चंदूचा मेंदू आणि शंभर शक्यता – सुबोध केंभावी

सुबोध केंभावी हे प्रयोगशील, पर्यायी शिक्षणपद्धतींचे अभ्यासक आहेत. अशा 

पद्धती प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये रुजाव्यात यासाठी ते शिक्षकांना मदत व मार्गदर्शन करतात. त्यांना गणित, विज्ञान व भाषा हे विषय शिकायला व शिकवायला आवडतात. शिक्षण-क्षेत्रातील संस्था, व्यक्तींचे एक कार्यक्षम नेटवर्क महाराष्ट्रात विकसित व्हावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

‘शिकण्याच्या, शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची गरज 

आहे काय?’

या प्रश्नाचे एक उत्तर असे असू शकेल: वेगवेगळ्या पद्धतींची गरज नाही. एकच पद्धत पुरेशी आहे, पण भरपूर सराव करून घ्यावा. मग सगळी मुले नीट शिकतात. कितीतरी कोचिंग क्लासेस हेच तर करून घेतात.  

पण या प्रश्नाचे अजून एक उत्तर आहे. ते उत्तर अनेक शिक्षकांच्या अनुभवांच्या मदतीने आपल्याला समजू शकेल. समजा इयत्ता पाचवीचा वर्ग आहे आणि वर्गात वीस मुले आहेत. अशा वेळी किमान दोन-तीन पद्धती वापरल्याशिवाय सगळी (किंवा निदान वीसपैकी अठरा) मुले शिकत नाहीत हा अनेक शिक्षकांचा 

अनुभव आहे.  

भरपूर सराव करून घेऊनही शिकत नाहीत. काही मुले तात्पुरती शिकतात पण सराव बंद झाला की शिकलेले (!) सगळे आठवड्याभरात विसरतात. 

मनाविरुद्ध भरपूर सराव करवून घेतला तर? अशावेळी अनेक मुले शिकत तर नाहीतच पण काहीजण शाळेत येणेच बंद करतात. 

गणित विषयाचे उदाहरण घेऊया. गणित शिकवायची रुढ पद्धत काय आहे? शिक्षकांनी एक गणित फळ्यावर सोडवायचे, सोडवताना स्पष्टीकरण द्यायचे मग मुलांनी तशीच काही उदाहरणे सोडवायची. या पद्धतीने किती मुले शिकतात? जी शिकत नाहीत त्यांचे काय? त्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी पद्धत हवी. अनुभव असा आहे की तीन-चार पद्धती शिक्षकांना माहीत असतील तर किमान नव्वद टक्के मुले नीट शिकली हे उद्दिष्ट गाठणे सोपे होते.

वरील उत्तर हे शिक्षकांच्या अनुभवातून आलेले उत्तर आहे. शिकवण्याच्या पद्धतींबद्दलचे उत्तर आहे हे. शिकवण्याची पद्धत कशी ठरते? एखादा विषय शिकण्याची मुलाची स्वतःची अशी जी काही पद्धत असते ती नीट वापरली जावी, विकसित व्हावी म्हणून शाळेत शिकवण्याची पद्धत वापरावी लागते. शिकवण्याच्या पद्धती या शिकण्याच्या पद्धतींवरून ठरायला पाहिजेत. शिकण्याच्या पद्धती समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे.

विद्यार्थ्यांचे अनुभव समजून घेतले तर शिकण्याच्या पद्धतींबद्दल काय लक्षात येते? हे समजून घ्यायला वरच्या उदाहरणातील इयत्ता पाचवीच्या वर्गातील वीस विद्यार्थी लक्षात न घेता एकाच मुलीचा, मानसीचा अनुभव बघूया. ही मानसी कशी आहे? ती शाळेत बहुतेकवेळा परीक्षेत पास होते, काही वेळा नापास होते. हुशार वगैरे मानली जात नाही.

शाळेत येण्यापूर्वीच मानसी एक भाषा नीट बोलायला शिकली होती. आता ती मित्रमैत्रिणींबरोबर कितीतरी खेळ खेळायला शिकली आहे. आपण फुटबॉल इतरांपेक्षा चांगला खेळू शकतो हे मानसीच्या लक्षात येते आहे. तिला कुठली भाजी आवडते ते तिला माहीत आहे आणि न आवडणारी भाजीसुद्धा बरेचदा कशीतरी खावी लागते हे ती शिकली आहे. आमटीची चव घेऊन त्यात काय जमलेय आणि काय हवे आहे हे ती चटकन सांगते. पाळलेल्या आणि न पाळलेल्या कुत्र्यांशी कसे वागायचे हे तिला हळूहळू समजतेय. पावसाळ्यात आपण व आपले दप्तर भिजू नये म्हणून कायकाय करता येते हे तिला ठाऊक आहे आणि एखादा मोबाईल फोन वापरायला मिळाला की त्यातले खेळ कसे शोधायचे आणि कसे खेळायचे हे तर तिला छानच जमतेय.

यातले काहीच ती शाळेच्या वर्गात बसून, पाठ्यपुस्तकातून शिकलेली नाही. हे खास आहेच पण याशिवाय एक महत्त्वाचा मुद्दा आहे इथे. 

मोबाइलवरचे गेम्स खेळायला शिकण्यासाठी आणि फुटबॉल खेळायला शिकण्यासाठी दोन वेगळ्या पद्धती, कुवती लागतात. पाळलेल्या कुत्र्यांशी कसे वागायचे हे शिकायला आणि आमटीत काय हवे-नको हे शिकायला दोन वेगळ्या पद्धती, कुवती लागतात. मानसीचा मेंदू पहा कसा योग्य वेळी योग्य पद्धत, कुवत वापरत हे सगळे बरोबर शिकतोय. 

ही ‘शिकण्याच्या पद्धतींमधील विविधता’ मानसीला फारशी नीट जाणवलेलीही नाहीय. तिला हे सगळे खेळता खेळता, जगता जगता जमून 

गेले आहे.

अशी ही मानसीसारखी मुलगी इयत्ता नववीत गेल्यावर बहुदा काय होते? तिला बहुपदींचा गुणाकार-भागाकार तसेच भूमितीतील सिद्धता अजिबात समजत नाही. ती सिद्धता पाठ करते. तिला भौतिकशास्त्र कठीण वाटते, विज्ञान-गणितात नापास होऊ अशी भीती वाटू लागते. 

असे कसे होते?  

योग्य वेळी योग्य पद्धत वापरत बरोबर शिकणारा मेंदू आहे ना मानसीकडे? मग हाच मेंदू आता भूमितीतील सिद्धतेबाबत काम करेनासा कसा होतो? 

की बहुपदींचा गुणाकार-भागाकार हे विषयघटक अशा मानसीसारख्या सर्वसामान्य मुलांबाबत ‘मेंदूच्या पलीकडले’ असतात ? 

काहीतरी भानगड दिसतेय इथे आणि ती जरा नीट समजून घ्यायचा प्रयत्न करू. 

माझ्या अनुभवानुसार वरील भानगडीबद्दलची माझी मते, विचार खाली दिले आहेत. वाचकांनी, पालकांनी पुढील भाग वाचताना आपले अनुभव आठवावेत व आपण सहमत आहोत का ते ठरवत वाचावे.

मानसीने शाळेत इतकी वर्षे कायकाय केले हे बघितले तर शाळेत वापरली जाणारी,  वेगवेगळे विषय शिकण्याची, सामाईक अशी एक पद्धत लक्षात येईल. त्या पद्धतीचे दोन मुख्य पैलू असे आहेत-

वर्गात शांत बसून नीट ऐक. पाठ्यपुस्तकही वाच. समजत नाही? गाईड वाच किंवा कोचिंग क्लासला जा. 

पाठ्यपुस्तक वाचताना सर्व समजले पाहिजेच असे नाही. परीक्षेतील उत्तरे मात्र पाठ्यपुस्तकातील भाषेतच हवीत. परीक्षेपुरता तरी धड्यातला मजकूर 

लक्षात ठेव.

विषय अनेक पण शिकायची पद्धत साधारणपणे एकच असा शाळेतला प्रकार आणि वेगवेगळ्या पद्धती वापरत हवे ते शिकणारा शाळेबाहेरचा मेंदू यांचे जमत नसावे असे मला वाटते. 

हवे ते शिकू दे आणि ते शिकण्याची पद्धतही ‘माझी मलाच’ ठरवू दे, अशी मेंदूची ठाम मागणीच आहे बहुतेक. 

ही मागणी पूर्ण झाली नाही तर मेंदू नीट शिकत नसणार. 

हा अंदाज कसा वाटतोय? तुमचा अनुभव काय सांगतोय? 

विद्यार्थी असतानाचा तुमचा अनुभव आठवा. पालक/ शिक्षक/ मुलांचा हितचिंतक या नात्याने तुमचा अलीकडचा अनुभव काय आहे ते तपासा. तुमचे अनुभव जर या अंदाजाला आधार देणारे असतील तर आपण हा अंदाज तपासून बघू. 

वैज्ञानिक पद्धत वापरून असे अंदाज तपासता येतात.  त्यासाठी ‘शिकण्याचे प्रयोग’ विचारपूर्वक करायला पाहिजेत. शाळेतील पारंपरिक पद्धतींशी हे प्रयोग बहुदा जुळणार नाहीत.  त्याची चिंता करू नये. मात्र, मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याबाबत किंवा सुरक्षिततेबाबत तडजोड न करता हे प्रयोग करावेत. प्रयोगशील शिक्षणाचा अनुभव असलेल्या लोकांशी चर्चा करून प्रयोगाचा तपशील ठरवावा. 

काही पालकांना वरचा अंदाज मान्य नसेल तर? त्यांची बाजूही समजून घेऊ. वरील अंदाज मान्य नाही असे एक पालक व प्रयोगशील शिक्षणात आस्था असलेला एक शिक्षक यांच्यात होऊ शकेल असा एक संवाद खाली दिला आहे. या पालकांच्या मुलाचे नाव चंदू आहे असे समजू. चंदू पाचवीतच आहे व पालकांच्या चिंतेचा विषय आहे. (आधीच कारटे हूड, त्यात धावे दुडदुड…)

पालक- मुलाला हवं ते शिकू द्या हा सगळा मूर्खपणा आहे. या चंद्याला असा मोकळा सोडला तर गावभर उंडारत फिरेल. शिकणार काहीही नाही.

शिक्षक- शाळेत नीट शिकतोय का?

पालक- अहो, तेच तर सांगतोय. शाळेत शिकत नाही म्हणून क्लासला घातला. तरी गणितात काठावर पास होतो कसाबसा. अशात तुम्ही म्हणताय तसा मोकळा सोडला तर हात तरी लावेल काय गणिताला?

शिक्षक- बरोबर आहे. गणित तर शिकायला पाहिजेच. त्यावर थोडया वेळाने नक्की बोलूया. पण मगाशी तुम्ही म्हणालात की मोकळा सोडल्यावर उंडारत फिरेल म्हणून… म्हणजे कायकाय करेल?

पालक- काय वाटेल ते करेल. एकदा एका शेळीच्या मागे मागे हिंडत होता भर उन्हात. एकदा एका प्रेतयात्रेची तयारी होत होती तिथे उभा होता. एकदा कोणीतरी झाडाच्या फांद्या कापत होतं रस्त्याच्या कडेला ते बघत बसला आणि मग त्या फांद्या घरी घेऊन आला.

शिक्षक- काय केलं मग चंदूनं त्या फांद्यांचं?

पालक-  त्यातली एक फांदी लावली तर झाड तयार होईल का हे त्याला बघायचं होतं आणि दुसऱ्या फांदीची त्याने बेचकी बनवली.

शिक्षक- पण हे सगळं करताना शिकतोय ना तो काहीतरी? तुम्हाला काय वाटतं ?

पालक- ठीक आहे. झाडाची फांदी तोडून बेचकी बनवायला शिकला असणार कोणाकडून तरी… पण याचा परीक्षेत काय उपयोग? आणि पाचवीचं गणित कसा शिकेल हे सगळं करत बसला तर?

‘शिकेल का नाही’ यावरील सर्व चर्चा शेवटी गणित, इंग्रजी अशाच विषयांपर्यंत येतात. (मराठी हा विषय ‘घर की मुर्गी’ असतो.) पालकांना परिसर-अभ्यास वगैरे विषयांची फारशी चिंता वाटत नसते. आणि तसे पाहिले तर तोडलेल्या फांद्या घरी आणणाऱ्या आणि प्रेतयात्रेची तयारी बघणाऱ्या चंदूचा परिसर-अभ्यास तर जोरातच चालू आहे. 

चंदू शाळेत न जाता उंडारत फिरला तर गणित कसा शिकेल हा पालकांनी विचारलेला प्रश्न महत्त्वाचा आहे. आधीच्या उदाहरणातली मानसीसुद्धा शाळेबाहेर खूप काही शिकत होती पण नववीत गेल्यावर बीजगणित, भूमिती मात्र शिकत नव्हती. या भानगडीबाबत आपण केलेला अंदाज काय आहे ते आठवतंय का?

‘विषय अनेक पण शिकायची पद्धत साधारणपणे एकच असा शाळेतला प्रकार आणि वेगवेगळ्या पद्धती वापरत हवं ते शिकणारा शाळेबाहेरचा मेंदू यांचे 

जमत नाही. मला हवे ते शिकू दे आणि ते शिकण्याची पद्धतही मलाच ठरवू दे अशी मेंदूची ठाम मागणीच आहे बहुतेक. ही मागणी पूर्ण झाली नाही तर मेंदू शिकत नसणार.’     

आता या अंदाजावर आधारित प्रयोग करायचा तर कायकाय करावे लागेल?

आपल्या अंदाजाचा एक भाग ‘मला हवे ते शिकू दे’ हा आहे. मग यानुसार चंदूला विचारावे लागेल की शाळेत किंवा क्लासमध्ये जे गणित तुला शिकवतात ते तुला आता, या महिन्याभरात शिकायचे आहे का? 

‘मित्राच्या मुलाचा वाढदिवस आहे म्हणून खरोखरच आनंदित झालेला माणूस मी कधीच पाहिला नाही’ अशा अर्थाचे पु.लं.चे एक वाक्य आहे. ‘उंडारत फिरण्यापेक्षा’ शाळेत किंवा क्लासमध्ये गणित शिकूया, असे आवडीने म्हणणारे मूलही फारसे कोणी पाहिले नसेल.

म्हणजे गणित शिकायचे नाही असेच बहुदा चंदू सांगेल. काहीही शिकायचे नाही असेही तो सांगेल. कदाचित त्याच्या त्यावेळच्या लहरीनुसार इतर काहीतरी बोलेल. तायक्वांदो/ कराटे शिकायला आवडेल किंवा ट्रक चालवायला शिकायचे आहे असे तो म्हणेल. टीव्हीवरच्या मालिकेत काम करायचे आहे असेही कदाचित तो सांगेल. आपण सुरुवात त्याच्या आवडीप्रमाणेच करायची आहे. त्याला हवे ते शिकू द्यायचे आहे.

ठीक आहे, तू गणित शिकू नकोस, अभिनय शीक. असे चंदूला सांगून हा ‘शिकण्याचा प्रयोग’ करून पहावा. (शाळा बुडवायची नसेल तर हा प्रयोग दिवाळीच्या किंवा मे महिन्याच्या सुटीत करावा. सुटीत अभ्यास न देणारी शाळा असेल तर उत्तम, नाहीतर सुटीतल्या गृहपाठासाठी थोडा वेळ काढून उरलेल्या वेळात हा प्रयोग करता येईल.)

टीव्हीवरच्या मालिकेत काम करायला शिकायचे ठरलेय असे समजू. समजा चंदूला शिक्षकांनी असे सांगितले की टीव्हीवरील मालिकांमध्ये काम नाही मिळू शकणार, पण एखाद्या एकांकिकेमध्ये मिळेल आणि गावातल्या एखाद्या साध्या रंगमंचावरून ती प्रेक्षकांसमोर सादरही करायला मिळेल. एवढी तडजोड स्वीकारायला चंदू बहुतेक तयार होईल. एकांकिकेत फालतू छोटया भूमिका नको आहेत, हीरोची भूमिकाच करायची आहे अशी अट मात्र तो घालेल, ही शक्यता आहे. म्हणजे केवळ हवे ते शिकायला मिळतेय असे नव्हे तर थोडी तडजोड करून का होईना चंदूला हव्या त्या प्रकारेही अभिनय शिकायला मिळतो आहे.

आपल्या या प्रयोगात काय घडेल याचे भाकीत आधी केले पाहिजे आणि मग ते तपासून पाहिले पाहिजे. त्या भाकितानुसार घडले नाही तर कदाचित आपला अंदाज चुकीचा होता असे मानून तो अंदाज दुरुस्त करायचा का यावर विचार केला पाहिजे. नेमके भाकीत ठरवणे कठीण आहे, पण प्रयत्न करूया. या प्रयोगात काय घडेल?

चंदूला अभिनय शिकायचा आहे. त्याला हवे त्या प्रकारे अभिनय शिकू दिला तर त्यामुळेच तो गणितही शिकेल. हे विधान जरा विचित्रच वाटतेय का? थोडा खुलासा करतो.

चंदूला हवे त्या प्रकारे अभिनय शिकू दिला तर व्यक्तिमत्त्व घडवणारे एक उपयुक्त कौशल्य तर तो शिकेलच पण अभिनय शिकत असतानाच गणित शिक्षणासाठी उपयुक्त असे काही नेमके अनुभवही मिळाले तर चंदू नकळत गणितही आवडीने शिकू लागेल, निदान त्याला गणित सोपे तरी वाटू लागेल.

पटतेय का हे ? शक्य आहे असे वाटतेय का? 

अजिबातच पटत नसेल तर मी सुचवतोय त्या एका साध्या शक्यतेचा विचार करून बघा.  शिकण्याच्या शंभर शक्यतांपैकी एक शक्यता मी सांगतोय. मुलांचा मेंदू जगता जगता, खेळता खेळता, रमतगमत शिकत असतो. नेमके काय घडेल हे प्रयोगातूनच समजेल पण गणित शिकायच्या शंभर शक्यतांपैकी अभिनयातून गणिताकडे जाणारी ही एक शक्यता 

पटते का बघा.

चंदूने एकांकिकेत काम करायचे ठरवले आहे. कोणत्या एकांकिका निवडायच्या हे ठरवणे सुरू आहे. इथे शिक्षक सुचवतो की बिरबलाच्या चातुर्यकथांवर एकांकिका करूया. हिरो म्हणजे बिरबल, अर्थातच चंदू असेल. 

शिक्षकाचा एक मित्रच इथे लेखक व दिग्दशर्काचे काम करणार आहे. त्याची चंदूबरोबर भेट होते. तो चंदूला म्हणतो,

“तू बिरबलाचे काम छानच करू शकशील पण त्यासाठी थोडी तयारी कर. बिरबलाची युक्ती काय होती, त्याने नेमकी काय आयडिया वापरली हे तुला नीट कळले नाही तर अभिनय करताना तुझ्या चेहऱ्यावर ते दिसणार नाही. अभिनय खरा, सहज वाटणार नाही. म्हणून बिरबलाच्या चार-पाच गोष्टी वाच. त्यातली बिरबलाची आयडिया नीट समजली का ते बघ. मग जी कोणती गोष्ट तुला आवडली असेल त्यावर आपण एकांकिका बसवूया.”

पुस्तके वाचायची फारशी आवड नसलेला चंदू आता हीरो होण्यासाठी आणि त्यासाठी स्क्रिप्ट निवडण्यासाठी बिरबलाच्या चार-पाच चातुर्यकथा वाचतो. अभिनय चांगला जमला पाहिजे म्हणून बिरबलाने केलेली ‘आयडिया’ आपल्याला नीट समजली आहे ना हे स्वतःच तपासून बघतो. हे सगळे ‘स्वतःलाच पडली आहे’ म्हणून झालेले आहे. खूप उत्साहात, आपण हीरो झाल्याची स्वप्ने रंगवत घडले आहे. चंदूचा मेंदू कसा शंभर पद्धतींपैकी 

बरोबर योग्य ती पद्धत वापरत शिकायला लागला आहे.

बिरबलाच्या किंवा तेनालीरामच्या किंवा पंचतंत्रातल्या गोष्टींमध्ये कोणकोणत्या ‘आयडिया’ असतात?

उदा. रेषेला हात न लावता रेषा लहानमोठी करण्याची गोष्ट घ्या. इथे 

रेषेची लांबी, लहानमोठेपणा आहेच पण मोठेपणाची सापेक्षताही आहे. अठरावा उंट ही गोष्ट तर नियमानुसार वाटप करणे आणि अपूर्णांक या संकल्पनांवरच आधारित आहे. अशा प्रत्येक गोष्टीत तर्क आहे आणि तो कोणतीतरी समस्या सोडवायला वापरला आहे. समस्या सोडवणारा हीरो आहे आणि ही हीरोगिरी समजली तर नेमका विचार कसा केला ही गंमतही वाचकाला समजते आहे. 

बिरबलाच्या गोष्टी वाचून उत्साहात अभिनयाची तयारी करतानाच चंदूची तर्काची समजही विकसित होऊ लागली आहे. आता गणिताचा गाव काही फार दूर राहिलेला नाही. 

वाचनाची आवड असती तर वाचता वाचताच हे घडू शकले असते. घरी गोष्टी सांगणारी आजी असती तर बिरबलाच्या गोष्टी ऐकता ऐकताही हे होऊ शकले असते. चंदूसारख्या काहीजणांच्या बाबत अभिनय करताना हे घडेल, इतर काहीजणांना सायकल दुरुस्त करताना विचार करून समस्या सोडवायची गंमत कळेल तर काहीजणांना गॅलरीतली शेती करताना गणित-विज्ञानाची समज येईल. 

शंभर शक्यता असू शकतील. शाळेत शिकत नाही अशा एका मुलाबरोबर यातली एक तरी शक्यता तपासणारा प्रयोग करणार का तुम्ही? असा काही प्रयोग आधीच केला आहे का? तर कळवा त्याबद्दल आम्हाला. 

‘शिकण्याचे प्रयोग’ करूया. ‘शिकण्याच्या शंभर शक्यतांचा’ अनुभव घेऊया.

सुबोध केंभावी   

subkem@gmail.com

9819144898