खेळघर म्हणजे…
आमचं एक स्वप्न आहे
अशी एक जागा असावी
जिथं लहान – मोठे, मुलं – मुली, गरीब – श्रीमंत
सगळेजण एकत्र येतील – आनंदानं शिकतील.
जिथं नसतील दडपणं… ताण,
जिथं नसेल अपमान आणि मिंधेपणा.
कुणी कुणाला घाबरत नसेल.
कुणी कुणाला तुच्छ लेखत नसेल.
जिथं माणूस, माणसाशी-माणसासारखा वागत असेल.
जिथं असतील पुस्तकं, खेळ, साधनं नि माणसं…
असेल साथ प्रत्येकाला…
स्वतःला शोधण्यासाठी… काही करून पाहण्यासाठी.
पण नसेल आग्रह नि अट्टाहास कशाचाच,
ज्याला तिला, ज्याच्या तिच्या पद्धतीनं, गतीनं,
काम करण्याची मुभा असेल.
शिकण्याची इच्छा बहरेल, कष्टांची उर्मी उभरेल,
असं वातावरण असेल.
अशी एक जागा असावी –
ती आपण सर्वांनी मिळून घडवावी…
जोपासावी… समृद्ध करत न्यावी,
असं हे स्वप्न ! खेळघराचं !
– शुभदा जोशी
शिक्षण वांचितापर्यंत पोचावं ,ते आनंदाच व्हावं ह्या दिशेने काम करणारी “खेळघर” ही अर्थपूर्ण रचना आहे.
खेळातून मिळणाऱ्या आनंदाला मायेचं कोंदण लाभावं आणि मुल शिकण्यासाठी उत्सुक व्हावीत यासाठी खेळघरात प्रयत्न केला जातो.
पालकनीती मासिकाच्या कामाच्या आधारावर खेळघराची रीत ठरवण सोपं गेलं. खेळघराने मुख्यता: दोन काम आपली मानली आहेत .
१) १९९६ पासून पुण्यातील कोथरूड मधील ‘लक्ष्मीनगर’ या झोपडवस्तीतील मुलांबरोबरचं आणि पालकाबरोबरचं शिकण्या -शिकवण्याचं काम .
२) खेळघररातील आनंददायी शिकण्याची अनुभूती महाराष्ट्रातल्या इतर अनेक वंचित मुला-मुलीपर्यंत पोचावी म्हणून २००७ पासून सुरु केलेलं खेळघर प्रशिक्षनाचं काम .
प्रत्येक मुलाला आपण होऊन, आनंदाने शिकण्याची संधी मिळावी’, हे आपणा सर्वांचेच स्वप्न आहे. ‘खेळघर’ ही या दिशेने काम करणारी एक अर्थपूर्ण रचना आहे.
‘खेळघर’ या नावामागेही एक विचार आहे. मुलांच्या दुनियेत ‘खेळ’ ह्या गोष्टीला वेगळेच महत्त्व आहे. ‘चला खेळायला जाऊ’, असे म्हटल्यावर त्यांचे चमकणारे डोळे, शारीर प्रतिसाद, आनंद, उत्साह खूप काही सांगून जातो. लहान वयात मुलांसाठी जग समजून घेण्याचे ‘खेळ’ हे एक माध्यम आहे. या माध्यमातून मुलांच्या चपळाई, निरीक्षण, तत्काळ निर्णय घेणे अशा अनेक क्षमतांचा विकास होत असतो. मुलांच्या संगोपनाची, विकासाची जबाबदारी घेऊ पाहणाऱ्या मोठ्या माणसांनी याची विशेष दखल घ्यायला हवी. म्हणूनच खेळघरात खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांना आवडणारी दुसरी जागा म्हणजे ‘घर’. घरांतून मिळणाऱ्या प्रेम, आधार, संगोपन, सुरक्षितता यांची मुलांना खूप आवश्यकता असते. अशा मुलांना अत्यंत आवडणाऱ्या दोन गोष्टींपासून ‘खेळघर’ हे नाव बनले आहे. ही मुलांसाठी मोठ्यांनी निर्माण केलेली अर्थपूर्ण जागा आहे. ज्या मुलांसाठी परिस्थितीच्या रेट्यामुळे घरांतून प्रेम मिळणे, संगोपन होणे अवघड बनते अशा वंचित मुलांच्या शिक्षणासाठी इथे काम केले जाते.
आनंदाने शिकण्याचे हे स्वप्न प्रत्यक्षाच्या भूमीवर उतरावयाचे तर आजची शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती समजावून घ्यायला हवी.
सरकारी शैक्षणिक धोरणांमध्ये मुलांच्या ‘सर्वांगीण विकासासाठी त्यांना आनंदाने शिकण्यासाठी पूरक वातावरण मिळायला हवे’ असे स्पष्ट म्हटले आहे. प्रत्यक्षात शाळांमध्ये मात्र अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि परीक्षा ही व्यवस्थेची चौकट महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येक मुलाचे वेगळेपण ध्यानात घेऊन शिकवणे शिक्षकांना अवघड जाते. वंचित मुलांसाठी तर प्रश्न अधिकच गंभीर आणि व्यामिश्र बनतात. त्यामुळे वंचित मुलांसाठी चालवलेल्या बहुसंख्य शाळांमध्ये किंवा वस्ती पातळीवरच्या वर्गांमध्ये शिक्षकांना अनेक प्रश्न जाणवतात. मुले वर्गात येतच नाहीत, आली तरी वेळेवर, नियमित येत नाहीत, त्यांचा शिकण्यात रस कमी झालेला असतो. साधारणत: शहरी वस्त्यांमधली मुले खूप गोंगाट करतात, दंगा – भांडणे करतात तर ग्रामीण – आदिवासी मुले कमी बोलतात, मागे – मागे राहतात.
शिक्षकांच्या प्रयत्नांना मुलांची साथ मिळाली नाही तर अनेकदा उद्विग्नता पदरी येते. मार्ग दिसेनासा होतो. कृतीशील, सर्जनशील शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतींनी वर्ग घेणे ही नंतरची गोष्ट आहे, आधी मुले यायला तर हवीत ! त्यांची शिकण्याची तयारी तर हवी ! या प्रश्नांची उत्तरे मुलांच्या परिस्थितीत, वंचिततेत लपलेली आहेत. ती सहृदयतेने समजून घेतल्याखेरीज हे काम तगणे, पुढे जाणे शक्य नाही.