दिवाळीनंतरचा सगळा वेळ खेळघर दुकानजत्रामय झाले होते. एखादे छोटे ध्येय असलेली सामूहिक कृती देखील वातावरण किती उत्साह – आनंदाने भरून टाकते याचे प्रत्यंतर आले.
अक्षरनंदन शाळेने विकसित केलेला हा उपक्रम, आम्ही त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून शिकून घेतला.
दुकानजत्रेच्या निमित्ताने मुलांना एखादा बिझीनेस करण्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांचा परिचय करून देणारा एक संवादगट शिक्षकांबरोबर आणि नंतर मुलांबरोबर प्लॅन केला होता.
दुकानजत्रा म्हणजे व्यवहारिक कौशल्ये शिकण्याची सुवर्ण संधीच!
तोंडी गणिते करणे, वस्तूंची किंमत काढणे, नफा- तोटा अशा अनेक संकल्पना मुलांबरोबर कशा घ्यायच्या या विषयांवर शिक्षकांची सत्रे सुमित्राताईंनी घेतली.
एकूण या उपक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी स्नेहा आणि मीनाताईंनी घेतली होती. प्रियंका आणि अनुराधा यांचे प्रत्येक गोष्टीवर लक्ष होते. कार्यक्रम उत्तम होण्यासाठी काय काय करता येईल यासाठी त्या प्रयत्न करत होत्या.
सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांनी वस्तू कशा बनवायच्या त्या शिकून घेऊन, चिकाटीने पुन्हा पुन्हा करून त्यात प्राविण्य मिळवून finished वस्तू मोठ्या संख्येने बनवणे, त्यांचे पॅकिंग, जाहिरात अशा सर्व फ्रंट्स वर पुढाकाराने काम केले. अभ्यास विषय शिकतानाचा कंटाळा इथे पार पळून गेला होता.
प्रत्यक्ष कार्यक्रम चांगलाच झाला. मुले, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, स्वयंसेवी कार्यकर्ते आणि पाहुणे असे तीनेकशे लोकांचा सहभाग असलेला हा मेळा सगळ्यांच्या मनात उत्साह आणि प्रेरणा जागवणारा होता.
आता पुढील आठवड्यात या कार्यक्रमाचे मूल्यमापन होईल. संवादातून काय जमले काय हुकले यावर विचार होईल. प्रत्येक वर्गात मुलांबरोबर नफा तोटा काढला जाईल. मुलांच्या श्रमाच्या पैशांचे काय करायचे हे सर्व सहमतीने ठरेल. पालकसभा घेतली जाईल. त्यात मुले ते या उपक्रमातून काय शिकले याबद्दल मांडणी करतील.
सर्व शिक्षकांनी अतिशय मनापासून काम केले, जबाबदारी घेतली. स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा देखील कार्यक्रमात पुढाकार होता. युवक गटाच्या मुलांनी देखील शक्य ती सर्व मदत केली अगदी शेवटच्या आवराआवरीपर्यंत!
या दुकानजत्रेसाठी वेळ काढून मुलांच्या आनंदात सहभागी झालेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार!
खेळघर टीम


