सरूबाईचा गुडघा – सुमन मेहेंदळे
रूबाई अलिकडे लंगडू लागली होती. डाव्या
गुडघ्याला कळच लागत असे. तसे आता तिचे सर्वच सांचे दुखरे व कुरकुरे झाले होते. पण काम केल्याशिवाय गत नव्हती म्हणून सहा घरची धुणीभांडी करत होती. कुणा कुणाचे वरकाम ही करत होती.
“सरूबाई, अगं सांध्यावर औषध कर गं काहीतरी.’’ – मालकीण नं एकने स्लोन्स लिनिमेंटची अर्धी बाटली सरूबाईच्या हवाली केली.
“सरूबाई, अगं व्हियस व्हेपोरब लाब गुडघ्यावर. लगेच कळ मरेल, हे घे ! तूं काही आणणार नाहीस.’’ – मालकीण नंबर दोन.
“सरूबाई, अगं महानारायण तेल लाव गुडघ्यावर.’’ मालकीण नं तीन, “माझ्या सासूबाईंना बरं वाटलं.’’ सरूबाईला क्षणभर वाटले, सदैव लोळत असणार्या सासूबाईंचे बरे काय आणि वाईट काय!
“सरूबाई, अगं मीठ सोड आणि पोटातून सराटेयुक्त गुग्गुळ घे.’’ – एक वैद्यबुवांची बहिण – मालकीण क्रमांक चार. मीठ सोडायचे? सरूबाई हबकलीच. मीठ तिखटाखेरीज कशाने अन्न सजवतोय आपण.
“हे बघ सरूबाई, चातुर्मासांत मला काहीतरी नियम करायचाच आहे. मी तुला रोज एक कप दूध देईन तुला कॅल्शियम कमी पडते.’’ एक पोरसवदा मालकीण नंबर पाच. पाण्यात थेंबभर दुधाची सवय. कसले दूध अन् काय आणि भिवाला सोडून दूध घशाखाली उतरणार नाही.
“सरूताई, अगं तुझा गुडघा लपकतो आहे चांगलाच. मोठ्या डॉयटरला दाखव वेळेवर नाहींतर एक दिवस जागेवरच बसशील.’’ मालकीण नं. सहा ची बत्तिशी.
“हो हो. सरूबाई आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी !’’ तमाम मालकिणींचा एक सुरांत मोठा आवाज.
सरूबाईचा भिवा अगदी नाखुष होता. पण सरूबाईचा आणि मालकिणीचा फार आग्रह म्हणून त्याने सणासाठी ठेवलेले पैसे डागदरला भरले. तपासणी करून घेतली.
डॉयटर म्हणाला ऑपरेशन करावे लागेल. साठ हजार रुपये खर्च येईल.
सरूबाईने डॉकटराचे म्हणणे सगळ्या मालकिणींना ऐकविले खर्चाची रक्कमही सांगितली.
मग कुणाच्या मुलाचा मेडिकलचा खर्च, कुणाच्या मुलीचे लग्न तोंडावर आलेले, कुणाला आई वडिलाना पैसे पाठवायचे होते, कुणाला मुलाच्या शाळाप्रवेशासाठी पैसे लागणार होते, कुणाला फ्लॅटच्या कर्जाचे हप्ते भरावयाचे होते. कुणाचे मोठ्या प्रवासाचे बुकींग झाल्यामुळे त्यांच्याजवळ पैसे नव्हते. एक ना दोन.
हां, पण एक निष्कर्ष मात्र त्या सरूबाईला व भिवाला सांगायला विसरल्या नाहीत. सगळे मोठे डॉयटर महालबाड असतात. उगाच जरूर नसताना शस्त्रक्रिया करायला सांगतात आणि अव्वाच्या सव्वा फी आकारतात.