ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स
भाषाशिक्षणाला माणसाच्या आत नेणारे – नोम चोम्स्की
मुलं भाषा कशी शिकतात याबद्दलच्या स्किनर यांच्या वर्तनवादी मांडणीतील अनेक मूलभूत त्रुटी दाखवत त्यांच्या ग्रंथाची कठोर चिकित्सा करणारा दीर्घ लेख नोम चोम्स्कींनी 1959 साली म्हणजे वयाच्या 31 व्या वर्षी ‘लँग्वेज’ या जर्नलमध्ये लिहिला. या लेखाने ‘भाषाशिक्षणक्षेत्रात किंवा तज्ज्ञांत खळबळ माजवली’ असं म्हणणं खूपच तोकडं ठरेल. हा लेख मुलांच्या भाषाग्रहणाच्या नव्या सिद्धांतनाची सुरुवात ठरला. एखाद्या पुस्तकाच्या परीक्षणातून, चिकित्सेतून काय घडू शकतं आणि नव्या कल्पना कशा आकाराला येऊ शकतात याचा वस्तुपाठ म्हणजे चोम्स्कींचा हा समीक्षणात्मक निबंध!
इराकमधल्या युद्धाबद्धल एक व्यक्ती जॉर्ज बुशला थेट जबाबदार धरते. तीच व्यक्ती शस्त्रास्त्र उत्पादन आणि जागतिक अशांतता यांचा सहसंबंध जगाला समजावून सांगते. माध्यमं केवळ समाजाला माहिती पुरवण्यासाठी नसून भांडवली जग आणि जागतिक युद्धखोरीसाठी सर्वसंमती निर्माण करणारी यंत्रणा आहेत (manufacturing consent) असं सोदाहरण दाखवते. मध्यपूर्वेतल्या आणि दक्षिण आशियातल्या युद्धोत्तर विस्थापनासाठी आपल्या देशाला म्हणजे अमेरिकेला (United States of America) जबाबदार धरते आणि त्याविषयी अत्यंत स्पष्ट शब्दांत सरकारचा निषेध करते. ही व्यक्ती गेली साडेपाच दशकं हे काम अव्याहतपणे करते आहे. परखड चिकित्सा हा शब्द व्याख्यित करण्यासाठी जिचं नाव उदाहरण म्हणून वापरलं जाऊ शकतं अशी ही व्यक्ती. एकाच आयुष्यात सामाजिक घडामोडीचे जागतिक विश्लेषक, तत्त्वज्ञ, राजकीय सिद्धांतन तज्ज्ञ, आज हयात असणार्या विचारवंतांपैकी एक तडफदार जनविचारवंत (पब्लिक इंटेलेक्च्युअल) अशा विविध ओळखी सार्थपणे मिरवणारी ही व्यक्ती मुळात भाषाशास्त्रज्ञ आहे, असं सांगितलं तर लोकांचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. मूल भाषा कसं शिकतं, याविषयी मूलभूत मांडणी करताना आधीच्या सिद्धांताला निश्चितपणे त्रुटीपूर्ण (conclusively erroneous) ठरवणारी ही व्यक्ती म्हणजे नोम चोम्स्की. तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, मानसशास्त्र, क्रांती आणि विरोध (Revolution and Resistance), अमेरिकेतील आधुनिक तत्त्वज्ञ, विसाव्या शतकातील मुख्य लेखक अशा विविध विषयांवरील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विश्वकोशात असलेलं समान नाव म्हणजे नोम चोम्स्की. अफाट कार्यक्षमता आणि जगाला सतत नवा विचार देण्याचं वैचारिक नाविन्य बाळगून असलेले चोम्स्की आता 88 वर्षांचे आहेत आणि आजही जगातल्या विविध संस्था, संघटना, भाषाशास्त्राची विद्यापीठे, युद्धविरोधी लढे, समानतेच्या चळवळी अशा अनेक प्रकारच्या कामात व्यस्त आहेत. आयुष्यभर अखंड कार्यरत असलेल्या चोम्स्कींनी वर्तनवादी सिद्धांतातल्या भाषाशिक्षणाच्या मांडणीची सखोल चिकित्सा करत, त्यातल्या त्रुटी आणि चुका जगाला लख्खपणे दाखवत, मूल भाषा कसं शिकतं याविषयीचे नवे सिद्धांत जगासमोर मांडले.
याआधी, म्हणजे एप्रिल 2016 च्या अंकात, आपण स्किनर आणि वर्तनवादी सिद्धांताची माहिती करून घेतली. चेतक (stimulus) आणि प्रतिसादाच्या (response) रूपात मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न वर्तनवादी सिद्धांतांची मांडणी करणार्या तज्ज्ञांनी केला. स्किनरप्रणीत वर्तनवादी सिद्धांतानुसार मूल घरातली भाषा शिकतानादेखील चेतक-प्रतिसाद पद्धतीनेच पुढे सरकतं. 1957 साली प्रकाशित Verbal Behavior या आपल्या ग्रंथात मुलांच्या भाषाग्रहणाचं वर्तनवादी सिद्धांताधारित सखोल विश्लेषण स्किनर यांनी केलंय. मूल जेव्हा संप्रेषणाचा प्रयत्न करतं तेव्हा पालक किंवा इतर प्रौढांकडून मिळणारी शाबासकी, त्यांच्या चेहर्यावरचं हसू, त्यांच्या डोळ्यातली आपुलकी, त्यांच्याकडून केलं जाणारं कौतुक या प्रकारच्या प्रतिक्रियांमधून भाषेच्या योग्य वापराची पुनरावृत्ती किंवा अधिक दृढीकरण (reinforcement) होत राहतं. प्रौढांच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया बक्षीसाचं (reward) काम बजावतात. अशा प्रकारच्या दृढीकरणामुळं मूल निव्वळ ध्वनिनिर्मितीतून (तान्ही बाळं काढतात ते वेगवेगळ्या प्रकारचे आवाज) बाहेर पडून भाषा शिकायला लागतं. प्रौढांकडून अधिकाधिक प्रोत्साहित होणारं मूल घरची भाषा आत्मसात करतं. प्रौढांकडून बोलली जाणारी भाषा मुलांसाठी चेतकाचं काम करते आणि त्या प्रकारच्या ध्वनिसमूहाच्या उच्चारणातून मुलं प्रतिसाद देत राहतात असं स्किनर यांचं म्हणणं होतं. आपण उच्चारलेल्या ध्वनिसमूहाला (शब्दांना किंवा वाक्यांना) जर मोठ्यांची मान्यता (recognition) मिळाली नाही किंवा त्यांचं दृढीकरण झालं नाही तर मूल ध्वनिनिर्मिती (साध्या भाषेत सांगायचं तर बोलणं) थांबवतं किंवा ही प्रक्रिया मंदावते. थोडक्यात सांगायचं तर मुलं त्यांच्या परिसरातून, प्रौढांच्या वर्तनाच्या अनुकरणातून भाषा शिकतात.’मुलांचं प्रत्येक वर्तन हे कुठल्यातरी चेतकाला दिलेला प्रतिसाद असतो, या मूलभूत गृहीतकावर आधारित भाषाग्रहणाची (language acquisition) मांडणी स्किनरनी केली. मुलांनी भाषा ग्रहण करण्यात त्यांच्या जीवशास्त्रीय जडणघडणीपेक्षा किंवा नैसर्गिक स्वभावापेक्षा (nature) परिसर आणि परिसराचा अनुभव (nurture) महत्वाचा असतो, असं त्यांच्या या मांडणीतून दिसतं.
स्किनर यांच्या मांडणीतील अनेक मूलभूत त्रुटी दाखवत त्यांच्या या ग्रंथाची कठोर चिकित्सा करणारा दीर्घ लेख चोम्स्कीनी 1959 साली म्हणजे वयाच्या 31 व्या वर्षी लँग्वेज या जर्नलमध्ये लिहिला. या लेखाने भाषाशिक्षणक्षेत्रात किंवा तज्ञांत खळबळ माजवली असं म्हणणं खूपच तोकडं ठरेल. ‘ A Review of B. F. Skinner’s Verbal Behavior’ या नावाने प्रकाशित हा लेख मुलांच्या भाषाग्रहणाच्या नव्या सिद्धांतनाची सुरुवात ठरला. एखाद्या पुस्तकाच्या परीक्षणातून, चिकित्सेतून काय
घडू शकतं आणि नव्या कल्पना कशा आकाराला येऊ शकतात याचा वस्तुपाठ म्हणजे चोम्स्कींचा हा समीक्षणात्मक निबंध!
स्किनर यांच्या मांडणीतली त्रुटी दाखवताना चोम्स्कींनी विविध प्रकारचं भाष्य केलं. मुलांच्या भौतिक परिसरात बदल घडवून त्यांच्या भाषिक वर्तनाचा अंदाज बांधणे आणि ते नियंत्रित करणे, हा स्किनर यांच्या मांडणीचा मुख्य हेतू होता असं चोम्स्कींनी दाखवून दिलं. मूल जर केवळ वर्तनातून भाषा शिकत असेल तर आपल्या अनेक अनुभवांचं स्पष्टीकरण देता येत नाही हे चोम्स्कींनी सोदाहरण दाखवून दिलं. उदाहरणार्थ, इंग्रजीभाषक परिसरात एखादं मूल “I had put the stones on the table” ऐवजी “I had putted stones on the table” असं म्हणतं. क्रियापदांची गल्लत केली जाते आणि कुणीही कसलीही प्रतिक्रिया दिली नाही तरी हा टप्पा ओलांडून मूल पुढं जातं. (अनेकदा मोठी माणसं भाषा शिकण्यासाठी प्रयत्नरत मुलांच्या अशा चुकांकडे दुर्लक्ष करतात हा आपल्या सर्वांचा अनुभव असतो.) नंतर पुढच्या टप्प्यात ते मूल “I had put the stones on the table” असा योग्य वापर करू शकतं. अशी उदाहरणं जगातल्या सर्व भाषांमध्ये आढळतात.
माझी एक भाची साधारणत: साडेतीन वर्षांची असताना तिच्या पायाखाली येऊन एक किडा मेला. मी किड्याला मेलवलं असं ती म्हणाली. कदाचित किड्याला घराबाहेर घालवलं अशाच स्वरूपाचं क्रियापदाचं रूप तिने वापरलं. तिच्या बोलण्यावर आम्ही सगळे कौतुकाने हसलो. तिच्या बोलण्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. पुढच्या चार-पाच महिन्यात ती अशा सिच्युएशनमध्ये मेलवलं ऐवजी मारलं म्हणायला शिकली. स्किनर यांच्या सिद्धांतानुसार विचार करायचा तर आमचं कौतुकानं हसणं तिला सकारात्मक प्रतिसाद वाटून तिने मेलवलं असाच वापर सुरू ठेवायला हवा होता. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही.
मूल पाच-सहा वर्षांचं होईपर्यंत त्याच्या परिसरातली/ल्या भाषा सर्व व्याकरणनियमांसाहित आत्मसात करतं. जर वर्तनवादी विचार खरा मानला तर मुलांचं भाषा बिनचूकपणे वापरणं, आधी न ऐकलेले शब्द किंवा वाक्यरूप तयार करणं, व्याकरणातली गुंतागुंत अचूकपणे हाताळणं अशी महत्त्वाची निरीक्षणं किंवा अनुभवांचं स्पष्टीकरण देता येत नाही, अशी अडचण चोम्स्कींनी मांडली. स्किनर यांच्या म्हणण्यानुसार भाषा आत्मसातीकरणाच्या प्रक्रियेत मुलासमोरचे चेतक आणि दृढीकरणासारखे बाह्यघटक सर्वात महत्त्वाचे असतात. हा विचार स्वीकारला तर जगभरात सर्व प्रदेशातल्या, कोणत्याही संस्कृतीमधल्या कोणत्याही मुलामध्ये दिसणार्या भाषा आत्मसात करण्याच्या क्षमतेचं कारण काय आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही, असं चोम्स्कींनी ठामपणे सांगितलं. मुलांचं प्रत्येक वर्तन कुठल्यातरी बाह्य चेतकावर अवलंबून असतं ही वर्तनवादातली कल्पना त्यांनी धुडकावून लावली. या मांडणीमध्ये मुलांचं माणूसपण दुर्लक्षिलं जातंय, त्यांची
विचार करण्याची नैसर्गिक क्षमता नाकारली जातीय म्हणून हा विचार चोम्स्कींना मान्य नव्हता. या अस्वस्थतेतून त्यानी भाषाग्रहण यंत्रणा ही महत्त्वाची संकल्पना मांडून परिसर-स्वभाव (nurture-nature) वादात स्वभावाला म्हणजे जीवशास्त्रीय जडणघडणीला महत्त्वाचं मानलं. किंबहुना उत्क्रांतीमधून आकाराला आलेल्या माणसाच्या जीवशास्त्रीय जडणघडणीतल्या वैशिष्ट्यांमुळेच मुलं भाषा ग्रहण करू शकतात, असं चोम्स्की मानतात.
मूल भाषा कसं शिकतं हे कुणी स्पष्ट करू शकलं नाही तरी मुलं सहजतेने भाषा शिकतात, ही वस्तुस्थिती आहे. भारतासारख्या बहुभाषिक देशात तर पाच-सहा वर्षांची मुलं केवळ घरातली किंवा मातृभाषा नाही तर शेजारपाजारच्या दोन-तीन भाषा सहज शिकतात. सोलापूरसारख्या बहुभाषिक शहरात मी जन्मलो. शाळेत जायला लागलो तोवर घरच्या भाषेखेरीज इतर दोन भाषा मला व्यवस्थित येत होत्या. असे कोट्यवधी लोक आपल्या देशात आहेत. वर्तनवादी पद्धतीने विचार करायचा झाला
तर अशा एकापेक्षा अधिक भाषा शिकणार्या मुलांना प्रत्येक भाषेसाठी एकाच प्रकारचे इनपुट किंवा चेतक मिळण्याची शक्यता नगण्य आहे. प्रत्येक भाषेतल्या दृढीकरणाच्या संधीही समान मिळण्याची शक्यता नाही. तरीही त्या दोन-तीन-चार भाषा मुलं जवळजवळ एकसारख्या सहजतेने हाताळतात. माझ्या घरात हा अनुभव मी अनेकदा घेतलाय. माझी पुतणी, चार-पाच वर्षांची होईपर्यंत, घरातल्या शिळोप्याच्या गप्पांच्या वेळी सगळ्या मोठ्यांना गोलात बसवत असे. ती गोलाच्या मधे उभी राहून सगळ्यांशी बोलायची. ती तिच्या आजी-आजोबासोबत एका भाषेत, माझ्यासोबत किंवा तिच्या आई-बापासोबत दुसर्या भाषेत तर तिच्या काकूसोबत तिसर्या भाषेत बोलत असे. ज्या व्यक्तीकडं ती तोंड करायची, त्या भाषेत बोलायला सुरू करायची. कुणीही कोणतीही भाषा शिकवण्याचे विशेष प्रयत्न न करता मुलांमधे अशी स्तिमित करणारी भाषा शिकण्याची क्षमता येते कुठून? चोम्स्कींनी यासाठी एक महत्त्वाचा विचार मांडला.
जगातल्या प्रत्येक मुलाच्या मेंदूत भाषा शिकण्याची नैसर्गिक क्षमता निर्माण करणारी भाषा ग्रहण यंत्रणा (Language Acquisition Device, LAD) जन्मत: असते. मानवी मेंदूतली ही यंत्रणा मुलाना भाषाग्रहणात सहजता प्राप्त करून देते. LAD ला device म्हटलं असलं तरी LAD म्हणजे मेंदूतला स्वतंत्र भाग नाही, हे लक्षात घ्यायला हवं. LAD ही एक सैद्धांतिक संकल्पना आहे. मानवी मेंदूतल्या या उपजत क्षमतेमुळं मुलं भाषा अवगत करू शकतात, जगभरातल्या सर्व भाषांमधली मुलं विशिष्ट टप्पे गाठत भाषा पूर्णपणे शिकतात. वर्तनवादी सिद्धांतनात याचं स्पष्टीकरण देता येत नाही. चोम्स्कींच्या मते प्रत्येक मूल LAD सह जन्मतं याचा अर्थ भाषेविषयीचे मूलभूत नियम मुलाला जन्मत: माहिती आहेत. मूल जगात
आल्यानंतर शब्द (vocabulary) शिकतं. म्हणूनच तेलगु भाषक पालकांचं मूल जन्मत: चीन मध्ये गेलं तर चिनी भाषा शिकतं आणि एखादं कोरियन मूल पुण्यात आलं तर मराठी बोलू लागतं. ही भाषा इतकी सहज शिकली
जाते की ते मूल भाषेतले शब्दच नाही तर भाषेचा लहेजा, उच्चारणपद्धत या सगळ्या गोष्टी आत्मसात करतं. (माझ्या गल्लीतल्या पाचेक वर्षांच्या कोरियन मुलाला अगदी पुणेरी मराठी बोलताना मी अनेकदा पाहिलंय.) LAD च्या जोडीला चोम्स्कींनी मांडलेली दुसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे युनिव्हर्सल ग्रामर. त्यांच्या मते जगातल्या सगळ्या भाषा अगदी बेसिक पातळीवर सारखे व्याकरण नियम वापरतात. उदाहरणार्थ, जगातल्या सर्व भाषांमध्ये नाम, क्रियापद असे वाक्यघटक असतात किंवा सर्व भाषांमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक वाक्यं असतात. चोम्स्कींच्या मते भाषांची सर्वात प्राथमिक स्तरावरची रचना साधारणत: समान आहे आणि ही रचना मानवी मेंदूचा (जनुकांचा) भाग असते. भाषांमधले लिंग-वचन-पुरुष असे भेद असतात पण प्राथमिक पातळीवर क्रियापदं किंवा नामं नसलेली भाषा जगात आढळत नाही. भाषा एक आहे आणि माणसाच्या मेंदूची रचनादेखील एकच आहे, असं ते मानतात.
चोम्स्कींचा हा विचार वर्तनावादाच्या विरुद्ध प्रकारचा आहे. भाषाग्रहणाचा विचार करताना चोम्स्कीप्रणीत सिद्धांतन माणसाला इतर सर्व प्राण्यांपासून वेगळं काढून त्याची वैशिष्ट्य दाखवतं. भाषाग्रहण कुठल्याही बाह्य चेतकावर किंवा परिस्थितीवर अवलंबून न ठेवता चोम्स्की भाषेला माणसाच्या अस्तित्वाचा भाग बनवतात. प्रत्येक माणसात असणारी समान क्षमता अधोरेखित करून चोम्स्कींनी अप्रत्यक्षरीत्या शिक्षणात ऐतिहासिकदृष्ट्या एक प्रकारची समानता आणण्याचा प्रयत्न केलाय. आय. क्यू. (बुद्ध्यांक) च्या संदर्भात ही मांडणी अधिक महत्त्वाची ठरते. बुद्ध्यांकाचा वापर करून अमेरिकेत कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकन-अमेरिकन लोकांना कमअस्सल किंवा दुय्यम मानव (secondary human) ठरवण्याचा जोरदार प्रयत्न 1910-20 च्या दशकांत झाला आणि 1960-70 पर्यंत शिक्षणक्षेत्रात बुध्यांकाची शिरजोरी मोठ्या प्रमाणात होती (आपल्याकडे अजूनही त्याला अवास्तव महत्त्व दिलं जातं). गौरवर्णीयांच्या सांस्कृतिक भांडवलाला साजेशी प्रश्नावली घेऊन बुध्यांक मोजायचा आणि कृष्णवर्णीयांना निर्बुद्ध ठरवायचा खेळ अमेरिकेत कित्येक दशके सुरू होता. चोम्स्कींनी ङअऊ च्या माध्यमातून सर्व मुलांना एका पातळीवर आणून ठेवलं आणि भाषाग्रहणाच्या दृष्टीने प्रत्येक मूल गिफ्टेड असल्याचं दाखवून दिलं. जर प्रत्येक मूल LAD घेऊन जन्मलं असेल तर भाषाग्रहणाच्या बाबतीत कृष्णवर्णीय किंवा श्वेतवर्णीय मुलांत कोणताही भेद नाही. स्वत:च्या आयुष्यात समानतेचा ठोस पुरस्कार करणारे चोम्स्की भाषाशास्त्राच्या सिद्धांतनातही तोच विचार मांडू शकले.
चोम्स्कींच्या 1960 च्या दशकातल्या मांडणीनंतर मेंदूविज्ञान बरंच गतिमान झालं. भाषा नेमकी कशी शिकली जाते, मेंदूतला नेमका कोणता भाग त्यासाठी जबाबदार असतो, LAD म्हणता येईल अशी एखादी जागा मेंदूत खरंच आहे का, अशा अनेक विषयांवर विविध प्रकारच्या न्यूरोसायन्स मधले संशोधक काम करतायत. चोम्स्कींच्या काही टीकाकारांच्या मते भाषाग्रहणासाठी वर्तनवादी स्पष्टीकरण अयोग्य असलं तरी त्यामुळे LAD ची उपपत्ती (hypothesis) सिद्ध होत नाही. यात एक अडचण अशी की LAD नाहीय असं सिद्ध करायचं झालं तर मुलांवर जे प्रयोग करावे लागतील ते आज जगात अनैतिक आणि बेकायदेशीर मानले जातात. मात्र ही समस्या दाखवून देत असताना त्यांचे टीकाकारही वर्तनवादी स्पष्टीकरणाला हद्दपार करण्याचं श्रेय चोम्स्कींनाच देतात.
साडेपाच दशकांपेक्षा अधिक काळ जगाला विचार देत राहिलेल्या नोम चोम्स्कींची अगदी अलीकडची मुलाखत 2 जून 2016 ला प्रकाशित झालीय. भाषाशास्त्रासह विविध विषयांवर शंभरावर ग्रंथ, शेकडो लेख, मुलाखती, डॉक्युमेंटरी, मोर्चे आणि लढ्यांमध्ये सहभाग अशा विविध मार्गांनी चोम्स्कींनी केलेली ज्ञाननिर्मिती मानवी समाजाचा महत्त्वाचा ठेवा आहे. (https://chomsky.info/ या संकेतस्थळावर त्यांच्याविषयीची भरपूर, authentic माहिती मिळेल.)
LAD चा सिद्धांत मांडणारे चोम्स्की एका अर्थाने बी. एफ. स्किनर या उत्तुंग प्रतिभेच्या व्यक्तिमत्त्वाच्या खांद्यावर उभे आहेत. ज्ञानव्यवहारात त्रुटीपूर्ण सिद्धांतदेखील नवनिर्मितीला किती अनुकूल अवकाश निर्माण करतात याचं जिवंत उदाहरण म्हणून वर्तनवादाला नाकारून LAD ची संकल्पना मांडणार्या चोम्स्कींच्या विचारांना समजावून घ्यायला हवं. वर्तनवाद्यांनी माणसाच्या बाहेर नेलेल्या भाषाग्रहणाला माणसाच्या आत स्थापन करून चोम्स्कींनी भाषाग्रहणाला माणसांमधल्या समानतेचा
निसर्गदत्त धागा बनवलं, आणि प्रत्येक मूल (भाषा) शिकू शकतं कारण ते माणसाचं मूल आहे असा बालककेंद्री विचार मांडला.
लेखक परिचय: किशोर दरक हे शिक्षणशास्त्राचे अभ्यासक व विश्लेषक आहेत. अनेक संशोधन प्रबंधांबरोबरच विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांनी शिक्षण व समाजशास्त्र या विषयांवर लेखन केले आहे.
Email : kishore_darak@yahoo.com