बा म्हणतु
बा म्हणतु, सकाळच्या पारी
धर जा दारी
तिनीसांज झाल्याबिगर
ईऊ नगं घरी
मग तुम्हीच सांगा मास्तर
ईऊ कसा साळत?
अवं चुकून आलो साळत
तर बा इतू मागनं पळत
हानत मारत नेतो घरी
आन घरी पाटानीवर
आसुडाची दुरी
भ्यानं जातो रानात पळत
मग तुम्हीच सांगा मास्तर
ईऊ कसा साळत?
एकदा म्हणाला आरं मर्दा
जमिनीला कर कागुद
आन खुरप्याला कर पेन
आन वढ त्याच्यावर रेगा
आन मंग भर गड्या पैक्याच्या बैगा
वरनं म्हणतु तुला नाय कळत
मग तुम्हीच सांगा मास्तर
ईऊ कसा साळत?
आरं नाय जायचं साळत
मळ्यात बसायचं राखण करत
मग आयचा बी काय इलाज नाय चालत
मग तुम्हीच सांगा मास्तर
ईऊ कसा साळत?
मायेनं म्हटला, आरं लेकरा
परकासासारकं सूख पसरत जा
आन दुक्काला अंधारात लपवत जा
मग त्याचं बी म्हणणं मला असतं कळत
मग तुम्हीच सांगा मास्तर
ईऊ कसा साळत?
प्रकाश अनभूले
इयत्ता आठवीत असताना, १९९४