Wirpo Foundation च्या माध्यमातून खेळघर वस्तीपातळीवर वंचित मुलांबरोबर काम करणाऱ्या काही संस्थांसमवेत, सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या गरजांनुसार त्यांना मदत करते.

दिनांक १६-१९ एप्रिल २०२५ मध्ये अशा तीन संस्थांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते.

त्यातील समावेश ही संस्था गुजरात मध्ये मेहेसाणा भागात मीर, फकीर, देविपूजक अशा भटक्या विमुक्त समुदायांसमवेत काम करते. यांची बहुसंख्य मुले शाळाबाह्य आहेत.

नवजीवन ही संस्था कल्याण भागातील कचरावेचक मुलांसमवेत शिक्षणाचे काम करते आणि ग्रामऊर्जा ही संस्था आंबेजोगाई भागात सरकारी शाळांबरोबर काम करते. ऊस तोडीसाठी ४-५ महिने स्थलांतरित होणाऱ्या येथील कुटुंबांचे प्रश्न जटिल आहेत.

या कार्यकर्त्यांबरोबर आम्ही गेले चार दिवस आनंदाने शिकण्याच्या दिशेने काम केले. शिकणे शिकवणे दोन्ही बाजूंनी होते. हे कार्यकर्ते ज्या समुदायांबरोबर काम करतात त्यांचे प्रश्न हालवून टाकणारे आहेत. गुजराथेतल्या तीव्र उन्हात दुपारच्या वेळी पायात चप्पल नसलेली मुले उन्हाचे चटके टाळायला धावत धावत वर्गाला येतात, असे प्रसंग सांगताना त्या कार्यकर्त्यांसमवेत सगळ्यांचेच डोळे पाणावत होते.

या तीनही संस्थादेखील अनेक अडचणींचा सामना करत काम पुढे नेत आहेत. वंचिततेच्या अनेक छटा या निमित्ताने आमच्यासमोर येत गेल्या.

अनेक activities च्या माध्यमातून शिकणे -शिकवणे या कार्यकर्त्यांसमोर उलगडत गेले. या workshop मधून आम्हा सर्वांनाच सहभावनेतून मिळणारी प्रेरणा फार महत्वाची आहे.

आजच्या काळात, एकविसाव्या शतकात देखील, ज्यांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहेत अशा वंचित समुदायांबरोबरील काम करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

शुभदा जोशी,पालकनीती परिवार,खेळघर.