माझा मुलगा

माझा मुलगा
रोज रियाज करतो
सराव करतो
तालीम करतो
रंगीत तालीमही करतो.
धावण्याच्या शर्यतीत
भाग घेतो.
१०० मिटर रिले
४०० मिटर रिले
१००० मिटर रिले
मैदान लांबत जातं
पण शर्यत संपत नाही
त्याचं उरी फुटेस्तोवर
धावणं थांबत नाही.
तो जेव्हा मैदानावर
मागे पडतो इतरांच्या
तेव्हा मी धावू शकत नाही
त्याला खांद्यावर घेऊन.
अशावेळी अधिकच अपराधी वाटतं
आपण बाप झाल्याबद्दल.
मी बघतो त्याच्या
रोजच्या टळत जाणार्या
भुकेच्या वेळा
झोपेच्या वेळा.
तो सकाळचे जेवण टाळतो
धावण्याची वेळ झाली म्हणूनच.
तो रात्रभचे जेवण टाळतो
उगीचच झोप येईल म्हणून.
झोपलाच तर दचकून उठतो
कसल्याशा अनाम भीतीनं.
त्याच्या पेंगुळलेल्या डोळ्यांत
साकळून जातं,
त्याचं हरवलेलं पोरपण,
तो ढेकर देतो कोरडा
अर्धतृप्तीचा
स्वतःची समजूत घालण्यासाठी.
मला कौतुक वाटतं
त्याच्या समंजसपणाचं; पण
व्याकूळ होण्याशिवाय
मी काहीच करू शकत नाही.
मैदानावरून फुललेल्या छातीनं
तो जेव्हा परत येतो गॅलरीत
तेव्हा मी त्याचं कौतुक करतो
सॅल्यूट ठोकतो
धीरही देतो
माझ्या काळजाच्या चिंध्या झाकून.
तो लांब उडी घेतो तो उंच उडी घेतो.
मला आठवू लागतात रेसकोर्सवरचे घोडे.
त्यांत दिसतो
मला माझा मुलगा.
मी बघतो
त्याची तारांबळ, ओढाताण
स्वतःला ओढत नेणं
आणि त्याचं खुराकाशिवाय वाढत जाणं
मी बघतो कोडगेपणानं.
त्याच्या धावांचा स्कोअर
जेव्हा उमटतो माझ्या
मोबाईलच्या डोळ्यांत
एसएमएसच्या अक्षरांनी
तेव्हा
मी मोबाईलची पापणी उघडतो
हलक्या हाताने नि
धडधडत्या अंतःकरणाने.
मी थोपटतो पाठ
माझ्या मुलाची
मनातल्या मनात.
आणि मनातल्या मनात
विचारतो प्रश्न स्वतःलाच
या धावण्याच्या शर्यतीत
मीच असतो स्पर्धक तर?
गाठला असता मी हा आकडा?
उत्तराच्या प्रतीक्षेत
मी अधिकच अस्वस्थ होतो.
पोकळ होत जातो आतून.
मला आठवतो
माझ्या वडिलांचा चेहरा
मी अंधारात चाचपडताना
कुस्करला गेलेला
अबोल चेहरा.
एक बरे झाले की
ते आज हयात नाहीत !
नाहीतर
तेच अधिक
डहुळले असते
थर्थरले असते
माझ्या मुलाच्या छातीतून.
माझं काळीज कुरतडतं
त्याचा गिनिपिग होईल की काय
या भीतीनं.
माझा मुलगा आता सरावानं
उंच उडी मारतो
लांब उडी मारतो
यदाकदाचित त्याची उडी
साता समुद्रापार
गेलीच नाही तर?
माझ्या मनात उगीचच
पापशंका डोकावते
मी त्याचा बाप आहे म्हणून !
जगातील प्रत्येक बापाला
असेच वाटत असेल नाही?