Project-Based Langauge Learning” ही अध्ययन पद्धती प्रत्यक्षात उतरवत खेळघरातील भाषेच्या वर्गात ‘खेळ’ या प्रकल्पाला जोडून मराठी भाषेचे काम झाले. महिनाभर चाललेल्या या प्रकल्पात मुलांनी आधुनिक आणि पारंपरिक खेळ यांचा अभ्यास केला. आपल्या ताईंच्या लहानपणी कोणते खेळ होते हे शोधून काढले, ते खेळून बघितले. ताईंनीही मुलांचे नवीन खेळ शिकून घेतले.

मुलांनी पारंपरिक आणि आधुनिक खेळ याच्या याद्या तयार केल्या. आपल्याला माहीत नसलेले खेळ जाणून घेण्यासाठी ताईंची मुलाखत घ्यायची ठरली. ताईंना प्रश्न विचारताना मुले मुलाखत कशी घेतात हे शिकू लागली. ताईने मुलांना नोंदी कशा घ्यायच्या हे ही शिकवले. त्याचा मुलांनी लगेच मुलाखतीच्या नोंदी घेण्यासाठी उपयोग केला. खेळाचे नियम कसे लिहायचे हे कुल्फी अंकातील एका उपक्रमाच्या आधाराने शिकून घेतले. गटागटाने एक खेळ निवडून त्यासाठी एक पोस्टर तयार केले, आणि त्याचे सादरीकरण केले. लोकांसमोर उभे राहून एखाद्या विषयाबद्दल नेमकेपणे बोलणे याचाही अनुभव मुलांना मिळाला. पोस्टर मधून मुलांची सृजनशीलता आणि प्रकल्पातील engagement दिसून येत होती.

एखादा खेळ उत्तम पद्धतीने खेळण्यासाठी काय करावे लागेल? असा प्रश्न विचारला असता मुलांनी अनेक बारीक निरीक्षणे नोंदवली – आंधळी कोशिंबीर साठी “लै फोकसनी ऐकावं लागतंय ताई”, कॅरम साठी “कोण चांगला खेळतो तो नक्की काय करतो हे बघायला लागतं”, कबड्डी साठी “दम ताकत आणि फास्ट पाहिजे खूप”, सागरगोटयांसाठी “जास्त पासरायच्या नाहीत, नाहीतर उचलता येत नाहीत” अशी वेगवेगळी निरीक्षणे मुलांनी सांगितली. मुलांच्या नेहेमीच्या अनुभवातले खेळ असल्यामुळे त्याबद्दल भरभरून बोलत होती. अमुक खेळ मुलींचा, तमुक मुलांचा असे असते का? या प्रश्नावरही खूप चर्चा झाली.

या प्रकल्पात कुल्फी मासिकाच्या गुढीपाडवा २०२४ अंकातील “बॅट बॉल खेळाचे नियम” या चित्र-उपक्रमाचा खूप उपयोग झाला. मुलांनी त्या चित्रावरून प्रोत्साहन घेऊन पोस्टर्स तयार केले. भाषेच्या वर्गात दर्जेदार बालसाहित्याचे स्थान इतर कोणतेही साधन घेऊ शकत नाही हे पुन्हा प्रकर्षाने जाणवले. असे उत्तम बालसाहित्य तयार केल्याबद्दल माझे मित्र Rushikesh Dabholkar आणि Harshal Korhale यांचे खूप खूप आभार!

भाषा शिक्षणात खूप संशोधन झाले आहे, होतो आहे. त्यातले नवनीत आपल्या मुलांना मिळावे, वेगवेगळ्या पद्धतीने हे संशोधन प्रत्यक्ष वर्गात यावे यासाठी हा उपक्रम आम्ही राबवून बघितला. हा उपक्रम खेळघरच्या स्नेहा ताईने इयत्ता ५-८ मुलांबरोबर राबावला.

मानसी महाजन