परेश जयश्री मनोहर
शोभा भागवत यांनी बालसंगोपनाच्या क्षेत्रात अत्यंत मूलभूत असं काम केलेलं आहे. ‘मूल नावाचं सुंदर कोडं’पासून ते ‘गारांचा पाऊस’पर्यंत त्यांनी लिहिलेली पुस्तकं असोत किंवा गिजुभाई बधेकांच्या ‘दिवास्वप्न’पासून ‘प्रिय बाई’सारख्या पुस्तकांचे त्यांनी केलेले अनुवाद असोत, गरवारे बालभवनच्या ‘कजा कजा मरू’ प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित केलेली पुस्तकं असोत… छोट्यांच्या विश्वातले अत्यंत महत्त्वाचे विषय शोभाताईंनी मराठी वाचकांसमोर आणले आहेत.
‘गरवारे बालभवन’ संस्थेची उभारणी, अशा संस्था ठिकठिकाणी निर्माण व्हाव्यात यासाठी घेतलेले प्रशिक्षण-कार्यक्रम, आधीच्या काळात प्रौढ शिक्षणासाठी केलेलं काम, तरुणांना सहजीवनाचं महत्त्व सांगणाऱ्या ‘जीवनसाथ’ सारख्या संवादगटाची उभारणी असा सारा त्यांच्या कार्य-कर्तृत्वाचा पट आहे. त्यांतलं वैविध्य पाहिलं, तर लक्षात येतं, की शोभाताई सातत्यानं वेगवेगळे विषय मुळातून समजावून घेऊन त्यात काम करत राहिल्या.
अत्यंत समृद्ध आणि भावसंपन्न आयुष्य जगून २०२३ मध्ये शोभाताई आपल्यातून निघून गेल्या. त्यांच्या जाण्याला दोन वर्षं होत असताना त्यांच्या सुहृदांनी त्यांची आठवण चिरंतन ठेवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे ‘झऱ्यातलं आकाश’ हे पुस्तक.
अनेक अंगांनी समरसून जीवन जगलेल्या व्यक्तीचं ढोबळमानानं लिहिलेलं चरित्र किंवा आपल्या जवळच्या माणसाच्या आठवणी जागवण्यासाठी केलेली धडपड एवढंच या पुस्तकाचं मोल नाही, तर ज्या साक्षेपी वृत्तीनं शोभाताई जगल्या, जी जीवनदृष्टी त्यांनी आयुष्यभर जपली, विकसित करत नेली त्याचा अत्यंत मनापासून घेतलेला मागोवा म्हणजे हे पुस्तक आहे.
पुस्तकात तीन विभाग आहेत. २०१८ मध्ये समीर शिपूरकर यांनी घेतलेली शोभाताईंची प्रदीर्घ मुलाखत, शोभाताईंच्या कुटुंबातील सदस्यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी आणि शोभाताईंच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या बालभवनमधील सहकाऱ्यांनी, तायांनी मांडलेला त्यांच्या आठवणींचा पट असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.
मुलाखतीमधून शोभाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर येतात. अगदी लहानपणापासून त्यांचं आपल्या मतांवर ठाम असणं, फक्त पत्रलेखनातून अनिलवर प्रेम करणं आणि अमेरिकेत जाऊन अत्यंत साध्या पद्धतीनं त्यांच्याशी लग्न करणं… सारंच थक्क करणारं. बरं हा काळ होता सत्तरच्या दशकातला. तेव्हा कोणी असा विचारही केला नसता. आपल्या गाडीनं अनिलसोबत पूर्ण युरोप ‘ड्राइव्ह’ करत फिरणं, पुढे भारतात येऊन भारतीय शिक्षण संस्था (आयआयइ) बरोबर प्रौढ-शिक्षणाचं काम करणं, कष्टकरी महिलांचे कष्ट समजून घेण्यासाठी डोक्यावर बारा विटांची चळत घेऊन चार मजले चढून जाणं, महत्त्वाची मूलभूत तत्त्वं शिकून घेताना लहान-मोठा असा वयाचा अडसर न मानणं… अशी त्यांची अनेक रूपं बघायला मिळतात. फक्त शोभाताईंचं जीवनच नाही, तर गरवारे बालभवनसारख्या अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या संस्थेची उभारणी आणि विस्तार कसा झाला हे समजून घेण्यासाठी ही मुलाखत एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे.
दुसऱ्या भागात प्रामुख्यानं शोभाताईंची मुलं, भावंडं आणि भाचरांनी ताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. बरेचदा आपण आपल्या आयुष्यात जे निर्णय घेतो त्याच्या विरुद्ध निर्णय आपण मुलांच्या आयुष्यात घेण्याचा प्रयत्न करतो किंवा अनावश्यक पद्धतीनं त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत असतो. मुलांना वाढवताना, भाचरांना त्यांच्या आयुष्यात मदत करताना शोभाताईंनी ज्या प्रकारे लोकशाही मूल्यांचं पालन केलं, कोणत्याही टोकाला न जाता सुवर्णमध्य साधत दोन्ही पिढ्यांमधलं अंतर मिटवायचा जो आदर्श घालून दिला तो आमच्या आजच्या पालक-पिढीनं नीट शिकून घेण्यासारखा आहे.
‘मनसोक्त हुंदडण्यासाठी बालभवन’ या तिसऱ्या भागात डॉ. श्रीधर राजेपाठक, शामलाताई वनारसे, अरविंद गुप्ता, विदुला म्हैसकर अशा ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींपासून नितीन सातव वगैरे बालभवनच्या पहिल्या बॅचमधल्या मुलांची मनोगतं वाचायला मिळतात. शोभाताईंच्या आठवणींच्या निमितानं ‘बालभवन’ची बांधणी कशी झाली, संस्थेचं वेगळेपण कशात आहे, इतर संस्थांची बांधणी होण्यासाठी बालभवननं सातत्यानं घेतलेले प्रशिक्षण-कार्यक्रम ह्या साऱ्यात शोभाताईंचं योगदान अधोरेखित होतं.
आपल्या तत्त्वांवर पूर्ण विश्वास ठेवून आणि आयुष्यभर शिकती राहून व्यक्ती स्वतःला एखाद्या क्षेत्रात झोकून देते तेव्हाच ‘बालभवन’सारख्या संकल्पना संस्थेचं रूप घेतात. आणि अशा संस्था उभारण्यासाठी शोभाताईंसारख्या माणसांचं ‘असणं’ आपल्या सगळ्या पिढ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे हे नेटकेपणानं मांडण्याचा प्रयत्न म्हणजे ‘झऱ्यातलं आकाश’ हे पुस्तक. अंजली मुळे यांनी या पुस्तकाचं संपादन केलेलं असून, अमलताश बुक्स या प्रकाशन संस्थेचे सुश्रुत कुलकर्णी यांनी पुस्तकाची देखणी निर्मिती केलेली आहे. एमकेसीएल चे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी लिहिलेली पुस्तकाची प्रस्तावनाही वाचनीय झालेली आहे.
बालशिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकानं, आपल्या मुलांवर विश्वास ठेवून त्यांना वाढवू पाहणाऱ्या प्रत्येक पालकानं आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नव्या व्यवस्था निर्माण करू पाहणाऱ्या प्रत्येक प्रशासकानं आवर्जून वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.
झऱ्यातलं आकाश
संपादन : अंजली मुळे
प्रकाशक : अमलताश बुक्स
किंमत : ४००/- रुपये
पुस्तक विकत घेण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधा –
गरवारे बालभवन
+९१ ७३९१० ०६९२०
अमलताश बुक्स
+९१ ७९७२८ २९१६५
परेश जयश्री मनोहर

paresh.jm@gmail.com
गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत.
