आमची दहावी
मंजिरी निंबकर
फलटणच्या कमला निंबकर बालभवन या प्रयोगशील शाळेच्या
मुख्याध्यापिका डॉ. मंजिरी निंबकर.
आनंद शिक्षणाच्या वाटेवरून चाललेली ही शाळा इयत्ता दहावीच्या टप्प्याशी पोहोचते आणि
व्यवस्थेचा काच अपरिहार्यपणे
समोर येतो.
1996 उजाडला. या वर्षी आमच्या शाळेची पहिली 10वी. पहिलीपासून शाळेत असणारी मुलं आता 10वी पर्यंत आली होती. सगळेच शिक्षक नवे, अननुभवी. त्यामुळे मुलांपेक्षा जरा अधिकच तणाव शिक्षकांवर होता. त्यात एका पालकांनी आपल्या बर्यापैकी हुशार मुलीला शाळेतून काढलं. ‘इथे कुणाला अनुभव नाही. त्यामुळे त्यांना 10वीची तयारी करून घेता येईल का? आत्तापर्यंत ठीक होतं. मजेमजेत अभ्यास झाला. पण आता हे 10वीचं वर्ष आहे.’ आमच्याही मनात असणारी आशंकाच जणू त्यांनी बोलून दाखविली. पण म्हणून गळाठून न जाता आम्ही निग्रहानं तयारीला लागलो.
आपापल्या विषयांची सखोल तयारी करण्याबरोबरच दुसर्या शाळांतील जुन्या अनुभवी शिक्षकांना, परीक्षकांना, मॉडरेटर्सना भेटून चर्चा करणे, इंग्रजी, गणित, विज्ञानाची विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर कृतीसत्रे भरविणे, आपण तपासलेले पेपर पुन्हा बाहेरून तपासून घेणे याबरोबरच पालकांशी वारंवार चर्चा करणे, मुलं पुरेसं खातापिताहेत ना, खेळ-व्यायाम करताहेत ना, पुरेसं झोपताहेत ना हेही आम्ही बघत होतो.
आमची शाळा एक प्रायोगिक तत्त्वावर चालणारी शाळा आहे. मुलांनी आवडीनं शाळेत यावं, हसतखेळत शिकावं, अनुभवातून ज्ञान घ्यावं, निसर्गाशी जवळीक साधावी, परीक्षेचा बाऊ न करता स्वप्रयत्नातून, विचारमंथनातून परिपक्वतेकडे जावं अशा हेतूने ही शाळा सुरू केली. आत्तापर्यंत इमानेइतबारे सारे या हेतूला चिकटून होेते. वाटलं तर सरकारी पाठ्यपुस्तकांना चक्क बासनात बांधून ठेवून किंवा पाठ्यपुस्तकातील काही धडे, कविता वगळण्याचं स्वातंत्र्य आम्ही घेत होतो. आता मात्र पाठ्यपुस्तकाच्या पानाबाहेर डोकावूनही न बघण्याचा वसा घ्यायची वेळ आली. आत्तापर्यंत मुद्दाम वेगळं काहीतरी मांडणार्या निबंधाला, मग तो साच्यात न का बसेना, प्रोत्साहन दिलं जाई. परंतु असा निबंध आता मार्कांच्या दृष्टीने निरुपयोगी ठरू लागला. आत्तापर्यंत स्वीकारला गेलेला समानार्थी शब्द गाळलेल्या जागी आता चालेनासा झाला. मुलांची भटकंती, नेचर कॅम्प यांच्यावर घरून बंदी आली. ‘गोष्टीची पुस्तकं वाचू नका. टी.व्ही. बघू नका. फक्त अभ्यास एके अभ्यास करा’, असा घरच्यांचा धोशा सुरू झाला. इतके दिवस जपलेलं ‘काहीतरी’ मुलांच्यातून नाहीसं होताना दिसू लागलं. अशा रितीनं आमची पहिलीवहिली 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सा झाली.
शिकवण्या, क्लासेस यांना पहिल्यापासूनच परवानगी नसल्यामुळे शिक्षक स्वत‘ खूपच जागरूक व जबाबदार होते. मुलंही पहिलीपासून डोळ्यासमोर असल्याने कुणाची अधिक तयारी करून घ्यावी लागेल याची त्यांना कल्पना होती. जी पुस्तकं एरवी मार्चपर्यंत शिकवून संपवायची ती आता जानेवारीच्या 15 तारखेपर्यंतच उरकायची म्हटल्यावर मे महिन्यातही 15-20 दिवस जादा तास घ्यायचे ठरले. त्यातल्यात्यात पाठ्यपुस्तक शिकविण्याऐवजी या जादा तासांमध्ये, निबंध, पत्र, सारांश लेखन इत्यादी भाग घ्यावा असं सर्व शिक्षकांचं म्हणणं पडलं. गणिताचे शिक्षक फक्त बीजगणित, भूमितीचे तास सुरू करणार होते. कारण एकदा रीत समजावून दिल्यावर विद्यार्थी उदाहरणं स्वत‘ची स्वत‘ सोडवितात. त्यामुळे कदाचित अभ्यासक्रम लवकर उरकणार नाही. आमच्या जादा तासांचं वेळापत्रक कळल्यावर दोघे पालक भेटायला आले.
‘‘आमची मुलं मे महिन्यात येणार नाहीत.’’
‘‘का हो? कुठं गावाला वगैरे जाताहेत का?’’
‘‘नाही, पुण्याला कोचिंग क्लासमध्ये घालणार आहे. तिथे सगळ्या वर्षाचा गणित-विज्ञानाचा सर्व पोर्शन दीड महिन्यात उरकला जातो. नाहीतरी तुम्ही विशेष काही घेतच नाही आहात. निबंध काय आल्यावर भराभरा उरकून घेता येतील.’’
‘‘अहो, पण मुलांना दीड महिन्यात वर्षाचा पोर्शन समजणार का?’’
‘‘हो समजतो की. दरवर्षी हजारो मुलं या क्लासेसना जातात. क्लासवाले अधूनमधून चाचण्या वगैरे घेतात. शिवाय महिन्याच्या शेवटी परीक्षा असते आणि सगळं कशाला लक्षात रहायला हवं? तुम्ही पुन्हा शाळेत घ्यालच की.’’
आम्ही गप्प झालो आणि ही दोघं मुलं व्हेकेशन बॅच नामक फार्सला गेली. फार्स म्हणण्याचं कारण की बॅचला गेलेल्या मुलांच्या विषयाच्या आकलनामध्ये किंवा मांडणीमध्ये आम्हाला इतरांच्या तुलनेत काहीच फरक जाणवला नाही. त्या दीड महिन्याच्या अभ्यासामुळे गणित-विज्ञानात ही मुलं एक पायरी इतरांच्या पुढे आहेत असं कधी वाटलं नाही. उलट एखादं उदाहरण सुटलं नाही तर प्रयत्न करण्याऐवजी क्लासच्या वहीत बघण्याची त्यांची वृत्ती दिसून आली. मग या सुट्टीतील शिकवण्यांना जाऊन काय निष्पन्न झालं? दीड महिना भयंकर उकाडा सहन करीत मेंदूवर निष्कारण भार टाकला झालं. मात्र आपल्या लेकरासाठी आपण बरंच काही केलं असं वाटून त्यांचे पालक खूश. तर ‘‘आमच्याकडे पैसे असते, पुण्यात रहायची सोय असती तर आम्हीही….’’ अशा विचारात इतर पालक.
बघता बघता जून उजाडला. बाकीची शाळा भरली तसे आम्ही जरा ‘नॉर्मल’ झालो. येवढं काय असतंय 10वी मध्ये? परीक्षा थोडी वेगळी असते. त्यासाठी संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम अभ्यासावा लागतो, दुसर्या शाळेत, अनोळखी वातावरणात पेपर लिहावा लागतो. याव्यतिरिक्त त्यात बाऊ करण्यासारखं काय आहे? असं म्हणत 10वीची शाळाही जादा तासांबरोबर सुरू झाली. हे जादा तास दररोज शाळा सुटल्यावर तीन तास घेतले जात. अंशत‘ अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व अंशत‘ कच्च्या मुलांना अधिक मार्गदर्शन करण्यासाठी हे तास होते.
मग खुद्द शिक्षणाविषयीचे प्रश्न सुरू झाले. एक दिवस इंग्रजीच्या बाई तावातावानं आल्या. ‘या धड्यामध्ये लिहिलंय की पिरॅमिडमध्ये ममीज नसतात. हे धादांत खोटं आहे. आम्ही ऑक्सफर्ड डिक्शनरीत बघितलं. त्यात स्पष्टच लिहिलंय की पिरॅमिडमध्ये ममीज असतात म्हणून.’ तेवढ्यात विज्ञानाचे सर उगवले. अहो विज्ञानातही चुका आहेत. विज्ञान-2च्या पुस्तकातल्या ‘मानवाचे स्वास्थ्य आणि रोग’ या धड्यात चक्क मतिमंदत्व आनुवंशिक असतं असं लिहिलं आहे. एकूण हा धडा मुलांना जरा जडच जातो आहे. हृदयाची रचना व कार्य स्पष्ट केल्याशिवाय जन्मजात हृदरोग कसा शिकवायचा? बरं खोलात जाऊन शिकवायचं तर मुलांना त्याचं आकलन तरी व्हायला हवं ना. नाहीतर पाठांतर करा म्हणून सांगण्याशिवाय पर्याय नाही. (1997 ला विद्यार्थ्यांचं ओझं कमी करण्यासाठी विज्ञान-2 मधले तीन धडे कमी केले. तेव्हा आम्हाला आशा वाटली होती की हा धडा त्यातून वगळला जाईल. पण मुलांना आवडणारा अवकाश संशोधन हाच धडा काटला गेला.)
खरंच, ज्या मुलांना पदोपदी विचार करायला सांगितला गेला, पुस्तकाबाहेरचं लिहिलं म्हणून कौतुक केलं गेलं, सत्यासत्यता पडताळून पाहायला उद्युक्त केलं गेलं, त्यांनाच आज आम्ही सांगत होतो, ‘‘मुलांनो हे चूक आहे. पण तरीही तुम्हाला ते लक्षात ठेवून पेपरमध्ये लिहायचं आहे.’’ सुदैवानं मुलंही मोठी शहाणी होती आणि हे परीक्षेपुरतं असं लिहायचं पण सत्य काही वेगळंच आहे हे त्यांनी स्वीकारलं होतं.
शेवटी एकदाची परीक्षा आली. मुलांची चांगली तयारी झाली होती. त्यामुळे पेपर हातात पडल्यावर ती एकदा खाली डोकं घालीत ते क्वचितच वर करीत. मात्र कॉपी प्रकरणानं ती चांगलीच गांगरली होती. एका वर्गात एका हुशार मुलीची इंग्रजीची उत्तरपत्रिका घेऊन दुसर्या एका मुलीला लिहायला दिली गेली. नंतर असं कळलं की ती दुसरी मुलगी वर्गावरील पर्यवेक्षकाची पत्नीच होती. आणखी एका वर्गात खिडकीतून कॉप्या पुरवल्या जात होत्या व पर्यवेक्षक या सर्व प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून वर्गाच्या दारात येऊन उभे होते. सुदैवानं हा सारा प्रकार पाहून मुलांना वैफल्य आलं नाही किंवा कॉपी करण्याची त्यांना इच्छा झाली नाही.
पहिल्या वर्षी आमचा निकाल 100% लागला. त्यामुळे सर्वांचाच आत्मविश्वास वाढला. आम्हाला वाटलं की आपण हे सिद्ध करून दाखवलं आहे की नुस्तंच पाठांतर न करता स्वत‘ विचार करायला शिकवूनही मुलं चांगली पास होतात.
त्यानंतर पुढील दोन वर्षीही लागोपाठ 100% निकाल लागला. पण आता त्याचा अभिमान वाटण्याऐवजी असं वाटतं की मुलांच्या कल्पनाशक्तीला, मूलपणाला, प्रश्न विचारण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला ज्या परीक्षापद्धतीमध्ये ठेचलं जातं, मार्कांच्यासाठी ऊर फुटेस्तोवर पळवावं लागतं ती केंद्रीकृत परीक्षा खरोखरच गरजेची आहे का? असेल तर ती कमी तणावपूर्व व अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी त्यात काही बदल घडवून आणता येतील का?