शब्दबिंब – जून २०१३
मागच्या लेखाच्या शेवटी आपण रुमालाबद्दल बोललो होतो. डोक्याला बांधायचे चौरसाकृती वस्त्र असा त्याचा अर्थ आहेच; तसाच, ह्या शब्दाचा अर्थ मूळ फारसीतून आलेला रु म्हणजे चेहरा आणि चेहरा पुसण्याचे साधन म्हणजे वस्त्र असाही आहे. अशाच अर्थाने आपण तो आजही वापरतो. नेहमी रुमाल वापरणार्यांना रुमाल्याही म्हणत. शिवाय पूर्वी महत्त्वाची कागदपत्रे रुमालात गुंडाळून ठेवत. ही कागदपत्रे सांभाळणार्यांना, म्हणजे कुळकर्णी-देशपांड्यांना, त्या कामासाठी बहाल केलेल्या जमिनीसही रुमाल म्हणण्याची पद्धत होती. युद्धात शरण जायची वेळ आल्यावर डोकीचा रुमाल काढून तो निशाणासारखा दाखवत, म्हणून रुमाल ह्याचा अर्थ तहाचे निशाण असाही होतो. रुमालाच्या या अनेक अर्थांनी आपल्याला दम लागला असेल, घाम आलेला असेल तर रुमालानेच तो पुसून आपण पुढे जाऊ या.
रुमालाचा उपयोग मोजमापासाठीही करत. चौदा तसूंचा एक रुमाली गज, असे लांबी मोजण्याचे माप आहे. तसूभर असा एक शब्द आपण वाचत-ऐकत आलेलो आहोत, पण त्याचा अर्थ ‘थोडेसे’ असाच आपण सामान्यपणे घेतो. मधले बोट व अनामिकेची एकत्र रुंदी इतके हे तसूभराचे माप असते. अशा वीस किंवा काही ठिकाणी चोवीस तसूंचा एक गज होतो. एक गज म्हणजे दोन हात असेही मानलेले आहे. शिवाय सोळा तसूंचा एक रेशमी गज होई. आता हात कुणाचा, बोटे कुणाची त्यावर हे माप लहानमोठे होणार, म्हणूनच वजने-मापे प्रमाणित करण्याची गरज भासली असणार हे आपल्या लक्षात येते. ब्रिटनचा एक राजा पहिला जेम्स (१६०३-१६२५) याच्या पावलाचे माप एक फूट म्हणून प्रमाणित केले गेले होते. लांबीप्रमाणे वजनाच्या मापातही हिंदुस्थानी पद्धतीत मोठीच गंमत दिसते. सहज मजा म्हणून त्यातली एक रीत इथे देत आहोत. ८ खसखशीचे दाणे म्हणजे १ तांदूळ, ४ तांदूळ म्हणजे १ गहू, २ गहू म्हणजे १ रत्ती, ८ रत्ती (म्हणजे रक्तिका, गुंज किंवा लहान बी) = १ मासा, १२ मासे = १ तोळा, ५ तोळे = १ छटाक; सोळा छटाक म्हणजे एक शेर, दहा शेर म्हणजे एक धडा. आणि चार धडे म्हणजे एक मण. नमनाला धडाभर तेल अशी जी म्हण आपण वापरतो, त्यातला धडा तो हाच. अनेक ठिकाणी धड्याऐवजी घडा असा शब्दही वापरला जातो, तोदेखील येथे अर्थपूर्ण ठरतो. रात्री होणार्या जागरण गोंधळाच्या वेळी संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत पोत किंवा मशाली पेटवलेल्या असतात. त्याला तेल लागते. ‘पहिल्या नमनामध्येच जर धडाभर तेल जाळले तर मुख्य आख्यानाला काय शिल्लक उरणार’, अशा अर्थाने ही म्हण वापरली जाते. धडा या शब्दाची ही गोष्ट श्रीमती विद्या मुळगुंद यांनी आवर्जून कळवली आहे.
धडा हा शब्द पाहू गेलात तर त्याचे अनेक अर्थ सापडतात. एखादे मोठे वजन जर हाताशी नसेल तर छोटे छोटे दगड एकत्र करून ते तयार केले जाते, त्यालाही धडा म्हणतात. यातूनच आलेला धड्याचा आणखी एक अर्थ म्हणजे अभंड. हा शब्दही आता विस्मृतीत गेल्यासारखा झालेला आहे. तेल आणायला बरणी घेऊन गेल्यावर बरणीचे वजन तेलाच्या वजनात धरले जाऊ नये म्हणून ते आधी तोलून घेतले जाते, यालाच अभंड किंवा धडा किंवा पासंगही म्हणतात. एखादी गोष्ट दुसर्या गोष्टीच्या तुलनेत खूपच अपुरी असेल तर ती ‘पासंगालाही पुरत नाही’ असे आपण म्हणतो, पण पासंग या शब्दाचा अर्थ मात्र आपण अंदाजानेच जाणून घेतलेला असतो. तराजूच्या पारड्यातील विषमपणा, किंवा तो काढण्यासाठी हलक्या वजनाची एखादी गोष्ट एका पारड्यात घालतात, ती म्हणजे ‘पासंग’.
असेच दोन शब्द हल्ली मागे पडू लागले आहेत, म्हणून मुद्दाम त्यांची आठवण करून देत आहोत; आधण आणि विसण. पाणी गरम करण्याला, किंवा उकळी आणण्याला आधण आणणे म्हणतात. तसेच गरम झालेल्या पाण्यालाही आधण म्हणतात. मग ते आधण चहासाठी ठेवलेले असो वा भातासाठी वा अंघोळीसाठी. पाणी खूपच गरम झालेले असले आणि ते निववण्याची गरज असली तर त्यात जे गार पाणी घालतात, ते विसण. भातासाठी पाण्याला आधण आले की त्यात रोवळीत धुऊन ठेवलेले तांदूळ. घालायचे नसतात, टाकायचे तर नसतातच, वैरायचे असतात. गुरांना घालायच्या ओल्या-कोरड्या चार्याला वैरण असे म्हणतात, आणि एका वेळी घरात जेवढा शिधा शिजतो, त्यालाही वैरा असा शब्द आहे. त्यावरून ‘घरात मणाचा वैरा असणे’, असा वाक्प्रचारही आहे. त्याचा अर्थ घरात मोठा परिवार आहे, (मणभराचे अन्न वैरावे लागते) असा होतो !
विशेष आभार : डॉ. श्रद्धा कुंभोजकर, इतिहास विभाग, पुणे विद्यापीठ