वेदी – डिसेंबर २००७

‘‘मला डोलणारा लाकडी घोडा, माऊथ ऑर्गन आणि मेकॅनो हवाय.’’ मी एकदा जेवणाच्या वेळी काका काकूंना म्हणालो. ‘‘ही खेळणी तुझ्या घरी होती का?’’ रासमोहनकाकांनी विचारलं.
मला जरा विचार करावा लागला. कधी कधी घराकडच्या गोष्टी इतक्या लांब गेल्यासारख्या वाटायच्या…. ‘‘हो.’’ मी म्हणालो.
‘‘तुला त्यांची आठवण येते का?’’ त्यांनी विचारलं. ‘‘मला आत्ता पाहिजेत त्या वस्तू.’’
‘‘तुला तुझी खेळणी स्वतः तयार करता यायला हवीत.’’ काकू म्हणाल्या. ‘‘सगळी शहाणी मुलं आपली खेळणी आपणच तयार करतात.’’ काका म्हणाले.

जेवण झालं. मुलांच्या वसतीगृहाकडे जायच्या आधी, रासमोहनकाकांनी मला सिगारेटचे रिकामे डबे खेळायला दिले. ते उभट आणि गोल होते. पहिल्यांदा मला त्याचं काय करायचं ते कळलं नाही. मग एक कल्पना सुचली. मी खिळ्यानं त्या डब्यांच्या तळात एकेक भोक पाडलं. दोन्ही डब्यांना जोडणारा एक लांब दोरा बांधला. एक डबा देवजीला दिला आणि एक मी घेतला आणि पळत लांब जाऊन उभा राहिलो. ‘‘हॅलो हॅलो. मी बोलतोय. तिकडून कोण बोलतंय?’’ तो डबा मी तोंडाच्या इतका जवळ धरला होता की माझं मलाच काय बोलतोय ते ऐकू येत नव्हतं.

मग मी माझा डबा कानाजवळ नेला आणि देवजी काय बोलतोय ते ऐकायचा प्रयत्न केला. मला काय ऐकू आलं असेल ! फक्त किंचितशी घर घर. पण मला हा खेळ आवडला. थोड्याच दिवसात त्याचा कंटाळाही आला. मग रासमोहनकाकांनी माझ्या खुशालीची तार डॅडीजींना पाठवल्याचं सांगितलं तेव्हा दुसरी कल्पना सुचली. त्यांनी पोस्टातल्या कारकुनाला मजकूर सांगितला आणि त्यानं तो मशीनवर टक टक टक टक करून पंजाबला पाठवला, तो ताबडतोब पोचला असणार असं त्यांनी मला सांगितलं होतं.

त्या दिवशी मी एक रिकामी काड्याची पेटी घेतली. त्यातला आतला उघडा भाग घेतला. त्यावर घट्ट दोरा गुंडाळला. त्यात एक काडी अडकवली. ती फिरवून फिरवून दोर्याला चांगला ताण देता येईल अशी ठेवली. इतका ताण दिला की काडी जवळजवळ ताठ उभी राहिली. मग मी डबी एका हातात धरली आणि दुसर्या हातानं काडी सटक् सटक् हलवली. काडी डबीवर आपटून टक् टक् टक् आवाज येऊ लागला तो मी मोठ्या उत्साहात ऐकत राहिलो. मग कल्पना केली की मी संदेश पाठवतोय. ‘‘मला एका माऊथ ऑर्गनची म्हणजे वाजवायच्या बाजाची, डुलणारा घोडा आणि मेकॅनोची गरज आहे. कृपया हे सगळे पाठवावे.’’

थोड्याच दिवसात बर्याच मुलांनी स्वतःचे काडेपेटीचे तारायंत्र बनविले. रासमोहनसरांनी वसतीगृहाबाहेर त्याच्या वापराला बंदी घातली होती तरी आत आम्ही मनसोक्त वापरत होतो. मग कोणाच्या काडेपेटीचा सगळ्यात जास्त मोठा आणि खूप वेळ टिकणारा आवाज येतो ते बघण्याची आमची स्पर्धाच लागायची.
-०-
पाऊस धोधो पडायला लागला होता. अब्दुल म्हणाला, ‘‘देवानं सगले नळ उघडले आहेत. आणि त्यांचे नळ चांगले मोठ्या तोंडाचे आणि खूप दाबानं पाणी सोडणारे आहेत.’’ पाऊस थांबायचा पण पुन्हा सुरू होण्यासाठीच.
मागच्या अंगणातलं ओलं गवत माझ्या गुडघ्यापर्यंत यायला लागलं होतं. पाऊस थांबल्यावर आमच्यापैकी खूपजण त्या गवतात आडवे व्हायचे. आम्ही गवतात झाकून जायचो आणि आम्ही प्राणी असल्याचं सोंग करायचो.
‘‘पावसामुळे साप बाहेर येतात.’’ अब्दुल म्हणाला. तो अकरा वर्षांचा होता आणि त्याला अजिबात दिसायचं नाही. ‘‘तुम्हाला माहीत आहे या अंगणाच्या टोकाला ते झाड आहे ना जिथे गिधाडं घरटी करतात, त्यात एक अजगर राहतो. त्यानं

एका अंध मुलाला विळखा घालून मारून टाकलं होतं. अजगरानी तुम्हाला पकडलं तर तुम्हाला विळखा घातल्यावर तुम्हाला त्याची फुसफुस ऐकू येईल. तुमच्या बरगड्या आणि हाडं कडा कडा मोडण्याचा आवाज ऐकून तो आनंदानं डोलेल तेही तुम्हाला जाणवेल. मग तुम्हाला मेलेलं तसंच खाली गवतात टाकून झाडावर जाईल. दुसरा आंधळा मुलगा येऊन तुम्हाला अडखळून पडेल याची वाट पाहत बसेल.’’
‘‘मी छोटासा चाकू बाळगेन जवळ. माझ्याजवळ आला तर वार करेन.’’ मी म्हणालो.
‘‘अजगराचे दोन तुकडे केले तर एका ऐवजी दोन अजगर तयार होतात. तीन तुकडे केले तर तीन अजगर होतात. असे ते वाढतात. आणि कापलेला अजगर जास्तच धोकादायक असतो. तो स्वतःला गुंडाळून घेतो आणि हवेत उडतो. मग कपाळाला किंवा गालाला चावून मारतो. डोळस माणसाला तो दिसेल आणि त्याला दूर पळून जाऊन लपता येईल पण आंधळ्या माणसाला तो आलेला कळणार नाही. बरीच आंधळी माणसं अशीच मरतात.’’ अब्दुलनं सांगितलं. मी त्याचा हात घट्ट धरला. दुसर्या दिवशी मी मच्छरदाणीतून बाहेर यायलाच तयार नव्हतो.
‘‘काय झालं?’’ देवजीनं विचारलं.
‘‘साप !’’ मी ओरडलो. ‘‘मला आता मच्छरदाणीसारखी एक सापदाणी हवी.’’ मी त्याला झाडातल्या अजगराबद्दल सांगितलं.
‘‘हो खरं आहे. इथे उडणारे आणि कापले तर वाढणारे साप आहेत. ते दिवसा जमिनीखाली राहतात आणि फक्त रात्री बाहेर येतात. अब्दुल तुला उगीच घाबरवतो आहे. जमलं तर तो रासमोहनसरांना सुद्धा घाबरवेल. खोडसाळ आहे नुसता.’’ त्यानंतर अब्दुलला घाबरवायच्या युक्त्या मी शोधायला लागलो.
एकदा मी दोरीला एका पुढे एक गाठी मारल्या आणि त्याचं वेटोळं केलं आणि एक टोक वर काढलं. ते वेटोळं ओंजळीत घेऊन मी अब्दुलकडे गेलो. त्याला कोपराने ढोसत म्हणालो, ‘‘माझ्या हातात काय आहे ते हात लावून बघ.’’
‘‘आधी मला सांग काय आहे ते’’, तो मागे सरकत म्हणाला. ‘‘तुला बघायचं नसेल तर मी सांगणारच नाही.’’ त्याची उत्सुकता वाढली.
मी माझी ओंजळ पुढे केली. त्यानं दबकत हात पुढे केला आणि दोरीला हात लावला.
‘‘ए जपून, साप आहे.’’ मी ओरडलो.
‘‘मुलांच्या वसतीगृहात साप.’’ असं ओरडत अब्दुल दाराकडे धावला. मी जोरात हसलो. मी गंडवलंय हे त्याला कळलंच. त्यानं माझा हात पिरगाळला. आता तो तुटणार असंच वाटलं मला. तो माझ्या दुप्पट उंच होता आणि चांगला शक्तिवान होता.

मी त्याची क्षमा मागितली आणि पुन्हा कधी त्रास न देण्याची कबुली दिली. त्यानं मला सोडून दिलं.

हा प्रसंग अब्दुल विसरून गेलाय असं मला वाटलं तेव्हा मी दुसरी खूप लांब दोरी घेतली. त्यावर लाईफबॉय साबण चोळला आणि दोरी बुळबुळीत केली. त्याचा फास करून मागच्या अंगणात अब्दुलच्या गळ्यात फेकला. फुस् फुस् आवाज काढत डोलू लागलो. ‘सावधान, अजगर आहे तो.’

तो घाबरून जोरात किंचाळला पण त्याच्या लगेच लक्षात आलं. आपल्याला परत मामा बनवलाय. त्यानं मला पकडलं पण या वेळेस मी तयारीत होतो. पटकन सुटून पळून गेलो.
त्या दिवशी जेवणानंतर माझा पाठलाग करत अब्दुल जिन्यावर धावत आला. मला पकडून म्हणाला ‘‘आज तू काय जेवलास?’’
‘‘टोस्ट आणि मटण. काका काकूंना मटण फार आवडतं पण आम्ही ते आठवड्यातून एकदाच खातो.’’

तो कुजकट हसला आणि म्हणाला, ‘‘मक्याची भाकरी आणि त्याबरोबर डाळ पालक याच्यासारखं दुसरं खाणं नाही. त्यानं चांगली शक्ती येते.’’ मग तो माझे कपडे, गादी, खाणं याबद्दल आणि मला मिळणार्या बायकी सोयींबद्दल नावं ठेवू लागला. ‘‘तू रस्त्यावरचा भिकारडा मुलगा आहेस.’’ मी त्याला चिडविण्यासाठी म्हणालो.

इथे येण्याआधी अब्दुल रस्त्यावर भीक मागत असे हे आम्हाला सगळ्यांनाच माहीत होतं. भीक घालण्यासाठी थांबलेल्या माणसाचं पाकीट त्यानं मारलं होतं. पोलिसांनी अब्दुलला पकडून सुधारगृहात पाठवलं होतं. बिघडलेल्या अंध मुलाचं काय करायचं ते त्या सुधारगृहातील लोकांना माहीतच नव्हतं. म्हणून त्यांनी अब्दुलला रासमोहन यांच्या शाळेत आणलं आणि त्यांनी त्याला शाळेत जाऊन सुधारण्याची संधी देण्याचं मान्य केलं होतं.
अब्दुलनं माझा दंड घट्ट पकडला. ‘‘बुळ्या आणि बायक्या.’’ त्यांना मला चिडवलं. ‘‘टोस्ट आणि मटण, बुळ्या आणि बायक्या’’ अब्दुलच्या खरखरीत हाताला घट्टे पडले होते आणि त्यांनं तंबाखूचा वास येत होता. तो शाळेच्या वर्कशॉपमध्ये खुर्च्यांचं वेत विणत असे आणि चोरून बिड्या ओढत असे.

मला मिळणार्या खास सवलती काही मला फार आवडत नव्हत्या पण त्याबद्दल इतर मुलांसमोर मला सतत चिडवणारा अब्दुलही आवडत नव्हता.
मी माझा हात सोडवून घेतला आणि मुलांच्या जिन्यावरून धूम ठोकली. त्याला चकवण्यासाठी मी नागमोडी पळत होतो. माझ्या मागून येणारे त्याचे पळणारे चामड्यासारखे पाय मला ऐकू येत होते. मी खाली थेट वर्कशॉपमध्ये गेलो. तो नेहमी जिथे विणायला बसतो तेथे पोचलो. त्यानं अर्धवट विणून ठेवलेली खुर्ची पकडली. मी काय करतोय ते मला कळायच्या आत वेतकामाची सुरी उचलून झपाझप खुर्चीच्या विणीचे मी तुकडे केले.
त्यानं ऐकलं. त्याच्या लक्षात आलं.

मी उडी मारून टेबलाच्या मागे लपलो. अब्दुल धडपडत मला शोधत होता खुर्च्यांवरून अडखळून पडत होता. तोडानं शिव्या देत होता. ‘‘थांब तू हातात आलास की तुझे बायकी हातच कापून टाकतो. बघच तू.’’
काय चाललं आहे हे पाहायला अब्दुलचा मित्र तारकनाथ धावत आत आला. त्याला थोडं दिसायचं त्यामुळे अशा मुलांशी मैत्री करायला पूर्ण आंधळी मुलं नेहमीच उत्सुक असायची. मला भीती वाटली की तो पकडून मला अब्दुलच्या ताब्यात देईल पण त्यानं भांडणाचा नियम पाळला. अंध मुलाच्या भांडणात थोडं दिसणार्या मुलांनी पडायचं नाही हा तिथला नियम होता. अब्दुल मला पकडणारच होता पण मी टेबलाखालून पळालो आणि मुलांच्या वसतीगृहात देवजीजवळ जाऊन बसलो. त्यानंतर अब्दुलनं मला एकट्याला गाठू नये म्हणून मला काळजी घ्यावी लागत असे.

एक दिवस माझ्या घरून माझ्यासाठी पाठवलेले थोडे पैसे मिळाले. मग मी त्यातले अर्धे अब्दुलला दिले. मी त्याचं वेतकाम कापलं होतं आणि त्याला ज्यादा काम करायला लागलं होतं. त्याची परतफेड करून त्याच्याशी असलेलं भांडण मला संपवायचं होतं.
‘‘मी जर तुला मुलांच्या वसतीगृहातलं एक गुपित सांगितलं तर तू मला तुझे उरलेले पैसे देशील?’’ तो म्हणाला.
मी आधी नाही म्हणालो. पण माझी उत्सुकता फारच वाढायला लागली आणि मी त्याला उरलेले पैसे देऊन टाकले.

त्या रात्री सगळे झोपल्यानंतर अब्दुल मला न्यायला आला. मी त्याच्या मागून गेलो. मला वाटलं आम्ही मुलांच्या सार्वजनिक बाथरूममध्ये चाललो आहे. कारण बहुतेक मुलांना रात्री तिकडे एकटं जायला भीती वाटायची. पण तो मुलांच्या जिन्याकडे वळला. मला परत जावंसं वाटायला लागलं कारण साप आणि भुतं रात्रीच बाहेर येतात. पण माझी उत्सुकता ताणली होती. मी त्याच्या मागून जात राहिलो. तो व्हरांड्यातून शाळेच्या फाटकाकडे जायला लागला. मला भीती वाटली. हा मला घेऊन पळून जाणार बहुतेक आणि परत रस्त्यावर भीक मागायला लागणार. मी थांबलो. त्यांनं माझा हात पकडला आणि टाटा मिलच्या बाजूच्या शाळेच्या भिंतीकडे जाऊ लागला. तिथे भिंतीत काही सळ्या होत्या त्याच्यावर त्याने माझे हात ठेवले. मी घरी असताना जुना गंजलेला घोड्याचा नाल खेळायला घ्यायचो. त्याच्यासारखा होता तो स्पर्श.
‘‘हे काय आहे?’’ मी विचारलं.
‘‘ते मुसलमानाच्या हॉटेलाच्या खिडकीचे गज आहेत. मिलमधले कामकरी तिथेच खायला जातात.’’ त्यानं सांगितलं.

गजांमागच्या काचेवर अब्दुलनं एक आण्याच्या नाण्यानं टक टक केलं. रात्रीच्या वेळी तो काचेवर होणारा नाण्याचा आवाज खूप मोठा वाटत होता. मला खात्रीच होती की रासमोहन आम्हाला पकडतील आणि पट्टीनं रट्टे देतील.
अचानक पलीकडच्या बाजूनं खिडकी उघडली. कुणीतरी दबक्या आवाजात म्हणालं, ‘‘गुलाबसरबत, लेमन गोळ्या, भेळपुरी’’. भेळपुरी म्हणजे मुंबईतल्या रस्त्यावरचा चटपटीत खाऊ होता.

‘‘सगळं काही दोघांसाठी.’’ पैसे देताना अब्दुल म्हणाला. कुणीतरी पलीकडून गुलाब सरबताच्या दोन बाटल्या, लेमन गोळ्यांची दोन पाकिटं आणि कागदात बांधलेले भेळेचे दोन पुडे दिले.
‘‘चल पटापट खा. आपल्याला या बाटल्या परत करायच्या आहेत.’’ अब्दुल म्हणाला.

मी पूर्वी कधीच भेळपुरी खाल्लेली नव्हती. पहिल्याच घासाला माझं तोंड तिखटानं भाजल्यासारखं झालं. पण नंतर लेमन गोळ्यांनी तोंड गोड झालं आणि गुलाब सरबतानं थंडही झालं. मी अशा रुचकर पदार्थांची मेजवानी कधीच खाल्ली नव्हती. आम्ही परत येत होतो तेव्हा मी अब्दुलला विचारलं ‘‘असं चोरासारखं का जावं लागतं त्या मुसलमानाच्या हॉटेलात?’’
‘‘रासमोहनसर आहेत शुद्ध ख्रिश्चन आणि तो हॉटेलवाला आहे घाणेरडा मुसलमान. मी मुसलमान आहे आणि मला घाणेरडं मुसलमानांचं खाणं आवडतं.’’ अब्दुलनं सांगितलं.
‘‘माझा हिंदुपणा संपला ना म्हणजे मी मुसलमान होईन बरं का आणि तुझे घाणेरडे मुसलमान पदार्थ खाईन.’’ मी म्हणालो.

त्यानंतर मी, अब्दुल आणि इतर काही मित्र, जवळ पैसे असले तर असेच रात्री खायला जायचो. मुलांना खुर्च्यांच्या वेतकामाचे पैसे मिळायचे. काहींना त्यांच्या मिशनरी आई-वडिलांकडून पैसे यायचे. मलाही माझ्या घरून हात खर्चाला पैसे यायचे. आम्ही त्या खिडकीशी जाऊन नाण्यानी टक टक करायचो आणि खाणं पिणं उरकायचो. एकदा हॉटेलवाल्यानं एक नवाच गोड पदार्थ केला. त्याची चव पिठीसाखरेसारखी होती आणि स्पर्श कापसासारखा होता. तो खाऊ आमचा सगळ्यात आवडता झाला. अब्दुलनं त्याचं नाव ठेवलं. ‘‘आईचा पापा.’’