
अरुणा बुरटे
धर्म-जात या ओळखीशी निगडित दुरभिमान आणि द्वेषावर आधारित घटना, भेदभाव, तिरस्कार, गैरसमज, एकटेपणा, अन्याय, हिंसा, गुन्हे आणि अशी इतर घटितं यामधील वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. या देशात हिंदू धर्मीय बहुसंख्य असल्यानं हा देश ‘आम्ही म्हणू तसला’ ‘हिंदुराष्ट्र’ आहे, याची चिकित्सा केली, तर तो देशद्रोह मानून तुरुंगात टाकलं जात आहे. दहशतीचं सावट दाट होतं आहे. समाजमन खंडित होत आहे. ‘ते’ आणि ‘आपण’ असं दुभाजन टोकाचं झालेलं आहे. संवादाच्या शक्यता अंधुक होत आहेत. यामुळे मनात खोलवर अस्वस्थता आहे. लहानग्यांच्या मनातील द्वेष आणि भ्रमदेखील व्यक्त होत आहेत. अशा वातावरणात पुढील पिढीचं संगोपन करणं संवेदनशील नागरिकांना म्हणजेच पालक, शिक्षक यांना कठीण जात आहे. अशा या काळात धर्म या विषयावर काही गोष्टी मांडायचा हा प्रयत्न आहे.
धर्म-अभ्यासाची गरज
धर्माची गरज नेहमीच होती, आज आहे आणि भविष्यातही असेल. जिथे जिथे प्राचीन मानवी संस्कृती रुजली, तिथे तिथे धर्म निर्माण झाले. माणसां-माणसांतील धर्माशी निगडित व्यवहार अनेक प्रकारचे असतात. काही नीतीनियम हे माणुसकी, परोपकार, सलोखा, सहअस्तिव सुलभ करणारे, अन्याय आणि भेदभाव कमी करण्याचे भान जागवणारे असतात, तर काही व्यवहार हे कर्मकांड, पूजा-पाठ, पुरोहित आणि प्रार्थनास्थळं यांसारख्या गोष्टीत अडकवणारे, अन्याय, शोषण आणि भेदभाव चालू ठेवणारे असतात. एक माणसाला प्रतिष्ठा देणारे, दुसरे माणसाची प्रतिष्ठा पायदळी तुडवणारे. ही झाली दोन टोकं. याच्या अधेमध्येसुद्धा अनेक धर्मव्यवहार असतात. विविध धर्मांशी निगडित अशा दोन्ही प्रकारच्या धार्मिक व्यवहारांची माहिती धर्म-अभ्यासातून मिळते.
मानवी अस्तित्वाशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टीचा कार्यकारणभाव पूर्णपणे दाखवता येत नाही. उदा. गंभीर आजार, साथी, अपघात, मृत्यू, दुष्काळ आणि यांसारख्या इतर अनेक घटना. त्या वाट्याला आल्या, की माणसं खचून जातात. भविष्यात कधी काय घडेल याबद्दलची अनिश्चितता आणि भय यावर मात करण्यासाठी माणसाचं मन देव, धर्म, प्रार्थना अशा गोष्टींचा आधार घेतं. लोकशाही मार्गानं कल्याणकारी व्यवस्थेतून भौतिक पातळीवर सर्वांसाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्यसुविधा, शिक्षण याची हमी देऊन काही प्रमाणात असे आधार निर्माण करता येतात. तरी मानसिक पातळीवरील आधाराची गरज धर्मश्रद्धेतून भागवली जाते. याची जाणीव धर्माविषयी विचार करताना सतत ठेवावी लागते.
सर्वसामान्य माणसं आपापली श्रद्धा, समज आणि सवडीनुसार धर्मपालन, रूढी-परंपरांचं पालन करत असतात. धर्मचिकित्सेला विरोध होत असला, तरी धर्माचा अभ्यास आणि चिकित्सा होत असते. कोणत्याही धर्माचं पालन न करणारी माणसंदेखील धर्माचा अभ्यास ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून करू शकतात, करतात. अशा अभ्यासानं धर्मांची ओळख, स्वधर्माविषयी आस्था आणि परधर्माविषयी आदर या गोष्टी साधता येतात.
धर्मांची निर्मिती
साधारण दोन लाख वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात आदिमानवानं अनेक संकटं झेलत तगून राहण्यासाठी आफ्रिकेतील जंगलातून विविध भूप्रदेशात भटकंती केली. शिकारीसाठी दगडाची अणकुचीदार शस्त्रं बनवली. अग्नी तयार करून त्यावर नियंत्रण मिळवलं. गुहांच्या भिंतींवर शिकारीची चित्रं काढली. अंदाजे 10 ते 12 हजार वर्षांपूर्वी पृथ्वीतलावरील तैग्रिस-युफ्रेटिस (इराक), नाईल (इजिप्त), सिंधू (भारत-पाकिस्तान) आणि हुआंग (पिवळी नदी-चीन) या अनादी काळापासून खळाळत वाहणार्या महाकाय नद्यांच्या सुपीक किनारी ‘प्राचीन संस्कृती’ची चार आदि रूपं साकारली. स्थलांतरं कमी झाली. शेती गवसली. जोडीनं पशुपालनही. चाकाचा वापर, कालमापन, नगराची स्थापना, लिपीचा शोध, दैवतांची पूजा आणि व्यापार इत्यादी प्राचीन संस्कृतीचे पैलू विकसित झाले. हम्मुराबीच्या कायद्यांचा शिलालेख, देव-मानव संघर्ष दाखवणारं ‘गिलगमेशचं महाकाव्य’, भव्य पिरॅमिड, ‘इजिप्तच्या मृत लोकांचा ग्रंथ’, रस्ते, दोन मजली घरं, 40’ु20’ु10’ आकाराचे सार्वजनिक तरण / स्नान हौद, विहिरी, 200 फूट लांबीच्या गोदामांची व्यवस्था, धातू आणि मातीची भांडी,
रेशीम आणि अशा इतर आविष्कारातून संस्कृती संपन्न होत गेली. सिंधू संस्कृतीची लिपी अजूनही उलगडलेली नाही.
समूहानं राहणार्या माणसाला निसर्गदेवता आपलं रक्षण करतात, आपली भूक भागवतात, मृत्यूपासून वाचवतात आणि भीती नाहीशी करतात असा विश्वास वाटायचा. देवतांची आराधना केल्यानं कोप टाळता येतो अशी आशा माणसाला वाटे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी माणसांनी अनेक विधी किंवा पूजाअर्चा तयार केल्या. शेतीत अतिरिक्त उत्पादन होऊ लागलं. पशुपालन आणि शेती यांमधून राबणारे कष्टकरी आणि शेतीचे मालक असं समाजाचं स्तरीकरण झालं. काही ठिकाणी राजाला देव मानण्याची पद्धत निर्माण झाली.
माणसाच्या मेंदूची उत्क्रांती आणि धर्मांची निर्मिती यात आंतरसंबंध दिसतो. माणसाचा भावनिक मेंदू (काही लाख वर्षांपूर्वी), विचारी मेंदू (50 हजार वर्षांपूर्वी) आणि उन्नत मेंदू (10 हजार वर्षांपूर्वी) असा उत्क्रांत झाला आहे. भीती, भूक आणि प्रजोत्पादन; स्वतःच्या समूहाविषयी प्रेम ते स्वतःच्या व दुसर्या समूहाविषयी प्रेम असा जाणिवांचा प्रवास आहे. उन्नत मेंदू उत्क्रांत होण्याच्या टप्प्यावर प्राचीन संस्कृती आणि त्यानंतर म्हणजे साधारण 4000 वर्षांपूर्वी विविध धर्मांची निर्मिती झालेली आहे.
धर्मांच्या कालरेषेवर हिंदू (4000 वर्षं ), ज्यू (3500), जैन (2500), बौद्ध (2500), पारसी (2500), ख्रिश्चन (2000), इस्लाम (1400), शीख (500) अशा क्रमानं महत्त्वाचे धर्म उदयाला आले. यापैकी हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख हे धर्म भारतीय भूभागात तर ज्यू, पारसी, ख्रिश्चन, इस्लाम हे धर्म मध्यपूर्व भूभागात निर्माण झाले. हिंदू धर्मविचारांत नास्तिक विचारांनासुद्धा स्थान असूनही त्याचा फारसा उल्लेख होत नाही. जगात 2015 च्या (पीईडब्ल्यू) गणनेनुसार साधारण ख्रिश्चन 31%, इस्लाम 24%, हिंदू 15%, निधर्मी 16%, बौद्ध 7% आणि इतर बाकीच्या धर्मांचे आहेत. भारतात 2011 च्या जनगणनेनुसार 80% हिंदू, 14 % इस्लामिक, 2.3% ख्रिश्चन, 0.2% निधर्मी आणि उरलेले बाकीच्या धर्मांचे आहेत.
आपल्या टोळीसह, समूहासह तगून राहण्याची इच्छा होणं, सहकार्य करणं, समूहातील इतरांबरोबर जोडल्याची भावना असणं, त्यामुळे सुरक्षित वाटणं यासारख्या मानसिक, भावनिक, सामाजिक गरजेतून, अस्तित्व टिकवण्याच्या प्रेरणेतून धर्माची सुरुवात झाली, असं विविध ज्ञानशांखांतले अभ्यासक सांगतात. मानवानं अज्ञाताचा शोध घेण्यासाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी, भीतीपासून मुक्तता मिळवण्यासाठी मिथककथा, विधी, मंत्र-तंत्र, पूजा याची रचना केली. हे विश्व कोणी निर्माण केलं, कसं तयार झालं, कशापासून झालं, मानवाच्या अस्तित्वाचा अर्थ काय, मृत्यूनंतर काय होतं, आत्मा-चैतन्य-प्राण म्हणजे काय, दुःख, संकटं का आहेत, यांसारख्या असंख्य प्रश्नांची सोडवणूक करताना तयार केलेले आधार म्हणजे धर्म. धर्मग्रंथ, रीती-रिवाज, पूजा-अर्चा-प्रार्थनास्थळं, विधी, कर्मकांडं, खाजगी आणि सार्वजनिक मनोव्यापार, विविध कला, सण-उत्सव, सत्तासंघर्ष हे सारे व्यवहार आपल्या कवेत घेऊ पाहणारी व्यवस्था म्हणजे धर्म. गूढ अनुभव, कथा, भक्ती, नीती-नियम आणि कायदे असे धर्माचे महत्त्वाचे पैलू आहेत.
धर्मविचार आणि बदल

मानवाजवळ स्मरण आणि कल्पनाशक्ती आहे. आधीची पिढी जास्त अनुभवी असल्यानं एक पिढी आपलं ज्ञान-माहितीचं संचित पुढील पिढीला देते. यातून विविध परंपरा तयार होतात. धर्म, तत्त्वज्ञान, कला, समाज-विज्ञान, मानव-विज्ञान आणि भौतिक-विज्ञान ही या परंपरेची काही उदाहरणं आहेत. या सार्या परंपरा मानवी संस्कृतीचा भाग आहेत.
धर्मशास्त्र, धर्म आणि परमेश्वर याबद्दलचा अभ्यास म्हणजेच धर्मविद्या (थिऑलोजी). ही सतत विस्तारणारी ज्ञानशाखा आहे. कोणत्याही नवीन धर्मश्रद्धा रचल्या जातात, तेव्हा धर्मातील आधीच्या ज्ञानसंचिताला ओलांडण्याचा त्या प्रयत्न करतात. कोणत्याही धर्मविचारांत एकसाचीपणा अथवा एकसुरीपणा नसतो. ऋग्वेदातील नासदीय सूक्तात म्हटलं आहे, ‘या जगाची, पृथ्वीची, सृष्टीची, सजीवांची निर्मिती कोणी केली हे कदाचित सृष्टीकर्त्याला माहीत असेल किंवा नसेलही. कर्ता असेल किंवा नसेलही.’ ही संकल्पना बुद्धिवादी परंपरेची अत्यंत प्राचीन कडी आहे. वेद, उपनिषदं, दर्शनं, पुराणं, स्मृती, महाकाव्यं, शैव-वैष्णव-तांत्रिक इत्यादी पंथ अशा विविध मार्गांनी हिंदू धर्मविचार सतत विस्तारले आहेत. नव्यानं सांगितलेला धर्म सुरुवातीला क्रांतिकारी बदल घडवतो. उदाहरणार्थ, गौतम बुद्धांनी माणसाच्या दुःखाचं कारण तृष्णा (हाव, लोभ) आहे असं सांगितलं. त्यामुळे पूर्वजन्मातील कर्मामुळे या जन्मात दुःख तयार होतं, हा विचार मागे पडला. नवीन धर्म रचताना आधीच्या धर्मविचारांमधून काही धागे
घेत, नवीन विचारांची जोड दिलेली असते. उदाहरणार्थ
‘ज्यू धर्माचे प्रेषित मोझेस यांनी सांगितलेल्या दशाज्ञांचा विसर पडल्यानं मी त्या पुन्हा सांगत आहे,’ असं प्रेषित येशू ख्रिस्त म्हणाले होते. आठव्या शतकात वासिल बिन अता (699-748) यांनी ‘मुताझिला’ या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांची परंपरा इस्लाममध्ये सुरू केली. सूफी विद्वान अल गजाली मंत्री झाल्यावर तुर्कस्तानमध्ये सूफी पंथाला राजाश्रय मिळाला.
सूफी संतांना अफाट लोकप्रियता मिळाली. 16व्या शतकात धर्मगुरू मार्टिन ल्युथर यांनी ख्रिश्चन धर्माचा अर्थ नव्यानं सांगितला. सामान्य अनुयायांची फसवणूक करणार्या पुरोहितशाहीला प्रश्न विचारले. त्यातून धार्मिक जीवनात व्यक्तिस्वातंत्र्याचं मूल्य निर्माण झालं. भारतीय भूभागात 12 ते 16-17 शतकादरम्यान सर्वदूर प्रभावी असलेल्या भक्तीपरंपरेनं जात-वर्ण-लिंग असे भेदभाव न करता कोणत्याही भक्ताला मुक्तीचा मार्ग खुला केला. कुराण, हिंदू धर्मग्रंथ आणि बायबल यांमधून काही तत्त्वं घेत सम्राट अकबरानं 16व्या शतकात दीन-ए-इलाही (दैवी धर्म) स्थापन केला; पण त्याला लोकाश्रय मिळाला नाही. हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचे ग्रंथ अभ्यासून याच काळात म्हणजे 15व्या शतकात गुरू नानक यांनी सर्व प्रकारच्या भेदांना ओलांडणार्या शीख धर्माची रचना केली.
प्राचीन काळात (इ.स.पू.500 ते इ.स.500 ही 1000 वर्षं) ग्रीसमध्ये प्लूटो, पायथॅगोरस, युक्लिड आणि यासारख्या इतर अभ्यासकांनी मूलभूत संशोधन केलं. भारतीय भूभागातील अनेक महाविहारात सुश्रुत, चरक, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि यासारख्या इतर अभ्यासकांनी ज्ञाननिर्मिती केली. दोन्ही ठिकाणी तयार झालेलं विविध शाखांमधील ज्ञान तेथे जपलं गेलं नाही. ते बगदादमधील ‘बैत-अल-हिक्मा’ हाउस ऑफ विस्डम म्हणजेच ‘ज्ञानालयात’ 8व्या ते 12व्या शतकापर्यंत अरेबिकमध्ये भाषांतरित होऊन जपलं गेलं होतं. विविध धर्मविचार, भाषा, प्रदेश आणि ज्ञानशाखा यांची कुंपणं ओलांडून या सर्वांना एकत्रित आणणारा ज्ञानसंचय बगदाद येथील इस्लामिक अभ्यासकांनी उभारला. विविध नवीन अरबी ज्ञानशाखा उदयाला आल्या. विकास पावल्या. पाश्चिमात्य जगातील ज्ञानसाठा ग्रीक-सिरीयन-अरबी-लॅटिन-इंग्लिश असा प्रवास करत आणि प्राचीन भारतीय भूभागातील ज्ञानसाठा संस्कृत-अरबी-इंग्लिश असा प्रवास करत ‘ज्ञानालयात’ संकलित झाला. 12व्या शतकानंतर या ज्ञानाची जपणूक युरोपियन विद्यापीठांत झाली.

बैत-अल-हिक्मा
छपाईचा शोध 15व्या शतकात लागला. कोपर्निकसच्या सिद्धांतानं भौतिक जगाबद्दलच्या वैचारिक धारणा बदलण्यास सुरुवात केली. त्यानं विश्वाच्या स्वर्ग आणि पृथ्वी या विभागणीला धक्का दिला आणि पृथ्वी ही स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरणार्या इतर ग्रहांपैकी एक ग्रह बनली. चर्च आणि पोप यांच्या सत्तेला प्रश्न विचारले गेले. त्यानंतर 14 ते 16व्या शतकातील प्रबोधनयुगात मानवतावाद मांडला गेला. मानवतावाद हा मानव-केन्द्री आहे; व्यक्ती-केन्द्री नाही. राजाच्या ईश्वरदत्त अधिकारावर 17-18व्या शतकातील ज्ञानोदय काळात प्रश्नचिन्ह उमटलं. मानवी समाजाचं व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीबद्दल विविध विचार मांडले गेले. राज्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक हक्क देणारी आणि परस्परांना लाभदायक होणारी व्यवस्था होय असं विचारवंतानी सांगितलं. समाजाचं व्यवस्थापन करण्यासाठी धर्मविचारांपेक्षा वेगळ्या विचारप्रणाली तयार होऊ लागल्या. पुरोहित, जमीनदार आणि राजे यांचं संगनमत होऊन सामान्य लोकांचे हाल होत होते. त्याला वैज्ञानिकांनी, अभ्यासकांनी प्रश्न विचारले. हा फार मोठा बदल होता. चार्ल्स डार्विन यांनी 19व्या शतकात सजीवांच्या उत्क्रांती-प्रक्रियेतून माणूस प्रजाती निर्माण झाली आहे हा सिद्धांत मांडला. समाजातील आर्थिक विषमतेचं कारण शोधताना कार्ल मार्क्स या विचारवंतानं ‘भांडवल’ (दास कॅपिटल) हा ग्रंथ लिहिला. भांडवली व्यवस्थेत कामगारांना न्याय्य हक्क का मिळू शकत नाहीत, याचं तपशिलात विवेचन केलं.
विचारधारा-निर्मितीच्या बदललेल्या परिस्थितीत, एकोप्यानं व्यवहार करण्यासाठी धर्माचा नव्यानं अन्वय लावण्याची, त्याच्या मर्यादा पार करण्याची गरज जाणवली. नवीन वैज्ञानिक शोधातून भौतिक जगाबद्दल मिळणारी माहिती आणि धर्मविचार या दोन्हीत सुसूत्रता आणण्यासाठी युरोपमध्ये ‘ख्रिश्चन धर्म सुधारणा आंदोलन’ झालं. यालाच आधुनिकतावाद (मॉडर्निझम) म्हणतात. ‘पवित्र बायबल’चा नवा अर्थ मांडण्यात आला. बायबलमध्ये गुलामगिरीचं समर्थन असलं, तरी त्याचा कालसुसंगत अर्थ लावण्याचा विवेक परमेश्वरानं आपल्याला दिला आहे, असं क्वेकर पंथांचं म्हणणं होतं. दोन शतकांच्या अथक प्रयत्नांनंतर 19व्या शतकात गुलामगिरी नष्ट झाली. बायबलचा अर्थ लावण्याची चिकित्सक पद्धतही रुजली. युद्ध-विरोध आणि शोषितांना सक्रिय मदत करण्याचं काम केल्यानं क्वेकर पंथीयांना ख्रिश्चन जगात विशेष सन्मान मिळाला. या पंथाला ख्रिश्चन धर्माचा ‘सदसद्विवेक’ मानलं जाऊ लागलं.
वासाहतिक काळात इंग्रजी शिक्षणामुळे अशा विचारांच्या आणि बदलांच्या संपर्कात आल्यानं हिंदू धर्माची चिकित्सा करून आधुनिकतावादी रचना करण्याची प्रेरणा काही भारतीय अभ्यासकांना मिळाली. आर्यसमाज, ब्राह्मो समाज, प्रार्थनासमाज यांची स्थापना करताना त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरांना विरोध केला. महात्मा फुले यांनी ‘सार्वजनिक सत्य धर्म’ स्थापून सत्यशोधनावर भर दिला. ही एक प्रकारे सामाजिक समतेकडे नेणारी धर्मसुधारणा चळवळ होती असं म्हणता येईल.
1893 मध्ये शिकागो येथे पहिली जागतिक धर्मपरिषद (पार्लमेंट ऑफ वर्ल्ड रिलीजन्स) झाली. त्यात विविध धर्मांतील सामंजस्यावर भर दिला गेला. या परिषदेच्या शतकपूर्ती वर्षात म्हणजे 1993 मधील धर्मपरिषदेत विविध धर्मविचारांवर चर्चा झाली. आजतागायत असे प्रयत्न होत आहेत. नुकतीच म्हणजे ऑगस्ट 2023 मध्ये शिकागो येथे जागतिक धर्मपरिषद झाली. त्यामध्ये हुकूमशाहीच्या विरोधात मानवाधिकार, लोकशाही, न्याय, पर्यावरण सुरक्षा, शांती इत्यादी गोष्टींवर भर देण्यात आला.
21व्या शतकात स्त्रिया, पारलैंगिक व्यक्ती, विविध जात-धर्म-वर्ग, मूलनिवासी, आदिवासी आणि इतर यांच्या स्वातंत्र्याच्या अपेक्षांची नोंद घेण्यात विविध धर्म कितपत प्रभावी होतील, याची उकल येणारा काळ करेल. राजसत्ता आणि धर्मपीठ यांना धर्मचिकित्सा झालेली आवडत नाही. त्यांना आपापली सत्ता आणि वर्चस्व अबाधित राखून शोषण चालू ठेवायचे असते. परंतु छळाला न जुमानता धर्मचिकित्सा होते, सत्ता आणि सत्य या संघर्षात सत्याची बाजू भक्कम होते, तेव्हा ज्ञानशाखा मुक्त होतात, संस्कृतीची भरभराट होते, ज्ञानाचा विकास होतो. माणसं विचारी बनतील अशी आशा वाढीस लागते.
धर्म आणि वैश्विक एकोपा
साधारण 2500 वर्षांपूर्वी झरतृष्ट्र, महावीर वर्धमान, गौतम बुद्ध, कन्फ्यूशस, सॉक्रेटिस आणि यांसारख्या इतर द्रष्ट्या व्यक्तींनी ‘मानवी जीवनातील दुःखाचं मूळ काय आणि त्याचं निवारण कसं करता येईल’ यावर सखोल चिंतन केलं.
सामान्य माणसांच्या जगण्याशी काहीएक संबंध नसणार्या – विश्व कोणी निर्माण केलं, ईश्वर आहे काय, या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी काल्पनिक अनुमान करणं बुद्धांनी टाळलं. ते म्हणत, ‘या प्रश्नांची उत्तरं देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. जे
काही जाणण्याजोगं आहे, ते सर्व आपण जाणतो, असं
कोणीच म्हणू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट सतत बदलणारी आहे. नेहमी काहीतरी अज्ञात राहतं. ज्ञानाला अंत नाही. नेहमीच अधिकाधिक जाणण्याचं शिल्लक राहतं. अमर्याद संपत्ती-संचय करण्याच्या हव्यासापोटी सामाजिक पातळीवर अनेक प्रकारची दुःखं तयार होतात. मारामारी, झगडे, वाद, प्रतिवाद, भांडणं, निंदा आणि असत्य इत्यादी गोष्टी निर्माण होतात. ही सर्व प्रकारची भांडणं राजसत्तेकडून मिटवता येणं शक्य नाही. त्यामुळे याबद्दल विशेष जागरूक असायला हवं.’
दोन सहस्रकांपूर्वी येशूंनी प्रेषित कर्मठ ज्यू धर्मपंडितांना प्रश्न विचारले, तसेच जुलमी रोमन सत्तेलाही. धर्म, कायदे हे माणसासाठी असतात… गोर-गरिबांचं दुःख दूर होऊ शकतं… परमेश्वराचं राज्य भूतलावर येऊ शकतं… या राज्यात कोणालाही प्रवेश आहे… त्यासाठी फक्त आपल्याजवळील सर्व संपत्तीचा त्याग करावा लागेल… तसेच शत्रूलाही क्षमा करावी लागेल… असा क्रांतिकारी विचार येशूंनी मांडला. प्रबळ सत्ताधारी धर्मपंडित आणि राजकारणी दोघेही जगाची व्यवस्था लावण्यासाठी जे कायदे करतात त्यामुळे दुःख निर्माण होतं असं येशू सांगत असत.
‘जे गरीब आणि दुःखी आहेत त्यांच्याबद्दल आपल्या मनात करुणा बाळगा. श्रीमंतीमुळे आलेले दुर्गुण आणि दुराचरण यांचा त्याग करा. सर्वांशी बंधुभावानं वागा. विधवा आणि अनाथ मुलं यांचा सांभाळ करा. सर्व व्यवहार प्रामाणिकपणे आणि नेकीनं करा…’ मक्केमधील गरीब आणि गुलाम यांच्या मनाला प्रेषित मुहंमद यांचा हा संदेश थेट भिडला.
अन्याय आणि भेदभाव चालू ठेवण्यासाठी जसा संस्थात्मक धर्माचा वापर केला गेला, तसाच अन्याय आणि भेदभाव कमी करण्याचं भान जागवण्यासाठी, विषमतेचं, अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी धर्माचा आधार घेतला गेला. प्रत्येक धर्मात नैतिक तत्त्वं सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ, लोभ सोडा, शत्रूवरही प्रेम करा, खरं बोला, दान करा इत्यादी. वर्तमान काळात दलाई लामा यांच्यासारख्या काही धर्मचिंतकांना धर्मांपलीकडे वैश्विक नीती बनवता येईल असं वाटतं.
सामाजिक प्रश्नांची उत्तरं शोधताना अनेक धार्मिक व्यक्तींनी व्यापक मानवतावाद रुजवण्यासाठी मोलाचं काम केलं आहे. विसाव्या शतकात अहिंसेच्या मार्गानं सामाजिक, राजकीय लढा देणारे महात्मा गांधी यांनी जगाला ‘सत्य हाच ईश्वर आहे आणि त्याकडे जाण्याचा मार्ग फक्त अहिंसा आहे’ हा संदेश दिला. ते म्हणत, ‘मी हिंसेला विरोध करतो. कारण हिंसेतून जे चांगले परिणाम होतील असं वाटतं, ते वरवरचे असतात आणि होणारे वाईट परिणाम मात्र दूरगामी असतात. अहिंसक सत्याग्रहाचं बी पेरल्यावरच शांतीचं झाड तयार होतं.’ बाबासाहेब आंबेडकर यांनाही माणसाच्या जीवनातल्या सर्व प्रकारचं दुःख, अन्याय यांचं निवारण करण्यासाठी गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरणा दिली. 20व्या शतकातले धर्मगुरू मार्टिन ल्युथर किंग यांनाही प्रेषित येशूख्रिस्तांच्या संदेशांनी मानसिक बळ दिलं. महात्मा गांधींच्या विचारांतून प्रेरणा घेत अहिंसा आणि सत्याग्रहाची कास धरत मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांसारख्या नेत्यांनी वर्णद्वेषविरोधात प्रखर आणि दीर्घ लढा दिला आहे.
वरील विविध प्रयत्नांच्या परिणामातून वैश्विक एकोप्याची मूर्त कल्पना क्षितिजावर उमटू लागली. त्यासाठी संघर्षाऐवजी संवाद, युद्धाऐवजी शांतता, स्पर्धेऐवजी सहकार्य, विषमतेऐवजी समता, हुकूमशाहीऐवजी लोकशाही, राष्ट्रवादाऐवजी वैश्विक भान, स्रोतांच्या अमर्याद वापराऐवजी पुनर्निर्मित वापर, अमर्याद नफ्याऐवजी पृथ्वीवरील सजीव-निर्जीव या दोन्हींचं संवर्धन यांसारखे पर्याय पुढे आले. त्याच्या बरोबरच बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे माणसाच्या मनाची मशागत करत राहायला हवी. द्वेष, शत्रुत्व, भीती, गर्व, स्पर्धा, हाव यासारख्या भावना तपासून पाहत, त्या कमी करत, प्रेम, मैत्री, धैर्य, सलोखा, सहकार्य, समाधान यांसारख्या भावना वाढीस लावाव्या लागतील. नेणिवेत बदल घडवण्यासाठी लहानपणापासून सहकार्य, प्रेम, धैर्य इत्यादी मूल्यं रुजवावी लागतील. माणसाच्या मनावर आणि माणसांनी तयार केलेल्या व्यवस्थांवर एकत्रित काम करावं लागेल.
चौदावे दलाई लामा आज जगभर बुद्धांचा संदेश प्रभावीपणे देताना म्हणतात, ‘दुसर्यांबद्दल आपल्या मनात करुणा निर्माण झाली, की आपण आनंदी बनतो. राग, संताप, द्वेष आणि लोभ, स्वार्थ यांपासून दूर जातो. हीच गोष्ट जगात शांती निर्माण करेल.’ हे जमवण्याची नितांत गरज आहे.
अरुणा बुरटे
aruna.burte@gmail.com
लेखक गेली 5 दशके मुंबई, सोलापूर आणि पुणे येथे विविध सामाजिक प्रश्नांवर काम करतात. त्या अनुषंगाने लिखाण करतात.
चित्रे : इंटरनेटवरून साभार
धर्म आणि जात
धर्म या विषयावरील कार्यशाळेत ‘तुमचा धर्म कोणता आहे हे कधी आणि कसं कळलं – या प्रश्नाला प्रतिसाद देताना ‘हिंदू’ धर्माचा उल्लेख न येता जातीचा संदर्भ दिला जातो.’ यावर विचार करताना लक्षात येते, की व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारात जातीचा संदर्भ जैव असतो. हिंदू धर्माची संस्थात्मक बाजू म्हणजे जातिप्रथा. अन्य धर्मांत विविध पंथ असतात; पण त्यामध्ये जन्माशी निगडित पवित्र-अपवित्रतेशी जोडलेला श्रेष्ठ-कनिष्ठ असा भाव नसतो. जातिभेद नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न होऊनही ती जात नाही, कारण जातीय उतरंड ही सामाजिक आर्थिक सत्तेशी निगडित असल्यामुळे या जाणिवा दैनंदिन व्यवहारातून दृढ होत अनेकांच्या नेणिवेत गेलेल्या आहेत.
हिंदू धर्म-विचारांत एक बाजू अशी आहे. ऋग्वेदातील पुरुषसुक्तात आद्य पुरुषापासून (ब्रह्मापासून) चातुर्वर्णाची निर्मिती झाली असा उल्लेख आहे. काही अभ्यासकांना हे निर्मितीचं सूक्त वाटतं. अजूनही हा वादाचा विषय आहे. परंतु याच सूक्तानुसार ब्राह्मण मुखापासून, क्षत्रिय बाहूपासून, वैश्य
मांडीपासून आणि शूद्र आद्य पुरुषाच्या (ब्रह्माच्या) पायापासून निर्माण झाले आहेत. प्रत्येक जीव जन्म, कर्म, मृत्यू या संसाराच्या रहाटगाडग्यातून जातो. आत्मा अमर असल्याने जीवाचा पुनर्जन्म होतो. आधीच्या जन्मातील पाप-पुण्य यावरून नवीन जन्म कोणत्या जातीत / योनीत होणार हे आधी ठरते, अशी ही मांडणी आहे.
हिंदू धर्म-विचारांत दुसरी बाजू अशी आहे. आर्य समूहांनी सिंधू खोर्यातील समूहांना असुर, पणी, राक्षस, दैत्य, कापालिक अशी विविध नावे दिली होती. या विविध नावांच्या सामान्य लोकांची विचारधारा म्हणून तिला ‘लोकायत’ हे नाव पडले असावे. लोकायत चातुर्वर्ण मानत नव्हते. जातिभेद, त्यातील वंशशुद्धी आणि उच्च-नीचतेच्या सर्व कल्पना गैर आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्व वर्णांचे लोक समान आहेत असे लोकायत मानते. त्यांना सिंधू संस्कृती जवळची वाटत असे. पुढे बार्हस्पत्य म्हणजे बृहस्पतीचे मत आणि चार्वाक या नावाने लोकायत विचार विकसित होत गेले. पंचमहाभूतांच्या संयोगातून विश्व आणि मानव निर्माण झाले. पंचमहाभूते म्हणजे जमीन, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश. कोणी ईश्वर या निर्मितीमागे नाही. माणसाचे शरीर आणि आत्मा एकच आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्माही वरील पंचमहाभूतात विलीन होतो. असे असल्याने पुनर्जन्मही नसतो. या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील कर्म, त्याची फळे, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, आत्मा, भुते या कोणत्याही गोष्टी नसतात. त्यामुळे शुद्ध-अशुद्ध, उच्च-नीच, पवित्र-अपवित्र असे कोणतेही संकेत, श्रद्धा मनुष्याच्या जन्माशी जोडल्या जात नाहीत. जे प्रत्यक्ष अनुभवायला येते, तेच प्रमाण मानायचे. मानव आणि भोवतालचे विश्व यातील प्रत्यक्ष हेच प्रमाण मानून समजून घ्यायचे. माणसां-माणसांतील व्यवहारात सुसूत्रता येण्यासाठी राजसत्ता, न्याय आणि नीती याचा पुरस्कार लोकायत विचारधारा करते. मानवाने कष्ट करून जीवन सुखी करावे असे लोकायत म्हणते.
लोकायत विचार आपल्यापर्यंत एका वेगळ्या वाटेने पोचले आहेत. विविध ऋषीमुनींनी तत्त्वज्ञान सिद्धांत रचनेत लोकायत विचार आधी (पूर्वपक्ष) मांडले आणि मग स्वतःचा सिद्धांत (सिद्धांतपक्ष) मांडून ते खोडून काढले. याचा अर्थच आर्यांना लोकायत विचार खोडून काढण्याइतपत महत्त्वाचे वाटले आहेत. रामायण आणि महाभारत या महाकाव्यातही लोकायतचे उल्लेख सापडतात. या सर्वांचे एकत्रीकरण करून नंतरच्या अभ्यासकांनी लोकायत विचारांची मांडणी केली. लोकायत नेहमीच अल्पमतात असणारे विचार होते. लोकायत, बृहस्पती, बुद्ध, कबीर, संत चळवळ, महानुभाव, महात्मा फुले, आंबेडकर, पुढे आ. ह. साळुंखे, डॉ. दाभोलकर आणि इतर अनेक बुद्धिवादी अशी ही परंपरा आपल्यापर्यंत पोचली.
धर्मांतर
धर्मांतर म्हणजे एका धर्मातून दुसर्या धर्मात विधिपूर्वक प्रवेश करणे. जात-धर्म याच्याशी निगडित व्यवहारात अन्याय, अपमान, शोषण झाल्याने, एखाद्या धर्मातील धारणा विशेष पटल्याने, काही भौतिक फायदे होत असल्याने, अथवा भीती, दहशतीपोटी धर्मांतरे होतात.
भारतीय संदर्भात इस्लामने तलवारीच्या जोरावर आणि ख्रिश्चनांनी प्रलोभने दाखवून धर्मांतरे केली असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. काही प्रमाणात तशी धर्मांतरे झाली असतील. सुफी संतांचा प्रभाव किंवा निम्न जातीतल्या लोकांना सोसावे लागणारे जातिप्रथेचे भीषण जाच-काच आणि शोषण यांसारख्या कारणांनी धर्मांतरे झाली असतील असे वाटते. दहशत आणि प्रलोभन ही कारणे असती, तर केवळ 14% इस्लाम आणि 2.5% ख्रिश्चन धर्मीय हे आजचे वास्तव नसते. यापेक्षा नक्कीच जास्त टक्केवारी दिसली असती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्मात प्रवेश केला. त्यांच्यासमवेत जवळजवळ 4 लाख अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. हे 20व्या शतकातील सर्वात मोठे धर्मांतर आहे. त्यानंतरही अशी धर्मांतरे छोट्या प्रमाणात होत राहिली. धर्मांतरानंतरही जात वास्तव शिल्लक उरलेच, एवढा जातीचा संबंध जन्माशी निगडित आहे. तरीही या धर्मांतरानंतर अनेकांना शिकण्याच्या, जीवनाचा दर्जा सुधारण्याच्या संधी मिळाल्या. अनेक विचारवंत, साहित्यिक घडले. त्यामुळे त्यांच्या पुढील पिढ्यांसाठी जवळचे आदर्श तयार झाले. अशी धर्मांतरे झाली नसती, तर हे सारे बदल बहुतेक घडले नसते.
बाबा पद्मनजी, लक्ष्मीबाई टिळक, पं. रमाबाई आणि डॉ. आंबेडकर यांच्या लिखाणातून त्यांनी धर्मांतर का केले हे समजते. माणसाला मुक्तिदायी विचारांचा आधार हवा असतो. त्यातून ही धर्मांतरे घडली आहेत. दुसर्या धर्मातल्या व्यक्तीला स्व-धर्मात धर्मांतरित करण्याचा पर्याय आहे. जगातल्या कोणत्याही प्रस्थापित धर्मविचारात धर्म त्यागण्याचा पर्याय नाही. असा पर्याय केवळ संविधानात आहे. संविधानानुसार ‘माझा कोणताही धर्म नाही’ असे आपण अधिकृतपणे जाहीर करू शकतो. तसेच ‘मी स्वेच्छेने…….. धर्म स्वीकारत आहे’ असेही जाहीर करू शकतो. व्यक्तीच्या सदसद्विवेकबुद्धीच्या स्वायत्ततेला संविधानात आधार आहे. तोही मर्यादित करण्याचे अनेक प्रयत्न अलीकडे सुरू आहेत.
इस्लामबद्दल थोडेसे
इस्लामपूर्व काळापासून भारत-अरब व्यापारी देवाणघेवाण केरळ, गुजरात आणि कोकण किनारपट्टीवर होत असे. त्यांनी इ.स. 629 मध्ये म्हणजे प्रेषित मोहंमद यांच्या काळात चेरामन पेरूमलच्या नातेवाईकांच्या मदतीने केरळमध्ये मशीद बांधली. मशिदीला चेरामन पेरूमलचे नाव दिले. प्राचीन, मध्य आणि अर्वाचीन काळ असा इतिहास समजून घेतला, की मध्ययुगातली युद्धे राज्यविस्तारासाठी असायची ही गोष्ट जगातल्या बहुतेक भूभागांत सामायिक होती हे लक्षात येते. मध्ययुगातल्या लढाया मुस्लीम विरुद्ध हिंदू अशा झालेल्या नाहीत. मुस्लीम राजे इतर मुस्लीम राज्यांविरुद्ध आणि हिंदू राजे इतर हिंदू राज्यांविरुद्ध अशाही लढाया झाल्या. भारतीय उपखंडात सत्ता स्थापन करणार्या अरबांशी तुर्क लढले, त्यांना बाजूला सारून अफगाण पुढे आले आणि अफगाणांना हरवून मुगल सत्तेवर आले. मोगल काळात दिल्ली हे सत्तेचे केंद्र होते. त्या सत्तेच्या केंद्रातही आज बहुसंख्य इस्लाम धर्मीय नाहीत. आजच्या जम्मू आणि काश्मीर येथे इस्लाम धर्मीय बहुसंख्य आहेत. तेथील राजा हिंदू होता. सरंजामशाहीच्या काळात धर्मापेक्षा सत्ता आणि साम्राज्यविस्तार यासाठी राजे, महाराजे, सरदार, सुलतान, नबाब महत्त्वाकांक्षी असायचे. सामान्य लोक पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून सैन्यात भरती व्हायचे.
उमरू पुल्लावर म्हणजे कवी उमर यांनी 17व्या शतकात प्रेषित मोहंमद यांच्यावर 5000 श्लोकांचे ‘सिरापुराणम्’ हे पुराण लिहिले. कुराणाचे वर्णन वेद म्हणून केलेले आहे. शहादा म्हणजे कुराणातील मुख्य सूत्र याला मूळ मंत्र म्हटलेले आहे. मक्का आदिशेषावरील मण्याप्रमाणे सुंदर आहे असे वर्णन केलेले आहे. भारतात पंचपीर किंवा पिराची अनेक स्थाने आहेत. तेथे उरूस उत्सव म्हणजे यात्रा असतात. येथे हिंदू मुस्लीम एकत्र येतात.
भारतीय मुस्लीम समाजात अश्रफ म्हणजे उच्च जाती, अज्लफ या मध्यम जाती आणि अर्झल या कनिष्ठ म्हणजेच दलित जाती असे स्तरीकरण झालेले आहे. शिवाय, मुस्लीम धर्म स्वीकारल्यावर पूर्वीच्या जातीचे संदर्भ होते तसेच राहिलेले आहेत. जातीप्रमाणे असणारे व्यवसाय अजूनही तसेच चालू आहेत. भारतातील मुस्लीम स्थानिक रीतिरिवाज पाळतात आणि प्रादेशिक भाषा बोलतात. उर्दू ही केवळ मुस्लीम धर्मीयांची भाषा नाही. भारतातील मुस्लीम एकसुरी आणि एकसाची नाहीत. त्यांच्यामध्येदेखील बरीच बहुविधता आहे.
इस्लाम धर्मस्थापनेच्या काळात स्त्रियांना आधीच्या काळाच्या तुलनेत काही प्रमाणात हक्क दिलेले आहेत. स्त्रीभ्रूणहत्या इस्लाममध्ये निषिद्ध मानलेली आहे. त्या काळात स्त्रियांना काही प्रमाणात स्त्रीधनाचा आणि वारसा हक्क दिलेला आहे. स्त्रियांना धर्मग्रंथ वाचण्याची मुभा आहे.
धर्म आणि युद्ध
समाजात धर्मांमुळे नक्कीच हिंसा घडली आहे. परंतु तेवढी अन्य कोणत्याही कारणाने घडलेली नाही, हे मत वास्तवाला धरून नाही. वेगवेगळ्या धर्मांत युद्धांबद्दल मुख्यत्वे तीन प्रकारची मते आढळतात.
एक – ‘शांतीच्या’ बाजूने असलेल्या मतानुसार हत्या, हिंसा, युद्ध हे सर्व अन्याय्य म्हणून चुकीचे आहे.
दोन – ‘न्यायाच्या’ बाजूने असलेल्या मतानुसार अन्यायाच्या विरोधात युद्ध करणे समर्थनीय आहे.
तीन – ‘पवित्र’तेच्या बाजूने असलेल्या मतानुसार आपला धर्म एकमेव आणि सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे दुसर्या धर्माचे अनुयायी धोकादायक / पाखंडी असल्याने शत्रू आहेत. युद्ध करून शत्रूचा नाश करणे बरोबर आहे.
गीतेत न्याय्य युद्ध ही कल्पना मांडलेली आहे. त्याच भूमिकेतून कृष्ण अर्जुनाला युद्धाला आणि त्यातील हिंसेला प्रवृत्त करतो. त्याचवेळी इतर ठिकाणी ‘अहिंसो परमो धर्मः’ म्हणजे अहिंसा हाच धर्म होय असेही म्हटलेले आहे. व्यास मुनींनी रचलेल्या महाभारत या महाकाव्यात युद्धातील सर्वनाश दाखवल्यानंतर शांती-पर्वात शांतीचे महत्त्व सांगितलेले आहे.
जैन धर्मविचारात अहिंसेला अत्यंत महत्त्व आहे. बौद्ध धर्मविचारात शांतीसाठी युद्ध टाळण्यावर भर दिलेला आहे. शीख धर्मात गुरू नानक यांनी ‘कोणीही माझा शत्रू नाही’, असे जाहीरपणे मांडले. पुढील काळात गुरू गोविंद सिंग यांनी न्याय्य युद्धाची कल्पना मांडली. ज्यू धर्मात प्रेषित मोझेस यांनी ‘कोणाचीही हत्या करू नये’ असे म्हटले. तसेच स्वतःच्या बचावासाठी न्याय्य युद्धाच्या बाजूने विचार मांडले आहेत. ख्रिश्चन धर्मविचारात काळाच्या विविध टप्प्यांवर शांती, न्याय आणि पवित्र युद्ध यावर विचार मांडलेले आहेत. यापैकी शांतीचा विचार प्रेषित येशूख्रिस्त यांच्या विचारांच्या जवळचा आहे; कारण ते म्हणाले होते ‘शत्रूवरही प्रेम करा’. ‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ अल्लाशरणता आणि शांती असा आहे. ‘जिहाद’ या अरबी शब्दाचा अर्थ आहे संघर्ष, झगडा. हा संघर्ष दोन प्रकारचा असतो. एक स्वतःमधील हीन प्रवृत्ती, विचार, जसे स्वार्थ, मोह या गोष्टी कमी करण्यासाठी स्वतःशी केलेला संघर्ष, झगडा, प्रयत्न. या संघर्षाला, ‘जिहाद’ला प्रेषित मोहंमद अल्-जिहाद उल-अकबर ‘महान पवित्र युद्ध’ असे म्हणतात. बचावासाठी केलेल्या युद्धातील हिंसेला अल-जिहाद-उल-अश्गर ‘अल्प पवित्र युद्ध’ असे म्हणतात. स्वतःचा बचाव करण्यासाठी करावे लागणारे युद्ध योग्य असले, तरी शांती सर्वात श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे.
हिंसेचे चक्र
धर्म-जात या ओळखीशी निगडित तीव्र द्वेष मनामनांत कसा पेरला जातो हा प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतो. त्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या मनात फिरणारे हिंसेचे चक्र समजून घेऊया. या चक्राचे प्रमुख टप्पे असे आहेत.
पहिला टप्पा ओळखीचा असतो. आपल्या प्रत्येकाची नाव, कुटुंब, पेशा, भाषा, शिक्षण, स्वभाव गुणधर्म, छंद, लिंग, वर्ग, वर्ण, जात, धर्म, प्रदेश, गाव, राहण्याचे ठिकाण, देश… अशी असंख्य पदरी ओळख आहे. यातील काही पदर हे आपण समूहाचे, गटाचे, विभागाचे सदस्य असल्याचे स्पष्ट करतात. काही व्यक्तिगत वैशिष्ट्ये स्पष्ट करतात. काही जन्माच्या वेळेपासूनचे असतात आणि काही नंतर तयार झालेले असतात. वेगवेगळ्या वेळी त्यातील विशिष्ट संदर्भ महत्त्वाचे असतात. त्यामधे आंतर्विरोधही असतात. ओळखीशी निगडित असलेले संदर्भ गतिशील व बहुपदरी असतात.
दुसरा टप्पा असतो अस्मिता आणि अभिमान यांचा. आपल्या ओळखीशी निगडित असलेल्या वेगळेपणाचे सर्वांनाच महत्त्व असते. काही भागांचा आपल्याला विशेष अभिमान वाटतो. अभिमानाशी निगडित अस्मिता तयार होतात. गतिशीलता आणि बहुपदरीपण बाजूला सारले जाते. ओळखीमध्ये एकसुरीपण आणि स्थितिशीलता येते.
तिसरा टप्पा असतो गैरसमज आणि पूर्वग्रह यांचा. व्यक्तिशः ज्या गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटतो आणि ज्या अस्मिता जपाव्याशा वाटतात, त्याकडे काळजीपूर्वक पाहिले, की लक्षात येते, की प्रत्येक जण आजूबाजूच्या गुंतागुंतीच्या समाजाची ‘आपण’ व ‘ते’ अशी विभागणी करतो. सहज बोलताना ‘आपल्यात’ असे असते का? असे विचारतो. आपल्याला ‘ते’ ची ओळख आणि वेगळेपण माहीत नसते. आपले अज्ञान असते. बहुतेकवेळा ‘ते’ बद्दल आपले गैरसमज व पूर्वग्रह असतात.
चौथा टप्पा असतो दुरभिमान, द्वेष यांचा. अनेकवेळा ‘आपण’ व ‘ते’ ची विभागणी साचेबंद होते. गैरसमज, पूर्वग्रह तपासून बघण्याच्या मानसिकतेचा संकोच होतो. दुरभिमान वाढीस लागतो. ‘ते’ बद्दल भीती व असुरक्षितता वाटू लागते. ‘ते’ बद्दल तिरस्कार, राग येतो. त्यामुळे ‘ते’ चा द्वेष करणे शूरपणाचे व स्वतःच्या बचावासाठी गरजेचे वाटते. ‘ते’ ला धडा शिकवणे निकडीचे वाटायला लागते. ‘ते’ बद्दल तीव्र द्वेष प्रबळ झाल्याने त्याला नष्ट केले, तरच कायमचा प्रश्न सुटेल असे वाटते. अशा विचारांना ‘नैतिकता’ दिली जाते.
पाचवा टप्पा असतो हिंसेचा. आपणही अशा प्रकारे धडा शिकवण्याच्या विचारांना नैतिक समर्थन देऊ लागतो. ‘ते’ ‘शत्रू’ असतात. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणे योग्य होते. शत्रूला धडा शिकवणे नैतिक बनते.
ओळख, वेगळेपण, अस्मिता, अभिमान, गैरसमज, पूर्वग्रह, दुरभिमान, द्वेष आणि हिंसा असे हिंसेच्या चक्रातील टप्पे सांगता येतात. हिंसेचे चक्र समाजात आणि प्रत्येकाच्या मनात कसे चालू राहते हे तपासून पाहता येते. हे दुष्टचक्र प्रगतीला खीळ घालते. शांती नष्ट करते. हिंसा वाढवते. ओळखीमधील वेगळेपणात काही गैर नसते. आपण सर्वजण वेगवेगळे आहोत. म्हणून तर जीवन एकसुरी होत नाही. पण ओळखीच्या सोबत चिकटलेल्या अस्मिता, अभिमान, गैरसमज, पूर्वग्रह, दुरभिमान, द्वेष आणि हिंसा हे चढत्या क्रमाने त्याज्य आहेत.
वरील टप्पे एक उदाहरण घेऊन स्पष्ट करूया. साधारण 1980 च्या दशकात ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा संदेश घर, दार, कार्यालय, रस्ते, चौक सर्व ठिकाणी लावण्यात आला. ओळखीमधील विविधता आणि गतिशीलता कुंठित करत केवळ ‘हिंदू’ ही ओळख ठसवण्यात आली. ‘ते’ म्हणजेच जे ‘आपण’ नाहीत ‘ते’, म्हणजे मुस्लीम आणि ख्रिश्चन. ‘त्यांच्या’बद्दल अव्याहत गैरसमज पसरवले. त्यातून तिरस्कार, राग, द्वेष या भावना पेटवत ठेवल्या. हिंसेला ‘देशप्रेम’ म्हणण्याइतपत समाजातील नैतिकता घसरली. आपल्यासारखी संवेदनशील माणसे अस्वस्थ आहेत. प्रत्यक्ष हिंसेचे समर्थन करणार नाहीत. आठवतेय, कोविड पसरण्यासाठी दिल्लीमधील मरकजसारखे धार्मिक संमेलन कारणीभूत झाले, असे अनेकांना वाटून गेले. गैरसमज होण्याचा टप्पा आपण गाठला होता. वास्तविक संमेलन-सहभागींची अडवणूक केली होती, हे सत्य नंतर समोर आले.
हिंसा चक्राला भौतिक आधार आहेत. हिंसा सत्तेशी जोडलेली असते. आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिमांचे राक्षसीकरण करणे खनिज तेलाच्या सत्तासंघर्षाशी जोडलेले आहे. राष्ट्रीय पातळीवर मुस्लीम राक्षसीकरण बहुसंख्याक ब्राह्मण्यवादी हिंदूराष्ट्र बनवण्याच्या सत्तासंघर्षाशी जोडलेले आहे.
आपल्या ओळखींतील बहुविधता आणि गतिशीलता केवळ ‘सहन’ करणे नव्हे, तर त्या समजून घेत त्या साजर्या करण्याची क्षमता वाढवायला हवी. तर आणि तरच आपली हिंसेच्या चक्रातून सुटका होईल आणि लोकशाही देखील रुजेल.
