संवादकीय – जुलै २००७
परीक्षांचे निकाल लागले. परीक्षांना बसलेल्या आसपासच्यांना आपण अभिनंदनाचे किंवा सांत्वनाचे दोन शब्द सांगत आहोत.
‘वा ! उत्तम गुण मिळवलेस, त्यासाठी खूप कष्ट केलेस, अभिनंदन’ किंवा ‘ह्यावेळी जमलं नाही ना, असू दे निराश होऊ नकोस, पुढच्या वेळी जोरदार अभ्यास करून परीक्षा दे. नक्की यश मिळेल.’
ह्या आपल्या वाक्यांमधला मुलामुलींसाठीचा प्रेमाचा भाग मानला आणि बाजूला ठेवला, तर आपण अतिशय अर्थहीन आणि त्यापेक्षा जास्त, भयंकर खोटारडं बोलत आहोत.
दहावी, बारावी, महाविद्यालयीन अशा कोणत्याही परीक्षांचं उदाहरण घेतलं तरी शिक्षणक्रमातला एक टप्पा आपण पार केला असं त्यानंतर वाटून घेता येणार नाही. तो टप्पा नाही, पुढील जीवनाच्या रस्त्यावरचा थांबा नाही, ते साधं वर्षभर केलेल्या कामाचं मूल्यमापनही नाही. ती आपली सवय आहे. व्यवस्था नाकारता येत नाही, म्हणून स्वीकारलेली वंचना आहे.
आपल्या सगळ्यांनाच ही सवय असते. कुठलीही परीक्षा देऊन बाहेर पडल्यावर किती गुण मिळणार ह्याची आपण भाकितं करतो. विशेष लक्ष घालणारे पालक-शिक्षक आणि मुलंसुद्धा, प्रश्नाप्रश्नाचे गुणांचे अंदाज काढून हिशोब करतात.
जर आपण मुलामुलींना परीक्षांना सामोरं जायला लावतो, त्यासाठी तयारी करण्याची अपेक्षा करतो, तर हे होणं अगदी साहजिक आहे. पण अडचण तिथेच आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली उत्तरपत्रिका आणि मिळालेले गुण ह्यांचा परस्परसंबंध फारसा उरलेला नाही. थोडंसं मागे बघितलं तर शिकवलेला अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका ह्यांचं तरी शंभर हिश्शांचं नातं आहे का?
आताच्या दहावी परीक्षेच्या वेळचा गोंधळ तर आपण सारे जाणताच. प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न येतातच कसे? त्यासाठी तपासणी व्यवस्था असायला नको का? मुलामुलींवर अन्याय व्हायला नको हे तर झालंच, पण मग त्यासाठी सरसहा गुण वाटप करणं ह्यापेक्षा काही बरे पर्याय निघणार नाहीत का? आणखी एक प्रश्न मनात येतो, हे मोफत तीस गुण मिळूनही किती जण त्या परीक्षेत नापास झाले? त्यांचा काही विचार आपण करू लागतो की नाही? हेही प्रश्न धसाला लावायला हवेत. होतं आहे काय? ज्या पालकांची मुलं परीक्षेला बसली आहेत, तेवढेच पालक त्या मुलांवर अन्याय होऊन देणार नाही म्हणून आवाज उठवतात. ही अन्यायाची दाद मागण्याची वरवरची आणि मर्यादित पद्धत झाली.
मुलामुलींवर ह्या परीक्षा व्यवस्थेत होत असणारा एकुणातला अन्याय फार मोठा आहे, घातक आहे आणि त्याला विरोध करण्याची गरज मात्र आपल्या तात्पुरत्या उत्तर काढण्याच्या नादात विसरून जाते आहे.
शालेय शिक्षणव्यवस्थेत शिरकाव झाला तरी तिथल्या अपमान, शिक्षा, निरस शिक्षणाला कंटाळून बाहेर पडणार्यापासून हे अन्यायाचं चक्र सुरू होतं. ह्यात शिकण्याचा, आकलनाचा आनंद वगैरे काही प्रेरणा असत नाही, मग एकमेव प्रेरणा उरते ती स्पर्धेची. ती स्पर्धात्मक प्रेरणा शिक्षकांना फार महत्त्वाचीच वाटते, कारण मुलामुलींकडून किमान सहकार्य मिळवायचं तर दुसरं काहीही त्यांच्या हातातच नसतं.
ही स्पर्धात्मक वृत्ती-उत्तम-त्याहून अधिक उत्तम-ह्या रस्त्यानं जावी अशी मूळ इच्छा असली तरी तसं घडत नाही. कष्ट केलेल्या आणि गुणही मिळालेल्या मुलामुलींच्या प्रतिसादात ह्या स्पर्धात्मकतेच्या परिणामांचं रूप स्वच्छपणे दिसतं.
ही मुलंमुली आत्ताच्या एस्.एस्.सी.तल्या तयार तीस गुणांबद्दल म्हणतात – म्हणजे आमच्या कष्टांना काही किंमतच उरली नाही. कष्ट न करणारांनाही तेवढेच गुण मिळत आहेत. हा गैरपरिणाम निश्चित आहे, कारण अभ्यासाचं फलित जाणिवा उंचावण्यात असतं. गुणाच्या बेरजेत नसतं, हे मुलंमुली इथं विसरत आहेत. पण त्यासाठीचा दोषही त्यांना देता येत नाही, कारण परीक्षा, त्यातले गुण, त्यातली चुरस, आणि पुढच्या प्रवेशांसाठी त्यांचा वापर हे सगळं आपणच तर त्यांच्या मागं लावून दिलेलं आहे.
म्हणून मग आपण मुलांची समजूत घालतो की प्रक्रिया महत्त्वाची, निष्कर्ष नाही !
एकीकडे आपण बोर्डात येणं, बक्षिसं मिळवणं ह्या सगळ्याला महत्त्व देतच असताना आपण घातलेली समजूत मुद्दा खरा असूनही पोकळ ठरते, (नाही म्हणायला, आता बोर्डाची गुणवत्ता यादी बंद करण्यात आली आहे ही बातमी थोडी आशादायक आहे.) परिस्थितीवश मुलं त्यामागची आपली आधाराची भावना मान्य करतात, पण त्यांची समजूत खर्या अर्थानं पटत नाही.
आज कितीही नको-नाही म्हणलो तरीही जागतिकीकरणाचा हत्ती आपल्या अंगणात आलेलाच आहे. मोठ्या लोकसंख्येचा देश म्हणून भारताकडे विशेष लक्षही आहे. अशावेळी आपली खरी ताकद मानवी शक्ती हीच आहे. पण मानवी शक्तीचा अर्थ केवळ दोन हात असा नसून त्या वरचं डोकं आणि त्यामधलं हृदय असाही हवा आहे.
मला हे लिहिताना शाब्दिक फुलोरा वगैरे अजिबात मांडायचा नाही. माझा अनुभव असा आहे की पदवीधर किंवा त्याहून वरचढ शिक्षणं घेऊन येणार्यांपैकी बहुतेकांची पातळी ही अक्षरशः निराशाजनक असते. शिकायची तयारी असेल तर हेही बदलता येईल पण, शिकण्याची, कष्ट करण्याची सवयच नसली तर ती लावून घेणं अवघड पडतं.
पदवी परीक्षांमध्ये साठ ते सत्तर टक्के गुण मिळवायला आठवडाभर अभ्यास करून पुरतो. मग अंग मोडून मेहनत करण्याचा प्रश्न येतोच कुठे?
नंतर ह्यातल्या काही मुलांना कष्टाचं, परिश्रमाचं मोल कळतंही पण तोपर्यंत काळ पुढे गेलेला असतो. आर्थिक मिळकतींचे ताण सामोरे आलेले असतात. पुन्हा कमी कष्टात भरपूर पैसा देणारे धंदे – वैद्यकीय बाजार, शिक्षण बाजार, आयटी बाजार, एवढंच काय समाजकार्याचा बाजारही असे अनेक आ वासून समोर उभे असतातच.
अशा वेळी आपण काय काय करू शकतो, ह्याची यादी बरीच मोठी होईल, ती प्रत्यक्षात आणावी लागेलच, पण एक गोष्ट तर नक्की करता येईल, आपल्या मुलाबाळांना ह्या व्यवस्थेची व्यर्थता आणि मग जी काय असेल ती अनिवार्यता सांगणे.
शिक्षणक्रमात जर कष्टाची, अभ्यासाची, फारशी गरज नसेल तर त्याशिवायच्या आवडीच्या, रस वाटणार्या विषयात वेळ द्या, शिकण्याजोगं आसपास चिक्कार आहे. माध्यमं हात जोडून समोर उभी आहेत. चांगल्या-वाईटाचा निर्णय घ्यायला, आपल्याला नेमकं काय करायचंय, आणि ते का करायचंय ह्याची स्वतःची स्वतंत्र उत्तरं तुम्हालाच शोधायला लागतील.
कमी कष्टात कोट्यवधींची मालमत्ता केल्यानं मिळणारा भेसूर आनंद मिळवावासा वाटतो आहे का, ह्यासाठी स्वतःचा शोध घ्यायला लागेल, कारण तुम्ही जितके कमीत कमी विचार कराल, जितके ऐषारामी राहाल तितकं फावणार्यांनी, तशाच सवयी लावणार्या शिक्षणसंस्था उघडून तुमच्यासमोर धरल्या आहेत.
आजच्या शिकत्या पिढीला हे सांगावंसं वाटतंय ते भारताला ‘महासत्ता’ बनवण्याच्या क्रूर कविकल्पनांमधून अजिबात नाही. तर…
‘तुम्हाला हे कळत होतं तर वेळीच आम्हाला का सांगितलं नाहीत, असं म्हणून हीच आपली मुलंबाळं आपला कान चावतील, अशी भीती वाटते आहे, म्हणून.