(आजार सुप्तावस्थेत ओळखण्यासाठीच्या) चाळणी-चाचण्यांचा अतिरेक
रक्ततपासणी, एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., स्ट्रेस टेस्ट, अँजिओग्राफी… अशा किती तरी तपासण्या करायला सांगितल्या जातात. ऐकूनच जीव धास्तावतो, पण खरंच,… या तपासण्यांमधून नक्की काय समजतं? ते १००% बरोबर असतं का? ते समजण्याचा उपयोग किती आणि कोणता? हे सगळं आपल्याला माहीत करून घ्यायला हवं. कारण आजकाल वैद्यकीय व्यवसाय हा केवळ पेशा न राहता धंदा होऊन गेला आहे.
रक्ततपासणी, एक्स-रे, सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., स्ट्रेस टेस्ट, अँजिओग्राफी… अशा किती तरी तपासण्या करायला सांगितल्या जातात. ऐकूनच जीव धास्तावतो, पण खरंच,… या तपासण्यांमधून नक्की काय समजतं? ते १००% बरोबर असतं का? ते समजण्याचा उपयोग किती आणि कोणता? हे सगळं आपल्याला माहीत करून घ्यायला हवं. कारण आजकाल वैद्यकीय व्यवसाय हा केवळ पेशा न राहता धंदा होऊन गेला आहे.
हार्ट-ऍटॅक आलेला पेशंट सांगत होता – ‘‘आमच्या कंपनीतर्फे दरवर्षी चेक-अप केला जातो. या चेक-अपमध्ये मागच्याच आठवड्यात इ.सी.जी. काढला होता तेव्हा तर ‘नॉर्मल’ असा रिपोर्ट आला होता म्हणून मी निश्चिंत होतो.’’
एक प्राध्यापक बाई सांगत होत्या – ‘‘मला कसलाच त्रास नाहीय. पण या हॉस्पिटलची जाहिरात पाहून पोटाची सोनोग्राफी करून घेतली तर गर्भाशयात फायब्रॉइडस्च्या गाठी आहेत असे समजले. त्यासाठी ऑपरेशन करायचे का नाही याबाबत मनात गोंधळ चालू आहे.’’ असे प्रसंग टाळायचे तर या ‘चाळणी-चाचण्यां’बद्दल काही किमान शास्त्रीय माहिती हवी.
‘चाळणी-चाचणी’ म्हणजे काय?
‘चाळणी-चाचणी’ (स्क्रीनिंग टेस्ट) म्हणजे कोणताही त्रास नसताना ‘काही आजार/दोष नाही ना?’ याची शंका फेडण्यासाठी केली जाणारी चाचणी. उदा. चाळिशीनंतर रक्तदाब तपासणे किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणे. शेकडो लोकांवर अशी चाचणी केली जाऊन ‘आजार/दोष’ असणार्या. व्यक्ती त्यातून वेगळ्या काढल्या जातात. नंतर त्यांच्याबाबत खोलात माहिती घेऊन, शारीरिक तपासणी करून, गरज लागल्यास आणखी इतर तपासण्या करून पक्के निदान पुढे केले जाते. कारण या चाळणी-चाचणीतून निदानासाठी फक्त पहिले पाऊल उचलले जाते. उदा. मधुमेह-तपासणी शिबिरात जे कोणी येतील त्या सर्वांची रक्तातील साखर तपासली जाते. पैकी ज्यांच्या रक्तात जादा साखर सापडेल ते सर्व जण मधुमेहाचे रुग्ण असतात असे नाही. ‘जादा साखर’ सापडली त्यांची आठ तास उपाशी पोटी राहून व त्यानंतर ७५ ग्रॅम ग्लुकोज देऊन दोन तासांनी रक्त साखर तपासतात व त्या आधारे मधुमेह आहे की नाही ते ठरवतात.
रक्त-साखर तपासणी एक चांगली चाचणी-तपासणी आहे कारण, ‘मधुमेह असूनही रक्त-साखरेचा रिपोर्ट नॉर्मल आला,’ असे कधी होत नाही. पण सगळ्याच चाचण्या अशा नसतात. उदा. हृदयाला रक्तपुरवठा कमी होत आहे का नाही हे ओळखण्यासाठी इ.सी.जी. तपासणी ही चांगली चाळणी-चाचणी नाहीये कारण तिची संवेदनक्षमता कमी म्हणजे ३०% आहे. म्हणजे काय? तर समजा एक हजार लोकांवर ती तपासणी केली व पैकी २० जणांमध्ये ‘हृदयाला रक्तपुरवठा कमी असणे’ असा दोष असला (आपल्या देशात अशा हृदयविकाराचे प्रमाण सुमारे २% आहे) तरी त्यापैकी फक्त ३०%
म्हणजे ६ जणांमध्येच ‘हृदयविकार आहे’ असा रिपोर्ट येईल. उरलेल्या १४ जणांमध्ये हृदयविकार असूनही ‘हृदयविकार नाही’ असा चुकीचा रिपोर्ट येईल. हा चुकीचा रिपोर्ट डॉक्टरांच्या चुकीमुळे आला असे नसून इ.सी.जी.ची ही अंगभूत मर्यादा आहे. मात्र छातीत दुखणे इत्यादी हृदयविकाराची लक्षणे असताना इ.सी.जी. काढला तर इ.सी.जी. संवेदनक्षमता वाढते व म्हणून ‘हृदयविकार नाही’ असा चुकीचा रिपोर्ट येण्याची शक्यता खूप कमी असते. पण हृदयविकाराचा कोणताही त्रास नसताना सरसकट अनेकांचा इ.सी.जी. काढला, म्हणजे इ.सी.जी.चा ‘चाळणी-चाचणी’ म्हणून उपयोग केला तर मात्र घोटाळे होतात.
इ.सी.जी. पूर्णपणे बिनत्रासाची, निरुपद्रवी व तुलनेने स्वस्त तपासणी आहे म्हणून तज्ञ डॉक्टरांकडे गेल्यावर ती खूप वेळा वापरली जाते. इ.सी.जी. नॉर्मल आला म्हणजे हृदयविकार नाही असा पक्का निष्कर्ष काढायचा नाही हे लक्षात ठेवणे मात्र महत्त्वाचे असते. (मात्र विसाव्या वर्षी एकदा इ.सी.जी. काढून घ्यावा म्हणजे आपल्या इ.सी.जी.चा पॅटर्न डॉक्टरांना कळतो. तसेच हृदयाच्या इतर काही विकारांचे निदान इ.सी.जी.मुळे होते. पुढे मागे हृदयविकाराची शंका आली व इ.सी.जी. काढला तर मूळ इ.सी.जी.शी तुलना करायला मिळते व यामुळे निदानाला मदत होते. पण नंतर तब्येतीत काही घसरण न होताही दरवर्षी इ.सी.जी. काढून घेणे व त्यावर अवलंबून राहणे व्यर्थ आहे.)
थोडक्यात काय – प्रत्येक चाचणी चाळणी-चाचणी म्हणून वापरता येत नाही. आजाराची खूप लवकर व नेमकेपणाने शंका घेण्याची क्षमता तिच्यात असायला हवी. एवढेच नाही तर ती शेकडो लोकांमध्ये वापरायची असल्यामुळे स्वस्त, निर्धोक व वापरायला सोपी हवी.
चाळणी-चाचणीतून ओळखायचे आजार
आजारांपैकी देखील सर्वच आजार चाळणी-चाचणीतून ओळखता येतात असे नाही. एकतर शरीराच्या आत आजाराची सुरुवात झाल्यावर खूप दिवसांनी लक्षणे सुरू होत असतील तरच चाळणी-चाचणीतून तो आधी ओळखण्याचा उपयोग आहे. दुसरे म्हणजे लक्षणे सुरू व्हायच्या खूप आधी आजार ओळखल्याने उपचाराच्या दृष्टीने खूप फायदा होणार असेल तरच तो ओळखण्यासाठी एवढ्या सर्व लोकांवर चाळणी-चाचणी करण्याचा खर्च करण्यात अर्थ आहे. उदा. सर्व लोकांच्या फुफ्फुसाचा क्ष-किरण फोटो काढून फुफ्फुसाचा क्षयरोग लवकर ओळखणे शक्य आहे. कारण या चाळणी-चाचणीची संवेदनशीलता (आजार लवकर ओळखण्याची क्षमता) चांगली आहे. पण असे करण्याऐवजी तीन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस खोकला किंवा ताप असेल तर क्षयरोगाची शंका घेऊन बेडक्याची तपासणी किंवा क्ष-किरण फोटो इ. तपासण्या करणे अधिक फलदायी असते. त्यामुळे ही पद्धत भारतात वापरली जाते. दुसरे उदाहरण म्हणजे गर्भाशयात फायब्रॉइडस्च्या गाठी सोनोग्राफीतून खूप लवकर ओळखता येतात. पण या गाठीमुळे काही त्रास सुरू होण्याच्या आधी उपचार करण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे या आजारासाठी पोटाची सोनोग्राफी ही काही चांगली चाळणी-चाचणी नाही.
आजाराचे प्रमाण विशिष्ट असेल तर…!
समजा एखादी चाचणी व ती वापरून ओळखायचा आजार हे दोन्ही वर दिलेल्या कसोट्यांना उतरतात. पण तेवढे पुरेसे नसते. जो आजार वेळेवर ओळखायचा त्याचे समाजातले प्रमाण खूप कमी असले तरी ही चाचणी चाळणी-चाचणी म्हणून वापरली तर चुकीचे रिपोर्टस् येण्याचे प्रमाणच जास्त असते ! हा आहे ‘बे’ (Bay) चा प्रसिद्ध ठोकताळा. वैद्यकशास्त्रीय प्रमाणभूत ग्रंथांमध्ये तो दिला आहे. पण अनेकजण सोयिस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करतात.
स्ट्रेस – इ.सी.जी. या चाचणीचा ‘हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे’ हा आजार ओळखण्यासाठी ‘चाळणी-चाचणी’ म्हणून वापर करण्याबाबतच्या उदाहरणावरून हा मुद्दा आपण स्पष्ट करून घेऊया.
स्टे्रस – इ.सी.जी. या चाचणीत सरकत्या पट्ट्यावरून झपझप चालायला लावतात व त्या योगे हृदयाचे ठोके बारा मिनिटे वाढवून त्यावर स्ट्रेस देत ही बारा मिनिटे सतत इ.सी.जी. आलेख काढतात. या चाचणीची संवेदनशीलता चांगली आहे (७०%). म्हणजे हृदयविकार ज्यांना आहे त्यांच्यापैकी ७०% मध्ये ‘हृदयविकार आहे’ असा रिपोर्ट येईल. तसेच या चाचणीचा नेमकेपणाही खूप म्हणजे ८५% आहे. म्हणजे हृदयविकार नसूनही ‘हृदयविकार आहे’ असा चुकीचा रिपोर्ट फक्त १५%च्या बाबतीत येतो. शिवाय हृदयविकार लवकर ओळखणे हे फलदायी असते.
असे सर्व असले तरी ‘हृदयाला रक्त पुरवठा कमी असणे’ या आजाराचे समाजात प्रमाण फक्त दोन-तीन टक्केच आहे. त्यामुळे कोणताही त्रास किंवा खास कारण नसताना ही चाचणी सरसकट सर्वांमध्ये केली तर दिशाभूल करणारे रिपोर्टस्च जास्त येतात. उदा. ज्या गटात हृदयविकाराचे प्रमाण ३% आहे (भारतात सरासरी हे प्रमाण यापेक्षाही कमी आहे) अशा १००० जणांचा स्ट्रेस – इ.सी.जी. काढला तर खालील रिझल्टस् मिळतील –
३० जणांना हृदयविकार असला तरी २१ जणांच्या बाबतीतच ‘रक्त पुरवठा कमी आहे’ असा रिपोर्ट (ट्रु पॉझिटिव्ह) येईल’; तर
९ जणांमध्ये आजार असूनही ‘आजार नाही’ असा रिपोर्ट येईल (फॉल्स नेगेटिव्ह रिपोर्ट)
१४६ जणांमध्ये आजार नसूनही ‘आजार आहे’ असा रिपोर्ट येतो (फॉल्स पॉझिटिव्ह रिपोर्ट).
डॉक्टरांची काही चूक झाल्यामुळे हे चुकीचे रिपोर्ट येत नाहीत तर या चाचणीच्या अंगभूत मर्यादांमुळे असे होते.
ज्या गटामध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त आहे अशा गटामध्ये फॉल्स पॉझिटिव्हचे प्रमाण कमी होईल. उदा. मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा असे तिन्ही विकार असणार्यांोमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त असते. अशांमध्ये हे फॉल्स पॉझिटिव्हज्चे प्रमाण कमी असते. जितके हृदयविकाराचे प्रमाण जास्त तितके ‘ट्रु पॉझिटिव्हच्या मानाने फॉल्स पॉझिटिव्हज्’ चे प्रमाण कमी होते.
त्यामुळे ज्या समाजगटात हृदयविकाराचे प्रमाण २०% आहे अशाच गटात स्ट्रेस-टेस्ट करणे फलदायी आहे. नाहीतर खर्याश रिपोर्टपेक्षा चुकीच्या रिपोर्टचे प्रमाण जास्त असते.
वैमानिक, बस व रेल्वे इंजिन ड्रायव्हर अशांमध्ये मात्र सरसकट स्ट्रेट इ.सी.जी. टेस्ट करणे समर्थनीय ठरू शकेल. कारण त्यांच्यामध्ये हृदयविकाराचे निदान वेळेवर करणे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असते. हजारापैकी १६७ जणांच्या बाबतीत ‘हृदयविकार आहे’ असा अहवाल येईल. त्यांची पुढे स्ट्रेस थॅलियम किंवा गरजेनुसार ‘अँजिओग्राफी’ नावाची महागडी व किंचित धोका असलेली पण भरवशाची चाचणी केल्यावर लक्षात येईल की या १६७ पैकी फक्त २१ जणांना खरोखर हृदयविकार आहे. बाकीच्या १४६ बाबतचा स्ट्रेस इ.सी.जी. अहवाल चुकीचा आहे (पहा सोबतचा तक्ता). या सर्व १६७ जणांची स्ट्रेस थॅलियम चाचणी किंवा अँजिओग्राफी करण्याचा खर्च व धोका पत्करणे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी समर्थनीय ठरतो. पण इतर नागरिकांच्या बाबतीत ज्या गटांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण कमी आहे अशांमध्ये सरसकट स्ट्रेस – इ.सी.जी. उर्फ स्ट्रेस- टेस्ट करणे समर्थनीय नाही. हृदयविकाराची लक्षणे असतील किंवा कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणे, मधुमेह, लठ्ठपणा, तंबाखू-व्यसन इत्यादींपैकी निदान दोन ‘घात-घटक’ ज्यांच्यामध्ये असतील अशांमध्ये स्ट्रेस – इ.सी.जी. करणे समर्थनीय ठरते कारण अशांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त असते.
स्ट्रेस – इ.सी.जी. बाबतच्या वरील उदाहरणावरून लक्षात येईल की चाळणी-चाचणी म्हणून कोणती चाचणी निवडायची हे जसे महत्त्वाचे आहे तसेच ती कोणामध्ये वापरायची हेही त्यापेक्षा महत्त्वाचे आहे. चाचणी खूप चांगली असेल पण ती अयोग्य प्रकारे वापरली तर नुकसानच जास्त होते. त्यामुळे प्रमाणभूत वैद्यकीय ग्रंथांमध्ये इ.सी.जी., स्ट्रेस – इ.सी.जी., सोनोग्राफी या चाचण्या सरसकटपणे ‘चाळणी-चाचण्या’ म्हणून वापराव्या अशी शिफारस नाहीय.
स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग अगदी सुरुवातीच्या अवस्थेत ओळखण्यासाठी करायची मॅमोग्राफी म्हणजे स्तनाची एक प्रकारची क्ष-किरण चाचणी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षानंतर करावी अशी शिफारस अमेरिकतील संबंधित तज्ज्ञांच्या समितीने केली आहे. पण आपल्याकडे मात्र चाळिशीनंतरच ती करायची शिफारस काही डॉक्टर करतात. अशी अवेळी चाचणी केल्याने फॉल्स पॉझिटिव्ह रिपोर्टचे प्रमाण खूप असते याकडे ही ‘तज्ज्ञ’ मंडळी दुर्लक्ष करतात.
प्रमाणभूत शास्त्रीय ग्रंथांमध्ये काही महत्त्वाच्या चाचण्यांबाबत दिलेली शिफारस खालील प्रमाणे-
वरपांगी निरोगी दिसणार्यान लोकांमध्ये करायच्या तपासण्या : रक्तातील साखर, कॉलेस्टेरॉल, इ.सी.जी. : वयाच्या विसाव्या वर्षी एकदा व नंतर इतर काही आजार वा त्रास न झाल्यास चाळिसाव्या वर्षी एकदा.
शेवटी सारांशाने सांगायचे तर
१) चाचणीचे संवेदनक्षमतेसारखे गुणधर्म, २) ज्या आजारासाठी ती चाळणी-चाचणी म्हणून वापरायची त्या आजाराची वैशिष्ट्ये व ३) ज्या समाजगटामध्ये ती चाळणी-चाचणी म्हणून वापरायची त्यात त्या आजाराचे पुरेसे प्रमाण असणे या तिन्ही कसोट्या पार पाडल्या तरच ‘चाळणी-चाचणी’चा चांगला उपयोग होतो. नाहीतर विकतची दिशाभूल पदरात पडण्याची शक्यताच जास्त असते !