‘अशी’ शाळा कुटं वं भेटंल? (कविता)

मॅडम,
तुमच्याकडची धुन्या-भांड्याची कामं माज्याकडनं,
कशी फुलं फुलल्यावानी व्हत्यात –
येता-जाता माज्या लेकीची इच्यारपूस करता
आन् च्याचा कप देता, हातात !
तुमी म्हंता, ‘बाई, लेकीला शिकवा…
आपली आपल्यावर धरील ती सावली !
न्हाय येनार रस्त्यावर,
जरी न्हवर्यारनं गुत्त्याची वाट धरली !’

येक इचारू मॅडम,
तुमी जवा-तवा बुकं वाचीत आसता,
हापिसाची गाडी येते तुमा न्यायला;
तरी बी, बगावं तवा, कसा आयकू येतो,
हुंदका तुम्च्या बेडरूममधनं, मला?

तुमास्नी सांगते,
माजा मालक मारतो तवा, म्याबी जाळ काडते,
आक्शी चुलीतल्या जाळाची शपत !
पर, ‘मुका मार’ खानार तरी किती तुमी,
आपल्या ‘खानदाना’ला जपत?

म्हनून म्हंते, येव्हढं सांगा मला,
‘निखारं इझू न देनारी’ साळा
कुटं वं भेटंल?
येक टैम उपाशी र्हालईन, पर –
माज्या लेकीला, ‘त्या’च साळंत टाकंल !