माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या दोन बाजू
आय आय टी कानपूर येथून एम टेक केल्यानंतर पी एच डी साठी डॉ. राजवंशी १९७४ साली अमेरिकेला गेले. तेथील अतिशय भरभराटीचे भविष्य असलेला व्यवसायमार्ग सोडून १९८१ साली ग्रामीण भारताचा विकास घडवून आणण्याच्या ईर्ष्येने ते फलटण येथील निंबकर कृषी संशोधन संस्थेत संचालक म्हणून रुजू झाले. ग्रामीण भागासाठी नवीकरणीय ऊर्जेवर आधारित तंत्रज्ञान विकसित करताना त्यांनी भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा अभ्यासही केला. आध्यात्माची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घातल्यास शाश्वत भारताचे स्वप्न साकार होऊ शकेल असा त्यांचा विश्वास आहे.
“काय सारखा त्या मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेला असतोस!” घराघरातून घुमणारे हे वाक्य. आजच्या पिढीतल्या मुलांना हे वाक्य मुळीच आवडत नाही. त्यांचे म्हणणे असते की याच माध्यमातून त्यांचा मित्र-मैत्रिणींशी संपर्क राहतो आणि पालकांना कधीच मिळाले नसेल एवढे जगाबद्दलचे ज्ञानही आज त्यांच्याजवळ आहे ते या तंत्रज्ञानामुळेच! मित्रांसोबत, माहितीसोबत अप-टू-डेट राहिले नाही तर हातातून काहीतरी मोठे सुटून जाईल आणि आपण मागे पडू अशी भीती त्यांना वाटत राहते.
इंटरनेटवरील वेबसाइट्स, फेसबुक अशा माहिती तंत्रज्ञान माध्यमांची मुलांच्या मेंदूवर घट्ट पकड बसते. वाढत्या वयात नवनवे चेतामार्ग (neural pathways) बनण्यासाठी मेंदूला मिळतील तितके इनपुट्स हवेच असतात. ते या माध्यमांतून भरपूर मिळतात. जसजसे नवीन चेतामार्ग बनतात तसतसे इच्छापूर्ती झाल्याचे अनुभव येतात. स्मार्ट फोन, आयपॅड, इंटरनेट सारखी साधने (गॅजेट्स) तत्क्षणी इन्स्टंट इच्छापूर्तीचा अनुभव देतात आणि त्यामुळे ती सतत जवळ हवीशी वाटतात.
पुष्कळदा मुलांनी (कधी कधी तर अगदी तान्ह्या बाळांनीसुद्धा!) त्रास देऊ नये म्हणून त्यांना अशी साधने खेळायला देणे किंवा त्यांना टीव्ही समोर बसवून ठेवणे अशा गोष्टी जाणते-अजाणतेपणी आपण करतो. यामध्ये किती वेळ टीव्ही पहायचा किंवा गेम खेळायचा असे नियम, शिस्त यांचा काहीच संबंध नसतो. त्यामुळे खूप लहान वयात मुलांना या वस्तूंची सवय व्हायला आपला हातभारच लागतो.
सतत मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहणे आणि आपले आयुष्य महाजालावर ‘अपडेट’ करत राहणे याचे व्यसन जडल्यास वेळ कसा उडून जातो ते मुळीच कळत नाही. यामध्ये खूपशी ऊर्जाही खर्ची पडते आणि मग दुसऱ्या कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड होऊन बसते.
शिवाय बरेचदा या नेट सर्फिंग, चॅटिंग, फेसबुकिंग, व्हॉट्सअॅपिंगच्या व्यसनाचे पर्यवसन हव्यासात होताना वेळ लागत नाही. याचमुळे मोबाईल फोन, MP3 प्लेयर्स, कॅमेरा, हेडफोन अशा वस्तू किंवा त्या वस्तू विकत घेण्यासाठीलागणारे पैसे मागणारी, प्रसंगी चोरणारीही मुले आपल्या आसपास दिसतात. या व्यसनाची आणि हव्यासाची दिशा वळवून त्याला व्यासंगाकडे कसे न्यायचे हे आज पालक आणि शिक्षकांसमोरील मोठे आव्हान आहे.
मुलांना आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवणे हे काही यावरचे उत्तर नाही. कारण शेवटी एका तंत्रज्ञानाच्या अनुभवातूनच दुसऱ्या तंत्रज्ञानाचा जन्म होतो. मी लहान असताना मला वाफेवर चालणारे इंजिन जवळून पाहायला मिळाले. तंत्रज्ञान शिक्षणाकडे वळण्याचा तो पहिला बुलावा होता असे मला वाटते. तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे शोध लावणाऱ्या बऱ्याचजणांची लहानपणी कोणत्या न कोणत्या गॅजेटशी ओळख झालेली होती. रिचर्ड फाइनमनला रेडिओ दुरुस्तीचे वेड होते तर आईनस्टाईनवर चुंबकीय होकायंत्राचा मोठा प्रभाव पडला होता.
मात्र जुन्या तंत्रज्ञानात देवाणघेवाण किंवा आंतरक्रियांचा फारसा प्रश्न यायचा नाही. ते आजच्यासारखे इंटरॅक्टिव्ह नव्हते. यामुळे कल्पनाशक्तीच्या वापराला भरपूर वाव असे. मुलांना गोष्टी समजावून घ्यायला जास्त प्रयत्न करावे लागत आणि त्यांचे कुतूहल टिकून राही.
आजचे तंत्रज्ञानमात्र इन्स्टंट उत्तरे आणि माहिती पुरवते. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाबद्दल खोलवर विचार करून उत्तर शोधण्याची वृत्ती लोप पावत आहे. शिवाय हे तंत्रज्ञान अतिशय इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे मुले दिवास्वप्नेही पाहीनाशी झाली आहेत का काय असे वाटते. कल्पनाशक्तीच्या विकासासाठी दिवास्वप्ने पाहणे फारच आवश्यक! एकटे बसून स्वतःच्याच विश्वात बुडून दिवास्वप्न पाहताना काही वास्तव तर काही काल्पनिक पात्रे व घटनांनी बनलेला एक चित्रपटच आपल्या डोळ्यासमोरून सरकत असतो व जाता जाता तो विचारांना केवढे खाद्य देऊन जातो हे आपल्या लक्षातही येत नाही. सतत दुसऱ्या व्यक्तीशी किंवा स्क्रीनशी संपर्कात असताना हे घडणे मुश्किल होऊन बसते.
तेव्हा तंत्रज्ञान तर महत्त्वाचे पण मग त्याच्यातून निर्माण होणाऱ्या इतक्या साऱ्या अडचणींचे काय करायचे? एक पर्याय पुढे दिसतो तो म्हणजे संपर्क तंत्रज्ञान (communication technology) वापरण्यात शिस्त कशी बाळगायची हे आपल्या मुलांना शिकवणे. अगदी लहान वयात मुलांना गॅजेट्स पासून दूर ठेवणेच उत्तम. मोठ्या मुलांना काही वेळा पाळणे बंधनकारक करता येईल.
दुसरा पर्याय म्हणजे मुलांना विशिष्ट गोष्टींची मुद्दामहून ओळख करून देणे. संपर्क तंत्रज्ञान वापरण्यात मुलांना मजा तर वाटायला हवीच पण शिकणेही व्हायला हवे. तरच मुलांमधून ओसंडून वाहणाऱ्या ऊर्जेला योग्य वाट मिळेल. युनायटेड स्टेट्स मध्ये सध्या काही इंटरेस्टिंग प्रयोग चालू आहेत. ‘मेकर मूव्हमेंट’ या स्वतः काहीतरी बनवण्याच्या चळवळीअंतर्गत मुले स्मार्ट फोन व इंटरनेट वापरून वस्तू डिझाईन करतात, ज्या नंतर 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्यक्षात उतरवता येतात.
आपल्याकडेही असे काही प्रकल्प देऊन आपण मुलांना नवनिर्मितीचा आनंद देऊ शकतो आणि चॅटिंगसारख्या कमी उत्पादक गोष्टींपासून दूर जायला त्यांना मदत करू शकतो. मग अरविंद गुप्ता यांच्या विज्ञान विषयक खेळण्यांचे व्हीडिओ बघून स्वतः खेळणी बनवणे असो किंवा ओरिगामी शिकणे असो. एखादे गाणे ऐकून ते स्वतःच्या शैलीत उपलब्ध वाद्यांच्या सहाय्याने म्हणणे असो किंवा जेन गुडालसारख्या व्यक्तींच्या कार्याबद्दल जाणून घेऊन, त्यापासून प्रेरित होऊन एखादा लेख वा कविता लिहिणे असो. संपर्क तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुलांना प्रेरणा तर मिळायला हवी मात्र त्यांची मातीशी, हाताने काम करण्याशी, नवनिर्मितीशी नाळ तुटता कामा नये. संपर्क तंत्रज्ञान पूरक आहे, सर्वस्व नव्हे हे स्वतः समजून घेऊन मुलांच्या मनांवर बिंबवणे आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठे काम आहे.
मूळ इंग्रजी लेख: अनिल राजवंशी
anilrajvanshi@gmail.com
रूपांतर: मधुरा राजवंशी
rmadhuraa@gmail.com
8275369702