एका बापाचा प्रवास

आज मी थोडा बेचैन होतो. सकाळी घरातून शाळेत येताना पुन्हा पुन्हा पूनमची विचारपूस करीत होतो. “शाळेत जाताना दवाखान्यात नंबर लावतो. तू आईबरोबर ये आणि मला फोन कर.” असे पुन्हा पुन्हा बजावत होतो. मी कम्प्यूटर शिक्षकाचे काम करतो. आजही शाळेत काम सुरू होते मात्र एक ताण वाटत होता. सतत फोन येतोय असे वाटत होते. दुपारी आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जेवण करायला बसलो. माझा फोन वाजला आणि मी थोडा स्तब्ध झालो. आई फोनवरून दवाखान्यात लवकर ये म्हणत होती. ती थोडी घाबरलेली वाटत होती. मी जेवण तसेच सोडून दवाखान्याकडे निघालो. दवाखाना शाळेपासून अगदी तीन मिनिटांच्या अंतरावर होता मात्र मला रस्ता संपत नाही असे वाटत होते. मी डॉक्टरांच्या केबिनकडे गेलो. डॉक्टर शांतपणे सांगत होते, “आपल्याला सिझेरियन करावे लागेल. बाळाला पाणी कमी पडत आहे. तुम्ही लवकर निर्णय घ्या.” खरे तर अशा परिस्थितीमध्ये आपण निर्णय करीत नसतो आपण फक्त निर्णयाला दुजोरा देऊ शकतो. डॉक्टरांनी थोडा विश्वास दिला. आई आणि मी एका मोठ्या बंद दरवाजाबाहेर काळजीयुक्त चेहऱ्याने बसून होतो.

काही काळ मी माझ्या गेल्या काही महिन्यांच्या प्रवासात गेलो. जून २००९ पासून हा प्रवास सुरू झाला. आपल्या घरात बाळ येणार या कल्पनेने साहजिकच घरात आनंदी वातवरण होते. पण थोडी काळजी देखील होती. एकीकडे नवीन घराचे काम काढले होते. अनेकांचे अनेक सल्ले येऊ लागले होते. घर आणि बाळंतपण एका वर्षात नसावे. सध्या मी भाड्याने राहत होतो त्यामुळे दुसऱ्याच्या घरात बाळ जन्माला येणे यावर देखील अनेकांची मते व्यक्त होत होती. मी मात्र ठाम होतो. फक्त मी पूनमला विचारत होतो की हे तुझ्यावर खूप लवकर लादले जात नाहीये ना.

Tanmay .jpg

हळू हळू माझ्या रोजच्या वेळापत्रकातही बदल करीत जात होतो. रोज शाळेत निघताना माझ्याबरोबरच पूनमने जेवले पाहिजे असा आग्रह धरीत होतो. जेवणात शक्य तेवढी पौष्टिकता आणायचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू होता. प्रत्येक तपासणीच्या वेळी नवे सल्ले मिळत होते- तब्येत नाजूक आहे, आहार अजून चांगला झाला पाहिजे. तसे माझे नियोजन बदलत होते. काही पुस्तके वाचून आहार कसा असावा याची पुन्हा पुन्हा चाचपणी करीत होतो. रोज रात्री आठवणीने बदाम, बेदाणे भिजत घालायचो. सकाळी ते खायला द्यायचो. आहाराबद्दल कायम निष्काळजी असणारा मी आता आहारशास्त्राचा अभ्यास करीत होतो. मनसंस्कार, गर्भसंस्कार, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात काळजी अशाही विषयांचा मी अभ्यास करीत होतो. आजवर कोणत्याच विषयाचा मी एवढा सखोल अभ्यास केला नव्हता. कधी कधी वाटायचे, आपण आपल्या स्वार्थासाठी तरी ही सारी काळजी करीत नाही ना. मग विचार यायचा, आपले बाळ नेहमी निरोगी असावे, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावे असे वाटण्यात काय गैर? तसा मी काही जगातला पहिलाच बाप नव्हतो पण बाप होण्याची तर माझी जगातली पहिलीच वेळ होती!

घरातील वातावरण अध्यात्मिक असल्यामुळे वडील अधून मधून घरात कबीर, मीराबाई, आणि काही पंजाबी संताचे शब्द लावत होते. शेजारी पाजारी माझे लहानपणापासून खूप लाड करणारे. त्यामुळे मी बाप होणार हे समजताच शेजारच्या अराद्यांच्या घरापासून सर्वांकडूनच पूनमला नवनवे पदार्थ मिळू लागले. मी कधी कधी काळजीत पडायचो की काय खायला द्यावे आणि काय नाही. पण कुणाचे मन न दुखावता पुढे जात होतो. जिथे राहत होतो तिथे सापांचा बराच वावर होतो. गर्भवतीने साप पाहिला तर मूल सतत जीभ बाहेर काढत राहते अशी एक अंधश्रद्धा आमच्या गल्लीतून घरात आली. आणि मग काय, पूनमच्या घरातून बाहेर पडण्यावरदेखील देखरेख सुरू झाली. मी या भ्रमातून सर्वांना बाहेर काढण्याचा पूर्ण शक्तीने प्रयत्न करीत होतो. शेवटी एकदा सापाचे दर्शनदेखील झाले! जेवढा वेळ मला कुटुंबियांना शास्त्रोक्त संगोपन कसे असावे हे पटवायला लागला नाही तेवढा वेळ त्यांना अशा भ्रामक समजुतींतून बाहेर काढण्यात लागला!

गेला तास दीड तास विचारांत हरवलेला मी ‘’ट्यँ ट्यँ’’ आवाजाने थोडा भानावर आलो. नर्सबाई लगबगीने ‘’मुलगा झाला हो’’ असे सांगत आल्या. प्रत्येक जण ‘’अभिनंदन! पहिला मुलगा झाला’’ असे अभिनंदन करीत होता. गेल्या काही महिन्यांच्या प्रवासात मी किंवा माझ्या कुटुंबाकडून मुलगा की मुलगी असा विचारच झाला नव्हता! आम्ही सगळे बाळ येणार एवढाच विचार करीत होतो आणि आताही बाळ झाले याचाच आनंद मानत होतो.

आतापर्यंतचा हा प्रवास काही महिन्यांचा होता. मात्र आता एक मोठा प्रवास सुरू झाल्याची जाणीव होत होती. लहानग्या तन्मयच्या येण्याने जवळ जवळ अडीच दशकांनंतर आमचे कुटुंब मोठे झाले होते. मी स्वतः विधी, कर्मकांड यांच्या विरोधी भूमिकेचा पण बाळाच्या प्रेमापोटी आणि कुटुंबाच्या आनंदासाठी या साऱ्यातून जात राहिलो.

तन्मयसोबतचा पहिल्या तीन वर्षांचा प्रवास मलाच एक निरीक्षण शक्ती देणारा ठरला. अगदी जन्माच्या पहिल्या दिवसापासून तन्मयचे फोटो टिपण्याचा मी सपाटा लावला होता. त्यामुळे त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाचे बारीक निरीक्षण होत होते. घरातील आणि घराच्या अवती भोवतीचे वातावरण याचा त्याच्या विकासावर बराच प्रभाव जाणवत होता. घरातील लोकांचे तो किती बारकाईने निरीक्षण करतो याचा अनुभव एकदा आला. तन्मय दोन वर्षांचा होता. घरात आई आणि आजी नव्हत्या. त्याने स्वयंपाकघरातून कढई, चमचा, ओल्या हरभऱ्याची फोलपाटे आणि एक डबा असे साहित्य गोळा केले. हे सारे घेऊन तो त्याची आई डब्यासाठी जशी भाजी करते त्याची हुबेहुब नक्कल करीत होता. कढईत भाजी टाकणे, ती हलवणे, तिची चव पाहणे आणि शेवटी डबा भरणे. मी सहज लक्ष गेले म्हणून पाहिले आणि थक्कच झालो. मुलांची निरीक्षण शक्ती किती अफाट असते याचे हे उत्तम उदाहरण मी पहात होतो.

तन्मय जसे घरातील लोकांचे निरीक्षण करायचा तसेच अवती-भोवतीचे देखील. माझ्या शेजारी अरादी राहतात. त्यांचे गाणे आणि संबळ या गोष्टींकडे तन्मय सर्वात प्रथम आकर्षित झाला. त्याच्या भाषेत संबळ म्हणजे ‘ढपांग’. आणि हे ढपांग तयार कसे करायचे याचे तंत्रदेखील त्याने शोधून काढले होते. एक साधा डफ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पाण्याचा जग उलटा करून एकत्र दोरीने बांधला आणि वाजवायला दोन चमचे. असे संबळ घेऊन, कपाळावर नाम ओढून अगदी बेंबीच्या देठापासून स्वरचित गाणे म्हणणे सुरू असायचे. या गाण्यात एक दोन कडवी देवीची तर एक दोन कडवी टी.व्ही. वर ऐकलेल्या गाण्याची.

तन्मयच्या या वेगवगेळ्या भूमिका साकारण्याचा कलेकडे मी घरातील सर्वांचे लक्ष वेधून घेत होतो. त्यामुळे हळू हळू सर्वांनाच अशा निरीक्षणाचा आनंद घेण्याची सवय जडली. खरे तर अशी निरीक्षणे टिपण्याची दृष्टी थोडीबहुत मला माझ्या शाळेकडूनच मिळाली आहे असे वाटते. या शाळेचा विद्यार्थी असणे आणि आज तिथे काम करणे या दोन्हींमुळे अशा निरीक्षणांचे महत्त्व मी जाणले आणि तन्मयला प्रोत्साहन दिले.

तन्मयच्या जीवनातला पुढचा टप्पा शालेय शिक्षणाचा होता. त्याला कोणत्या शाळेत टाकायचे याचा निर्णय त्याच्या जन्माआधीच झालेला होता. आपले बाळ आपण जिथे घडलो आणि आजही घडत आहे अशा ठिकाणीच शिकावे हे मी तरी गृहीत धरले होते.

पहिल्या तीन वर्षांच्या निरीक्षणातून मी काहीशा भ्रामक कल्पनेत होतो की तो शाळेत आणि शाळेतील वातावरणात लवकरच मिसळून जाईल. पण तसे काही झाले नाही. घराची ओढ ही प्रत्येकालाच असते. घरातील वातावरणातून एका वेगळ्या वातावरणात मुले स्थिरावताना आपल्या सहनशीलतेची कसोटी असते याचा अनुभव तन्मयला शाळेत टाकल्यावर पहिल्या काही दिवसांतच आला. सुरूवातीचे काही महिने शाळेत बसण्यात आणि बसवण्यात गेली.

गेली चौदा वर्षे मी शाळेत काम करत आहे. तरीदेखील कोणत्याही प्रकारची सभा हा काहीसा न आवडणारा प्रकार आता तन्मयचा पालक म्हणून मला आवडता करावा लागणार होता. तन्मयच्या शाळेतील पालकसभांना मी जिज्ञासेपोटी मी हजेरी लावू लागलो. आजवर तांत्रिक व्यवस्थेसाठी अनेक वेळा अशा पालक सभा मी केल्या होत्या. मात्र स्वतः पालक म्हणून अनुभव पूर्ण वेगळा होता. शाळेतील घडामोडी आणि आपले पाल्य यांबद्दल जाणून घेताना मी देखील शिकत गेलो. त्याच्या फाईलींच्या कामात सहभागी होऊन शाळेतला तन्मय पाहत गेलो.

‘आता तन्मय चांगला रुळला आहे, आता बऱ्यापैकी आपली काळजी संपली’ अशा अविर्भावात मी तन्मयच्या दुसऱ्या शैक्षणिक वर्षात प्रवेश केला. पण एक दोन महिन्यात एक नवे आव्हान समोर येऊन उभे ठाकले. त्याच्या शाळेतील ताई सांगत होत्या की तो मुलांमध्ये नीट मिसळत नाही, सूचना ऐकत नाही आणि काहीसा आक्रमक वागतो. ताईंशी बोलून झाल्यावर मी अनेक प्रकारे विचार केला. या मागील कारणांचा शोध घेण्याचा माझा प्रयत्न सुरू होता. खरे तर हे माझ्यासाठी छोटेसे संशोधन होते. मला लक्षात आले की तो गटात मिसळत नव्हता कारण घरी आणि अवती-भोवती त्याच्याशी खेळणारे त्याच्या वयाच्या जवळपासचे कोणी नव्हते. त्यामुळे एकटे राहणे, खेळणे असे काहीसे त्याचे आधीचे जग होते. साहजिकच त्याची खेळणी, साहित्य हे फक्त त्याचेच असते, त्यावर कोणाचा हक्क नसतो आणि त्याला कोणी हातपण लावायचा नसतो असा त्याचा समज झालेला होता. घरात त्याचे काही ठरलेले वेळापत्रक नव्हते. त्याचे वेळापत्रक त्यानेच ठरवले होते. म्हणूनच शाळेतील वेळापत्रकात बसणे त्याला थोडे अवघड जात होते आणि या साऱ्या गोष्टींना तो प्रतिकार करीत होता.

तन्मयला यातून बाहेर येण्यासाठी मला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागणर होती ती म्हणजे त्याच्यासाठी वेगळा वेळ देणे. माझ्या कामाच्या व्यापातून मी किती वेळ देऊ शकेन हे माहीत नव्हते. पण मी एक ठरवले- किती वेळ देईन यापेक्षा कसा वेळ देईन हे महत्त्वाचे असेल. मी त्याला अधून मधून बागेत घेऊन जायला सुरुवात केली. आपल्याला झोक्यात बसायचे असेल तर इतर मुलांचे होईपर्यंत थांबावे लागेल अशी त्याला जाणीव व्हावी, सी-सॉ खेळायचा तर अजून कुणाची तरी मदत मागावी लागेल अशा गोष्टी न सांगता त्याच्या लक्षात आणून देण्याचा माझा हा एक प्रयत्न होता. त्याच्या वयाच्या मुलांमध्ये त्याला खेळायला नेण्यासाठी देखील घरी सांगून ठेवले. घरापासून थोडे लांब असलेल्या पाहुण्यांच्या मुलांमध्ये कधी त्याची आजी तर कधी आई त्याला रोज घेऊन जाई. त्यामुळे इतरांबरोबर बोलणे, एकत्र खेळणे, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे असे अनुभव त्याला कौटुंबिक वातावरणातच मिळायला लागले.

घरात काही वेळा तो काहीच ऐकत नाही असे वाटले तर त्याला जरा वेळ ‘विचारांच्या कोपऱ्यात’ जा असे मी सांगू लागलो. त्यासाठी घरातील माझ्या संगणकाची खुर्ची म्हणजे त्याचा विचारांचा कोपरा केली. शाळेतील विचारांचा कोपरा घरात कसा काय आला याबद्दल त्याला आश्चर्य वाटले होते पण तो तेथे जाई. ज्या खुर्चीत बसून मी गेली अनेक वर्षे वेगवेगळे चांगले विचार केले तेथे त्यालाही चांगले विचार करता आले याबद्दल मला विशेष आनंद वाटतो. विचारांच्या कोपऱ्यातून आल्यावर सुरुवातीला माझे चुकले म्हणायला त्याला अवघड जात असे पण जेव्हा त्याला प्रोत्साहन दिले तेव्हा तो अजून पुढे गेला. आज कधी कधी जेव्हा माझी चिडचिड होते आणि हा माझा पाच वर्षांचा तन्मय ‘इथे बसा’ म्हणून विचारांच्या खुर्चीकडे बोट दाखवतो, तो एका बापाच्या प्रवासातला अतिशय सुखद आणि निवांत क्षण असतो.

प्रकाश अनभूले
anbhuleprakash@gmail.com
9960460474