लावला इवलासा वेलू…

ज्ञानप्रबोधिनी – स्त्री शक्ती प्रबोधनाचा ‘संवादिनी’ हा एक विकासगट. काही पदवीधर गृहिणी एकत्र येऊन १९९९ मध्ये हे काम सुरू झालं. त्याबद्दल –

एक छोटंसं बी मातीमध्ये पडलं. बघता बघता रुजलं. तिथल्या जाणार्यान येणार्यांचच्या घामाचं पाणी त्याला मिळालं. मातीची ऊब मिळाली. जमिनीतल्या अंधारात गुपचूप बसलेल्या ‘बी’ला वर खुणावणार्याी प्रकाशाच्या दिशेनं जावंसं वाटलं. असंही वाटलं, ‘ही ऊब, हे पाणी, ही शांतता सोडून जायलाच हवं का?’ पण एकीकडे प्रकाश पाहण्याची – अनुभवण्याची ओढ तर दुसरीकडे आहे ती सुरक्षितता, उबदारपणा सोडण्याचा ताण! ‘बी’ गोंधळून गेली. तिला काही सुचेना. तेवढ्यात तिला कुठूनतरी एक गंभीर नाद ऐकू आला! ‘चरैवेति| चरैवेती|’ पुढे चालत रहा – चालत रहा!

‘बी’ला एकदम लक्षात आलं, ‘अरे, असं थांबून-थबकून नाही चालणार बरं. चालत राहिलं पाहिजे, वाढत राहिलं पाहिजे. आपणच जर वाढायचं नाकारलं तर इथेच कोळपून जाऊ, मरून जाऊ!’ या जाणिवेच्या क्षणीच तिच्या आतून एक कोंब कवचाला भेदत अलगद बाहेर आला. मातीच्या थरांना फोडत निकरानं वर वर जाऊ लागला. ज्या क्षणी त्याला मातीच्या वरच्या सूर्यकिरणाचा प्रथम स्पर्श झाला, तेव्हा तो दिपून गेला, क्षणभर थरथरला पण मग मात्र त्यानं आतुरतेनं तो प्रकाशाचा स्पर्श अनुभवला, आत-खोल दडलेल्या ‘बी’च्या अंतरंगापर्यंत पोचवला. ‘बी’च्या ध्यानी आलं, ‘पहिला टप्पा पार पडला. आता आपण नक्कीच फुलत जाणार.’ तिचा स्वतःवरचाच विश्वास दृढ झाला. पाहता पाहता त्या अंकुराचं रोप बनलं. पाना-फुलांनी शोभू लागलं!’

कुणाला वाटेल, ही काय गोष्ट झाली? किती साधी, सरळ, बालिश गोष्ट. पण खरं तर हीच ‘संवादिनी’ची, संवादिनीतल्या प्रत्येक मैत्रिणीची प्रातिनिधिक गोष्ट आहे.

आज आपण ज्या वर्तुळात जगतो आहोत, ज्या सांस्कृतिक, सामाजिक संदर्भांशी स्वतःला जोडत आहोत, त्यात स्त्रियांची एक विशिष्ट भूमिका अपेक्षिलेली असते. ‘उत्तम कन्या – सुशील पत्नी – सुयोग्य स्नुषा – संस्कारी माता’ अशा अनेक ‘छापां’ची पुटं तिच्या अंगा-मनावर लहानपणापासून चढत असतात. ह्या सर्व छापांमध्ये तिचा विचार सतत ‘कुणाच्या तरी’ संदर्भात केलेला आहे हे जाणवतं. तिचं स्वतःसाठी ‘असणं’ किंवा ‘व्यक्त होणं’ ह्याला प्रश्नार्थक दृष्टीतूनच बघायची सवय आपल्याला असते. त्यातून हे ‘व्यक्त’ होणं नोकरी – व्यवसायासारख्या आर्थिक गोष्टीशी थेट जोडलेलं असेल तर एक वेळ चालेलही पण असा काही ‘फायदा’ नसताना नुसतं ‘आनंदासाठी’, ‘इतरांसाठी काही करण्याच्या समाधानासाठी’ वगैरे असलं तर जरा गंभीरच मानलं जातं. रोखठोक शब्दात बोलायचं तर ‘लष्करच्या भाकरी’ भाजण्यासाठी वेळ घालवणं अशीच बहुधा याची संभावना केली जाते.

अशा ‘लष्करच्या भाकरी भाजणं’ ही पण कुणाची स्व-विकासासंदर्भातली महत्त्वाची गरज, पायरी असू शकते, हे आपण लक्षातच घेत नाही. विशेषतः ज्या व्यक्तीच्या मूलभूत शारीरिक, सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत पण तरीही ‘पुढे काय’ असा प्रश्न जिला पडतो अशा व्यक्तींच्या बाबतीत तर निश्चितच.

असा प्रश्न कुणाकुणाला पडतो? आपल्या क्षेत्रात उच्चतम ज्ञानाची साधना करणार्याबला जसा पडतो तसाच ‘रोजरोज तेच तेच’ च्या चक्रात अडकलेल्या साध्यासुध्या गृहिणीलाही पडतो.

आपल्या कुटुंबरचनेत प्रत्येक व्यक्तीच्या बदलणार्याज भूमिकांचेही एकेक टप्पे असतात. ते सगळे एकमेकांना नेहमी पूरक असतातच असं नाही. खास करून स्त्रियांच्या बाबतीत हे प्रकर्षानं जाणवतं. कारण त्यांच्या बहुतांश भूमिका ‘इतरांशी’ कुठल्या ना कुठल्या प्रकारचं थेट किंवा अप्रत्यक्ष अवलंबित्व दाखवणार्याब असतात. जिनं रोजचं नोकरी-व्यवसायाचं रूटीन बांधून घेतलेलं नाही तिला तर हे फारच जाणवतं.

विवाहानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षात स्थिरस्थावर होण्यात, कुटुंबाची घडी समजून घेऊन त्यात स्वतःसाठी जागा निर्माण करण्यात काही वर्ष सरतात. तोपर्यंत जर मुलं झालेली असतील तर त्यांची देखभाल, काळजी, अभ्यास-खाणी (‘पोटपाणी’ सारखं हे नवीन काम) इत्यादी बघणं ह्यात गृहिणीचे दिवसचे दिवस उडून जात असतात. मुलं आपल्यावर अवलंबून, ज्येष्ठ लोक (सासू-सासरे-अन्य) कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे अवलंबून, नवरा जर प्रमुख ‘मिळवणारा’ असेल तर त्याच्या पोटापाण्याच्या ‘सोयी’ बरोबरच कुटुंब – पाहुणेरावळे – लग्न – मुंजी – समारंभ यातील अधिकृत जबाबदार प्रतिनिधी म्हणून त्यानं दिलेली / कधी आपणहून घेतलेली भूमिका पार पाडणं – या सार्या्चं एक आवर्त तिच्या उर्जेला खेचत फिरत राहातं, तिच्या दिवसांचे आणि विचार – मनाचे रांजण भरत राहातं.

वयाच्या एका ठरावीक टप्प्यावर मात्र ह्या विविधांगी भूमिकेचे पदर सुटायला लागतात. बंध आपसूक मोकळे व्हायला लागतात. मुलांचं वेळापत्रक भरगच्च बनतं. तिच्यावरचं त्यांचं असलेलं शारीरिक भावनिक अवलंबित्व कमी होतं. ठरावीक ठोक्यांना ‘आई असली तर उत्तम – नसली तरी बिघडत नाही’ (कधी कधी तर नसलेलीच बरी!) असं वाटण्याचा मोसम येतो. पतीच्या नोकरी – व्यवसायाच्या चक्रात एखाद्या भोज्यासारखं तिचं स्थान असतं. संवादाला मर्यादा पडायला लागतात. अशा वेळी इतके दिवस जपलेलं ‘माझ्याशिवाय ह्या घराचं काही खरं नाही’, हे बिलोरी स्वप्न थोडं थोडं फिकं व्हायला लागतं. काही काही नकळत येणार्याह ‘आपल्यांच्याच’ ‘परक्या’ प्रतिसादांचे धक्के हळव्या बनलेल्या मनाला सोसेनासे होतात. ‘आपण खरंच काय मिळवतो आहोत?’ ‘कोण बनतो आहोत?’ ‘निखळ आणि निव्वळ ‘आपलं’ असं समाधान कशात मिळणार आहे?’ ‘आपल्या इतर उत्तम क्षमता – विद्या – कौशल्याचं आपण जे लोणचं घालून ठेवलं आहे त्याची चव आपल्याला कधी बरं चाखायला मिळणार?’ असे सनातन प्रश्न पडायला लागतात.

इतकं हलवणारं वास्तव एखादीचं नसलं तरी किमान ‘माझ्या’ म्हणून काही स्वतंत्र ‘ओळखी’ची गरज तर निश्चितच जाणवलेली असते. जमिनीत रुजलेल्या ‘स्व-विकासाच्या’ बीला हा धक्का – ही हाक पुरते आणि ती स्वतःचा मार्ग शोधू लागते. त्याचंच एक रूप म्हणजे ‘संवादिनी’. ज्ञानप्रबोधिनी ‘स्त्री शक्ती’ प्रबोधन गटाच्या तर्फे पदवीधर गृहिणींसाठी चालवला जाणारा एक विकासगट. अट एकच की यात ‘बघे’पणाला स्थान नाही. ‘सहभागी’ होण्याची इच्छा असलेल्या कुणीही आनंदानं – उत्साहानं यात यावं, ‘स्वयंविकासातून समाजपरिवर्तन’ हे उद्दिष्ट ठेवून यावं.

आपल्या देशापुढच्या समस्यांचा एक कळीचा मुद्दा म्हणजे सुप्त मनुष्यशक्तीला वाट मिळण्यासाठी दिल्या जाणार्‍या सक्षम, स्वाभाविक पर्यांयाचा काहीसा अभाव. ‘गृहिणी’ हा अशा सुप्त मनुष्यशक्तीचा एक ताकदवान स्रोत आहे, त्याला व्यक्त होण्यासाठी आणि आपल्या क्षमता कुठल्याही व्यक्तिगत स्वार्थ-फायद्याशिवाय उत्तम कारणी खर्चता याव्यात हा ह्या मागचा प्रमुख उद्देश.

१९९९ मध्ये अशाच प्रकारे स्वतःच्या क्षमता वयाच्या पस्तिशीनंतर कसाला लावून त्या वाढवणार्याे आणि सिद्ध करणार्यात विद्याताई करंबेळकर ह्या मैत्रिणीच्या मनात ‘संवादिनीचं’ बी प्रथम पडलं. जे आपण करू शकतो ते आपल्यासारख्या इतर मैत्रिणी का नाही करू शकणार? व्यासपीठ मिळालं तर एक उत्तम संघटित ताकद त्यातून उभी राहील.

ह्या विचारांनी त्यांनी आणि मी ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून ह्या गटाची सुरुवात केली. ‘दर महिन्याला एकदा एकत्र तर जमूया. विविध विषयांची – घराबाहेरच्या परिघाची – स्वतःतल्या क्षमतांची ओळख तर करून घेऊया’, असं म्हणत काही जणी जमायला लागल्या. सुरुवातीला वर्षभर फक्त दर महिन्याला एकत्र जमायचं असं ठरवलं. आपल्याला कुठल्या गोष्टींविषयी आस्था वाटते, जाणून घ्यावंसं वाटतं त्यांची एक छोटीशी यादी केली. काही विषय स्वतःचं व्यक्तिमत्त्व विकसण्यासाठी निवडले. त्यात ‘आग्रही वृत्तीची जोपासना’ ‘अलिप्त पालकत्व’ पासून ते व्यक्ती भिन्नतेचा स्वीकार’ ‘संवाद कौशल्यं’ असे कितीतरी विषय येऊन गेले. ‘आरोग्य’ हा दुसरा जिव्हाळ्याचा भाग. स्त्री-आरोग्यातील बारकाव्यांपासून – आहार – ऋतुचर्या आणि अगदी ‘नेत्रदाना’पर्यंत विविध विषयांवर तज्ज्ञांकडून माहिती घेतली, चर्चा केल्या. व्यावहारिक कौशल्यांबद्दल जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं वाटलं. बदलतं राहाणीमान, व्यावसायिक जगाच्या अपेक्षांना सामोरं जाताना बँकेचे व्यवहार, ग्राहक हक्क, किमान कायदेज्ञान, गुंतवणुकीपासून ते मृत्युपत्र आणि संगणक परिचय असे कितीतरी विषय चर्चिले गेले.

ज्यासाठी ‘संवादिनी’ रुजली ती ‘सामाजिक जाणिवेची’ गाभ्याची बाब तर नेहेमीच महत्त्वाची मानली आहे. ‘पलीकडच्या घराला आग लागली तर मला झळ लागो न लागो मी त्याविषयी सजग असलंच पाहिजे – शक्य ते प्रयत्न ती धग कमी करण्यासाठी केलेच पाहिजेत’, ही भूमिका. गोध्राचं हत्याकांड, भांडारकर संस्थेवरचा हल्ला अशा राजकीय – सामाजिक प्रश्नांपासून सेवा प्रकल्पांचा अभ्यास दौरा, देवदासींच्या आयुष्याचं वास्तव असे विविध विषय ह्यात आजवर येऊन गेले. आमच्या जगण्याचं क्षितिज विस्तारत गेले.

या बैठकीतून अशा अनेक ज्येष्ठ – समविचारी मैत्रिणींची अनुकरणीय रूपं अनुभवली, ज्यांनी स्वतःच्या कष्टांनी – विचारपूर्वक स्वतःला घडवलं.

वर्षभर जमल्यानंतर काही मैत्रिणींना आपोआपच काही कृती करण्याची उर्मी जाणवू लागली. त्यातून समाजाशी नातं जोडू इच्छिणारे काही उपक्रम सुरू झाले. त्यातला चांगला रुजलेला उपक्रम म्हणजे ‘उमलत्या वयाशी जुळवून घेताना’ हा किशोरवयीन मुलामुलींसाठी सुरू केलेला ‘कार्यशाळा’ स्वरूपातला उपक्रम! पुण्यातल्या अगदी मागास ते उच्चभ्रू पार्श्वभूमीच्या मुलामुलींपासून ते लोणी – खेड – मंचर – हुपरी सारख्या ग्रामीण मुलामुलींपर्यंत जिव्हाळ्यानं मार्गदर्शन केला जाणारा कार्यक्रम सुरू झाला.

ज्यांना प्रत्यक्ष खूप वेळ देणं शक्य नाही अशा काहींनी ग्रामीण भागातील बचत गटातल्या मैत्रिणींसाठी ‘जागर’ हे आरोग्य भित्तीपत्रक सुरू केलं. दुर्लक्षित – अज्ञानामुळे उपेक्षित राहणारे स्त्रियांचे काही विशेष आरोग्यविषयक प्रश्न, शरीरातील एकूण संस्था आणि त्यांचं काम, इथपासून ते उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा आहारातला वापर आणि जवळपासच्या वैद्यकसुविधांचे संपर्क अशा विविध प्रकारे ‘जागर’मधून या मैत्रिणींपर्यंत त्यांच्या विषयीची आस्था ‘संवादिनी’नं पोचवली.

आपल्या मुलांसाठी जे आपण सहज-स्वाभाविकरित्या करतो ते लौकिकार्थानं आपल्या नात्याच्या नसलेल्या पण मायेची – मदतीची गरज असलेल्या मुलांसाठी थोडंतरी करता येईल का? या विचारातून ‘पालवी’ उपक्रमाची सुरुवात झाली. पुण्याच्या पूर्व भागात राहाणार्याच प्राथमिक शाळेतील काही मुलांसाठी शैक्षणिक संसाधने तयार करणं, त्यांच्या बैद्धिक क्षमता वाढीसाठी गंमत खेळांचा वापर करणं अशी रचना हळूहळू उभी राहात आहे.
या उपक्रमांशिवाय स्व-वाढीला मदत करणारे संस्था भेट, गप्पा कट्टा आणि ‘समतोल’ त्रैमासिकाचं लेखन करण्या-मिळवण्यापासून मुद्रितशोधनापर्यंत सर्व कामाचा आनंद ‘संवादिनी’तल्या मैत्रिणी लुटत असतात. अशा सर्व वर्तुळांची एक साखळीच तयार होत आहे.

ह्यात दिला जाणारा वेळ – श्रम – गुंतवणूक सगळं काही फक्त स्वान्तः सुखाय! आपण हे करून कुणावरही ‘उपकार’ वगैरे करत नाही, (करत असू तर स्वतःवरच!) ह्याची पक्की जाण असलेला आणि तरीही एकमेकांच्या सहकार्यानं – सहविचारानं स्वतःला आणि आपल्या मैत्रिणींना पुढे – पुढे नेणारा गट असं स्वरूप हळूहळू आकाराला आलं.

पुण्याच्या सहकारनगर भागात आणि बोरिवलीला तिथल्या काही मैत्रिणींच्या पुढाकारानं, अशा काही शाखा सुरू झाल्या. अगदी सुरुवातीपासून काही पथ्यं कटाक्षानं पाळली. उदा. मोजके अपवाद वगळता कुठल्याही कार्यक्रमात शक्यतो चहापान, अल्पोपाहार ठेवायचा नाही, खाजगी चर्चा करायच्या नाहीत, आपले ‘पालकत्वाचे’ प्रश्न सोडवण्यासाठीच ह्या व्यासपीठाचा उपयोग करायचा नाही. इथल्या कुठल्याही स्वेच्छेनं केलेल्या कामाची/ जबाबदारीची आर्थिक गणितं मांडायची नाहीत. इ. इ.

आनंदाची आणि समाधानाची गोष्ट अशी, की ही सगळी पथ्यं अगदी काटेकोरपणे पाळत आणि (एरवीच्या स्त्रियांबद्दलच्या सर्वसाधारण प्रतिमेला छेदत) अनेकजणी स्वतःच्या आणि इतरांच्या क्षमता – भावना जाणून घेत एकत्र वाढत आहेत. नातेसंबंध आणि एकमेकांना जोडलेलं असणं ह्यातला – फरक जाणून घेऊन काम करताहेत. ‘आपल्यापैकी काही जणी स्वभावतः एकमेकींच्या छान मैत्रिणी बनतीलही पण तसं नसलं तरीही आपण कुठल्यातरी ध्येयाशी – उद्दिष्टाशी स्वतःला जोडून घेतलेलं आहे म्हणून एकमेकींचे गुणदोष पचवूनच पुढे जायचंय’, याची स्पष्टता प्रत्येकीला निश्चित आहे. ‘संवादिनी’चं असणं हे त्यातल्या प्रत्येकीच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो तिच्या इतर भूमिकांशी विरोधात नाही तर त्याशिवायची तिची ओळख जपणारा – वाढवणारा – अमृता प्रीतम ह्यांच्या भाषेतला ‘चौथा कमरा’ आहे, हे निश्चित.

ह्यात ग्लॅमर नाही, चकचकीतपणा नाही, भरमसाट पैसे गुंतवून केलेले भव्यदिव्य शोज नाहीत, अध्यक्ष – उपाध्यक्ष इ. सारखी पदाधिकार्यां ची नामावली नाही. असलाच तर स्वतःला समविचारी, प्रेरणाशाली मैत्रिणींशी जोडला जाण्यातला आनंद – आपण कुणाच्यातरी कुठल्यातरी प्रकारे भलं होण्याचं एक ‘साधन’ बनू शकतो याचं समाधान.

याच समाधानाच्या एका प्रक्रियेबद्दल पुढच्या अंकात अधिक खोलात जाणून घेऊया.

संपर्क : मंजूषा बेहेरे – २४३२७५७७
अनघा लवळेकर ड्ढ २४२२१७७०