पालक महिलांचा साक्षरता गट
लॉक डाऊनच्या काळात महिलांना, त्यांच्या मुलांना अभ्यासात मदत करता यावी म्हणून आम्ही ‘खेळघर मित्र’ या नावाने महिलांचा एक आठवडी वर्ग सुरू केला.
या महिलांना खेळघराच्या पद्धतीने शिकण्यात खूप गोडी वाटू लागली आहे. या गटात काही अक्षर ओळख नसलेल्या महिलादेखील यायच्या. त्यांना वाटायचे, ‘आम्हाला पण गटात बरोबरीने सहभागी व्हायचे आहे, त्यासाठी आम्ही शिकायला तयार आहोत.’ 7-8 जणी साक्षरता वर्गासाठी यायला तयार झाल्या.
मित्र प्रकल्पात सगळ्यांसमोर मुद्दा मांडला,”आपण ज्या महिलांना लिहिता येत नाही त्या महिलांना लिहायला शिकवूया का?” त्या गटातील तेजश्री, शबाना आणि ललिता या तिघीजणी शिकवायला तयार झाल्या.
या साक्षरता गटाची जबाबदारी मी घेतली. महिलांच्या गटाला शिकवण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. गेली 8 वर्षे मी पहिलीच्या मुलांना शिकवते.
सुरवातीला त्यांना धीर दिला आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. प्रत्येकीबरोबर वैयक्तिक बोलून असा विश्वास दिला, “जेव्हा शिकायचे होते तेव्हा आपल्याला संधी मिळाली नाही पण आत्ता संधी मिळते आहे तर नक्कीच जमेल!”
प्रत्येकीला स्वतःचे नाव आणि काही शब्द वाक्ये लिहीता – वाचता यायला लागली आहेत. काही मुळाक्षरांचे शब्द आणि वाक्य लिहीता येऊ लागली आहेत.
हा वर्ग आठवड्यातून एकदाच होतो त्यांना जे वर्गात घेऊ त्याचा सराव घरी करून यायचा आणि आल्यावर न बघता फळ्यावर लिहून दाखवायचं आणि वाचायचं हे आता त्यांना छान जमते आहे.शबाना, तेजश्री आणि ललिता पण उत्साहाने वर्ग घेत आहेत.
महिला लिहित्या- वाचत्या होऊ लागल्या आहेत. वर्गाला येण्याची ओढ त्यांना लागलेली असते. त्या म्हणतात, “ताई कधी वर्गाचा वार येतो याची आम्ही वाट आतुरतेने बघतो.”
सारिका जोरी,पालकनीती परिवार , खेळघर.