बदलती परिस्थिती शिक्षकांच्या नजरेतून

पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा आदेश असो, क्रमिक पुस्तकांमधल्या बदलानुसार नवे पाठ शिकवणं असो, शिक्षणहक्क कायद्यानुसार शालाबाह्य मुलांना शाळेशी जोडणं असो की, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची जबाबदारी असो. ठरवणारे कुणीही असले तरी अंमलबजावणीचं काम शिक्षकच करतात. शिक्षणव्यवस्थेत घडणार्याक प्रत्यक्ष बदलांचे पडसाद शिक्षकांच्या जबाबदार्यांतवर उमटतात. त्यामुळेच त्यांच्या अनुभवांना एक सच्चा आवाज असतो, तो महत्त्वाचा असतो.
पालकनीती गटाशी जोडलेल्या शिक्षकांनी या दिवाळी अंकासाठी लिहावं असं आवाहन आम्ही केलं होतं. त्याला प्रतिसाद देणारे लेख महाराष्ट्राच्या विविध भागातून आले. शहरीच नाही तर निम-शहरी, ग्रामीण भागातलेही बहुसंख्य पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्यासाठी धावत आहेत. आणि मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहेत ही परिस्थिती जवळजवळ सगळ्यांनी नोंदवली आहे.