असत्य
मुलांशी खोटं बोलणं चूक आहे.
त्यांना खर्याशचं खोटं सिद्ध करून दाखवणं चूक आहे
त्यांना सांगणं-की ईश्व र स्वर्गात असतो
आणि पृथ्वीवर सगळं मंगल आहे-चूक आहे
मुलांना कळतो तुमचा हेतू.
मुलं माणसंच असतात.
त्यांना सांगा की अडचणी मोजता येत नसतात
आणि पुढे काय होणार आहे हे त्यांना दाखवा, एवढंच नाही
तर स्पष्टपणे दाखवा आपला वर्तमानकाळही.
सांगा की अडथळे येतील, त्यांचा सामना करावा लागेल,
दुःख होत असतं, वाईट दिवस येतात,
पर्वा नको,
ज्यानं आनंदाचं मोल जाणलं नाही
तो कधी आनंदी नाही होऊ शकणार.
जर दिसलीच तर एकही चूक माफ करू नका
ती पुन्हा होईल, पुन्हा-पुन्हा होईल
आणि भविष्यात आपली मुलं
आपल्याला कधी माफ करणार नाहीत, जे आपण करत राहिलो होतो.
येवगेनी येवतुशेन्को
(१९३३ साली सायबेरियात जन्मलेले प्रसिद्ध रशियन कवी.)
अनुवाद : गणेश विसपुते