नर्मदा घाटी
सरदार सरोवर धरणामुळे डूब येणार्या गावामधील सर्वांचे पुनर्वसन झाले की सहा महिन्यानंतरच धरणाची उंची वाढवता येईल, असा नर्मदा लवादाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता. पण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून ८ मार्च २००६ रोजी नर्मदा धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी वाढवायला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
सध्या महाराष्ट्रातल्या मणिबेलीपासून अक्कलकुवा तालुक्यातील सर्व गावांमधे धरणामुळे डूब येत आहे. आज नव्हे ९४ सालापासूनच. तरीही लोक तेथे राहात आहेत. आंदोलकांनी चालवलेल्या तीन जीवनशाळाही या परिसरात आहेत. त्याही यावर्षी अशाच डुबणार आहेत. या सर्वांचे पुनर्वसन न करताच धरणाची उंची वाढवायला परवानगी देणे म्हणजे त्यांचा जगण्याचा अधिकार डावलणेच आहे.
सध्या तिथे नेमकी काय परिस्थिती आहे, याचा अंदाज या दैनंदिनीतून येऊ शकतो.
जून १२ – धडगावला पोहचले – जीवनशाळांच्या मान्यतेबद्दल काम करायचं होतं. ‘‘जीवनशाळांना वस्तीशाळा म्हणून शासनाला देऊन टाका असा सल्ला नंदुरबार जिल्हा कार्यालयातून दिला जातोय पण तो पटत नाही. पुढे प्रयत्न सचिवालयात – ते ही सोपे नाहीच.
अक्कलकुवा तालुक्याच्या गावी चिमलखेडी, डनेल वगैरे नर्मदा किनार्यााच्या गावातील लोक आले होते. गेली सात वर्ष त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढणारा कार्यकर्ता चेतन साळवे मलाही बरोबर चलायचा आग्रह करू लागला. मी निघाले. – गेली १२ वर्ष मी नर्मदेच्या खोर्याकत जाते आहे, अनेकदा महिनोन्महिने राहते आहे. अगदी पाण्याशी टक्कर घेतानाही साथ देते आहे.
धडगावाहून मिळेल तशा गाड्या-जिपड्या / बस बदलवत मुळगीला पोहचलो तर तिथे निरोप मिळाला ‘तहसिलदार भेटू शकणार नाहीत, नवीन कमिशनर उद्या डॅमसाईटकडून नदी किनार्याबच्या गावात भेट देत आहेत म्हणून त्यांची गडबड सुरू आहे.’ झाले. तसेच परत निघालो धडगावला. फोन करून फक्त कळवलं की ‘सावर्याकडून नदीकिनारी बोट घेऊन जायचं आहे, डिझेलची व्यवस्था करायला हवी.’ बोट जाणारच म्हणूनच अडचणीतल्या कुटुंबासाठी जनसहयोगचे थोडे धान्यही खरेदी केले. जीपमध्ये धान्य, आम्ही गर्दी करत. सिड्याची बायको, पोरं, मी, चेतन, पुढे काही गावकरी टपावर. कसं तरी भूश्याला नदीकिनारी पोहचलो तो रात्रीचे अकरा वाजलेले. टपावरचे काही गावकरी वाटेत उतरले त्याना निरोप देऊन सावर्याहून बोट पोहचेपर्यंत आणि धान्य चढवून निघेपर्यंत पहाटेचे दोन वाजले होते. नदीजवळच्या अवघड वळणावर टपावरून उतरून पायी डोंगर उतरणार्याल राण्याडाया (वय वर्ष ७० पेक्षा जास्त), सोपान (नुकताच १२ वी पास), सिड्या (युवा) यांनी किनार्यापवर तसंच अंग टाकून बोट येईपर्यंत एक डुलकी काढली.
रात्रभर प्रवास सुरू – पोरंसोरं झोपली. माझा डोळा लागत नव्हता – वरती चांदणं, भोवती फक्त पाणी. आता नदी पूर्वीची नर्मदा माता वाटत नव्हती – निमगवाण, डोमखेडी, सुरुंग, सर्व गिळकृंत केलला तो भयानक नद – ह्या पावसाळ्यात तर आणखीनच उग्र होणार. त्याच्यापेक्षा जास्त उग्र शासन-पोलीस.
१३ जून– सकाळी सकाळी अक्कलकुव्यातलं मुखडी पार करून डनेल शाळेजवळ पोहचलो. गेल्या पावसाळ्यात पाणी लागलेलं घर आता वापरता येणारच नव्हतं. वरच्या घरावर चढून शिक्षक मंडळी शाकारण्याचे काम करत होती. मुलं अजून पोहचली नव्हती, तरी त्यांच्या घोषणा माझ्या कानांना आपोआप ऐकू येऊ लागल्या. नेहमी बोटीचा दुरून आवाज ऐकला की पोरं उत्स्फूर्त स्वागत करतात. त्यातूनच बळ मिळतं : लढण्याचं. त्यांना जगवण्यासाठी, त्यांच्या शिक्षणाच्या-जगण्याच्या हक्कासाठी लढायलाच हवं. निराशेचं ओझं सहजच गळून पडतं.
शाळेत न येता पुढे जाणं जमतच नाही. जरा हातपाय धुतले तर नूरजीभाऊ हातात भाकरी घेऊन आले. राण्याडाया आमच्याबरोबर बोटीतच होते – आता डोंगर चढून येणं जमत नाही म्हणून. नूरजीभाऊ काल मुळगीत होते आमच्याच बरोबर पण आमच्याआधी डोंगर उतरून पुढ्यात हजर – हे ह्या गावातल्यांनाच जमतं. असाच छोटा नूरजी चिमलखेडीत अन् विज्या मणिबेलीत पोहचले होते म्हणे – कमिशनरांच्या बरोबरच्या मीटिंगची गावागावात खबर देत.
बोलताबोलता दूर नवी बार्ज दिसली ‘महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग’ – ९४ पासून कागदावर गाजलेला तरंगता दवाखाना आज प्रथमच पाण्यावर दिसला – मात्र त्यावर फारसं कुणीच नव्हतं. वाटलं ‘कमिशनर ह्याचे उद्घाटन करून डॅमसाईटवरूनच माघारी फिरले की काय? त्यांना तिथेच गाठायला हवं होतं.’ पण गुजराथमधून पोहचू ह्याची सध्या खात्री वाटत नाही.
नंतर कळले ही बार्ज अक्राणीकडे जाते आहे. मागून अशीच दुसरी येते आहे, अक्कलकुव्याची. त्यातून साहेब येत आहेत. चला म्हणजे गाठता येईल. लगेच मणिबेलीकडे निघालो पण जवळपास पोहचताना साहेबांची बार्ज मणिबेलीत भेट आटोपून पुढे येताना दिसली, त्यामुळे नदीतच परत वळून त्यांचा पाठलाग करू लागलो तर मंडळी धनखेडीत थांबली. पाठोपाठ आम्हीही.
शासकीय डॉक्टरमंडळींचा नवीन तरंगता दवाखाना मिळाल्याचा आनंद ओसंडत होता. ‘‘अच्छा, म्हणजे ह्या उद्घाटनासाठी कमिशनरसाहेब आलेत तर…’’ मी काहीतरी सुरवात करायची म्हणून म्हटले. नव्या साहेबांनी लगेच प्रतिसाद दिला ‘‘दोन्हीही – लोकांना भेटायला पण’’ साहेबांभोवती अधिकार्यांरची फळी. लोकांच्यासाठी अडसर. चिमलखेडीच्या दमण्याने सुरवात करत म्हटले. ‘‘लहान मुलांचं खाणं नीट मिळत नाही’’, साहेबांनी अधिकार्यारकडे बघताच एका अधिकार्यावने, ‘‘नाही साहेब सर्व गावांत अंगणवाड्या आहेत’’ म्हणत सर्व आलबेल भासवण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न केल्यावर मात्र मला राहवले नाही. मी सुटलेच. ‘‘अहो, साहेब नवीन आहेत, त्यांना गावातल्या लोकांचे म्हणणे ऐकू देत. तुम्ही तर खोटे ऍफेडव्हिट देऊन गावात कुणीच शिल्लक नाही सांगून मोकळे होता…’’ ह्या सत्याला सामोरं जाणं अवघडच म्हणून लगेच डिफेन्सिव्हवर जात साहेब सावरून ‘‘आम्ही सगळे (म्हणजे अधिकारी) एकच आहोत. खोटे म्हणू नका. विशिष्ट परिस्थितीत काही गोष्टी कराव्या लागतात…’’ वगैरे सारवासारव करायला लागले. ‘‘पण निदान आता इथे तरी लोकांचे म्हणणे ऐकून घ्या ना.’’ मी माझे म्हणणे रेटल्यावर, लोकही सरसावले. ‘‘एका पाड्यावर आंगणवाडी, पाडे पाण्यामुळे तुटले, लहान मुलांना तिथे जाता येत नाही, वाटप करणारे प्रत्येक पाड्यावर जातच नाहीत, आम्ही काही म्हटले तर, करा, करा आमची कम्प्लेंट, काही होणार नाही, अशी धमकी देतात.’’ – ‘‘ठीक ठीक आपण त्याबद्दल बघू. तुम्ही नंदुरबारला मिटींगला या. जमिनी बघण्याचे दिवस ठरवा.’’ साहेब काढता पाय घेत, बार्जकडे निघाले. विज्या म्हणायला लागला ‘‘मणिबेलीत पण जातर्याीभाई वगैरेंनी खूप सुनावलं, तर लगेच इकडे सटकले, चिमलखेडीतही जायचे आहे म्हणत’’ पण आता पुढच्या गावांना येण्यास त्यांना वेळ नव्हता. अधिकारी चिमलखेडीच्या नूरजीला शेडचे सामान घेऊनच तुमच्या गावी येतो, म्हणू लागताच, तो उखडला. ‘‘अजिबात नाही. फक्त एक जुनी वस्ती आणि शाळेच्या मुलांची शेड हलवा वर. बाकी हात लावायचा नाही’’ … हे बार्जच्या बाहेर चाललं होतं. मी संधी घेत म्हटलं ‘‘चला ना नूरजी, आत साहेबांनाच सांगूयात. चेतन ते रेशनचं पण सांग ना.’’ मग केबिनमध्ये शिरून आम्ही पुन्हा ठासून सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे असे-
चिमलखेडी मणिबेलीतले लोक अजिबात हलणार नाही म्हणतात. तुम्ही शेडच्या टीनपटात नेऊन ठेवता मग, जमीन चांगली दाखवत नाहीत. अघोषितना घोषित करण्याचे काम सध्या बंद केले आहे, ते आधी सुरू करा. आमच्या ‘नुकसानाचे पंचनामे करणार नाही’ असे कलेक्टर म्हणतात म्हणे – मागच्या वर्षी पण केले नाहीत. आधी पंचनामे करा, त्याशिवाय जमीन धरायला आम्ही तयार नाही. आता कधीही पाऊस येईल. (आता कुठे २००३ चे नुकसान वाटप सुरू केलं आहे.) रेशनपण नीट येत नाही. गेल्यावर्षी अक्कलकुव्याच्या नऊ दुकानदारांना बार्ज नाही म्हणून पंधरा दिवस किनार्या्वर पडून राहावं लागलं होतं. आमच्या जनसहयोगच्या धान्यासह आम्हालाही एकतर रेशन नीट पोहचत नाही. ते घ्यायला पैसे पण नसतात. गेल्यावर्षी आम्ही जनसहयोग दिला नसता तर मृत्यू झाले असते. तेव्हा अन्नसुरक्षेच्या अंतर्गत दुर्गम भागातील विस्थापित, ज्यांचे सरकारला पुनर्वसन करता आले नाही, त्यांना जवार/मका आणि डाळ ह्या गोष्टी मोफत पोहचवण्याची जबाबदारी आपण घ्यावी. गहू पाठवू नये – इथे गहू वापरत नाहीत.
दुसरं आरोग्य हक्काबद्दल – जंगलं बुडल्यामुळे विषारी साप घरात खाटल्यावर चढून झोपलेल्या लोकांना चावून आठ-दहा मृत्यू झाले. नीट आरोग्य सेवा हवी. तरंगते दवाखाने अधिकार्यांाची बार्ज होऊ नयेत.
‘बघतो बघतो’, पण परवा १५ तारखेला मिटींगला या असं म्हणत मंडळी निघाली.
ते निघून गेल्यावर आम्ही चिमलखेडीत येऊन गावकर्यांिची मिटींग घेतली. मणिबेलीप्रमाणेच इथल्याही गावकर्यांनचा आग्रह आहे सत्याग्रहाचा.
आता सरकारने जमीन दाखविली अन् ती समजा पसंत केली तरी खरेदी करून सर्व बाळंतपण व्हायला किमान एक वर्ष तरी लागणार. अजूनही वडछिल वसाहत/शोभानगरमधल्या लोकांनासुद्धा सात-बाराचे उतारे मिळालेले नाहीत त्यामुळे कुठल्याही शासकीय मदतीचा/कर्जाचा अधिकार नाही. बायकांचे चांदीचे दागिने गहाण ठेवून बियाणं खरेदी करावं लागतं आहे. म्हणजे अजून आधीच्यांचेही पुनर्वसन झालेले नाही, त्यामुळे सत्याग्रहाची आवश्यकता वाटते आहे.
सर्व समर्थक साथींसाठी नेहमीप्रमाणे आग्रहाचे निमंत्रण, सोबत राहण्याचं. जगण्याच्या हक्काच्या ह्या लढाईत साथ द्यायला जरूर या.
संपर्क :
सुहास कोल्हेकर – २५३८२७८२,
सुनीती सु. र. २४२५१४०४,
संजय संगवई – २५४५००८७०,
धडगाव कार्यालय – ९५२५९५२२०६२०