शब्दबिंब – मे २०१३

मागच्या वेळी आपण वस्त्रांसंदर्भातून शब्द पाहत होतो. असे शब्द पाहताना त्या काळात असलेल्या वस्त्रांच्या पद्धतींचा विचारही आपल्या मनात असायला हवा, नाहीतर भलतीच पंचाईत होऊन बसते. भूतकाळातील परिस्थितीचे आकलन आपल्याला नसले, तर आपण आजच्या मापाने त्या काळाला तोलू लागतो. आपल्यासमोर असणारी देवादिकांची चित्रे किंवा रामायण-महाभारतासारख्या मालिकांमधील वस्त्रप्रावरणे बघून आपली त्या काळातल्या परिस्थितीबद्दलची कल्पना काहीतरी वेगळीच होऊन बसते. राजा रविवर्म्याच्या चित्रातल्या लक्ष्मी, सरस्वती ह्या देवता तसेच सीता, द्रौपदीही नऊवारी लुगडे-चोळी घालून, दागदागिने ल्यायलेल्या दिसतात. महाभारताचा काळ तीन हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो. त्या काळात या प्रांतात कपडे शिवून घालायची पद्धत नव्हती. स्त्री-पुरुष दोघेही कमरेला अर्धे घट्ट धोतर – त्याला अर्धोरुक असे म्हटले जाई – एवढाच पोशाख सामान्यपणे वापरीत. अनेक देवतांच्या मूर्ती आजही आपल्याला या पोशाखातच बघायला मिळतात. राजघराण्यातील लोक मात्र कमरेशी गाठ बांधून नेसलेले अधरीय आणि अंगावर पांघरलेले उत्तरीय अशी दोन वस्त्रे वापरीत.

द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग नुसता आठवला, तरी ‘अरे, दासी झाली म्हणून काय झाले, फार तर चार कामे सांगा, पण कुणा बाईला जाहीर ठिकाणी विवस्त्र कशाला करायचे!’ असा आपल्याला संताप येतो. पण प्रत्यक्षात मूळ घटना कदाचित तितकी वाईट नसावी. युधिष्ठीर द्यूतात हरल्यामुळे द्रौपदी कौरवांची दासी झालेली आहे, तेव्हा आता तिने उत्तरीय वापरू नये, इतकीच कौरवांची अपेक्षा असावी. असो.

शिवलेली वस्त्रे वापरायची पद्धत आली ती पहिल्या ते तिसर्याच शतकापर्यंत आलेल्या शक / हूण लोकांमुळे. शकांच्या स्वार्यात येत, त्यातील योद्धे कंचुक नावाचा एक कपडा घालीत. यालाच चोगाही म्हणतात. हा गुडघ्याखाली पोचणारा झगा असे, त्याच्या किनारीला गोट असून कमरेशी दोरी किंवा एखादे वस्त्र बांधीत. देवळांच्या दाराशी दोन्ही बाजूला कंचुक घातलेल्या द्वारपालांचे चित्र / शिल्प आजही पाहायला मिळते. या द्वारपालांनाही कंचुक असेच म्हटले जाई.

प्राचीन शिल्पांमध्ये आढळणारे आणखी एक वस्त्र म्हणजे शिरोवेष्टन. भारहूत, भाजे, बोधगया, सारनाथ, सांची, मथुरा येथील शिल्पांत स्त्रियांच्या डोक्यावरही ते आढळते. अजिंठ्याच्या ‘ब्लॅक प्रिन्सेस’च्या डोक्यावरचे शिरोभूषण आठवत असेल. तिने उत्तरीय मात्र घेतलेले नाही. चवथ्या शतकानंतरच्या काळात मात्र शिरोवेष्टन ही फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिली. आणि पुढे एकोणिसाव्या शतकापर्यंत यामध्ये भरपूर विविधता आली.

गेल्या काही शतकांतील शिरोवेष्टनांकडे पाहिले, तर ते मुळात एक चांगले १५-२० हात लांब आणि १ हात रुंद वस्त्र असल्याचे दिसते. ते डोक्याला गुंडाळण्याच्या मात्र अनेक पद्धती आहेत. त्यानेच पागोटे, पटका, फेटा, साफा, कोशा किंवा मुंडासेही बांधले जाई. नुसते गोल घट्ट गुंडाळले की ते होई मुंडासे; दोन्हीकडे उंच आणि मध्यभागी खोलगट केले की तो फेटा होतो. त्यातच आणखी बदल म्हणून एका टोकाचा तुरा काढून दुसर्‍या टोकाचा शेमला पाठीवर सोडतात. राजपूत लढवय्ये आणि पहिला बाजीराव लढाईवर जाताना फेटा बांधीत असत. त्यामुळे फेटा हे प्रतिष्ठेचे चिन्हही बनले. दर वेळी नव्याने न बांधता एकदाच विशिष्ट आकारात बांधूनही ते ठेवता येई.

शेला, पागोटे वापरताना त्यातल्या वस्त्राचा पोत आणि रंग यांवरूनही पुरुषाचा समाजातील दर्जा सूचित व्हावा असेही संदर्भ त्यास दिले गेले. संन्यासी लोक काषाय रंगाचा फेटा (स्वामी विवेकानंद) तर खानदानी मराठा लोक केशरी रंगाचा पटका बांधीत. ब्राह्मण पगडी घालीत; तर मराठा, माळी व इतर जातींचे पुरुष पागोटे घालीत. गोव्याचे सारस्वत ब्राह्मण, कर्नाटक व महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे ब्राह्मण आणि काही इतर जातींचे लोक वर चार टोके असलेली लाल किंवा शेंदरी रंगाची टोपी वापरीत. सोनकोळी लोक अशीच, पण मध्यावर नालाचा आकार असलेली टोपी वापरीत.

कोशा आणि साफा ह्याही तशाच वेगळ्या पद्धती. एक बाजू कानापर्यंत गेली की त्याला साफा म्हणतात. पगड्या बांधताना काही वेळा त्या कापडाला आधी पीळ भरून घेतात. शिवाजीमहाराजांबद्दलच्या आपल्या जाज्वल्य प्रेमामुळे आपल्याला जिरेटोप माहीत असतो. तोही पीळ भरूनच बांधलेला असतो. लांब वस्त्राऐवजी बारा हात चौरस कापड घेऊन, चौरसाच्या कर्णाभोवती पीळ भरूनही त्याचे पागोटे बांधतात. अशा पागोट्याला तमिळ भाषेतले उरुमाली हे नाव प्रचलित आहे. त्यावरूनच चौरसाकृती कापडाला आज वापरात असलेला रुमाल हा शब्द आलेला आहे.

विशेष आभार : डॉ. मंजिरी भालेराव, प्राध्यापक, इंडॉलॉजी विभाग. टि. म. वि. पुणे.