(विशीच्या वेशीतून – लेखांक -२) सहल : एक्स्ट्रा-करिक्युलर, को करिक्युलर की करिक्युलर?
सृजन-आनंद विद्यालय म्हणजे जणू उपक्रमांचं झाड. नानाविध उपक्रम पालक-शिक्षक हाती घेतात आणि पार पाडतात. विद्यालय सुरू झाल्यानंतर दुसर्या्च वर्षी मुलं आणि शिक्षकांनी स्मशानभूमीची सहल काढली होती. मधल्या काळात पन्हाळगडची साहसी सहल, घुणकीची निवासी सहल, पोस्ट-ऑफिसची अभ्यास सहल अशा सहली होत राहिल्या. शिवाय नजीकच्या परिसराच्या अभ्यास सहली तर होत्याच. उदाहरणार्थ-शिंप्याचे दुकान, पिठाची गिरणी, बरणीवाल्यांची वसाहत इत्यादी. मधल्या अठरा-एकोणीस वर्षांच्या काळात विविध हेतूंसाठी, वेगवेगळ्या ठिकाणी सहली आयोजित करता करता ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ हे काही ताई-दादांच्या लक्षात आलं होतं. २००२ च्या इयत्ता तिसरी व चौथीच्या सहलीचा विषय निघाल्यावर निमाताईंनी सहल-प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. सहलीचं ठिकाण हा कळीचा मुद्दा! ‘कोल्हापूर बस-स्थानक’ – लीलाताईंनी सुचवलं. सूचना झटकन मान्य झाली खरी पण नंतर हळूहळू बस-स्थानक ऑक्टोपससारखं मनात पाय पसरू लागलं तसं कुठून हे मान्य केलं असं सहल-प्रमुखांना झालं! सहलीचं ठिकाण ठरल्यावर दोन्ही इयत्तांमधील मदत करू इच्छिणार्यां पालकांची सभा पंधरा ऑगस्टला झाली. या सहलीमुळं मुलांच्या शिकतेपणाचा कस कितपत वाढेल याची शालेय विषयांच्या अनुषंगानं निमाताईंनी सभेत मांडणी केली.
बस-स्थानक सहल –
मुलं काय काय शिकतील?
१) भाषा :
ऐकणं — समजणं — लक्षात ठेवणं —- उपयोग करणं
अभिव्यक्ती चर्चा प्रश्न विचारणं मुलाखत घेणं चित्रांतून व्यक्त होणं
लेखन यादी करणं चित्रमय माहिती लिहिणं संवाद लेखन पत्रलेखन
२) भूगोल :
नकाशाचं महत्त्व समजणं नकाशा वाचता येणं नकाशा तयार करता येणं नकाशा आणि आराखडा यांतील फरक समजणे
३) परिसर अभ्यास :
कोल्हापूर बस स्थानकाचा इतिहास समजून घेणं.
परिसर स्वच्छता : पाहणी/अभ्यास
आगार पाहणं : गाडीची आंघोळ/पेट्रोल/डिझेल भरणं, रॅम्पवरील व इतर दुरुस्ती बस-स्थानकाची रचना
म्हणजे, सहलीचे लाभार्थी फक्त मुलंच? सहभागी पालक-शिक्षकांच्या मनाच्या पाट्या कोर्याथच राहाणार की काय? छे! छे! त्यांनाही शिकण्यासाठी बरंच आहे. त्यातले काही मुद्दे पाहू.
पालकांच्या शिक्षणाच्या काही दिशा –
१) बस-सेवेची सर्व अंगे-उपांगे समजून घेणं.
२) एक सुजाण नागरिक म्हणून बस-सेवेच्या संदर्भात आपल्या विविध जबाबदार्याी समजून घेणं आणि आपल्या वर्तनात बदल करणं.
३) मुलांना शिकवण्यासाठी स्वतः समृद्ध व्हावं लागतं ही समज येणं.
४) शिकण्यासाठी खर्चिक साधनं लागतातच असं नाही हे उमजणं.
५) शिकणं-शिकवणं ही क्रिया नसून प्रक्रिया आहे हे जाणवणं.
६) एखाद्या ठिकाणाचा समग्र अभ्यास कसा करतात हा अनुभव घेणं.
या दोन्ही प्रकारची मांडणी झाल्यावरही पालकांच्या मनात सहलीबाबत बर्यााच आशंका होत्या. त्या अशा-
१) बस-स्थानक हे काय सहलीचं ठिकाण आहे का? दुसरीकडं कुठंतरी जाऊ ना!
२) मुलांना यातून नवं काय मिळणार? बस स्टँडवर मुलं कितीदातरी जातात.
३) ही सहल पूर्ण दिवसाची असायलाच हवी का?
४) एवढ्या गजबजत्या ठिकाणी साठ मुलांना एकदम नेणं धोक्याचं नाही का?
५) अख्खा दिवस पालकांनी काय म्हणून द्यायचा?
या सभेला बस स्थानकाचे विभागीय अधिकारी श्री. राजेंद्र पाटील उपस्थित होते. पालकांच्या शंकांना त्यांनी योग्य प्रकारे उत्तरं दिली. शंकांचं निरसन झाल्यावर ज्यात विशेष काही नाही असं वाटलं होतं, ती कोल्हापूर बस-स्थानकाची सहल शैक्षणिक दृष्ट्या अर्थपूर्ण ठरणार असा विश्वास पालकांना, शिक्षकांना वाटू लागला. मध्यंतरीच्या काळात ‘सहल’ हळूहळू बाळसं धरू लागली. सहलीच्या वाटचालीचे टप्पे हळूहळू स्पष्ट होत गेले. त्याची थोडीशी झलक :
अभ्यास सुरुवात :
इयत्ता तिसरीचा भाषेचा तास झाला त्याची नोंदच विमलताईंनी केली ती अशी :
बस स्थानक शब्द उच्चारताच डोळ्यासमोर काय काय येतं त्याची नोंद सात मिनिटांत करा.
पाठाचे हेतू :
१) विषयाशी सुसंगत शब्द शोधणं.
२) दिलेल्या वेळात शब्द आठवून लिहिणं.
३) जास्तीत जास्त किती शब्द मुलांकडून येतात याचा शोध घेणे.
४) शब्दलेखन अचूक आहे का हे पाहणं.
५) निरीक्षण क्षमता तपासणं.
मुलांचे प्रतिसाद :
– अमृतनं लिहिलेले शब्द इतरांपेक्षा थोडे वेगळे, अधिक निरीक्षण व स्मरणक्षमता दाखवणारे होते. उदाहरणार्थ – हमाल, मुतारी, थुंकू नका व इतर पाट्या, भटकी कुत्री, भडंगवाले इत्यादी.
– अनुराधा व असीम यांचा लेखनवेग चांगला. प्रत्येकी तीस ते बत्तीस शब्द लिहिले.
– सोनल, सुकन्या, कल्याणी यांचा लेखनवेग कमी.
– एकूण सर्वांचा प्रयत्न बरा.
मराठी भाषेत बसस्टॉपला ‘थांबा’ म्हणतात. ‘थांबा’ हे इथं नाम आहे पण ते क्रियापदही आहे हे मुलांना सोदाहरण सांगितलं. आणखी कोणकोणते इंग्रजी शब्द बसच्या संदर्भात आपण व्यवहारात वापरतो असं विचारल्यावर मुलांकडून पुढील शब्द आले :
स्टिअरिंग, ड्रायव्हर, कंडक्टर, एस.टी., स्टँड, ब्रेक, स्पीडब्रेकर. या शब्दांसाठी मराठी भाषेतले शब्द शोधण्याचा प्रयत्न झाला.
‘का बरं?’ हा प्रश्न :
शिकण्याचं महत्त्वपूर्ण साधन –
महाश्वेतादेवींची ‘का बरं?’ नावाची एक सुंदर गोष्ट ‘शैक्षणिक संदर्भ’ – अंक १७ मधे आली होती ती मुलांना वाचून दाखवली. कोणतीही बाब नीट समजून घ्यायची असेल तर त्या बाबतीतले प्रश्न मुलांना पडायला हवेत. त्या प्रश्नांची उत्तरं शोधावी असं वाटायला हवं. गोष्टीतली मैना प्रत्येक बाबतीत प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. तिच्या या जिज्ञासू वृत्तीमुळंच ती आदिवासी समाजातली असूनही उत्तम शिकली. शिक्षक झाली. तिचा ‘का बरं?’ हा सततचा धोशा मुलांना आवडला. गोष्ट चित्ररूपानं, संवादरूपानं भिंतीवर झळकू लागली. का, कोण, कधी, कुठं, काय, कसं असे प्रश्न विचारणारे शब्द मुलांनी शोधले. ‘सहा सोबती’ – हे चित्राताईंचं सुंदरसं, वेगळं गाणं मुलं म्हणायला शिकली. बस स्थानक समजून घेण्यासाठी, मुलाखती घेण्यासाठी मुलांना प्रश्न सुचावेत म्हणून हा खटाटोप करावासा वाटला.
बस आणि बस-स्थानकाविषयी आलेल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या मुलांनी शोधल्या, त्यावर चर्चा केली.
१) दिल्लीत पेट्रोल व डिझेलचे दर वाढले – त्याचा काय परिणाम आपल्यावर होईल? मुलांनी सांगितलं – बसच्या भाड्यात वाढ होईल, गरिबांना प्रवास परवडणार कसा? वस्तू महागणार कारण पेट्रोलचे दर वाढले.
२) जॅकच्या खरेदीत गैरव्यवहार एस.टी. महामंडळातील चार अधिकार्यांचना अटक – बातमी वाचून मुलांना पडलेले प्रश्न –
१) जॅक म्हणजे काय? २) त्याची खरेदी कुठे करतात? ३) जॅक कशाला लागतात? ४) गैरव्यवहार म्हणजे काय? ५) गैरव्यवहार कोणी केला? ६) तो कसा शोधून काढला? ‘अधिकार्यांयनी असं वागायला नको होतं. त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. त्यांचा निषेध व्हायला हवा’ असं मुलांचं मत!
वर्गात होत राहिलेल्या चर्चेतून मुलं काय शिकली? – बातमी कशी वाचावी, शब्दकोशातून माहीत नसलेल्या शब्दांचा अर्थ कसा शोधावा, अर्धवट राहिलेली बातमी पुढील पानावर शोधणं. इत्यादी…
वाहनांचा इतिहास समजून घेऊ –
इयत्ता चौथीवर मीनलताईंनी तास सुरू केला तोच मुळी वाहनांचा इतिहास समजून घेण्यापासून! ‘झोळी’ हे माणसानं अनुभवलेलं पहिलं वाहन हे समजल्यावर मुलांना फार गंमत वाटली. झोळीपासून ते अगदी अलीकडच्या म्हणजे रॉकेटपर्यंतच्या वाहनांची नोंद मुलांनी केली. प्रत्येक वाहनाचं वैशिष्ट्य समजून घेतलं. झालेल्या चर्चेनंतर मुलांनी दोन वाहनांमधलं संवादलेखन लिहिलं. त्याला सोबत म्हणून चित्रंही काढली. टॅक्सी/बोट, बैलगाडी/आगगाडी, बस/विमान अशा अनेक जोड्यांची चित्रं व संवाद लेखनांनी वर्गाच्या भिंती सजून गेल्या.
फळ्यावरचं उपाहारगृह
बस-स्थानकावरील उपाहारगृहाबद्दल मुलांच्या मनात प्रश्न निर्माण व्हावेत म्हणून लीलाताईंनी वर्गातल्या फळ्यावर चक्क ‘खादाडी’ नावाचं उपाहारगृह उघडलं. ‘उपाहार’ हा शब्द सर्वांनी समजून घेतला. आज आपण या उपाहारगृहात शिरा करायचा आहे. काय लागेल त्याची यादी करूया का? असं म्हणताच अगदी वेलदोड्यासकट यादी तयार झाली! आपल्याला बस-स्थानकावरील उपाहारगृहाची माहिती घ्यायची आहे. तिथं गेल्यावर आपण त्यांना कोणते प्रश्न विचारू? चला यादी करू या.
मुलांचे प्रश्न असे :
१) खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी कोणतं तेल वापरता?
२) पदार्थ तयार करताना अधून मधून जाऊन पाहता का?
३) कोणकोणत्या सूचना देता?
४) हॉटेल काढावंसं का वाटलं?
५) हॉटेलात शाकाहारी/मांसाहारी दोन्ही प्रकार ठेवता का?
६) तुमच्या हॉटेलचा खास पदार्थ कोणता?
७) हॉटेल केव्हा सुरू केलं?
८) दारूडे आले तर त्यांना कसं ओळखता? त्यांना काय सांगता?
९) इतर हॉटेलचे खाद्यपदार्थांचे व तुमचे दर सारखे आहेत का?
१०) स्वयंपाकघराच्या स्वच्छतेचे नियम पाळता का?
११) हिशेब कधी करता? तो चुकला तर?
१२) एखाद्या गिर्हालईकानं पैसे नाहीत, पाकीट हरवलं सांगितलं तर काय करता?
१३) नोकरांना सुट्टी कधी देता?
१४) कपबशी फुटली तर काय करता?
१५) हॉटेलचं सामान खरेदी कोण करतं?
१६) हॉटेलवर सामान कसं आणता?
१७) कँटीन कधी धुता?
१८) पदार्थांची भेसळ तपासायला कोण येतं? तुम्हाला आधी ते ठाऊक असतं?
१९) खराब पदार्थांचं काय करता?
२०) तुम्ही इथंच जेवता की जेवायला घरी जाता?
किती विविध अंगांनी मुलांनी या प्रश्नाकडं पाहिलं ना? या प्रश्नांची नोंद केली व ते प्रश्न अंकुश काकडे या उपाहारगृह चालकांना, शाळेत घेतलेल्या मुलाखतीत मुलांनीच विचारले. लीलाताईंनी ‘अंकुश’ या नावापासूनच मुलाखतीची सुरवात केली. आपल्या नावांनाही अर्थ असतो हे लक्षात यायला याचा उपयोग झाला. अंकुश या शब्दाचा अर्थ मुलांना माहीत नव्हता, तो त्यांनी शब्दकोशातून शोधला. ‘अंकुश’ म्हणजे एक प्रकारचं शस्त्र. हत्तीचा माहूत त्याला ताब्यात ठेवण्यासाठी ‘अंकुश’ ढोसत असतो. तसं उपाहारगृहावर ‘ताबा’ राहण्यासाठी अंकुशदादांना कशाकशावर अंकुश ठेवावा लागत असेल – असं विचारल्यावर मुलांच्या उत्तरांवरून एक सुंदर आराखडाच फळ्यावर तयार झाला. (पुढील चौकटीत पहा.)
अभ्यासक्रमातील विषयांना
सहलीचा पेहरावः
वेगवेगळ्या गावांची नावं, तिकिटांचे निरनिराळे दर, प्रवाशांची संख्या, पैशाची देवाणघेवाण या विषयी चर्चा करण्यासाठी दोन तासिका वापरल्या गेल्या. मुलांनी तिकिटावर आधारित गणिते स्वतः तयार केली व सोडवलीही. गणिती संकल्पनांबरोबरच शाब्दिक गणितं तयार करताना मुलं भाषा कितपत शिकली आहेत ते लक्षात येत होतं. अंकुशदादांच्या उपाहारगृहाच्या गल्ल्यावर जमा झालेली रक्कम व खर्च काय काय असाही हिशेब मांडण्याचा प्रयत्न झाला.
सहलीचं ठिकाण म्हणून विभागीय बस-स्थानक ही जागा असीमच्या बाबांना अजिबात पसंत नव्हती. मात्र तिसरीतल्या असीमचे बाबा या नात्यानं त्यांनी सहलीच्या वेळी भरपूर काम केलं. पालक-शिक्षकांनी बस-स्थानकाला भेट दिली होतीच. ‘भूगोल व बस-स्थानक परिसर’ असा विषय निवडून त्यांनी मुलांसाठी पारदर्शिका तयार केल्या.
– कोल्हापूर बस-स्थानक आराखडा-वेगवेगळे विभाग.
– फलाट व तिथून सुटणार्यास बसेस.
– कोणकोणत्या राज्यांत बससेवा आहे.
– सर्व दिशांना जाणारे बसचे मार्ग.
– महाराष्ट्राचा नकाशा व त्यातली बससेवा असणारी ठिकाणं.
ओव्हर हेड प्रोजेक्टरवर पारदर्शिका दाखवून त्यांचं वर्णन असीमच्या बाबांनी केलं. नकाशाचं महत्त्व सांगून नकाशाचं पुस्तक संग्रही ठेवा असं सुचवलं. कोल्हापुराहून बुलढाण्याला जायचं आहे तर मार्ग शोधा असं काम देऊन नकाशा भरून घेतला. या निमित्तानं मुलांच्या पारदर्शिका व ओव्हर हेड प्रोजेक्टर ह्या दोन नवीन माध्यमांशी परिचय झाला.
सहलीला जायचं तर सर्व मुलांना ताई-दादांना बॅज हवेतच ना? गटांची नावं मुलांनीच सुचवली – ब्रेक, थांबा, वाहक, चालक, आगार, चाक अशी विषयाशी सुसंगत नावं आली. बसचे चित्र काढून त्यावर स्वतःचं नाव, इयत्ता लिहून ते बॅज पंच करण्याचं काम मुलांनी हस्तकलेच्या तासाला केलं. एका तासिकेत सत्तर बॅजेस तयार झाले आणि मुलांनी ते सहलभर छातीवर मिरवले!
पाहणं म्हणजे प्रकाशणं आणि म्हणजेच शिकणं:
प्रत्यक्ष सहलीत मुलांनी खालील ठिकाणं पाहिली-
– बस-स्थानक परिसर.
– बस-स्थानक कार्यालये.
– बस-स्थानक आगार.
याशिवाय पुढील मुद्यांबाबत मुलांनी माहिती घेतली.
– येणार्याप जाणार्या बसेसची नोंद.
– विविध व्यक्तींच्या मुलाखती – हमाल, भिकारी, प्रवासी, दुकानदार, सफाई कामगार इत्यादी.
कोल्हापूरचा परिवहन विभाग खूप मोठा आहे. बारा बस डेपोंचा कारभार पाहणं खूप कठीण, गुंतागुंतीचं काम आहे. शेकडो कर्मचारी, त्यांच्या कामाचं नियोजन, त्यांच्या अडचणी, त्या सोडवणं, परस्परांचे संबंध सहकार्याचे असणं हे सगळं श्री. राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळं चांगलं पेललं आहे. म्हणून सरकारी कर्मचार्यांंविषयी सामान्य माणसांच्या मनात जी अढी असते तिची निरगाठ सुटते. शासकीय सेवेतही चांगले अधिकारी, कर्मचारी असतात ही एक दृष्टी आम्हा पालक-शिक्षकांना मिळाली आणि आम्ही प्रकाशलो.
दिवसभरात मुलांनी विविध विभाग पाहिले. तिथलं कामकाज समजून घेतलं. प्रश्न विचारले, नोंदी केल्या.
बस-स्थानकावर येणार्यार बसेसची नोंद करण्यासाठी दोन-दोन मुलांच्या जोड्या केल्या होत्या. एकानं बस आत शिरली की तिचा नंबर सांगायचा, कुठून बस आली ती पाटी वाचायची आणि दुसर्याानं नोंद करायची. वाचणं, द्रुतगतीनं लिहिणं, समजून घेणं, नोंदवणं ही थोडीफार वेगळी कौशल्यं मुलं शिकली.
कधीच न पाहिलेली काही कागदपत्रं मुलांनी पाहिली. उदाहरणार्थ – कार्यालयातील रजिस्टरं, गाड्यांची वेळापत्रकं, वाहक-चालकांची हजेरी बुकं, त्याशिवाय तिकीट पंच करताना पाहणं, कंडक्टर बनून आवश्यक तिकीट पेटी मिळवणं, आरक्षण विभागातली रजिस्टरं वगैरे. हा सर्व अनुभव मुलांनी घेतला. हे सगळं म्हणजे एक वेगळाच प्रकाश पाहणं आहे ना?
या नंतरचा अनुभव काही आगळाच होता. सूर्योदयाच्या वेळचा प्रकाश आणि त्यावेळचं वातावरण जसं कोणालाही उल्हासित करतं तसंच मुलांवरच काय प्रौढांवरही बस-स्थानकाच्या आगारातील अनुभवांनी आनंदाची उधळण केली. डिझेल/पेट्रोल कसं भरलं जातं, त्यातली भेसळ कशी ओळखतात, ती ओळखण्याची साधनं कोणती – ही सारी नवी माहिती मुलं उत्सुकतेनं ऐकत होती, आतमधे मुरवून घेत होती. स्वतः पाईप हातात धरून मुलांनी पेट्रोल भरण्याचा आनंद घेतला. हे सारं शिकणं वर्गखोल्यांचे दरवाजे आणि कुटुंबाचे उंबरठे ओलांडून त्यांच्यापर्यंत पोचत होतं आणि म्हणूनच त्यांना ते हवंहवंस वाटत होतं. मुलं आणि प्रौढ जणू एकाच पातळीवर असलेले विद्यार्थी होते!
बसची आंघोळ
घरात जसं न्हाणीघर असतं तसं आगारात बससाठी एक न्हाणीघर आहे. लहान मुलाला आंघोळ घालताना आपण त्याला जसं स्टुलावर, दगडावर बसवून आंघोळ घालतो तसंच बसला न्हाणीघरात आणलं जातं. मुलाला आंघोळ घालणारी व्यक्ती पाणी ओतत ओतत मुलाचा एकेक अवयव धुवून धुवून स्वच्छ करते अगदी तश्शीच ही बसची आंघोळ असते. बसच्या एखाद्या विशिष्ट भागावर पाण्याचा फवारा उडत असतो आणि एक भलामोठा ब्रश मागे, पुढे, वर, खाली, डावीकडून उजवीकडं, उजवीकडून डावीकडं फिरत फिरत बसचा तो भाग लखालख स्वच्छ करत असतो. संपूर्ण बस अशा प्रकारे स्वच्छ केली जात असताना ती बघायला मिळणं ही बाब अतिशय दुर्मिळ! तुम्ही अनुभवलंय हे दृश्य?
आणखी एका स्थळानं आणि तिथल्या कामानं मुलांना आणि प्रौढांनाही खिळवून ठेवलं. ते स्थळ म्हणजे रॅम्प! रॅम्प म्हणजे बस दुरुस्तीसाठी जमिनीखाली खणलेला चर किंवा खड्डा. या खड्ड्यात उतरून खालच्या बाजूनं बसची चाकं, रॉड्स तपासले जातात, दुरुस्त केले जातात. ह्या खड्ड्यातील जागा थोडीशी अंधारी, तेलकट असते. त्यामुळे निसरडीही असते. रॅम्पमधे मुलं, पालक, शिक्षक असे सगळेच पाळीपाळीनं उतरले. खालच्या बाजूनं होणारी दुरुस्ती पाहिली. एकूणच त्या खोल, अंधार्यास खड्ड्यात उतरणं, बसचे वेगवेगळे अवयव निरखण्यानं मुलांनाच काय मोठ्यांनाही खिळवून धरलं! अगदीच वेगळं काहीतरी सर्वांना पाहायला मिळालं. या आनंदाचा प्रकाश तसंच तेलकट खड्ड्यात घसरून पडण्याच्या आनंदाचाही प्रकाश मुलांनी अनुभवला.
आतापर्यंत पाहण्यात न आलेली काही यंत्रं लहानांना व मोठ्यांना बघायला मिळाली. हवेच्या दाबाचा उपयोग करून पंक्चर काढण्याचं यंत्र, बोल्ट फिरवत स्टेपनी बसवणारं यंत्र. कधीच न पाहिलेलं काही पाहायला मिळालं की ते हाताळून पाहावंसं वाटणारच ना? मुलांच्या बरोबर प्रौढांनीही तो प्रयोग केला!
पालक : सहलीतले ऍक्टिव्ह पार्टनर्स काय म्हणतात :
तिसरीतल्या पारसच्या आई लिहितात, ‘‘मी फार शिकलेली नाही. त्यामुळे लेखन करता येईल का नाही असे वाटत होते, पण आज ती शंका दूर झाली. सहलीला आल्यावर मी पुनः एकदा लहान झाले. दिवसभर फिरून फिरून पाय दुखले. पण त्याचे सार्थक झाले असे वाटते.’’
जयेशच्या आई, ‘‘मला वाटलं होते की एवढं एस.टी.स्टँडवर काय बघायचं असतं? पण पंधरा ऑगस्टच्या पालक सभेला मी गेले आणि सहलीचा एवढा खोलवर विचार केलेला पाहून चकितच झाले. सगळंच मला नवीन आणि खूप महत्त्वाचं वाटलं.’’
सुनील कुलकर्णी यांनी आपला अहवाल प्रांजळपणं आणि परखडपणं मांडला होता. ‘‘बस-स्थानक ही जागा सहलीच्या दृष्टीनं मुळीच योग्य वाटली नव्हती. माझी भूमिका थोडीशी उपहासात्मकच होती. पण माझा विचार बरोबर की विद्यालयाचा हे ठरविण्यासाठी एक संधी म्हणून मी सहलीत सामील झालो. प्रत्यक्ष एस.टी.स्टँड पालक-शिक्षकांनी ‘पाहून’, ‘समजून’ घ्यायचा ठरवलं तेव्हा ‘आत्ता एवढ्यात येतो’ असं घरी सांगून आलो होतो, पण स्टँडवरचे वेगवेगळे विभाग पाहताना, अधिकारी, कर्मचार्यांलशी बोलताना या प्रचंड यंत्रणेचा पसारा लक्षात येऊ लागला आणि माझे पूर्वग्रह साफ झाले! मुलांसाठी आपण काहीतरी करायलाच हवं असं ठरवून मी घरी आलो.’’
जयचे बाबा आमचे माजी पालक आणि शिक्षकही! ही आगळीवेगळी सहल जाणार हे ऐकून तेही आपणहून सहलीत उतरले आणि ‘आगार’ विभाग समजून घेण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
आणखी एक मुद्दा सुनीलदादा नोंदवतात : ‘‘सृजनची मुलं फार प्रश्न विचारतात बुवा! मागे एकदा ‘दुधातली भेसळ’ या विषयी माहिती द्यायला गेलो तर लॅक्टोमीटरबद्दल मुलांनी इतके प्रश्न विचारून भंडावून सोडलं की बस्स! गळ्याशपथ सांगतो, गेली सतरा वर्ष डेअरी टेक्नॉलॉजी शिकवताना कॉलेजमधल्या मुलांनीही लॅक्टोमीटरबद्दल इतके प्रश्न विचारले नव्हते. त्यामुळं सृजनच्या मुलांचा मी थोडा धसकाच घेतलाय म्हणा ना!’’
रमेशदादा आमच्या विद्यालयात गेली काही वर्षं काम करत आहेत. दिवसभर ते या सहलीत उत्साहाने सहभागी होते. ते अहवालात म्हणतात, ‘‘बस-स्थानकावरच्या पोलिसांच्या खुर्चीवर पोलिसदादांबरोबर बसण्यात मुलांना फार मजा वाटली. वैयक्तिकरित्या मला या सहलीत नवे असे काही वाटले नाही तरी एस.टी.चे अधिकारी, कर्मचारी इतक्या सौजन्याने वागू शकतात हा अनुभव हीच नवी व कौतुकाची बाब होती.’’
सर्वात्मकच्या आई म्हणतात, ‘‘आपल्या शाळेत आमची मुलं शिकू लागली आणि आमच्या वेळच्या शालेय सहलींची तुलना आपोआपच होऊ लागली. आपल्याच मुलांचा थोडा हेवा वाटू लागला. ताई-दादा आणि आम्ही – आपण सगळे एकाच मातीतले पण विचारात किती भिन्नता आहे. जे आमच्या ‘विचारात’ नसते ते तुमच्या ‘लेखी’ तयार असते. लीलाताईंचं तर गाणंच वेगळे; की जे बी फेकलं ते रुजलं नाही असं होणंच शक्य नाही. म्हणून म्हणते हे असलं सगळं करणं म्हणजे ‘येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नव्हे.’’’
सहल : एक्स्ट्रा-करिक्युलर, को-करिक्युलर की करिक्युलर?
एकात्म शिक्षणाची आवश्यकता गेली अनेक वर्षं विविध विचारवंतांनी मांडली असली तरी अजूनही अभ्यासक्रमाबाहेरील, अभ्यासक्रमाशी थोडीफार संबंधित आणि अभ्यासक्रमातीलच विषय अशी विभागणीही प्रचलित आहे. सहल, क्रीडास्पर्धा, स्नेहसंमेलन यासारख्या बाबी जणू अभ्यासक्रमाबाहेरील बाबी. हस्तकला, चित्रकला, शारीरिक शिक्षण हे थोडेफार अभ्यासक्रमाशी संबंधित विषय. मात्र इंग्रजी, गणित, विज्ञान, मराठी, इतिहास, भूगोल असे महत्त्वाचे विषय म्हणजे गाभ्याचा अभ्यासक्रमच! अभ्यासक्रमात समाविष्ट होणार्याच विषयातही दोन पोटविभाग मानले जातात. इंग्रजी, गणित, विज्ञान, मराठी, भूगोल, इतिहास हे मुख्य (core) विषय. हस्तकला, चित्रकला, शारीरिक शिक्षण अशा प्रकारचे विषय परिघावरचे! ही विचारधारा योग्य नाही असे विविध शैक्षणिक समित्यांच्या अहवालात मांडले गेले असले तरी अजूनही सहल, स्नेहसंमेलन म्हणजेही एकात्म अध्ययन अध्यापनाचं एक साधन आहे असं मानलं जात नाही. परीक्षेतील प्रश्नपत्रिका म्हणजे जसं दैनंदिन अभ्यासाचं प्रतिबिंब तसंच स्नेहसंमेलन, सहल, क्रीडास्पर्धा म्हणजेही शिकण्याचं एक महत्त्वपूर्ण साधन असं मानून त्यांची सांगड एकूण व्यक्तिमत्त्व विकास व विविध क्षमतांचा विकास यांच्याशी घालण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. स्नेहसंमेलनातील नाटकं, गाणी, नाच यांचा आशय अथवा अभिव्यक्ती अशा माध्यमांतून आपण मुलांपर्यंत तसंच प्रेक्षकांपर्यंत काय पोचवत आहोत असा स्वतःला सवाल न करता कार्यक्रम सादर केले जातात. सृजन-आनंद विद्यालयात एकात्म अध्ययन – अध्यापनाचे प्रयत्न सातत्याने होत असल्यानं एक्स्ट्रॉकरिक्युलर, को-करिक्युलर आणि करिक्युलर असा कप्पेबंद विचार नसतो. त्यामुळेच सहल वा स्नेहसंमेलनाचे विषय, आशय, कार्यपद्धती, ठिकाण निश्चित केले जातात. अभ्यासक्रमातील विविध विषयांना पूरक ठरणारे अनुभव मुलांना मिळावेत अशी इच्छा असते. घर म्हणजे विकसित शाळा व शाळा म्हणजे विस्तारित घर या विचारावर श्रद्धा असल्यानं शिक्षकांनी जशी पालकांची भूमिका वठवायला हवी तशी पालकांनी शिक्षकाची भूमिका पेलायला हवी असं मानलं जातं. मुलांच्या क्षमता अपार व बहुआयामी असतात. आपण प्रौढच त्या क्षमतांना पुरेसं खाद्य देण्यात कमी पडतो की काय असं वाटतं.
क्षमता-विकासाची यात्रा आनंददायी होताना शिक्षकांनी मुलांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न वेठबिगारी स्वरूपाचे नसतात. विद्यालयाच्या अशा या सार्यार विचारधारांचे प्रतिबिंब कोल्हापूर विभागीय बस-स्थानक सहलीतही उमटलेलं वाचकांनाही दिसलं असेल. सहल प्रमुख व त्यांचे सहकारी यांना शिक्षणाच्या ज्या एकात्मरूपाचं बिंब दिसत होतं त्याचं प्रतिबिंब मुलं, पालक यांच्यापर्यंत पोचावं या धारणेनं विद्यालयातील ताई-दादा व त्यांचे सहकारी पालक यांनी नानाविध रंगाचे वेगवेगळ्या पोताचे धागेदोरे एकत्र करून बस-स्थानक सहलीची आखणी केली. ह्या लेखातून वाचकांना प्रतिबिंबच काय पण बिंबाचीही ओळख करून देण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला आहे. या प्रयत्नामागची प्रेरणा इतकीच आहे की ज्या एकात्म, आनंददायी, अर्थपूर्ण व बालककेंद्रित शिक्षणाचा ध्यास सृजन-आनंद विद्यालयानं गेली वीस वर्षं घेतला आहे त्या ध्यासाकडं एकदोन पावलं तरी टाकून पाहण्याची इच्छा इतरांना व्हावी. काहींच्या मते विद्यालयाचे आम्ही लोक बिघडलोय, असं असेल तर आम्हाला – ‘‘तुम्हीही बिघडा ना’’ असं म्हणावंसं वाटतं.