होलपडणारी पावलं
दाराशी होलपडणाऱ्या पावलांनी
येणाऱ्या बापाला बघून
पोरांनी घाबरून
आईला बिलगून घेतलं.
तीच स्वतः खूप घाबरलेली,
तरी तिनं पोरांना पदराआड लपवलं.
रोजचंच मग सगळं,
त्याच शिव्या तेच किंचाळणं
कधीतरी मध्यरात्री मग
बापाच्या झोपेमुळे सगळं थांबलं.
पोटाशी पाय घेऊन
पोरांनीही सुटलो म्हटलं.
रोजचीच सकाळ मग,
रोजचीच शाळा.
न बोलता काम करणारी आई
आणि अस्ताव्यस्त पसरलेला बाप बघतच
पोरांनी स्वतःच स्वतःचं आवरून घेतलं.
कसंबसं खाऊन थोडं
शाळा नावाचं ठिकाण गाठलं.
हसत शाळेत येणाऱ्या पोरांना
पोट भरून पाहून घेतलं.
स्वत:च्या बापाचं बोट धरून
शाळेत येणारी पोरं पाहून
मागंदेखील वळून बघितलं.
रूपाली सुभाष फरांदे
rupaleepharande@gmail.com
9960591947