपात करून घेण्याची घाई करणारं जोडपं… मुलीनं जातीबाहेर लग्न केलं आहे. तिच्या सासरच्यांनी तिला आपलं मानलं आहे, तरी तिला क्षमा करण्याची ताकद नसलेले तिचे आईवडील… दोष तरी कुणाकुणाला देणार?
काही जोडप्यांचा निर्णय मात्र हे सगळं समजावून सांगितलं, तरी ठाम असतो. कधी नाईलाज, कधी अज्ञान तर कधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष असतं.
सारिकाच्या सासूनं मला चमकवलंच होतं. सारिका लग्नाच्या आधीपासून काही वर्षं माझ्याकडे येत होती. तिला मासिक पाळी वेळेवर येत नसे. स्त्री बीज तयार होऊन फुटण्याची क्रिया व्यवस्थित होत नव्हती. लग्नापूर्वी आणि नंतरही तिला दिवस जाण्यासाठीही कदाचित उपचारांची गरज लागेल ह्याची कल्पना मी तिच्या आईवडिलांना दिली होती. पण माझे सगळे ठोकताळे चूक ठरले आणि सारिकाला लग्नानंतर दोन महिन्यातच दिवस गेले. ही प्रेग्नन्सी आता नको, सध्या शक्य नाही म्हणून ती, तिचा नवरा आणि सासू माझ्याकडे आले. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण तिची सासू तिच्या मतावर ठाम होती. एमटीपीमध्ये असणार्या धोक्यांच्या शक्यतांची मी चर्चा करू लागले. भूल देण्यामधील धोके, रक्तस्राव होण्याची शक्यता ह्या गोष्टी बोलण्यात आल्या तेव्हा तिची सासू मला म्हणते, ‘‘काय डॉक्टर उगाच घाबरवून टाकताय. आजकाल कुठं एवढं अवघड राहिलं आहे? क्यूरेटिंग तर करायचं आहे !’’
अलीकडच्या काळात गर्भपात बर्याच प्रमाणात सुरक्षित झाला आहे. हे खरं, पण एवढाही बिनधास्तपणा कामाचा नाही.
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात सातव्या आठवड्यापर्यंत वैद्यकीय सल्ल्यानुसार गोळ्या घेऊनही गर्भपात करवून घेता येतो. पण ही औषधे डॉक्टरांच्या देखरेखीखालीच घ्यावी लागतात, कारण काही वेळा अर्धवट गर्भपात होऊन रक्तस्राव होण्याची शक्यता असते. त्यानंतर परत क्यूरेटिंग करून ती प्रक्रिया पूर्ण करण्याची वेळ येते.
काही जोडप्यांच्या बाबतीत मात्र गर्भपात करून घेण्याचं कारण वैद्यकीय असतं. गर्भधारणेच्या सुमारास ते समजेपर्यंतच्या काळात काही औषधं अनवधानानं घेतली जातात; त्याचा गर्भाच्या निकोप वाढीवर परिणाम होण्याची, गर्भामध्ये व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते. अशावेळी मात्र वैद्यकीय सल्ल्यानं गर्भपात करवून घेणं योग्य ठरतं. पण ह्या बाबतीतही सर्वसामान्यांचं प्रबोधन करण्यात आपण काही कमी पडतो आहोत असं वाटतं. बर्याच वेळा पाळी येण्याच्या आधीच्या आठवड्यात घेतलेली ही औषधं पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतलेली असतात. घटनाक्रम साधारणपणे असा असतो – नियमित पाळी येत असणार्या स्त्रीला गर्भधारणा होण्याची शक्यता पाळीच्या १२ ते १८ व्या दिवसांमध्ये असते. त्याकाळात निरोधनाची साधनं न वापरता स्त्रीपुरुषसंबंध आलेला असेल तर गर्भधारणा होऊ शकते. कधी कधी पाळी पुढे ढकलण्यासाठी हारमोन्सच्या – संप्रेरकांच्या गोळ्या घेतल्या जातात. ज्या कारणासाठी मासिक पाळी पुढे ढकललेली असते, ते झाल्यावर गोळ्या थांबवून पाळीची वाट पाहिली जाते. मधल्या काळात १२-१८ दिवसात गर्भधारणा होऊन गेलेली असते. त्यामुळे गोळ्या थांबवल्यावरही पाळी येत नाही. तपासणी केल्यावर ‘दिवस गेले आहेत’ असं कळतं आणि मग गडबड होते. कारण पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतलेल्या गोळ्यांचा परिणाम म्हणून वाढणार्या गर्भामध्ये व्यंग निर्माण होण्याची शक्यता असते. पाळी पुढे ढकलण्याची कारणं ही घरातील धार्मिक समारंभ, बाहेरगावी देवदर्शनाला जाणं अशीच असतात. काही वेळा इतर काही शारीरिक त्रासासाठी ह्या काळात औषधं घेतली जातात. तर काही कारणासाठी एक्स-रे काढला जातो. गर्भामध्ये व्यंग निर्माण करू शकणार्या औषधांना टेराटोजन म्हणतात. संशोधनानं सिद्ध झालेल्या टेराटोजनचं सेवन गर्भवाढीच्या सुरुवातीच्या काळात झालं तर गर्भपाताला पर्याय राहत नाही. त्यामुळे ज्या जोडप्यांनी गर्भधारणा होण्याच्या दृष्टीनं विचार सुरू केलेला आहे, गर्भनिरोधनाची साधनं जी जोडपी वापरत नाहीत त्यांनी अशा प्रकारची औषधं वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. औषधविक्रेत्याकडून तर नक्कीच घेऊ नयेत.
प्रथम गर्भपात करून घेण्याची कारणं काही वेळा सामाजिक, कौटुंबिक असतात. कधी तिचं शिक्षण चालू म्हणून तर कधी त्याला काहीच नोकरी नाही म्हणून. रंजनानं मला कळवळून सांगितलं होतं, ‘‘मॅडम एके ठिकाणी कामाचे मला ३००० रु. मिळतात. तो अजून काहीच मिळवत नाही, कसं वाढवू मी हे?’’ ‘‘दिवस राहू देताना काळजी घ्यायची अक्कल नव्हती का?’’ हा प्रश्न गिळून टाकून तिला मदत करावी
लागली होती.
‘आमचं एकमेकांशी पटत नाही. आम्ही कदाचित वेगळं होण्याचाही विचार करू. आता चुकून दिवस राहिले आहेत म्हणून गर्भपात करून घ्यायचा आहे.’ असं सांगतही जोडपं येतं किंवा स्त्री येते. हा गर्भ वाढू दिला तर तिच्या निर्णय स्वातंत्र्यामध्ये अडथळा येणार असतो. पुढच्या आयुष्याचा विचार करता ते अवघड असतं. निर्णयप्रक्रियेमध्ये अनेक कंगोरे असतात.
वैशाली आणि मंदारचा प्रेमविवाह होता. एकाच कंपनीमध्ये दोघं कामाला होते. वैशाली वेगळ्या पोटजातीमधली म्हणून तिच्या सासूला हे लग्न मुळातच पसंत नव्हतं. त्यात वैशालीला लगेच दिवस गेले आणि सर्वसाधारणपणे होणार्या त्रासापेक्षा उलट्यांचा त्रासही जास्त सुरू झाला. प्रमाणाबाहेर उलट्या होऊन तिच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून सलाईन द्यावं लागलं. गर्भ व्यवस्थित होता. तिची आई तिच्याबरोबर होती. बाहेरगावी राहणार्या तिच्या सासूने मात्र आपल्या मुलाकरवी निरोप पाठवला की तिचा गर्भपात करून घ्यावा. मंदारही आईचं ऐकून तेच म्हणू लागला. गर्भपात करून घे असं सांगण्याची कारणं मात्र वेगळीच होती. सासूच्या मते वैशाली घर चालवण्यास अगदीच असमर्थ होती. तिला घरकामाची अजिबात सवय नव्हती. त्यांच्याकडच्या रीतीरिवाजांची तिला ओळख नव्हती. स्वयंपाक व्यवस्थित करता येत नव्हता. रांगोळी काढता येत नव्हती ! ‘‘तिला अजून रांगोळीही काढता येत नाही ती मूल कसं वाढवणार?’’ असा वैशालीच्या सासूचा सवाल होता ! वैशाली एका आय.टी. कंपनीमध्ये काम करत होती. ह्याला तिच्यालेखी काहीच महत्त्व नव्हतं. मंदारही मग आईच्या म्हणण्याचा आधार घेत, ‘‘वैशालीला घरकाम झेपत नाही. माझा भाऊ माझ्याबरोबर राहतो तर तिला आम्हा दोघांचं करता येत नाही. आई म्हणते तिला रांगोळीही काढता येत नाही. हे मूल आताच नको.’’ असं म्हणू लागला. त्याचा मुद्दा आर्थिक स्थैर्याचाही होता. ‘‘वैशालीला इतका त्रास होत असताना, तिची नोकरी कशी चालू राहणार? आणि मी आता ही नोकरी सोडून दुसरी बघणार आहे. आता हे मूल आम्हाला नकोच.’’ शिवाय आई म्हणते… ही पुस्ती त्याला होतीच. वैशालीला स्वतःला हा गर्भ वाढवण्याची इच्छा होती. तिचे आईवडीलही त्याच मताचे होते. ‘‘आम्ही मदत करू. अगदी आर्थिकसुद्धा’’ असं ते सांगत होते. पण ‘‘मला कुणाकडून मदत नको आहे.’’ असं म्हणून मंदार सासू-सासर्यांशीही उर्मटपणे बोलू लागला. वैशालीची आई आणि वडीलसुद्धा रडत होते. ‘‘अहो, आमच्या मुलीला घरकामाची सवय नाही हे खरंय. पण शिकते आहे ती आणि आता ह्या उलट्यांनी हैराण आहे. आम्ही तिला घेऊन जातो. तिचा बाळंतपणाचा सगळा खर्च करतो. नंतरही त्यांना मदत करू…’’ ते परोपरीनं सांगत होते. सासू इकडे यायला, ऐकायला तयार नव्हती. शेवटी एका संध्याकाळपुरते सासूसासरे आले. पण ते काही ऐकून घ्यायला नव्हे तर ‘‘हा गर्भपात करून घ्यायलाच हवा. नाहीतर आम्ही तिला घरात घेणार नाही.’’ हे सांगण्यासाठी. पुन्हा एकदा तिला रीतिरिवाज माहीत नाहीत, रांगोळी काढता येत नाही, ह्याची उजळणी झाली. शेवटी वैशाली आणि तिच्या आईवडिलांनी गर्भपात करून घेण्यास मान्यता दिली. हॉस्पिटलमधून जाताना मी तिला कुटुंबनियोजनाच्या साधनांची माहिती देऊन पाठवलं. वैशाली मंदारचे संबंध मात्र त्यानंतर दुरावतच गेले. आईचा मालकी हक्क असल्यासारखा पगडा, स्वतःचा खोटा अहंकार, नोकरी सुटल्याचा न्यूनगंड यातून मंदार बाहेर पडू शकला नाही. त्यांचा संसार घटस्फोटाच्या दिशेनं वाटचाल करतो आहे.
पहिल्यांदा गर्भ राहिल्यावर गर्भपात करून घेऊ नये असं म्हणण्याची वैद्यकीय सोडून इतरही कारणं आहेत. डॉक्टरांनीही ‘दिवस गेले आहेत, आता नको आहे. गर्भपात करून घ्यायचा आहे’ असं सांगत असलेल्या जोडप्यांशी थोडी चर्चा करायला हरकत नसते. तेवढा वेळ काढणं आवश्यक असतं. कधी कधी ‘आम्हाला आता नको आहे पण चार-पाच महिन्यांनंतर चालेल’ असंही सांगत येतात, तेव्हा ‘इतक्या थोड्या कालावधीसाठी गर्भपात करून घेण्यात अर्थ आहे का, असा विचार करा’ असं सांगून त्याच्या फायद्यातोट्यांची, सर्व बाजूंच्या मुद्यांची चर्चा करणं आवश्यक असतं. मागणी तसा पुरवठा ह्या तत्त्वावर सगळेच व्यवसाय चालत असले तरी ‘त्यांना पाहिजे होतं, आम्ही केलं. ते भोगतील.’ इतक्या अलिप्तपणेही वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही.
‘‘हमारे एक भूल की इतनी बडी सजा हमे क्यूं मिल रही है?’’ मेघा मला कळवळून विचारत होती. तीन वर्षे दिवस राहण्यासाठी विविध तपासण्या, उपचार चालू होते.
पाच वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं, त्यानंतर तिला लगेच दिवस राहिले. ते जुळं होतं. ‘लग्नानंतर लगेच मूल नको. जुळी तर अजिबात नकोत’ अशा विचारानं डॉक्टरांकडे जाऊन तिनं गर्भपात करून घेतला. त्यानंतर काही महिन्यातच गर्भनलिकेत गर्भ राहून पोटात रक्तस्राव झाला. त्यावेळी शस्त्रक्रिया करून त्या बाजूची गर्भनलिका काढून टाकण्यात आली. पहिल्या गर्भपाताच्या वेळी धक्का लागून, जंतुसंसर्ग होऊन हे घडलं असावं. त्यातून सावरायला वर्ष-सहा महिने गेले आणि त्यानंतर आता तीन वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नव्हती.