पलिता

Magazine Cover

आजपातूर तुमचं समदं आयकत आले म्या
बस म्हनलात बसले – उठ म्हनल्याव उठले
माझ्या मायनं सांगीतल्यावनी
द्याल तेच ल्यायले आन रुचल तेच बोलले –
चुलीतलं लाकूड हुन चुलीतच जळाले –
पन… आता….
माज्या लेकीलाबी त्याच आगीच्या
हवाली करायला निघालाव तुम्ही
आता न्हाय गुमान बसायची म्या –
जगाच्या लाजंकाजं का होईना,
दोन पाच वर्साचं शिक्षनाचं बळ दिलं
आपण तिच्या पदरात –
आवो ऽ हरनागत पळतंय आन चित्यागत
अभ्यासावर झेप घालतंय लेकरू….
आन इतक्यातच तिच्या लग्नाच्या
गोष्टी करालाव तुम्ही….?
आपल्या येळची गोष्ट येगळी व्हती
बैल इकून ट्रयाक्टर लावला शेतात
आन हिरीवर इंजान बशिवलं
तवा तुमीच म्हनला व्हता न्हवं –
जमान्यासंगं बदलायला पायजे म्हून?
मग निस्ती अंगावरची कापडं बदलल्यागत –
जुनी हत्यारं, आवजारं
आन घरं बदलून जमान्यासंगं राहनं व्हतं का?
मनाच्या हिरीतला जुन्या इचाराचा गाळ उपसाया पायजे का नकु?
ठाव हाय मला –
किती बी शिकवलं तरी ‘परक्याचं धन’
म्हूनच राहनार ते
पन आपून परक्याचं म्हनलं
तरी तिचं सोताचच घर नव्हं का त्ये
आन चुलीतलं लाकूड हून जळन्यापरीस
चांगली ट्यूबाची लाईट हून
उजळंल दोनीबी घरास्नी माजी लेक
म्हूनच- आगुदर तेवढी ईज पेरायचीच धमन्यात तिच्या
आन मगच करायच्या तिला उजवायच्या गोष्टी….. पटतंय नव्हं?
आज पातूर निस्तं होला हो करनार्याट
बायकूचा हयो नवाच आवतार बघून
‘आवो’ इचारच करत बसला –
‘‘आजपातूर चुलीतच अक्कल पाजळलेल्या ह्या लाकडाचा
‘पलिता’ कवाशी झाला?’’