छोट्यांचं जग

निकोलाय इलिच बिल्यायेव्ह. बत्तीस वर्षांचा, गोलमटोल, गुलाबी तरुण माणूस. एका संध्याकाळी तो ओल्गा इव्हानोव्हना इरिनाकडे गेला. तिच्याबरोबर त्याचं त्याच्या दृष्टीनं कंटाळवाणं प्रेम प्रकरण चालू होतं.
ओल्गा इव्हानोव्हना घरी नव्हती. त्यानं हॉलमध्येच सोफ्यावर एक डुलकी काढली आणि मग तिची प्रतिक्षा करू लागला.

‘‘शुभ-संध्या निकोलाय इलिच’’. त्याच्या कानावर लहान मुलाचा आवाज आला, ‘‘आई आत्ता येईलच. ती सोन्याबरोबर शिंप्याकडे गेलीय’’.
ओल्गा इव्हानोव्हचा आठ वर्षांचा, किरकोळ शरीराचा मुलगा अल्योशा, तिथेच हॉलमध्ये दिवाणावर लोळत पडला होता. त्यानं वेलवेटचं जॅकेट आणि लांबुडके स्टॉकिंग्ज घातले होते. एका मळक्या उशीवर आडवा होऊन एक पाय उंचावला होता तर दुसर्याा पायाने तो ऍक्रोबॅटसची नक्कल करत होता असं वाटत होतं. असे ऍक्रोबॅटस त्याने नुकतेच एका सर्कसमध्ये पाहिले होते. पाय थकले की तो हातांनी हालचाल करीत होता, नाहीतर पाय वर करून डोक्यावर उभं राहण्याचा प्रयत्न करीत होता.

‘‘हॅलो, माझ्या मित्रा,’’ बिल्यायेव्ह म्हणाला, ‘‘तू इथेच आहेस होय? माझं लक्षच नव्हतं. आई बरी आहे ना?’’
अल्योशानं उजव्या हातानं डावा पाय धरला अन् वळून भल्यामोठ्या लँपशेडमागून बिल्यायेव्हकडे पाहिलं.

‘‘कसं सांगावं तुम्हाला?’’, तो म्हणाला अन त्यानं खांदे उडवले. ‘‘खरं तर आई कधीच प्रकृतीनं बरी नसते. ती बाई माणूस आहे आणि निकोलाय इलिच, बायकांचं नेहमी काही ना काही दुखतच असतं.’’
करण्यासारखं काहीच नसल्यानं बिल्यायेव्हनं अल्योशाच्या तोंडाकडे निरखून पाहिलं. ओल्गा इव्हानोव्हनाशी ओळख असली तरी त्यानं त्या मुलाकडे कधीच नीटपणे पाहिलं नव्हतं. आणि त्याच्या अस्तित्वाची त्याने जराही दखल घेतली नव्हती.

अल्योशाच्या मोठमोठ्या डोळ्यांच्या पण म्लान वाटणार्या् चेहेर्या वरून बिल्यायेव्हला पूर्वीची ओल्गा इव्हानोव्हना आठवली आणि त्या पोरावर माया करावी असं वाटायला लागलं.
तो म्हणाला, ‘‘ये बाळा इकडे. तुझ्याकडे पाहू दे रे.’’
मुलानं दिवाणावरुन उडी मारली अन् बिल्यायेव्हकडे धाव घेतली.
निकोलाय इलिचनं त्याच्या कृश खांद्यावर हात ठेवून म्हटलं, ‘‘कसं काय चाललंय?’’
‘‘कसं सांगावं तुम्हाला, या आधी कितीतरी पटीनं चांगलं चाललं होतं माझं.’’
‘‘का बरं’’.
‘‘अगदी सरळ आहे. पूर्वी मी आणि सोन्या फक्त संगीत आणि वाचनाचा सराव करायचो. आता आणखी फ्रेंच कवितांचाही अभ्यास करतो.’’
मुलगा बिल्यायेव्हला चिकटला आणि त्याच्या घड्याळ्याच्या साखळीशी खेळायला लागला.
‘‘मी शाळेत जायला लागलो की.. आई मला घड्याळ घेईल.’’ तो बोलायला लागला, ‘‘ मी तिला सांगेन की,… कसल्या तरी लॉकेटचीच साखळी घे. बाबांजवळच फक्त तसं लॉकेट आहे. तुमच्या घड्याळ्याला फक्त तशी पट्टी आहे. त्यांच्या साखळीत अक्षरं… त्याच्या मधोमध आईचं चित्र आहे. आता पपांच्या घड्याळाची साखळी नवी आहे.’’
‘‘ते तुला कसं कळलं? तू पपांना भेटतोस?’’
‘‘हो,… आणि नाही.’’
‘‘नाही. तू खरं सांग, न लपवता सांग. तुझ्या चेहेर्याधवरून दिसतंय की तू खोटं बोलतोय्स. बोल, भेटतोस ना? मला दोस्त समजून सांग.’’
अल्योशा विचारात पडला.
‘‘पण तुम्ही आईला सांगणार नाही ना?’’
त्यानं विचालं.
‘‘अर्थातच. नाही सांगणार.’’
‘‘वचन?’’
‘‘अगदी वचन.’’

अल्योशानं आजूबाजूला पाहिलं आणि हळूच सांगितलं, ‘‘फक्त तुम्ही आईला सांगू नका.– खरं तर कुणालाच सांगू नका.– कारण ते गुपित आहे. जर का ममाला कळलं तर सोन्या, पिलग्येया आणि मी अडकलोच.– ठीक आहे तर. नीट ऐका.– दर मंगळवारी आणि शुक्रवारी मी आणि सोन्या पपांना भेटतो. आम्ही पिलग्येयाबरोबर जेव्हा फिरायला जातो, तेव्हा मिठाईच्या दुकानात जातो आणि तिथे पपा आमची वाट पाहात असतात.– ते नेहमी एका स्वतंत्र खोलीत बसलेले असतात.’’

‘‘आणि तुम्ही तिथे काय करता?’’
‘‘काही नाही. आधी एकमेकांची खुशाली विचारतो, नंतर मग टेबलाशी बसतो, मग पपा आम्हाला पिराष्कीबरोबर कॉफी देतात. सोन्या मटनाचे पिराष्की खाते. मला मटणाचे फारसे आवडत नाहीत. मला कोबीचे आणि अंड्याचे आवडतात. आम्ही असं खातो की जेवणाच्या वेळेस ममाच्या लक्षात येणार नाही. तरी आम्ही घरी जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करतो.’’
‘‘तुम्ही तिथे कशाबद्दल बोलता?’’
‘‘पपांबरोबर? सगळं काही. ते म्हणतात की आम्ही मोठे झाल्यावर ते आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाणार आहेत. पण सोन्याला ते नकोय आणि मला ते कबूल आहे. अर्थात आईशिवाय कंटाळवाणं होईल, पण मी तिला पत्र लिहीन ना. कदाचित सणावारी मी तिच्याकडे जाईन. शिवाय पपा म्हणतात की ते मला घोडा विकत घेऊन देतील. खूप प्रेमळ आहेत ते. मला कळत नाही की आई त्यांना आमच्याकडे राहायला का बोलवत नाही? आणि त्यांना भेटायची परवानगी का देत नाही? खरं तर ते आईवर खूप प्रेम करतात. आम्हाला ते सतत तिची तब्येत कशी आहे? ती काय करते? असं विचारत असतात. जेव्हा ती आजारी होती, तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारून घेतला आणि अशी खूप धावपळ करत राहिले. आम्ही तिचं नीट ऐकावं, तिचा मान ठेवावा असं ते आम्हाला समजावून सांगत असतात. आता खरं सांगा आम्ही अभागी आहोत का?’’
‘‘का बरं?’’
‘‘पपाच असं म्हणतात. ते म्हणतात दुर्दैवी पोरं. त्यांचं हे बोलणं ऐकायलाही चमत्कारिक वाटतं. ते म्हणतात, तुम्ही दुर्दैवी आणि तुमची ममाही दुर्दैवी.’’
पेंढा भरलेल्या पक्ष्यावर अल्योशानं टक लावली, आणि विचार करू लागला.
बिल्यायेव्ह म्हणाला, ‘‘अस्सं तर. तुम्ही मिठाईच्या दुकानात अशा भेटी घडवून आणता तर आणि ममाला काही कळत नाही?’’
‘‘नाही. तिला कुठून समजणार? पिलग्येया काहीही झालं तरी सांगणार नाही आणि परवा तर पपांनी आम्हाला पेर घेऊन दिले. इतके गोड की जसा काही जॅमच. मी तर दोन पेर खाल्ले.’’
‘‘आणि पपा माझ्याबद्दल काहीच बोलत नाहीत?’’
‘‘तुमच्याविषयी? तुम्हाला कसं सांगावं?’’
अल्योशानं बिल्यायेव्हच्या चेहर्यायकडे शोधक दृष्टीनं पाहिलं आणि खांदे उडवले.
‘‘विशेष असं काही बोलत नाहीत’’ अल्योशा म्हणाला.
‘‘तरी पण काय बोलतात?’’
‘‘पण तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना?’’
‘‘का म्हणून? ते मला शिव्या देतात का?’’
‘‘ते शिव्या देत नाहीत— पण— तुमच्यावर रागवतात. ते म्हणतात, तुमच्यामुळेच आई सुखी नाही, आणि… तुम्ही आईला पळवलंत. खरोखर, ते जरा विचित्रच, चमत्कारिक आहेत. मी त्यांना समजावून सांगतो – तुम्ही चांगले आहात, पण ते फक्त मान हलवतात.’’
‘‘मी तिला पळवलं असं ते म्हणतात?’’
‘‘होय. पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका, निकोलाय इलिच.’’
बिल्यायेव्ह उठला आणि हॉलकडे चालायला लागला.
‘‘हे विचित्रच आहे, आणि — विनोदच आहे’’.— तो पुटपुटला. आणि वेडावून दाखवत हसला. ‘‘सगळा त्याचा दोष आहे आणि म्हणे मी पळवलं ! तो तुला असं म्हणाला, की मी तुझ्या आईला पळवलं?’’
‘‘होय. पण बघा.— तुम्ही सांगितलं होतंत की तुम्ही वाईट वाटून घेणार नाही म्हणून.’’
‘‘मी नाही वाईट वाटून घेत. आणि—आणि हे तुझं काम नाहीये. ही सगळीच थट्टा आहे.’’

इतक्यात घंटा ऐकू आली,—पोरगा बाहेर धावला. मिनिटभरात एका स्त्रीनं छोट्या मुलीसह हॉलमध्ये प्रवेश केला. ती ओल्गा इव्हानोव्हना होती.–अल्योशाची आई. तिच्या पाठोपाठ अल्योशा उड्या मारत आला. मान हलवून बिल्यायेव्ह खोलीकडे जायला निघाला.
‘‘अर्थातच. आता मला नाही, तर कुणाला दोष द्यायचा? त्याचं बरोबर आहे. तो अपमानित नवरा आहे.’’ तो पुटपुटला.
ओल्गा इव्हानोव्हनानं विचारलं,’’ तुम्ही कशाविषयी बोलत आहात?’’
‘‘कशाविषयी? मग ऐक तर. तुझा नवरा म्हणतो की मी नीच आहे. खलनायक आहे. आणि मी तुला अन् मुलांना पळवलं. तू सर्वार्थानं दु:खी, अभागी आहेस. आणि मीच तेवढा प्रचंड सुखी आहे.’’
‘‘मला समजत नाहीये, निकोलाय. हे सगळं काय चाललं आहे?’’
‘‘तर मग अल्योशालाच विचार.’’ बिल्यायेव्ह म्हणाला.
अल्योशा ओशाळला आणि एकदम भयानं पांढरा फटक पडला. ‘‘निकोलाय इलिच, शू!…’’ तो मोठ्यानं कुजबुजला.
ओल्गा इव्हानोव्हनाने अल्योशाकडे आश्चर्याने पाहिले.
‘‘विचार तर’’, बिल्यायेव्ह बोलत राहिला. ‘‘तुझी पिलग्येया त्यांना मिठाईच्या दुकानात त्यांच्या वडिलांची भेट घडवून आणण्याकरता घेऊन जाते. पण खरा मुद्दा हा नाहीये. तर असं आहे की बाप सहन करतोय आणि मी खलनायक आहे. मी म्हणे तुमचं दोघांचं जीवन उध्वस्त केलं.’’

‘‘निकोलाय इलिच, तुम्ही मला वचन दिलंय.’’ अल्योशा उद्गारला. बिल्यायेव्हने हातवारे करत म्हटलं, ‘‘मला प्रामाणिकपणा हा जास्त महत्त्वाचा आहे. मला या ढोंगीपणाचा, खोटेपणाचा राग आहे.’’ ओल्गा इव्हानोव्हनाच्या डोळ्यात पाणी तरारलं. ती म्हणाली,’’ मला समजत नाहीये. अल्योशा तू वडिलांना भेटतोस?’’ तिनं विचारलं.
अल्योशाला तिचं बोलणं ऐकूच आलं नाही, तो बिल्यायेव्हकडे भयचकित नजरेनं पाहात राहिला.

‘‘हे शक्यच नाही.’’ आई म्हणाली, ‘‘पिलाग्येयाव्हला जाऊन विचारतेच.’’ आणि ओल्गा इवानोव्हना तिथून निघून गेली. अल्योशा थरथरत होता. तो एकदम म्हणाला, ‘‘निकोलाय इलिच, तुम्ही मला वचन दिलं होतंत.’’
बिल्यायेव्हने पुन्हा हात ओवाळले आणि तो चालायला लागला. तो खूपच दुखावला गेला होता. आधीच छोट्या मुलाचं तिथं असणं हे त्याच्या लक्षात राहिलं नव्हतं. अल्योशा कोपर्याात बसून आपल्याला कसं फसवलं ते सोन्याला सांगत होता. तो थरथरत, अडखळत, रडत सांगत होता. आयुष्यात प्रथमच असा वाईट अनुभव त्याला येत होता. यापूर्वी त्याला कळायचं नाही की गोड पेर, केक आणि महागडं घड्याळ, याशिवाय अजून खूप काही असतं आणि त्याला मुलांच्या भाषेत नावच नसतं.

(केल्याने भाषांतर, जुलै-सप्टेंबर २००६ मधून साभार)