खेळघराच्या कामाची सुरुवात जीवन कौशल्यांच्या ( life skills ) कामापासूनच झाली खरेतर… शालेय विषयासंदर्भातील काम नंतरच्या काळात आकाराला आले. मात्र ह्या विषयाचा परीघ एवढा मोठा आणि गुंतागुंतीचा आहे की त्यासंदर्भात आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ह्याची स्पष्टता येत नव्हती.
१५ – १८ डिसेंबर २०२५ या काळात पहिल्यांदाच जीवन कौशल्ये या विषयावरची कार्यशाळा आयोजित केली होती. त्या निमित्ताने या विषयाचा नेटका आणि सुस्पष्ट content तयार व्हायला मदत झाली.
मुलांनी आनंदाने, आत्मविश्वासाने आणि संवेदन जाण्यासाठी सक्षम व्हावे हे जीवन कौशल्यांच्या शिक्षणाचे ध्येय…हे आम्ही ठरवले होते आणि त्यानुसार मुलांबरोबर काम पण चालू आहे.
पुढे जाऊन जीवन कौशल्ये म्हणजे नेमके काय, त्यातील आशयाचा आपल्या मुलांसाठी सुयोग्य असा आवाका, मुलांबरोबर काम करताना या विषयाचे ध्येय काय? पद्धती कशी असावी, साधने कोणती असावी? असे सर्वसमावेशक फ्रेमवर्क या कार्यशाळेच्या निमित्ताने तयार झाले.
विचार करणे, शिकण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्ये, संवाद कौशल्ये, स्वयंशिस्त, स्वतःला आणि इतरांना समजून घेणे असा विषयांच्या सत्रांची आखणी केली होती. या साऱ्याला अस्तर होते, मुलांबरोबरचे शिक्षकाचे नाते आणि वर्गातील वातावरण कसे असावे या नीतीचे! आस्था, आदर, विश्वास आणि संवाद या पायावर शिकण्या शिकवण्याचे सर्जनशील काम आकार घेईल.
खेळ, कला, संवाद, पुस्तके आणि विशेष कार्यक्रम या साधनाच्या माध्यमातून केलेले मुलांबरोबरचे काम कसे आत्मसात होते याची प्रत्यक्ष अनुभूती सहभागीना मिळाली.
मूल कसे शिकते या संदर्भातील संशोधनाच्या पायावर वर्गाची आखणी, प्रत्यक्ष वर्ग घेणे आणि वर्ग नियंत्रण ही रीत हा कार्यशाळेचा महत्वाचा भाग होती.
कार्यशाळेत छोट्या गटांतील संवादाला, reflections ना भरपूर वेळ दिला होता. त्यामुळे स्वतःच्या धारणा आणि पूर्वग्रह तपासून बघणे, चिकित्सक विचार करून स्वतः ही मूल्ये आत्मसात करण्याची प्रेरणा कार्यकर्त्यांमध्ये जागी झाली.
राधा जोशी, ज्योती कुदळे आणि मी पूर्ण वेळ कार्यशाळेच्या प्रक्रियेत सहभागी होतो. सुमित्रा मराठे यांनी चिकित्सक विचार या क्षमतेवर सत्र घेतले तर वंदना कुलकर्णी यांनी समावेशी पुस्तके या साधनाची ओळख करून दिली
खेळघर टीमचा सपोर्ट कंटेंट डिझाइन करण्यापासून प्रत्यक्ष कार्यशाळा पार पडण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत होताच.
वंचित समुदायांमधील मुलांसमवेत काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या संस्थांमधून आलेल्या सुमारे २५ सहभागींच्या मनापासून सहभागातून ही कार्यशाळा अतिशय harmonious बनली.
ह्या वातावरणातून आम्हा सर्वांनाच मिळालेली प्रेरणा दीर्घकाळ तेवत राहील.
शुभदा जोशी

