हनुमंत मोहिते
(डिप्लोमा सिविल इंजीनीरिंग)
मी खेळघरात इतर मुलांच्या मानाने जरा उशिराच म्हणजे ८ वी मध्ये यायला लागलो. पण लवकरच आमचा चांगला गट जमला आणि मला खेळघरावाचून चैन पडेना. मी रोज खेळघरात येऊ लागलो. दर आठवड्याला आमचा संवादगट असे. त्यात आम्ही अगदी मोकळेपणानं आमच्या प्रश्नांवर, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर बोलायचो. जणू मला मीच सापडत चाललो होतो. दहावीमध्ये काकूंनी आमचा छान अभ्यास करून घेतला पण तरीही माझा गणित विषय राहिला. माझ्या एकट्यासाठी बसून काकूंनी माझं गणित करून घेतलं आणि त्यामुळे मी पास झालो. पुढे अभिनव अभियांत्रिकी या खाजगी संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. मला चांगली नोकरीही मिळाली. इंजिनीअरिंग मधलं गणित जरी अवघड गेलं तरी साइट वरचं व्यवस्थापन मात्र चांगलं जमू लागलं. पुढे मी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला. अनेक टक्केटोणपे खाऊन शहाणपण कमावले. आता मी स्विमिंग पूल बांधण्यात एक्स्पर्ट झालो आहे.
मला एक अनुभव सांगावासा वाटतो. मी नववीत होतो तेव्हा शाळेच्या आधी बिल्डिंग झाडण्याचं काम करायचो. एका फ्लॅटमध्ये काही तरूण मुले रहायची त्यांचे ब्रँडेड बूट दारात ठेवलेले दिसायचे. मला ते खूप वाटायचे. एक दिवस मी ते चोरले. दोन दिवस बॅगेतच ठेवले. पण मला त्याचा त्रास होऊ लागला. आमचं संवादगटातील बोलणं आणि माझं वागणं यात मेळ बसेना. मी रात्री ते बूट जिथून घेतले तिथं परत नेऊन ठेवले. तेव्हा मला शांत झोप लागली.
आज खेळघर सोडून ८ वर्षे झाली तरी अजून ते दिवस स्पष्ट आठवतात.